Home » Blog » या रे या रे लहान थोर

या रे या रे लहान थोर

या रे या रे लहान थोर

by प्रतिनिधी
0 comments
Muktabai file photo

शामसुंदर महाराज सोन्नर

संविधानाच्या अमृतमहोत्सवानिमित्त संविधान कीर्तन मालिका

भाग ३

महिलांनी कीर्तन करू नये, अशा मानसिकतेचे लोक सातशे वर्षांपूर्वी होते. पण वारकरी संतांनी स्रियांचा दाबलेला आवाज खुला केला. मात्र आज त्याच वारकरी संप्रदायाला विषमतावादी वळण देण्याचे काम काही मंडळी करीत आहेत. खरं तर वारकरी संप्रदायातील फडकरी मंडळींनी पिढ्यान पिढ्या परंपरा जपत संत चळवळ प्रवाहित ठेवली. मात्र विषमतावादी शक्तींनी आता काही फडक-यांना आपल्या कह्यात घेतले आहे. म्हणूनच आपलं श्रेष्ठत्व आणि वेगळेपण दाखविण्यासाठी काही फडकरी आपल्या फडावर महिलांना कीर्तन करू देत नाहीत.

भारतीय संविधान आणि त्याची तीन मूल्ये समता, स्वातंत्र्य आणि बंधुता यावर जर समाजव्यवस्था निर्माण झाली तर ती समाज व्यवस्था अधिक बळकट होईल असा विश्वास महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना होता. घटना समितीमधल्या सर्व महापुरुषांना होता. म्हणून त्यांनी ही तीन मूल्ये संविधानाच्या प्रास्ताविकेत समाविष्ट केली. जात, धर्म, लिंग यावरून कुणाचा द्वेष केला जाऊ नये, हे घटनेच्या १४ ते १६ अनुच्छेदामध्ये स्पष्ट केलेले आहे. त्यातील जात आणि धर्मावरून कुणाचाही भेद करू नये, हा संविधानात आलेला विचार संत साहित्यात जागोजागी कसा पहायला मिळतो, हे आपण दुस-या भागात पाहिले. या भागात कुणाचा लिंगावरून म्हणजे तो स्री आहे की पुरुष आहे, यावरून भेद केला जाऊ नये याबाबत संत साहित्यात काय उल्लेख आहेत, संतांच्या या प्रबोधन चळवळीत स्री संतांचे योगदान काय आहे, याचा धांडोळा घेण्याचा आपण प्रयत्न या भागात करणार आहोत.

