नवी दिल्ली : प्रतिनिधी : पहिल्यांदाच आमदार झालेल्या भाजपच्या रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना यांनी त्यांना शपथ दिली. दिल्लीत मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या त्या चौथ्या महिला ठरल्या आहेत. यापूर्वी भाजपच्या सुषमा स्वराज, काँग्रेसच्या शीला दीक्षित आणि ‘आप’च्या आतिशी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्रिपद भूषविले आहे. (Delhi CM oath)
रामलिला मैदानावर झालेल्या या शपथविधी सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यासह कपिल मिश्रा, रविंदर इंद्रराज, परवेश साहिब सिंग यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. शपथ घेतलले मंत्री परवेश साहिब सिंग दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहिब सिंग वर्माचे यांचे पुत्र आहेत. त्यांनी नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध विजय मिळविला आहे. शपथ घेतलेले दुसरे मंत्री कपिल मिश्रा यांनी निवडणुकीपूर्वी ‘आप’मधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी करावल नगर मतदारसंघातून विजय मिळविला आहे.(Delhi CM oath)
बुधवारी भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत रेखा गुप्ता यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी निश्चित करण्यात आले. २७ वर्षांनंतर राष्ट्रीय राजधानीत भाजपचे पुनरागमन झाले आहे. पहिल्यांदाच आमदार झालेल्या रेखा यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत शालीमार बाग मतदारसंघातून विजय मिळवला आणि ‘आप’च्या वंदना कुमारी यांचा २९,५९५ मतांनी पराभव केला. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी १९९२ मध्ये दिल्ली विद्यापीठातील दौलत राम महाविद्यालयात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेततून राजकीय प्रवास सुरू केला. १९९६-९७ मध्ये, त्या दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या अध्यक्ष झाल्या. २००७ मध्ये, गुप्ता उत्तर पितमपुरा येथून नगरसेवक म्हणून निवडून आल्या. नगरसेवकपदाच्या कारकीर्दीत त्यांनी ग्रंथालये, उद्याने आणि स्विमिंग पूल यासारख्या स्थानिक सुविधा सुधारण्यास मदत केली. उच्च शिक्षणात आर्थिकदृष्ट्या कमकुवत महिला विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी त्यांनी “सुमेधा योजना” देखील सुरू केली. महिला कल्याण आणि बाल विकास समितीच्या अध्यक्षा म्हणून, त्यांनी महिला सक्षमीकरणासाठी पुढाकार घेतला. गुप्ता यांनी दिल्लीतील भाजप महिला मोर्चाच्या सरचिटणीस आणि त्यांच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीवरही काम केले.(Delhi CM oath)
५० वर्षीय रेखा यांचा जन्म १९७४ मध्ये हरियाणातील जिंद जिल्ह्यातील नंदगड गावात झाला. त्यांचे वडील स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अधिकारी पदावर होते. १९७६ मध्ये, जेव्हा रेखा फक्त दोन वर्षांच्या होत्या, तेव्हा त्यांचे कुटुंब दिल्लीला गेले. त्यानंतर त्यांनी दिल्लीत प्राथमिक ते उच्च शिक्षण पूर्ण केले. ७० विधानसभा मतदारसंघांपैकी भाजपने ४८ जागा जिंकल्या, तर ‘आप’ला फक्त २२ जागा मिळाल्या आहेत.
हेही वाचा :
मोदी सरकारकडून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन