Home » Blog » साहित्य ही संस्कृती रचणारी महान शक्ती Delhi Sahitya Sammelan

साहित्य ही संस्कृती रचणारी महान शक्ती Delhi Sahitya Sammelan

दिल्ली येथे १९५४ साली झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या भाषणाचा संपादित अंश.

by प्रतिनिधी
0 comments

स्वागताध्यक्ष श्री. काकासाहेब गाडगीळ आणि मित्रहो!


मराठी साहित्य संमेलनाचे हे ३७ वे अधिवेशन दिल्ली येथे भारत संघराज्याच्या केंद्रस्थानी भरत आहे, हे मराठी साहित्याच्या उज्ज्वल भवितव्याचे सूचक आहे. भारताच्या संघराज्याची राजधानी म्हणूनच केवळ दिल्लीचे महत्त्व आपण समजत नाही. ती प्राचीन कालापासूनचे भारतीय संस्कृतीचे मुख्य केंद्र आहे, म्हणून दिल्लीचे महत्त्व आपण अधिक समजतो. या अधिवेशनाचा सर्वातिशायी विशेष म्हणजे भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या संमेलनाचे उद्घाटन केले हे होय. यात मोठे औचित्य आहे. पं. नेहरू भारतीय संस्कृतीचे प्रतीक व नवोदित विश्वव्यापी मानवी संस्कृतीच्या थोर संवेदनांशी संवादी अशा साहित्याचे श्रेष्ठ निर्माते आहेत. या भारतीय संस्कृतीच्या मुख्य केंद्राला व संघराज्याच्या मुख्य पीठाला अभिवादन करण्याकरिता हे संमेलन येथे भरत आहे. त्यामुळे मोठा सुंदर योगायोग साधला आहे. आधुनिक भारताचे द्रष्टे न्या. रानडे यांनी मराठी साहित्य संमेलनाला जन्म इ. स. १८८५ साली दिला आणि त्या मराठी साहित्य संमेलनाच्या ३७ व्या अधिवेशनाचे उद्घाटन आधुनिक स्वतंत्र भारताच्या एका थोर शिल्पकाराने केले आहे. या सुंदर योगायोगात फारच मोठी उचितता व सूचकता भरलेली आहे. (Delhi Sahitya Sammelan)


संकुचित सांस्कृतिक संघर्ष नको


या सूचकतेचा अभिप्राय असा आहे की, भारतातील माणसाने भविष्यकाळाकडे संपूर्ण दृष्टी ठेवून व भूतकाळाकडे पाठ फिरवून जीवनयात्रा केली पाहिजे. जरूर पडल्यासच सिंहावलोकन न्यायाने भूतकाळावर नजर टाकावी. विश्वशांतीच्या शक्तीने भरलेली एकात्मक, परंतु देशकालपरत्वे उत्पन्न होणाऱ्या वैशिष्ट्यांना संवादीपणे अंतर्भूत करणारी मानवसंस्कृती, हे या यात्रेचे अंतिम उद्दिष्टस्थान आहे. भारतीय संस्कृती हा त्याच विश्वव्यापी संस्कृतीचे एक स्वतंत्र आविष्करण आहे. संस्कृतीची प्रादेशिक वैचित्र्ये मानवी स्वातंत्र्याचीच गमके होत. संकुचित सांस्कृतिक संघर्ष पुरातन काळापासून सुरू आहे, असे इतिहास दाखवितो. हे जरी सत्य असले, तरी हा संघर्ष आता यापुढील मानवी प्रगतीकरिता व सार्वभौम मानवी विनाश टाळण्याकरिता समाप्त व्हावयास पाहिजे, हे अधिक महत्त्वाचे सत्य होय. मानवी स्वातंत्र्याच्या तत्त्वाचा स्पष्ट जाणिवेने निष्ठापूर्वक अंगीकार करणारी माणसे सांस्कृतिक प्रयत्न जितके अधिक करीत जातील तितका तितका सांस्कृतिक संघर्ष लोप पावत जाईल. आणि प्रादेशिक संस्कृती संवादी बनेल. संवादित्व जसे समानाकार घडविते तसे वैशिष्ट्यही टिकविते. (Delhi Sahitya Sammelan)


आधुनिक मराठी साहित्याचा जन्म


भारताच्या संघराज्याच्या जन्मास ज्या विविध प्रकारच्या चळवळी कारणीभूत झाल्या, त्या चळवळींचा एक प्रेरक मध्यबिंदू म्हणून आधुनिक मराठी साहित्य जन्मले आहे. मराठी साहित्याचा एकंदरीत उगम व विकास, चिरंतन अशा भारतीय संस्कृतीच्या अधिष्ठानावर झाला आहे. दुसरे असे की, आधुनिक काळातील मराठी वाङ्‌मयाच्या मुळाशी असलेली एक महत्त्वाची प्रेरणा भारतीय स्वातंत्र्याच्या जन्मास कारणीभूत झाली आहे. त्या प्रेरणेनेच भारतीय एकराष्ट्रीयत्वाची रचना केली आहे. एकराष्ट्रीयत्वाच्या प्रसूतिवेदना व संवेदना महाराष्ट्रभूमीने अनुभवल्या आहेत व ती अनुभवीत आहे. त्या अनुभवातच आधुनिक मराठी वाङ्‌मय विकास पावत आहे. संघराज्यावरील निष्ठेतच महाराष्ट्राची प्रतिष्ठा आहे, हे विशिष्ट मनोगत गेल्या शतकातील महाराष्ट्राचा इतिहास व्यक्त करीत आहे. संघराज्याच्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यामध्ये महाराष्ट्राने आपल्या वाट्यास आलेले कर्तव्य कसलीही कसूर न ठेवता पार पाडले आहे. आधुनिक मराठी वाङ्‌मय या गोष्टीची साक्ष सविनयपणे देत आहे. म्हणूनच या भारतीय संस्कृतीच्या केंद्राकडे महाराष्ट्रीय मन कायमचे ओढले गेले आहे. या मनाच्या संवेदना या केंद्राच्या दर्शनाने उल्हसित होत आहेत. या मनाला या दर्शनामुळेच प्राचीन भूतकाळापासून वर्तमानकाळापर्यंतच्या इतिहासाचा विशाल चित्रपट दिसू लागतो. विश्वचैतन्यात निनादून राहणारे, कुरुक्षेत्रात भगवंताने गायिलेले चिरंतन गीत येथे अधिक जवळून ऐकू येत आहे. त्या गीताचे स्वर बाहेर पडल्यानंतर अनेक मानवी युगे निघून गेली. त्या प्रत्येक युगात जे जे उच्चतम विचार द्रष्ट्यांच्या, प्रेषितांच्या, तत्त्ववेत्त्यांच्या व चिरस्थायी कलाकारांच्या कृतींनी प्रकट केले, त्याचे उचित स्वरसंमेलनही या गीताला साथ देत आहे. साध्ये व साधने आमच्या या उच्च भाविक जाणिवेच्या योगाने आमच्यावर ज्या ज्या नव्या जबाबदाऱ्या आल्या आहेत व जे जे नवे प्रश्न आमच्या पुढे उपस्थित झाले आहेत, त्यांचा अर्थ समजण्यास आम्हास सामर्थ्यच प्राप्त होईल. आम्हाला आमचे ध्येयवाद, विचार व आचार यांचा योग्य समन्वय साधून विसंगती नष्ट करावयाची आहे. आमची ध्येयेही अनेक असून त्यांच्यात विसंगतीही पुष्कळ आहे. त्या विसंगतीमुळे आमच्या विचारांत व प्रयत्नांत दोष उत्पन्न होतात. आमच्यात असलेली, मनुष्यस्वभावात सुलभपणे आढळणारी जरठ स्थान-पूजकता आमच्या उच्च नैतिक ध्येयांना बंधने घालीत आहे. ही विसंगती, दोष व बंधने निवारणारा समन्वयात्मक दृष्टिकोन आम्हास पाहिजे आहे. या दृष्टिकोनाच्या आश्रयाने मानवी विश्व, भारत राष्ट्र आणि महाराष्ट्रासारखे अवांतर प्रदेश यांच्यातील चळवळीत अविरोध स्थापन करणारे आणि त्याबरोबरच स्वतंत्र वैशिष्ट्यांचे पोषण करणारे साधन घडवावयाचे आहे. अशा प्रकारचे मुख्य साधन लोकशाही संस्कृती वा लोकशाही समाज हाच होय. विश्वव्यापी मानवी सहानुभूती व तिच्यातून निष्पन्न होणारी स्वातंत्र्य, समता व बंधुत्व ही बौद्धिक तत्त्वे जीवनात उतरणे व अनुभवणे या गोष्टीची गरज त्याकरिता आहे.