 स्त्रियांची लोकसंख्या ५० टक्के असताना आजही स्त्रियांना जितक्या प्रमाणात संधी मिळायला पाहिजे, तितकी मिळताना दिसत नाही. म्हणूनच सरकारला स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारी अस्थापनामध्ये महिलांना खास आरक्षणाची व्यवस्था करावी लागली. परंतु संत चळवळीकडे पाहिले तर कोणताही आरक्षणाचा कायदा नसता मोठ्या प्रमाणात महिला संत दिसतात. या महिला संतांची कामगिरी तितकीच डोळे दीपविणारी आहे. बरं या संत परंपरेत ज्या महिला संत झाल्या यातील कुठलीही पाटलाची मुलगी नाही, कुठली सावकाराची मुलगी नाही, कुठलीही खासदाराची मुलगी नाही. एक संत मीराबाई सोडल्या तर बाकी सर्व महिला संत समाजातील शेवटच्या घटकातील असल्याचे आपल्याला दिसून येतात. आजही कायद्याने स्त्रियांना अनेक अधिकार दिलेले असले तरी स्त्रियांना जितके स्वातंत्र्य मिळायला पाहिजे, तितके मिळत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांतील महिला आरक्षणामुळे महिलांना पद मिळाले पण त्या पदाचा वापर अनेकदा त्यांच्या पतीकडून केला जात असल्याचे पहायला मिळते. मग सातशे वर्षांपूर्वी ही संत चळवळ आकार घेत होती तेव्हा महिलांना किती कठीण प्रसंगातून जावे लागले असेल. परंतु चळवळीने महिलांना मोठ्या प्रमाणात सामील करून घेतले. या महिला संत ज्या परिस्थितीतून आल्या आणि उतुंग काम केले त्याचा नुसता विचार केला तरी थक्क होऊन जायला होतं. आता संत जनाबाईचेच पहा ना! जनाबाईंचे कुळ कोणतं? त्यांचे आई-वडील श्रीमंत होते काय? तर नाही. जनाबाई ही आई-वडिलांशिवाय पोरकी झालेली आणि संत नामदेव महाराजांचे वडील दामाजीशेठी यांच्या घरी वाढलेली एक अनाथ मुलगी होती. शेवटपर्यंत नामयाची दासीम्हणून ती दामाजीशेठी यांच्या घरीच राहिली. एका धुणीभांडी करणाऱ्या दासी महिलेला संतपदी विराजमान करण्याचे औदार्य दाखविणारं जर कोण असेल तर ती संत परंपरा आहे. दुस-या आमच्या सोयराबाई. तत्कालीन समाज व्यवस्थेनुसार त्या अस्पृश्य समाजात जन्माला आलेल्या. त्यामुळे त्यांना गावकुसाबाहेर रहावे लागत होते. त्या संत चोखामेळा यांच्या पत्नी होत्या. त्यावेळच्या समाज व्यवस्थेप्रमाणे चोखामेळा यांना गावात वावरायला बंदी होती. मंदिरात जायची बंदी होती. तरीही त्या संत होऊ शकल्या. एखाद्या वेळी गावात राहून धुणीभांडी करणारी, दळणकांडण करणारीबद्दल मनात आपुलकी निर्माण होईल, गावकुसाबाहेर राहणारीबद्दल आपुलकी निर्माण होईल पण महिलांचा एक घटक असा आहे, ज्याबद्दल समाजाला कधीच उघडपणे आपलेपणा वाटणार नाही तो घटक म्हणजे वेश्या. अशा समाजातून तिरस्कारणीय असलेल्या वेश्येची मुलगी असणाऱ्या कान्होपात्राला संतपद बहाल करण्याचं औदार्य जर कोणी दाखवलं असेल तर ते वारकरी संप्रदायानं दाखवलं आहे. संत मुक्ताबाई, संत बहिणाबाई पाठक या उच्च कुळात जन्माला आल्या असल्या तरी दोघींनाही तत्कालीन विषमतावादी समाज व्यवस्थेचा खूप त्रास सहन करावा लागला. तरीही सर्व परिस्थितीवर मात करून महिला संत चळवळीत सहभागी झाल्या. तिथे मात्र त्यांना समानतेचा अधिकार देण्याचे काम संत परंपरेने केलेले आहे. महिलांना ज्यावेळी संधी मिळते तेव्हा त्या आपलं कर्तृत्व सिद्ध करून दाखवतात. संत परंपरेतील या महिला संतांना दिलेल्या समतेमुळे त्यांनी उत्तुंग कार्य केल्याचे दिसते. अर्थात त्यांना तत्कालीन समाजातील विषमतावादी प्रवृत्तीकडून प्रचंड त्रास झाला तरी त्या विरोधाला धीराने सामोरे जात संतांचा समतावादी, विवेकवादी डोळस विचार पुढे घेऊन जाण्यासाठी धीराने पावले टाकलेली दिसतात. त्यातील वानगीदाखल काही उदाहरणे पाहू. 

