नवी दिल्ली : आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने (भाजप) शनिवारी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात पक्षाने ‘आप’चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात परवेश वर्मा यांना उमेदवारी दिली आहे. (Delhi election)
भाजपने करोलबागमधून दुष्यंत गौतम, राजौरी गार्डन मतदार संघात मनजिंदर सिंग सिरसा, बिजवासनमध्ये कैलाश गेहलोत आणि गांधी नगरमधून अरविंदर सिंग लवली यांना उमेदवारी दिली आहे.
दिल्ली विधानसभेच्या निवडणुका फेब्रुवारीत होत आहेत. विधानसभेच्या ७० जागांपैकी भाजपने २९ उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात मुख्यमंत्री आतिशी यांच्या विरोधात कालकाजी येथील माजी खासदार रमेश बिधुरी यांची उमेदवारी जाहीर केली आहे. (Delhi election)
पक्षाने जनकपुरीत आशिष सूद यांना उमेदवारी दिली आहे. दिल्ली भाजपचे माजी अध्यक्ष सतीश उपाध्याय मालवीय नगरमधून निवडणूक लढवणार आहेत.
आदर्श नगरमध्ये राजकुमार भाटिया, बदलीमध्ये दीपक चौधरी, रिठाळामध्ये कुलवंत राणा, नांगलोई जाटमध्ये मनोज शोकीन, मंगोलपुरीमध्ये राजकुमार चौहान आणि रोहिणीमध्ये विजेंद्र गुप्ता यांना उमेदवारी जाहीर केली आहे. (Delhi election)
शालीमार बागेत रेखा गुप्ता, पटेल नगरमध्ये राज कुमार आनंद, राजौरी गार्डनमध्ये सिरसा, जंगपुरामध्ये तरविंदर सिंग मारवाह, आरके पुरममध्ये अनिल शर्मा, महरौलीमध्ये गजेंद्र यादव, छतरपूरमध्ये कर्तारसिंग तन्वर यांची नावे निश्चित केली आहेत.
आंबेडकर नगरमध्ये कुशीराम चुनार, पटपरगंजमध्ये रवींद्र सिंह नेगी, विश्वास नगरमध्ये ओमप्रकाश शर्मा, कृष्णा नगरमध्ये अनिल गोयल, सीमापुरीमध्ये कुमारी रिंकू, रोहतास नगरमध्ये जितेंद्र महाजन आणि घोंडामध्ये अजय महावर यांना उमेदवारी दिली आहे.
२०२० च्या विधानसभा निवडणुकीत आपने ६२ जागा जिंकून मोठा विजय मिळवला होता.
मतदार याद्यांवरून ‘आप’ विरुद्ध ‘भाजप’
दिल्लीत निवडणुकीचा प्रचार हळूहळू वेग घेत आहे. त्यातच मतदार याद्यांमध्ये फेरफार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आम आदमी पक्षाने भाजपवर केला आहे. त्यामुळे दोघांत शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे.
‘आप’ समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी नवी दिल्लीच्या जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहून गेल्या काही दिवसांपासून नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात मतदार वाढवणे आणि हटवण्याच्या प्रकारांत मोठी वाढ झाल्याचा आरोप केला आहे. २८ डिसेंबर रोजी पत्र लिहून केजरीवाल यांनी निवडणूक अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आहे. (Delhi election)
केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेतली आणि भारतीय जनता पक्षाने १५ डिसेंबरपासून त्यांच्या मतदारसंघात ‘ऑपरेशन लोटस’ चालवल्याचा आरोप केला. ५००० मतदारांची नावे हटवण्यात आली तर ७५०० मतदार नोंदीचे अर्ज दाखल करून घेण्यात आल्याचे सांगितले.
केजरीवाल यांच्या या आरोपाला भाजप नेते विजेंदर गुप्ता यांनी प्रत्युत्तर दिले. केजरीवाल लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप त्यांनी केला. ‘केजरीवाल घाबरले आहेत. आपण ही निवडणूक हरणार हे त्यांच्या लक्षात आले आहे. म्हणूनच ते वेगवेगळी विधाने करून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत,’ असे ते म्हणाले.
हेही वाचा :
दहा लाखांचा सूट घालणाऱ्याने ‘शीशमहल’बद्दल बोलू नये