मानवी स्वातंत्र्याचे तत्त्व


मानवी स्वातंत्र्याच्या तत्त्वाच्या आश्रयाने विविध संस्कृतींचे स्थिर वैशिष्ट्य राखले जाते; परंतु त्याबरोबरच त्यातील संकुचित बंधनांचा विध्वंस करणारी प्रवृत्तीही निपजते. समतेच्या तत्त्वाचा आश्रय केल्याने भौतिक व आध्यात्मिक समृद्धीचे सार्वत्रिक वितरण करणारी चळवळ वाढीस लागून तद्नुरूप सामाजिक व राजकीय संस्था अस्तित्वात येतात. विश्वबंधुत्वाच्या तत्त्वाचे अवलंबन केल्याने स्वयंप्रेरित मानवी सहकार्याला सर्व प्रकारच्या मानवी प्रयत्नांच्या क्षेत्रांत प्राधान्य येते व त्यामुळे प्रादेशिक, राष्ट्रीय व जागतिक स्पर्धा हतवीर्य होते. लोकशिक्षणाशिवाय लोकशाही संस्कृती व लोकशाही समाज निर्माण करण्याची प्रक्रिया सफल होऊ शकत नाही. कारण विकसित स्वतंत्र समाज म्हणजेच लोकशाही समाज होय. लोकशाही संस्कृती अशाच समाजाचे आविष्करण असते. अशा सामाजिकतेची घडण शिक्षणाद्वारे वाङ्‌मय व कला करीत असतात. कारण, वाङ्‌मय आणि कला हे आध्यात्मिक व उदात्त अशा परस्पर सहयोगाचे एक उच्चतम साधन आहे. वाङ्‌मय व कला यांच्या उत्कृष्ट संवर्धनाच्या योगाने भाषा प्रगल्भदशेस येतात. प्रगल्भदशेस आलेल्या मातृभाषांच्या योगाने सार्वत्रिक लोकशक्षिण देणे शक्य आहे. प्रगल्भदशेस आलेल्या प्रादेशिक मातृभाषा ही भारतीय लोकशाहीची एक मुख्य गरज आहे. सामर्थ्यशाली एकराष्ट्रीयत्व निर्माण करण्याचा उद्देश सफल करण्याकरिता प्रादेशिक मातृभाषांची वाढ करणारे साहित्य कसे निर्माण होईल, हा साहित्य संमेलनांच्या चिंतेचा व चिंतनाचा विषय होय. सरकार व लोक, साहित्यिक व पंडित, शिक्षणसंस्था आणि शिक्षक यांना यासंबंधी मार्गदर्शन करणे हे आपल्या वर्तमान साहित्य संमेलनांचे मुख्य प्रयोजन होय; परंतु हेही येथे प्रामुख्याने लक्षात ठेवले पाहिजे की, साहित्याच्या वाढीची व्यवस्थित योजना संमेलने जरी आखू शकतात. तरी त्या योजना अमलात आणण्याची मुख्य जबाबदारी अखेरीस व्यक्तिश: साहित्यिक, प्राध्यापक व पंडित यांच्यावर पडत असते.साहित्यिक, प्राध्यापक व पंडित यांना त्याकरिता सरस्वतीची आराधना वसाधना करावी लागते. सूरसुंदरी सरस्वतीचे ध्यान रमणीय असते; परंतु तिची साधना सिद्ध होण्यास दीर्घ काळ प्रखर तपश्चर्याच करावी लागते. प्रखर तपश्चर्येचे कष्ट सरस्वतीच्या सुंदर ध्यानामुळेच सुसह्य होऊन समाधान देत असतात. त्यामुळेच प्रज्ञामय सविकल्प समाधी साधून साहित्याची सरसफळे सरस्वतीच्या प्रसादाने प्राप्त होतात. आदिपुरुषाने अभिध्यानरूप महातपातून हे विश्व निर्मिले, असे वेद वारंवार म्हणतात. हे वेदांचे म्हणणे मानवी विश्वाला म्हणजे संस्कृतीस अधिक समंजसपणे लागू पडते. अगणित युगांच्या चिरंतन महातपस्येतून माणसांनी संस्कृतीचे विश्व निर्माण केले आहे, असे इतिहासाचे सार आहे.

साहित्य ही संस्कृती रचणारी एक महान शक्ती होय. विश्वाचे अर्थ मानवी जीव पिंडात भरले जात असतानाच, मानवी रचना होत असते. विश्वाच्या अर्थांची किंवा अभिप्रायांची सुंदर रचना म्हणजेच साहित्य व कला होय. आपल्या वाङ्‌मय तपाचा क्रियाकलाप कोणता व त्यास साफल्य कसे प्राप्त होईल, याचे विवरण व संबंधाचा मूलभूत दृष्टिकोन मला या अध्यक्षीय भाषणात सांगावयाचा आहे. इतिहासाचे तत्त्वज्ञान, हे या दृष्टिकोनाचे अधिष्ठान आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक पार्श्वभूमी गृहीत धरून संस्कृतीचा इतिहास व वाङ्‌मयेतिहास यांचा परस्पर संबंध दर्शित करणे, हा या दृष्टिकोनाचा गाभा आहे. (Delhi Sahitya Sammelan)