 जनाबाईंचे वारकरी संप्रदायावर फार मोठे उपकार आहेत. ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज, सोपानकाका, मुक्ताई यांनी एका वर्षामध्ये समाधी घेतलेली आहे. संत गोरोबा कुंभार आणि संत सावता महाराज यांचे वयपरत्वे देहावसान झाले आहे. संत नामदेव महाराज हे संतांचा समतेचा विचार घेऊन देशभ्रमण करायला निघाले आहेत आणि त्यांनी त्यांचा मोठा कालखंड पंजाबमध्ये व्यतीत केला आहे. नामदेव महाराज पंजाबमध्ये असताना पंढरपूरच्या वाळवंटातील वारकऱ्यांना सांभाळण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते संत जनाबाईंनी केलेलं आहे. आपणा सर्वांना माहीत आहे की एखादी स्त्री अशा प्रकारचे जर काम करू लागली तर ते पुरुषसत्ताक परंपरेला सहजासहजी सहन होत नाही. जनाबाई धीराने वारकरी परंपरा वाढविण्याचे काम, कीर्तन, भजन, अभंग रचनाच्या माध्यमातून करत होत्या. एक स्री वारक-यांचे नेतृत्व करते आहे, हे पुरुषसत्ताक व्यवस्थेला सहन होण्या सारखे नव्हते. पण जनाबाई यांचं काम इतकं नेक होतं की त्यावर काही आक्षेपही घेता येत नव्हता. स्रीच्या कर्तृत्वावर जेव्हा आक्षेप घेता येत नाही, तेव्हा तिला कमी लेखण्यासाठी तिच्या राहणीमानावर बोट ठेऊन चारित्र्याबाबत संशय निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. जनाबाईंच्याबाबतीत तेच झाले. जनाबाईला बदनाम करण्यासाठी काही लोक म्हणू लागले, “काय ही जनाबाई! बाजारात जाते, डोक्यावरून पदर घेत नाही, तिला पदराचं भान नाही”. अशा लोकांना जनाबाईंनी थेट सांगितलं, केवळ पदर सांभाळण्याची नाही तर वारकरी संप्रदाय सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावर नामदेव महाराज यांनी सोपवली आहे. ती जबाबदारी मला अधिक महत्वाची वाटते. म्हणून या पुढे तर मी डोक्यावरचा पदर खांद्यांवर आला तरी भरल्या बाजारातून जाईल…. 

डोईचा पदर आला खांद्यावरी l 

भरल्या बाजारी जाईल मी ll 

अशी थेट भूमिका संत जनाबाईंनी घेतली. जेव्हा राहणीमानावर शंका घेऊन जनाबाईला नामोहरम करता येत नाही, असे लक्षात आले तेव्हा तिच्या व्यक्त होण्याच्या स्वतंत्र्यावर घाला घालण्याचा प्रयत्न केला गेला. तुला अभंग लिहिण्याचा, कीर्तन करण्याचा अधिकार नाही, असे सांगून तिच्या प्रबोधन चळवळीलाच थांबविण्याचे कारस्थान रचले गेले. एवढा विरोध पाहून एखादी लेचीपेची स्री सरळ सगळं सोडून घरात बसली असती. पण जनाबाईंची भूमिका इतकी तकलादू नव्हती. त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या आणि त्या व्यवस्थेला ठणकावून सांगितले-

 हातामध्ये टाळ खांद्यावरी वीणाl 

आता मज मना कोण करीll 

“अरे! मी भजनासाठी हातामध्ये टाळ घेतलेला आहे, कीर्तनासाठी खांद्यावर वीणा घेतलेली आहे, मला मनाई करणारे कोण तुम्ही आहात?

