नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान संपल्या-संपल्या ‘एक्झिट पोल्स’चे निष्कर्ष जाहीर करण्यात आले. त्यानुसार तब्बल २५ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर भारतीय जनता पक्ष दिल्लीची सत्ता काबीज करेल, असा बहुतांशी ‘एक्झिट पोल्स’नी दावा केला आहे. (Delhi exit poll)
चाणक्य स्ट्रॅटेजीजने ३९ ते ४४ जागांचा आश्वासक अंदाज वर्तवला आहे, तर पोल डायरीने ४२ ते ५० एवढ्या घसघशीत जागा भाजपला मिळतील, असा अंदाज वर्तवला आहे. पीपल्स इनसाइटनेही असे अंदाज वर्तवत भाजप ४० ते ४४ जागा जिंकू शकेल, असे म्हटले आहे. दुसरीकडे, आम आदमी पार्टी (आप) केवळ १८ ते २८ जागा मिळवेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या निवडणुकी काँग्रेसची कामगिरी खूपच खराब राहील, असे म्हटले असून त्यांना ० ते ३ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एबीपी मॅट्रिझनेही भाजपला ३५ ते ४० जागा आणि आप ३२ ते ३७ जागा मिळवेल, असे म्हटले आहे.(Delhi exit poll)
delhi election chart
दरम्यान, दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीसाठी बुधवारी सकाळी ७ वाजल्यापासून मतदान सुरू झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय समन्वय आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली आहे. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, त्यांच्या पत्नी तसेच कुटुंबीयांनी मतदान केले. दुपारी तीनपर्यंत ४६.५५ टक्के मतदान झाले. संध्याकाळी पाचपर्यंत ईशान्य दिल्लीत सर्वाधिक ५२.७३ % मतदान नोंदवले गेले. नवी दिल्लीतील मतदानाची टक्केवारी सर्वांत कमी ४३.१०% नोंदवली.
दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान होत असल्याबद्दल आम आदमी पक्ष आणि भाजपनेही संशय व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी बोगस मतदान होत असल्याचा आरोप आप आणि भाजपचे नेते करत आहेत.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, केंद्रीय मंत्री एस. जयशंकर, हरदीप सिंग पुरी, दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी, ‘आप’चे प्रमुख अरविंद केजरीवाल, ज्येष्ठ काँग्रेस नेते राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी वड्रा, सरन्यायाधीश संजीव खन्ना, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी मतदानाचा हक्क बजावला. बोगस मतदान झाल्याच्या आरोपानंतर सीलमपूर, जंगपुरा आणि कस्तुरबा नगरमध्ये काही काळ गोंधळ उडाला. तथापि, दिल्ली पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे स्पष्ट केले.(Delhi exit poll)
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून या तिन्ही प्रमुख पक्षांसह काँग्रेसनेही प्रचाराची राळ उडवून दिली होती. सर्वच पक्षांकडील दिग्गज नेते प्रचारात उतरले होते. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या होत्या. विशेषत: आप आणि भाजपने यमुना नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी आणला होता. भाजपने केजरीवाल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोपही केले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून केजरीवाल यांनी भाजप पोलिस यंत्रणेसह निवडणूक यंत्रणाही केंद्रातील सत्तेच्या जोरावर आपल्या दबावाखाली ठेवत आहे, असा आरोप केला होत.(Delhi exit poll)
या पार्श्वभूमीवर दिल्लीकरांनी सकाळपासूनच मतदान केंद्रावर गर्दी केली आहे. विधानसभेच्या ७० जागा आहेत. त्यासाठी १३,७६६ मतदान केंद्रांवर मतदान झाले. बुधवारी सायंकाळी ६ वाजता मतदान संपले. ८ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल.
सत्ताधारी आम आदमी पक्षासाठी (आप) ही निवडणूक केवळ सत्तेसाठीची लढाई नाही – ती जनतेच्या विश्वासाची परीक्षा देखील आहे. काही महिन्यांपूर्वी, आपचे प्रमुख केजरीवाल यांनी दारू धोरण प्रकरणात भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. ‘‘जनतेच्या न्यायालयात निर्दोष सुटका झाली तरच ते या पदावर पुन्हा येतील,’’ असे जाहीर केले होते.(Delhi exit poll)
विधानसभा निवडणुकीचा निकाल कथित दारू धोरण घोटाळ्यातील कायदेशीर लढाईवर परिणाम करणार नसला तरी, तो मतदारांच्या भावनांचे प्रतिबिंब असेल.
दुसरीकडे, भाजपने केजरीवाल यांच्याविरोधात जोरदार प्रचार केला. गेल्या २७ वर्षांपासून भाजप दिल्ली विधानसभेत विरोधी बाकावर आहे. राष्ट्रीय राजधानीत पुन्हा सत्ता मिळवण्याच्या प्रयत्नात भाजपने यावेळी कोणतीही कसर सोडलेली नाही.
राष्ट्रीय स्तरावर ‘आप’सोबत काँग्रेस इंडिया आघाडीचा सहकारी पक्ष आहे. मात्र दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनेही एकाकी लढण्याचे धोरण ठेवले आणि तसे प्रयत्नही केले आहेत.
हेही वाचा :
आम्ही ओबीसींना घटनात्मक दर्जा दिला
कृषीमंत्रिपदाच्या काळात मुंडेंकडून १६१ कोटीचा घोटाळा
महाराष्ट्रात अख्ख्या हिमाचलएवढे मतदार वाढले कसे?