वेनगंगा ते कृष्णवेणा

महाराष्ट्राचा विद्यमान प्रादेशिक विस्तार, उत्तरेकडून दक्षिणेकडे पाहिला असता, वेनगंगेपासून कृष्णवेणेपर्यंत दिसतो. महाभारतात कृष्णा नदीचे नाव ‘कृष्णवेणा’ असेच दिले आहे व इतर अनेक पुराणांतही ही संज्ञा आढळते. वेनगंगेतील ‘वेन’ व कृष्णवेणेतील ‘वेण’ हा शब्द त्या नद्यांच्या काठी वसाहत करणाऱ्या कृषिगणाचा दर्शक असू शकेल. उत्तरेकडील गंगाकाठचे लोक प्रथम गोदावरीच्या तीरी वसाहत करून राहू लागले, तेव्हा प्रयागचे नाव ‘प्रतिष्ठान’ हे त्यांनी गोदातीरावरील प्राचीन नगराला दिले. ‘पैठण’ हा शब्द ‘प्रतिष्ठान’ शब्दाचा अपभ्रंश होय, असे व्युत्पत्तिशास्त्राने सांगता येते. आपण इतिहासपूर्व काळातून प्राचीन इतिहासाच्या अंधुक प्रकाशात शिरतो तेव्हा इ.स.पूर्वच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या शतकात वैदिक धर्माचे पुरस्कर्ते सातवाहन राजे महाराष्ट्रात प्रथम राज्य स्थापून अश्वमेधादि अनेक यज्ञ करीत राज्यविस्तार करताना दिसू लागले. त्याच सुमारास झालेल्या मौर्य सम्राट अशोकवर्धनाचे संबंधही महाराष्ट्रात पोहोचलेले आपण पाहतो; परंतु महाराष्ट्राच्या राजकीय व सांस्कृतिक इतिहासात मौर्यांचा महत्त्वाचा हात होता, असे म्हणता येत नाही. सातवाहनांच्या पुराणप्रसिद्ध राजवंशाच्या राजकीय कारकीर्दीचा प्रारंभ महाराष्ट्रात झाला, याची साक्ष सह्याद्रीतील नाणेघाटात तपशीलवार मिळते. सातवाहनांनी वैदिक संस्कृतीचे पोषण महाराष्ट्रात केले. त्यानंतर वाकाटक व गुप्त यांच्या प्रभावाखाली महाराष्ट्रातील वैदिक संस्कृतीचे पोषण झाले. नंतर बौद्ध व जैन, शैव व वैष्णव यांचाही खोल प्रभाव महाराष्ट्रातील संस्कृतीवर पडला, तरी वैदिक संस्कृती टिकून राहिली. महाराष्ट्र हा कायमचा वेदस्थानच बनून राहिला. गृहस्थाश्रमी; परंतु अल्पसंतुष्ट पुरोहितवर्ग महाराष्ट्रातील नद्यांच्या तीरांवर वेदपारायण करीत शब्दब्रह्माच्या गंभीर नादात तल्लीन होऊन आतापर्यंत कायम राहिला. महाराष्ट्रात जितक्या वैदिक शाखांचे ब्राह्मण आजपर्यंतही टिकाव धरून राहिलेले आढळतात, तितक्या वैदिक शाखांचे ब्राह्मण दुसऱ्या कोणत्याही भाषिक प्रदेशांत सापडत नाहीत. संपूर्ण वेद कंठस्थ करून वेदपारायण करणाऱ्या, षडंगेजिव्हाग्री नाचविणाऱ्या व गरिबीतही समाधान मानणाऱ्या वैदिक गृहस्थांची परंपरा हजारो वर्षे येथे आजपर्यंत टिकून राहिली. यापुढे काय होणार, हे मात्र सांगणे कठीण आहे. बौद्ध, जैन, शैव व वैष्णव या धर्मांनी धार्मिक दृष्ट्या सर्व वर्णांना समान मानून येथील माणसांच्या मधील कलेची सर्जनशक्ती अधिक जागृत केली. त्या जागृतीने उद्बोधन पावलेली मानवी सामर्थ्ये स्थापत्यकलेची चिरस्थायी स्मारके निर्माण करून विराम पावली. ती सामर्थ्ये येथील सामान्य माणसांमध्ये समाजातील खालच्या वर्गापर्यंत संचारली होती. येथील पाथरवटांनी पर्वतांचे कडे व प्रचंड खडक फोडून त्यांच्या अंतरंगात चिरस्थायी सुंदर मंदिरे उभारली. भागवतधर्मी व बौद्धधर्मी राजांच्या लक्ष्मीने वरदहस्त त्यांच्यावर ठेवला होता, म्हणूनच ही विशाल स्थापत्यकला जन्मली, हे खरे आहे. परंतु लक्ष्मीच्या केवळ वरदहस्ताने कलेचा जन्म होत नाही. त्याकरिता नैतिक भावनांची व स्फूर्तीची भांडारे खोलावी लागतात. बुद्धाच्या संदेशाने आणि शैव व वैष्णव धर्माच्या आदेशांनी विश्वव्यापी अनुकंपा व शांती अनुभवणारी कलाकारांची हृदये या स्फूर्तीची भांडारे बनली होती. अजिंठा, वेरूळ, कार्ला, भाजे, जुन्नर, मुंबईची हस्तिगुंफा येथील विहारही अशा विश्वव्यापी नैतिक अनुभवाने भरलेल्या मुनींच्या व भक्तांच्याहृदयांची प्रतीके होत. (Delhi Sahitya Sammelan)

अनंत विश्वाच्या चैतन्याशी तन्मय झालेल्या अंत:करणाचे गाभार म्हणजेच वेरूळ, कार्ला, अजिंठा व हस्तिगुंफा येथील शैव व बौद्ध मंदिरे होत. उत्पत्ती, स्थिती व लय या विश्वचैतन्याच्या तीन बाजू हस्तिगुंफेतील त्रिमूर्तीत दिसतात. विश्वाची धारणा करणारे स्थिर नियम म्हणजेच हस्तिगुंफेतील दृढ व स्थिर स्तंभ होत. सामाजिक शक्ती विध्वंसक न होता रचनात्मक कार्यात परिणत झाल्याची ही चिरस्मारके होत. प्राचीन महाराष्ट्रात संस्कृतच्या प्रौढ वाङ्‌मयकाळात संस्कृत व प्राकृत भाषांना महाराष्ट्रातील साहित्यकारांनी एक स्वतंत्र सुंदर शैली प्राप्त करून दिली. ती शैली ‘वैदर्भी रीती’ म्हणून संस्कृत साहित्यशास्त्रात निर्दिष्ट केली आहे. भर्तृहरीने वैदर्भी रीतीत काव्य रचणाऱ्या कवींचा महिमा एका श्लोकात सूचित केला आहे; तो असा: ‘‘समोर गायन गायले जात आहे, बाजूला दाक्षिणात्य सरस कवी आहेत, पाठीशी चवऱ्या ढाळणाऱ्या रमणींच्या कंकणांचे नाद होत आहेत, असे असेल तरच संसार रसाच्या आस्वादावर लंपट हो! नाही तर, हे मना! मोठ्या साहसाने निर्विकल्प समाधीत दडी मार.’’ (Delhi Sahitya Sammelan)