तत्कालीन स्त्रियांना कमी लेखणा-या व्यवस्थेविरोधात लढा देत असतानाच इतर स्त्रियांच्यामध्ये आत्मभान जागृत करताना जनाबाई म्हणतात- 

स्त्री जन्म म्हणुनी न व्हावे उदास l 

साधु संत ऐसे केले जनी ll 

महिलांनी कीर्तन करू नये, अशा मानसिकतेचे लोक सातशे वर्षांपूर्वी होते. पण वारकरी संतांनी स्रियांचा दाबलेला आवाज खुला केला. मात्र आज त्याच वारकरी संप्रदायाला विषमतावादी वळण देण्याचे काम काही मंडळी करीत आहेत. खरं तर वारकरी संप्रदायातील फडकरी मंडळींनी पिढ्यान पिढ्या परंपरा जपत संत चळवळ प्रवाहित ठेवली. मात्र विषमतावादी शक्तींनी आता काही फडक-यांना आपल्या कह्यात घेतले आहे. म्हणूनच आपलं श्रेष्ठत्व आणि वेगळेपण दाखविण्यासाठी काही फडकरी आपल्या फडावर महिलांना कीर्तन करू देत नाहीत. इतकेच नव्हे तर ज्या गावात त्या फडाची परंपरा आहे तिथल्या लोकांनाही महिलांची कीर्तनं घेण्यास मज्जाव करतात. काही कर्मठ कीर्तनकार तर आपल्या कीर्तनात महिलांना टाळ घेऊनही उभा राहू देत नाहीत. अशा वेळी प्रश्न पडतो की, या कीर्तनकारांना –

या रे या रे लहान थोर lभलते याती नारी नरll

हा अभंग म्हणण्याचा अधिकार आहे का? महिलांना कीर्तन करण्यास प्रतिबंध करण्याबाबत जे कारण दिले जाते ते तर अत्यंत हस्यास्पद आहे. अलिकडेच वारकरी साहित्य परिषदेच्यावतीने मुंबईत संत साहित्य संमेलन झाले. यावेळी झालेल्या खुल्या चर्चेत महिलांच्या कीर्तनाचा विषय चर्चेला आला. तेव्हा महिलांनी कीर्तन का करू नये यावर बोलताना एक महाराज म्हणाले, ” महिला कीर्तन करायला उभ्या राहिल्या तर त्यांच्या सौंदर्याकडे पाहून श्रोत्यांच्या मनातील विकार जागे होतात. त्यामुळे कीर्तनातील सात्विकतेला धक्का लागतो. म्हणून महिलांनी कीर्तन करू नये. म्हणजे पुरूषांना आपले विकार काबूत ठेवता येत नाहीत, म्हणून महिलांनी कीर्तन करू नये. वा रे तर्क! कीर्तनात ज्यांचे विकार जागे होतात त्यांची कीर्तनाला येण्याची पात्रता आहे का? अशा पुरूषांना उपदेश करण्यापेक्षा त्यांच्यासाठी महिला कीर्तनकारांच्या कीर्तन करण्यावर बंधन आणणे केवळ भारतीय संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे हननच नाही तर संतांच्या `या रे या रे लहान थोर भलते याती नारी नर` या संत वचनाचा उपमर्द करणारे आहे. आज संविधानाने महिलांना समान अधिकार दिलेले असतानाही जर अशी परिस्थिती असेल तर सातशे वर्षांपूर्वी स्रियांवर किती निर्बंध असतील? सातशे वर्षांपूर्वी काय परिस्थिती असेल? परंतु त्या काळात पंढरपूरच्या वाळवंटात उभ्या राहिलेल्या संत परंपरेने महिलांना पुरुषांच्या बरोबरोबरीचा अधिकार दिला, ही केवढी क्रांती होती?महिला संतांना वारकरी संप्रदायात समतेचा अधिकार मिळाल्यानंतर या महिलांनी जे विचार मांडले ते अत्यंत धाडसी होते. महिलांच्या मासिक पाळी बद्दल आजही पवित्र-अपवित्र अशा संकल्पना मांडल्या जातात. पण सातशे वर्षांपूर्वी संत सोयराबाई यांनी स्रियांच्या या विटाळाबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाने तत्कालीन धर्म मार्तंडांना निरुत्तर केले होते. विटाळाबद्दल त्या लिहितात-

