नवी दिल्ली : “ भाजप निवडणुकांमध्ये खुलेआम पैसे वाटतो. मतदारांना विकत घेतले जाते. अनेक निवडणुकांमध्ये भाजपने भूतकाळात हे कृत्य केले आहे. आरएसएसला हे मान्य आहे?, असा सवाल आम आदमी पक्षाने नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक मोहन भागवत यांना केला आहे. भागवत यांना पाठवलेल्या पत्रात केजरीवाल यांनी हे सवाल उपस्थित केले आहेत. त्यावर भाजपने संतप्त प्रतिक्रीया दिली आहे. (Delhi Election)
दिल्ली विधानसभेची निवडणूक येऊ घातली आहे. या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांच्या या पत्राची चर्चा जोरात सुरू झाली आहे. दिल्लीतील दलित आणि पूर्वांचल नागरिकांची मतदार यादीतील नावे मोठ्या प्रमाणात कमी करण्यात येत आहेत, याकडे लक्ष वेधून लोकशाहीसाठी हे योग्य वाटते का? भाजप लोकशाही कमकुवत करतोय, असे आरएसएसला वाटत नाही का? असा सवाल केजरीवाल यांनी आपल्या पत्रात केला आहे.
केजरीवाल यांनी बुधवारी भागवत यांना पत्र लिहिले आहे. यात भाजपच्या कृत्याचा पाढा वाचला आहे. भाजप दरवेळच्या निवडणुकीवेळी पैसे वाटतो, असा आरोप त्यांनी केला आहे. तसेच दलित आणि पूर्वांचलच्या मतदारांची नावे मोठ्या प्रमाणात कमी केल्याचे म्हटले आहे. (Delhi Election)
‘आप’च्या प्रवक्त्या प्रियंका कक्कर यांनी मतदारांची नावे कमी केल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी केला होता. तसेच त्यांनी षडारा मतदारसंघाचा उल्लेख करून भाजप नेते विशाल भारद्वाज यांनी येथील काही मतदारांची नावे हटवण्यासाठी अर्ज सादर केल्याकडे लक्ष वेधले होते. या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी संघाला पत्र लिहिले आहे.
केजरीवाल यांनी केलेल्या टिप्पण्यांवर भाजपने तीव्र शब्दांत खंडन केले आहे. केवळ ‘प्रसिद्धी’साठी ‘आप’कडून हा प्रकार सुरू असल्याचे म्हटले आहे.
त्यावर पत्र लिहिण्याऐवजी संघाकडून काहीतरी शिका, असा टोला भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केजरीवाल यांना लगावला आहे.
तुमची औकात नाही : भाजपचे प्रत्युत्तर
भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी ‘सरसंघचालकांना पत्र लिहिण्याची तुमची औकात नाही,’ अशा शब्दांत केजरीवाल यांना सुनावले आहे. तुम्ही दिल्ली लुटली. त्याबद्दल दिल्लीतील लोकांची माफी मागा, अशी मागणीही केली आहे. दिल्ली भाजप अध्यक्षांनी केजरीवाल यांच्यावर कॅनडातील ‘दहशतवाद्यांकडून’ पैसे घेतल्याचा आरोप केला. (Delhi Election)
हेही वाचा :
- मंत्र्याच्या चालकाने हॉर्न वाजवल्याने दोन गटात राडा
- वाल्मिक कराडच्या शरणागतीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर विरोधकांचा सवाल
- सोयाबीन खरेदीची नोंदणी करण्यास ६ जानेवारीपर्यंत मुदतवाढ