गुणाढ्याची बृहत्कथा


गुणाढ्याची बृहत्कथा इसवी सनाच्या पूर्वीच पैठण येथे तयार झाली होती. त्या बृहत्कथेची कथा फारच मनोवेधक व सूचक आहे. तुकारामांची गाथा पाण्यात तरल्याची कथा जशी वाङ्‌मय मूल्याचा महिमा सूचित करते, तशीच गुणाढ्याची ही कथा आहे.
बृहत्कथा गुणाढ्याने पैशाचि भाषेत रचली. पैशाचि भाषा म्हणजे हिंदुस्थानच्या वायव्य प्रांताची प्राचीन प्राकृत भाषा होय. ही पैठण येथे गोदावरीच्या तीरी गुणाढ्याने रचली. त्यावेळी पैठण सातवाहन कुळाची राजधानी होती. सिंहासनस्थ राजाने या कवीची व कथाग्रंथाची उपेक्षा केली. त्यामुळे कवी वैतागला. आपल्या गुणाला किंमत नाही असे गुणाढ्याला वाटले. या ग्रंथाचे सात लाख श्लोक होते. तो कवी ही कथेची पोथी घेऊन जंगलात गेला. विमनस्क होऊन निराशेने या पोथीचे एकेक पत्र काढून अग्नीत टाकू लागला. धूर व जाळ होऊ लागला. एकेक पान जळत असता त्याच्या डोळ्यांतून अश्रू गळू लागले. त्या वनातील मुके पशू व पक्षीदेखील हे पाहून गहिवरून गेले. त्यांनाही अन्न-पाणी गोड लागेनासे झाले. रोज गुणाढ्य आपल्या पोथीची पाने जाळीत व रडत बसे. तो सुकत चालला. त्याच्याबरोबर वनातील प्राणीही सहानुभूतीने शोकाविष्ट होऊन सुकू लागले. त्या प्राण्यांची शिकार राजाच्या नित्य भोजनात असे. राजाला ते भोजन नीरस वाटू लागले. त्याने चौकशी केली. तेव्हा कळले की, वनातील प्राणीच सुकून चालले आहेत. राजाने कारणाचा तपास लावला. त्याला पश्चात्ताप झाला. गुणाढ्याला परत बोलाविले; परंतु तोपर्यंत सहा लक्ष श्लोक जळून एक लक्षच शिल्लक राहिले होते. यानंतरचा काळ भारतीय प्रादेशिक भाषांच्या प्रगल्भदशेच्या आरंभाचा काळ होय.

बंगाली, हिंदी, गुजराती, मराठी इत्यादी भाषा लेखनिविष्ट व ग्रंथनिबद्ध होण्याचा हा प्रारंभकाळ होय. उत्तरेकडून व दक्षिणेकडून दोन्ही बाजूंनी भक्तिधर्माचे प्रवाह महाराष्ट्रात येऊन यावेळी एकत्र मिसळले. पंढरपूरचा विठ्ठल या दोन प्रवाहांचे संगमस्थान बनला. मराठी भाषेची वेल या भक्तिधर्माच्या रसाने पोषण पावू लागली. या वेलीवर प्रथमच काव्यवाङ्‌मयाची पुष्पे बहरून डोलू लागली. विवेकसिंधु व अनुभवामृत यांच्या सिंचनाने भक्तिपुष्पांना अधिकच बहर आला. तत्त्वज्ञानाची बौद्धिकप्रमेये ज्ञानेश्वर महाराजांच्या योगाने काव्यात्मक बनली. महाराष्ट्रात भक्तिधर्माचे मुख्य अधिष्ठान भगवद्गीता बनली. हे महाराष्ट्राचे इतर प्रांतांपेक्षा वेगळे असलेले वैशिष्ट्य होय. गेल्या ६०० वर्षांत भगवद्गीतेची भाष्ये व टीका मराठीत जितक्या झाल्या, तितक्या इतर कोणत्याही प्रांतांच्या भाषांत झाल्या नाहीत. त्यामुळे येथील भक्तिधर्म व भक्तिभाव दैवी शृंगाररसापासून अलिप्त राहिला. द्रविड परंपरेतील भक्तिधर्माचाही अप्रत्यक्ष प्रभाव यास कारणीभूत झाला असावा. उत्तर प्रदेशात, बंगालात व गुजरातेतही या भक्तिधर्माचा उदय त्याचवेळी झाला होता; परंतु महाराष्ट्राने त्याचा अंगीकार फार सावधपणाने व विवेकपूर्ण रीतीने केला. उत्तर प्रदेश, बंगाल व गुजरात येथील वैष्णव धर्माचा भक्तिरस राधामाधवांच्या विलासात समरस झाला आहे. तेथील यतीदेखील राधारमणगोविंदात रत झाले; परंतु महाराष्ट्रातील गृहस्थाश्रमी संतांसाठी द्वारकेचा राणा झालेला गोपाल राधेला बाजूस सोडूनच महाराष्ट्रात आला आणि पंढरपुरात भीमेच्या तीरावर एकटा भक्तांची वाट पाहत उभा राहिला. इंद्रियलालसेचा लेश अप्रत्यक्षही सहन न करणाऱ्या भागवत धर्माची पताका महाराष्ट्राने उभारली. या भागवत धर्माने कौटुंबिक जीवनास शुद्ध बनविले. या भागवत धर्माने देवभक्तीच्या मिषात मिरवणाऱ्या जार-श्रृंगाराची प्रतिष्ठा मानली नाही. ‘‘छातीमध्ये छिनालगाणे’’ छाती काढून नाचू नये म्हणून ते आतल्या आत जिरवून टाकणाऱ्याजिवंत धर्माची निष्ठा भगवद्गीतेच्या अधिष्ठानावर वाढल्यामुळे मध्ययुगीन महाराष्ट्राचे नैतिक पुनरुज्जीवन झाले. ज्ञानेश्वरांपासून टिळकांपर्यंत मराठी वाङ्‌मय भगवद् गीतेच्या चिंतनात वाढले. श्रीमद् भागवतालाही महत्त्व पूर्वी आले होते, परंतु त्यातील कृष्णचरित्र सांगणारा दशमस्कंध गौण ठरला. एकादश स्कंधावरच एकनाथी भागवत उभे राहिले. भगवद् गीतेच्या खालोखाल रामायणाचा महिमा मराठी भाषेत गाजला. मराठीत छंदोबद्ध रामायणे अनेक आहेत, परंतु तुलसीदासांच्या ‘रामचरितमानस’ची बरोबरी करणारे रामायण मात्र मराठीत होऊ शकले नाही. भगवद्गीता व महाभारत यांनीच महाराष्ट्रच्या मनावर चिरंतन विजय मिळविला.

माझा अभंग माझी ओवी


आता जागतिक मानव समाजच जीवन मरणाच्या संशयात सापडला आहे. वर्तमानकाल हा मानव्यावरील संकटाचा काळ आहे. उदासीनता व निराशा घेरून टाकीत आहे. जीवनाबद्दल शिसारी उत्पन्नहोत आहे. त्यामुळे अधिक प्रत्ययशाली, सूक्ष्म संवेदनशील व मृदू मनाचा मराठी नवकवी आपल्या प्रतिभेबद्दल आदर बाळगण्यास तयार नाही. तो म्हणतो, ‘माझा अभंग माझी ओवी । नतद्रष्ट गाथा गोवी । इंजिनाविण गाडीजेवी, घरंगळे ।…. संत शब्दांचे नायक । शब्द अर्थांचे धुरंधर । एक शब्दांचाकिंकर । डफ्फर मी ।।’ (‘काही कविता’).
निराशेने तो ग्रासला आहे- ‘आशेचीच वात । आशेचेंच तूप । जळतें स्वरूप । निराशेचें ।।’
कारण सामाजिक जीवन म्हणजे एक ओंगळ देखावा आहे. अणु परमाणूंवर जरी मानवाची सत्ता विज्ञानाने स्थापिली असली, तरी शेवटी ‘मानव्याची होळी’ सत्तेचे राजकारण करील की काय, अशी भीती त्याच्या पुढे मूर्तिमंत उभी आहे. म्हणूनच चिंतेने त्याचे ‘रोमरंध्र शिणून’ गेले आहेत. ऐहिक जीवनाकडे वळलेली आधुनिक मराठी कविता मानवधर्मी भावनेच्या संगीतात रममाण झाली आहे. ऐहिक जीवननिष्ठेतून उद्भवलेल्या राष्ट्रधर्मीय शौर्य आणि करुणा यांच्या नृत्याची तिला साथ मिळाली आहे. वीर विनायकराव सावरकर शौर्याची व कारुण्याची सूक्ते गाणारे कवी व करुणरसाला स्वत:च्या आयुष्यातच मूर्त स्वरूपात आणणारे स्फूर्तिनिधानवीर होत. यांच्यामुळेच राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या अनेक शाहिरांना युयुत्सू व जयिष्णु वृत्तीचे स्फुरण चढले. प्रत्यक्ष अनुभवाचे रसरशीत अंगार असे काव्यखंड या शाहिरांनी चेतविले. ‘हे मातृभूमी तुजला मन वाहियेलें । वक्तृत्व वाग्विभवहि तुज अर्पियेलें’ अशी मातृभूमीला समर्पित असलेली ही कविता जन्मली. त्या मातृभूमिदेवतेच्या प्रीत्यर्थ करावयाच्या आत्मयज्ञाच्या स्थंडिलावर ‘बघ अतां मम देह ठेला’, असे उदात्त करुण स्वर त्या कवितेतून उचंबळून बाहेर आले. (Delhi Sahitya Sammelan)


मराठी कादंबरी


मराठीतील कादंबरीवाङ्‌मयाचा विवेचनात्मक इतिहास (मराठी कादंबरी, पहिले शतक, १८५० ते १९५०) प्रा. कुसुमावती देशपांडे यांनी नुकताच प्रसिद्ध केला आहे. आधुनिक मराठीत कादंबरी वाङ्‌मय हे इतर वाङ्‌मय प्रकारांशी तुलना करता अत्यंत विपुल, वैचित्र्यपूर्ण व अधिक गुणान्वित आहे. या कादंबरी वाङ्‌मयाच्या विस्तारामुळे एकंदरीत मराठी गद्याची शैली खूपच सुधारली आहे. बोध वाङ्‌मयाच्या शैलीवर या कादंबरी वाङ्‌मयाने महान उपकार केला आहे. आतापर्यंत परकीय भाषेतच सर्व प्रकारचे उच्च शिक्षण दिले जात असल्यामुळे बोध वाङ्‌मय त्रुटित, अल्प व दरिद्री राहिले आहे; परंतु इतिहास, तत्त्वज्ञान, सामाजिकशास्त्रे इत्यादी प्रकारच्या बोधवाङ्‌मयाच्या अप्रतिहत संचाराला व विस्ताराला आवश्यक असलेली संपन्नशैली मराठी कादंबरी वाङ्‌मयाच्या अनुग्रहामुळेच लाभणार आहे. नवीन जागतिक व सांस्कृतिक इतिहास प्रसन्न व चित्तवेधक कसा लिहावा, हे ऐतिहासिक कादंबऱ्या शिकवितील. सामाजिक वस्तुस्थितीच्या अनुभवाचे सार ध्यानात येईल, अशी सामाजिक शास्त्रे अर्थपूर्णपणे लिहिण्याकरिता सामाजिक व राष्ट्रीय प्रश्नांवर आधारलेल्या कादंबऱ्यांचा उपयोग होणार आहे. तत्त्वज्ञान, विशेषत: मानसशास्त्र व नीतिशास्त्र सुबोध करण्यास तत्त्वचर्चांनी अवगुंठित असलेल्या कादंबऱ्या मदत करतील. कामुकता, लैंगिकता, स्त्रैणता, गुन्हेगारी व बाजारबुणग्या अशा स्वैर मानवी प्रवृत्ती यांना रंगविणाऱ्या साहित्याला बाजार सर्वत्रच असतो, तसा मराठीतही आहे. तशाही प्रचुर साहित्याची गटारे समाजात बाजूस वाहत असतात. त्यांच्यावर कायदा हा उपाय योजू नये. कारण कायद्याचा दुरुपयोग होऊ शकतो व कळत नकळत तो लेखन स्वातंत्र्यावरच घाला घालू शकतो. उच्च अभिरुचीचा समाज तयार करणे एवढाच खराखुरा उपाय यावर आहे. कादंबरीकडे वळणे म्हणजे मानवी विश्वाकडे जाणे होय. विशाल नैसर्गिकविश्वाच्या व मानवी जीवनाच्या भावात्मक अनुभवावर काव्यसंसार सजतअसतो. उलट, कादंबरी केवळ मानवी विश्वाच्या कल्पनेवरच उभारली जाते. कादंबरी ही मानवी विश्वाची व्यक्तिकेंद्रित रचना होय. मानवी इतिहासाचे काल्पनिक दर्शन म्हणजे कादंबरी नव्हे.

कादंबरी व्यक्तिनिष्ठ असते. त्यातील कौटुंबिक व सामाजिक विश्व व्यक्तिचरित्रावर केंद्रित झालेले असते. व्यक्तीची महती हे आधुनिक युगाने मानलेले व गृहीत धरलेले श्रेष्ठमूल्य आहे. मराठी काव्याला व नाटकाला पूर्वकाल आहे, तसा कादंबरीला नाही; पण मनुष्यस्वभाव पूर्वपरंपरेला धरून वर्तमान व भविष्यकालाकडे पाहण्याचा असतो. म्हणून नवलकथा वाङ्‌मयाला ‘कादंबरी’ ही बाणभट्टाच्या कथेची संज्ञा देऊन परंपरेवरची आसक्ती मराठी माणसाने व्यक्त केली आहे. मराठीमध्ये प्रथम पाश्चात्त्य कादंबऱ्यांच्या भाषांतराने वा रूपांतराने कादंबरी वाङ्‌मयाला प्रारंभ झाला. या रूपांतराचा सुधारलेला व उत्कृष्ट नमुना म्हणजे मराठीतील ‘वाईकर भटजी’ ही कादंबरी होय. गोल्ड स्मिथच्या ‘व्हीकार ऑफ वेकफिल्ड’ या कादंबरीचे ते रूपांतर आहे.सरकारी नोकरी करून किंवा तत्सम व्यवसाय करून थकल्या भागलेल्या साक्षर वा सुशिक्षित लोकांना करमणुकीच्या वाङ्‌मयाची गरज असते. मध्ययुगीन कालात निर्माण झालेले पौराणिक कथावाङ्‌मय आधुनिक माणसांची तहान भागण्यास अपुरे पडत होते. इंग्लिश शिक्षणाच्या अनुग्रहाने कल्पनाकुशल झालेल्या लेखकवर्गाला यामुळे चांगली संधी मिळाली. विपुल कादंबऱ्या प्रसिद्ध होऊ लागल्या. या वाङ्‌मयाला उत्तम बाजार मिळाला. अजूनपर्यंत कादंबरी वाङ्‌मयाचा बाजारच तेजीचा राहिला आहे. मराठीत दुसऱ्या कोणत्याही वाङ्‌मयाला खराखुरा बाजारच नाही. याचा अर्थ असा नव्हे की, मराठीतील लघुकथा व कादंबऱ्या हे बाजारी वाङ्‌मयच बनले आहे. पाश्चात्त्य कादंबऱ्या वा लघुकथांच्या तोडीचे शिल्प व कल्पनासामर्थ्य असलेल्या मोठ्या सिद्धहस्त, शैलीशाली, कल्पनाविलासी व सराईत लेखकांची वंशवेल गेल्या शंभर वर्षांत विस्तारलेली दृग्गोचर होते. कुसुमावतीबार्इंचा कादंबरी वाङ्‌मयाचा इतिहास आपणास या वंशवेलीची कल्पना चांगली करून देतो. महाराष्ट्रातील, भारतातील व एकंदरीत मानवी समाजातील सामाजिक व राजकीय परिवर्तनाचे व आंदोलनाचे सुभग व प्रसन्न असे चित्र व चरित्र मराठी कादंबरी वाङ्‌मयात पाहावयास व वाचावयास सापडते. पितृप्रधान किंवा पुरुषप्रधान एकत्रित कुटुंबसंस्था विस्कळीत होऊ लागल्यामुळे व स्त्रीचे व्यक्तित्व विकसित व्हावे अशी नवी वासना प्रादुर्भूत झाल्यामुळे उत्पन्न झालेल्या कौटुंबिक विग्रहाचे प्रश्न मराठी कादंबरीचा विषय झाला आहे. पाश्चात्त्य साम्राज्यशाहीच्या शोषणामुळे उत्पन्न झालेल्या दारिद्र्याची झळ लागून व्यथित झालेल्या जीवनाचे प्रश्नही मराठी कादंबरीस विषय पुरवीत आहेत. भारतीय धार्मिक समाजरचना, पवित्र जातिसंस्था, तिचे अर्थशास्त्र व विधिनिषेधात्मक आचार यांच्यात विसंगती, गोंधळ व बेबंदशाही माजून उत्पन्न झालेल्या प्रश्नांच्या गाठी सोडविण्याचे कामही आधुनिक मराठी कादंबरीला मिळाले आहे. हिंदुस्थानात अस्तित्वात आलेल्या नवीन भांडवलशाहीने निर्माण केलेला मजुरांचा व बेकारीचा प्रश्नही मराठी कादंबरीचा विषय बनला आहे. राष्ट्रीय स्वातंत्र्याची चळवळ व अन्य राष्ट्रीय आंदोलने यांनीही मराठी कादंबरीला भरपूर विषय दिले आहेत. नवसामाजिक रचनेचे व क्रांतीचे तत्त्वज्ञान आणि ध्येयवादही मराठी कादंबरी व लघुकथा वाङ्‌मयांची निर्मिती करणाऱ्या कल्पनाशक्तीला साहाय्य देत आहे. व्यक्तींच्या सुख-दु:खांना प्रगल्भ वाचा मराठी कादंबरी वाङ्‌मयाने दिली आहे. हे वाङ्‌मय नवीन उदयाला येणाऱ्या लोकशाही संस्कृतीचे आगाऊ पडलेले मानसिक प्रतिबिंब होय, असे म्हटले तरी चालेल. या बाबतीत लघुकथा वाङ्‌मयाचे महत्त्व असामान्य आहे. सामान्य माणसाच्या वैयक्तिक जीवनाची उत्कट अनुभूती, हे लघुकथेचे रहस्य आहे. व्यक्तित्वाबद्दलच्या गाढ सहानुभूतीतून लघुकथा उत्पन्न होते व वाचकांतील सहानुभूतीला जागविते.


पुराणकथेतल्या शोकांतिका


भारतीय पुराणकथेत अनेक महत्त्वाच्या शोकांतिका आहेत. राम व कृष्ण यांचा अंत अत्यंत दुर्दैवी व करुण आहे. परंतु सहस्रावधी वर्षांपूर्वीच त्यांना ईश्वर बनविले. त्यामुळे त्यांचा करुण अंत त्या ईश्वरी स्वरूपात विलीन होऊन नि:शेष झाला आहे. महात्मा गांधींचे जीवनही भव्य दु:खांतिकेचाच विषय आहे; परंतु महात्मा गांधी पुनर्जन्म तत्त्वाने अमर केले आहेत. मराठी वाङ्‌मयाचा समग्र इतिहास मराठी वाङ्‌मयाचा समग्र इतिहास लिहिण्याची आता योग्य वेळ आहे. त्याची पूर्वतयारी होत आहे व काही अंशी झाली आहे. आतापर्यंतचे उच्चशिक्षण इंग्लिश भाषेच्या माध्यमातूनच झाल्यामुळे व परकीय राज्यात निर्माण झालेल्या शिक्षणसंस्थांचा उद्देश व विस्तार केवळ अल्पसंख्याकांपुरताच मर्यादित झाल्यामुळे शास्त्रीय किंवा बौद्धिक वाङ्‌मय अपुरे व दरिद्री राहिले; परंतु आता नव्या स्वतंत्र भारताच्या कालखंडात आपण प्रवेश केला आहे; त्याचा विशाल बौद्धिक पाया निर्माण करावा लागणार आहे. सामाजिक व भौतिक शास्त्रविषयक ग्रंथांची निर्मिती भारतीय प्रादेशिक भाषांमध्ये करणे, हे आपले आद्य व श्रेष्ठ कर्तव्य आहे. त्याकरिता मागील कालखंडातील मराठी वाङ्‌मयाचा संपूर्ण इतिहास लिहून त्याचा पुरा आढावा घेतला पाहिजे.


प्रादेशिक भाषांची वाढ


प्रादेशिक भाषांच्या वाढीचा कठीण प्रश्न देश्य भाषांची किंवा मराठी भाषेची योग्यता अद्ययावत उच्चशिक्षणाचे प्रभावी साधन म्हणून अजून वाढावयाची आहे. मराठी किंवा देश्य भाषा असे साधन बनावे अशी बळकट उत्कंठा कोठे आहे? मराठीत किंवा देश्य भाषेतच परिश्रमपूर्वक मोठमोठे ग्रंथ रचीन, अशी भीष्मप्रतिज्ञा केलेला प्राध्यापकांचा व पंडितांचा वर्गच आज दिसत नाही व तसा आग्रहही कोठे दिसत नाही. असे थोडेच सुशिक्षित व पंडित गेल्या शतकात झाले. जे काही पाश्चात्त्य विद्याविभूषित व्यासंगी पंडित झाले. त्यांनी आतापर्यंत या गेल्या शतकात इंग्रजीचीच वाढ केली. समुद्रास एखादी नदी मिळाली म्हणून समुद्राची मर्यादा वाढलेली दिसत नसते. इंग्रजी भाषेच्या समुद्रात भारतीय आधुनिक शिक्षितांनी आपल्या वाङ्‌मयाचा छोटासा पाट नेऊन मिळवला आहे. त्यामुळे प्रादेशिक भाषानदी कोरडीच राहिली. भिन्न भिन्न विषयांत प्रवीण असलेल्या प्राध्यापकांची आजपर्यंतची संख्या मोजली तर फार मोठी भरेल; परंतु त्यांनी प्रादेशिक भाषांची अक्षम्य उपेक्षाच केली आहे. परकीय सरकारने व त्या सरकारच्या स्थापलेल्या शैक्षणिक संस्थांनी उपेक्षावृत्तीने प्रादेशिक भाषांची दीर्घकाल उपासमार केली आहे. हा मोठा गुन्हा घडला आहे. या गुन्ह्याचे परिमार्जन करण्याची जबाबदारी आता आपल्या विश्वविद्यालयीन प्राध्यापकांनी व इतर आंग्ल विद्याविभूषितांनी आपल्यावर घेतली पाहिजे. सध्याच्या लोकशाही सरकारने प्रादेशिक भाषांची व नव्या विद्यांची मोठमोठी ग्रंथभांडारे उभारली जावी म्हणून अशा प्रयत्नांना संघटित व व्यवस्थित मूर्तिमंत रूप देण्याकरिता नव्या संस्थांची साधने उपलब्ध करून द्यावीत. प्रादेशिक भाषांमध्ये आधुनिक विद्याविषयक ग्रंथविस्तार होण्यास आवश्यक असलेल्या सामान्य शब्दांची, पारिभाषिक पदांची व वाक्प्रचारांची बरीच वाण आहे. ही वाण भरून काढण्यास तीन प्रकारचे प्रयत्न एकसमयावच्छेदेकरून चालले पाहिजेत. पहिला प्रयत्न म्हणजे पारिभाषिक पदे आणि वाक्प्रचार यांचा सरसहा उपयोग करून मातृभाषांमध्ये शिक्षणसंस्थांचा व सरकारचा व्यवहार चालू करावा व तो वेगाने वाढवावा. दुसरा प्रयत्न म्हणजे या व्यवहाराचा वेग वाढण्याकरिता नवे शब्द, परिभाषा व वाक्प्रचार यांचा उपयोग करून लेखकवर्गाने सामाजिक व भौतिकशास्त्रे प्रादेशिक भाषांमध्ये आणण्याकरिता प्राथमिक, माध्यमिक व विश्वविद्यालयीन शिक्षणास उपयुक्त वा वैचारिक सर्जनाचे दर्शक वा वाचकवर्गाच्या ज्ञानसाधनेस उपकारक असे ग्रंथ लिहावेत. तिसरा प्रयत्न म्हणजे त्या त्या प्रादेशिक भाषांच्या स्वभावास अनुसरून आणि त्या सर्व भाषांमध्ये पूर्वीच असलेली भारतीय संस्कृतिमूलक एक प्रकारची साम्ये व संवादित्वे पोषण पावतील, अशा जुन्या व प्रचलित शब्दसमृद्धीचा संग्रह करून व नव्या अधिक शब्दसमृद्धीची निर्मिती करून कोश तयार करावे. आता असे कोश तयार होऊ लागले आहेत. या कोशांना अखेरचे प्रामाण्य मानण्यात मात्र अर्थ नाही; त्यात धोका आहे. प्रादेशिक भाषांचा स्वभाव वपरंपरा जे शब्द पचवू शकतील तेच अखेर प्रमाण ठरतील. धोका असा आहे की, अर्थपूर्ण असलेल्या शब्दांची उपेक्षा करून लादलेले नवे कृत्रिम शब्द वैचारिक अस्पष्टता, विसंगती व गोंधळ उत्पन्न होण्यास कारण होतील.


शब्दसमृद्धीच्या वाढीचा वेग वाढला पाहिजे; परंतु गोंधळ टाळला पाहिजे. म्हणून पूर्वीच रूढ व प्रसिद्ध असलेल्या अर्थपूर्ण शब्दांद्वारे व्यवहार व ग्रंथनिर्मिती करण्याच्या क्रमातच व त्याच्या प्रभावाखालीच कोशनिर्मिती होणे जरूर आहे. नवे कृत्रिम शब्द फाजील प्रमाणात वापरल्यास सामाजिक शास्त्रांचे ग्रंथ अर्थसंपन्न व प्रसन्न असे तयार होणार नाहीत. नव्या कृत्रिम शब्दांच्या योगाने शब्दांचा भरणा केलेले नवे भौतिकशास्त्रांचे ग्रंथ मात्र सामाजिक शास्त्रांपेक्षा सुसह्य होऊ शकतील. म्हणून विश्वविद्यालयांनी व खाजगी संस्थांनी आणि व्यक्तींनी असे भौतिकशास्त्रांचे ग्रंथ त्वरित निर्माण करण्याचे कारखाने स्थापन करण्याच्या उद्योगास अगोदर लागावे. त्यात यश अधिक चांगले येईल.

हिंदी भाषा…

हिंदी ही संघराज्याची भाषा म्हणून स्वीकार करण्याला अनुकूल असे वातावरण स्वराज्यापूर्वीच निर्माण झाले आहे. स्वराज्याची चळवळ, भारत हे एक राष्ट्र आहे, या खोल भावनेने प्रेरित झालेली होती. याच भावनेला अनुसरून हिंदीचाही पुरस्कार या चळवळीचे अंग या नात्याने होत होता. महाराष्ट्रात तर अलीकडे हिंदी भाषा शिकण्याची स्वयंप्रेरित अशी चळवळच उभी राहिली आहे. त्यात महाराष्ट्रीय समाजात उत्साहाने प्रत्येक वर्षी शेकडो आणि हजारो पदवीधरही निर्माण होत आहेत. या उत्साहाची उपेक्षा मुळीच करून चालणार नाही. महाराष्ट्रातील सुशिक्षित स्त्री-पुरुषांनी हिंदी भाषा शिकलीच पाहिजे हे गृहीत कृत्य झाले आहे. महाराष्ट्रात इतक्या लवकर हिंदी भाषेचे हे इतके उत्साहपूर्ण स्वागत होण्याचे कारण राष्ट्रीय भावनेची पार्श्वभूमी. ती संघराज्याची भाषा आहे हे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच राष्ट्रीय ऐक्य, भारतीय संस्कृतीची प्राचीन काळापासूनची एकता व मराठी भाषेशी असलेले हिंदी भाषेचे निकट साम्य हेही महत्त्वाचे आहे. भारतातील द्रविड भाषाकुल सोडल्यास बाकीच्या मराठी, गुजराती, बंगाली इत्यादी भाषा हिंदी भाषेच्या भगिनी भाषा आहेत. त्यांचा स्वभाव व तोंडावळा सारखा आहे. हिंदीबद्दलचे मराठी साहित्यिकांचे प्रेम पुरातन आहे. मराठी साहित्याचा पाया जेव्हा संतमंडळी घालू लागली, मराठीत सुंदर व प्रसन्न काव्यरचना करू लागली, तेव्हाच ती संतमंडळी हिंदीमध्येही पद्यरचना करण्यात स्वत:स कृतार्थ मानू लागली. मराठी संतांनी केलेले हिंदी काव्य अजून शिल्लक आहे. नामदेव महाराजांपासून तुकारामांपर्यंत ही हिंदी पद्यरचना करण्याची पद्धती चालू होती. मराठी माणसाच्या हिंदीविषयक प्रेमाचा हा सहाशे वर्षांचा इतिहास आहे, हे आम्ही हिंदी भाषिक बंधूंना नम्रतेने सुचवू इच्छितो.


राज्यांच्या भाषावार प्रादेशिक रचनेचा प्रश्न पूर्ण समाधानकारक रीतीने सोडविला गेल्यास मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांचा हिंदी भाषा शिकण्याचा उत्साह तुफानी वेगाने वाढेल. हिंदी भाषा लादण्याचा प्रश्नच उत्पन्न होऊ शकत नाही. हिंदी भाषेचा स्वीकार हा क्रमप्राप्त असून काही वेळाचे अंतरचमध्ये आहे. महाराष्ट्रातील सगळी सुशिक्षित जनता एक-दोन पिढ्यांमध्ये दुभाषी बनणार आहे. संघराज्याची भाषा म्हणून हिंदीची असलेली प्रतिष्ठा, तिचे मराठी भाषेशी असलेले सांस्कृतिक नाते व तिच्यातील वाक्यरचना व शब्दसमृद्धी आणि वाक्प्रचार यांचे मराठीशी असलेले साम्य यामुळे सुशिक्षित महाराष्ट्रीय, मराठी व हिंदी या दोन्ही भाषा जवळजवळ सारख्या सहजतेने जवळच्या भविष्यकाळात बोलू लागेल. मात्र, हिंदी भाषेच्याआक्रमणाची शंका येईल असले कोणत्याही प्रकारचे वर्तन प्रादेशिक किंवा मध्यवर्ती सरकारांनी संपूर्णपणे निषिद्ध मानले पाहिजे. लोकमानसशास्त्राचे गंभीर भावार्थ जाणूनच आपल्या सरकारांनी आपले धोरण आखून पावले टाकली पाहिजेत. देशप्रेमाइतकेच किंबहुना त्यापेक्षाही अधिक खोल मातृभाषेचे प्रेम असते, ही गोष्ट सरकारने विसरल्यास देशाच्या एकतेस, राष्ट्रीय ऐक्यास अनिवार्य धोका उत्पन्न होईल. प्रादेशिक राज्यांची भाषावार रचना प्रादेशिक भाषा बोलणाऱ्या लोकांचे पूर्ण समाधान होईल, अशा रीतीने करणे हेच एकमेव कृत्य राष्ट्रीय ऐक्याचा पाया दृढ व खोल करण्याचा नजीकचा उपाय आहे. इतर देशांच्या फुटीचे दाखले गृहीत धरून भाषावार प्रादेशिक राज्यांची रचना करण्यात साशंक असणारे शहाणे लोक मूर्खांच्या स्वर्गात आहेत, हे प्रादेशिक भाषांची रचना करण्यास जबाबदार होऊ पाहणाऱ्या शहाण्या मंडळींनी विसरता कामा नये. राज्यकर्त्यांनी जे जे पाऊल टाकावयाचे असते ते प्रामाणिक, विचारपूर्ण व निश्चित धोरणानेच न डगमगता टाकावे लागते. धरसोडीचे अर्धवट व संदिग्ध उपाय योजणाऱ्यांना भविष्यकाळ क्षमा करीत नाही.


उपसंहार सांगावेसे वाटले ते सांगून झाले. संस्कृती व वाङ्‌मय यांच्या संबंधाचे तत्त्वज्ञान ध्यानात धरून मराठी सारस्वताची व महाराष्ट्रातील सांस्कृतिक वसामाजिक चळवळींची मीमांसा आपणापुढे निवेदन केली, त्याच संदर्भात प्रादेशिक व विशेषत: मराठी भाषेच्या भवितव्याचा प्रश्न चर्चिला. वर्तमान युगातील भारताच्या सांस्कृतिक व राजकीय प्रेरणा व आकांक्षा आणि महाराष्ट्राच्या प्रेरणा व आकांक्षा एकच आहेत. भारतीय व महाराष्ट्रीय यांची वरिष्ठ उद्देशांची साधना व साधनेचे मार्ग एकच आहेत. एकाच समान सांस्कृतिक परंपरेचा वारसा महाराष्ट्राने आत्मसात केला आहे; तिचे रक्षण केले आहे व महत्त्वाची भरही घातली आहे. ही भर घालीत असताना एक मनोज्ञ वैशिष्ट्यही प्रकट केले आहे. यासच महाराष्ट्र संस्कृती म्हणतात. हे वैशिष्ट्य प्रकट करीत असताना महाराष्ट्रातील माणसांचे नेतृत्वही जीवनाच्या त्या त्या क्षेत्रात उजळून बाहेर आले आहे. हे नेतृत्व जेव्हा जेव्हा व ज्या ज्या क्षेत्रात आपले स्वतंत्र गुण प्रकट करताना दिसते, तेव्हा तेव्हा ते समग्र भारताच्या ध्येयाशी समरस झालेले असते. व्यापक मानवी सद्गुणांचा फुलोरा त्याला आलेला असतो. जीवनाची कला तेथे आकारास आलेली असते. देशकालाच्या बंधनात हे नेतृत्व जरी त्या त्याप्रसंगी कार्य करीत असले तरी त्याची आध्यात्मिकता देशकालातीत शाश्वत मानवी मूल्यांकडे अभिमुख झालेली असते, त्या मूल्यांच्या संवेदनांनी उजळलेली असते. परंतु जेव्हा जेव्हा महाराष्ट्राचे अंत:करण संकुचित बनते, हेवा आणि मत्सर यांची त्याला बाधा होऊ लागते, तेव्हा तेव्हा पापिणी अहंता जीवन खुंटवून टाकते व त्यामुळे उतरती कळा लागते, प्रगतीचे मार्ग रुद्ध होऊन दुर्गतीच्या वेढ्यात महाराष्ट्र समाज रुतून पडतो. सांस्कृतिक विजयाच्या घटना आणि पराभवाच्या व पतनाच्याही घटना यांची कथा म्हणजे महाराष्ट्रातील संस्कृतीचा इतिहास आहे. या इतिहासातील पराजय अहंतेचे खंडन करून विवेक व विवेचक बुद्धी प्रदीप्त करतो आणि या इतिहासातील विजय आत्मविश्वास उत्पन्न करून कर्तव्यास प्रवृत्त करतो.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00