देहासी विटाळ म्हणती सकाळ l

आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध ll

देहीचा विटाळ देहीच जन्मला l

सोवळा तो झाला कवण धर्म ll

विटाळा वाचोनी उत्पत्तीचे स्थान l

कोण देह निर्माण नाही जगी ll

विटाळच उत्पतीच स्थान असून तो नसेल तर देहाची उत्पत्तीच होऊ शकत नाही. हा त्यांनी उपस्थित केलेला मुद्दा सोयराबाई किती विज्ञानवादी होत्या, हे सिद्ध करतो. त्यांचे हे धाडसी विचार आजही विचार करायला लावणारे आहेत. मासिक पाळी बद्दल बुरसटलेल्या कल्पना घेऊन जगणारांना सोयराबाईने दिलेली ही सणसणीत चपराकच म्हणावी लागेल. संत चळवळीतील इतरही संतांचे कार्य खूपच मोलाचे आहे. ज्यात मुक्ताबाई, बहिणाबाई, कान्होपात्रा, निर्मळा यांनी अभंगातून मांडलेले विचार आजही तितकेच टवटवीत आहेत. 

मुक्ताबाईंचे तर वारकरी संप्रदायावर खूप मोठे उपकार आहेत. मुक्ताबाई नसत्या तर ज्ञानेश्वरीच लिहून होऊ शकली नसती. आळंदीतील कर्मटांनी ज्ञानेश्वर महाराज यांचा छळ केला. त्यांनी भिक्षा मागून आणलेले पीठ हिसकावून मातीत मिसळले तेव्हा उद्विग्न होऊन ज्ञानेश्वर महाराज आपल्या झोपडीची ताटी लावून बसले. केवळ संन्याशाची मुलं म्हणून विषमतावादी क्रूर व्यवस्थेकडून होणारा छळ सहन न होऊन ज्ञानेश्वर महाराज यांनी या जगाशी कायमचा संबंध संपवून टाकण्याचा निर्धार करून झोपडीची ताटी बंद केली होती. तेव्हा मुक्ताबाई यांनी ज्ञानेश्वर महाराज यांची समजूत काढली. ही समजूत काढण्यासाठी मुक्ताबाई यांनी जे ताटीचे अभंग लिहिले त्यात ख-या संतांची लक्षणे सांगितलेली आहेत. ज्ञानेश्वर महाराज यांना मुक्ताबाई सांगतात.

विश्व रागे झाले वन्ही l

संती सुखे व्हावे पाणी ll

शब्द शस्त्रे झाला खेद l

संती मानावा उपदेश ll

संपूर्ण विश्व रागाने आगी सारखे तप्त झाले असेल तर संतांनी पाण्यासारखे शीतळ झाले पाहिजे. कठोर शब्दामुळे मनाला खेद होत असतील तर संतानी तो उपदेश समजावा, अशी समजूत घालून दया क्षमा ज्याच्या अंगात आहे, त्यालाच संत म्हणावे, असे मुक्ताबाई म्हणतात. संत कुणाला म्हणावे हे सांगत असतानाच संत कुणाला म्हणू नये हे सांगताना मुक्ताबाई लिहितात- 

वरी भगवा झाला नामे l

अंतरी वश केला कामे ll

त्याशी म्हणू नये साधू l

जगी विटंबना बाधू ll

केवळ नावाला भगवे कपडे घातले असतील आणि अंतःकरणात कामाने वश केलेला असेल तर त्याला साधू म्हणू नये, असेही मुक्ताबाई सांगतात. आपण सुख सागर होऊन बोधाने जगाला निववावे, अशी समजूत मुक्ताबाई काढतात आणि ज्ञानेश्वर महाराज यांना-

ताटी उघडा ज्ञानेश्वरा

अशी साद घालतात. लहानग्या मुक्ताबाईने विवेक जागा केल्याने ज्ञानेश्वर महाराज झोपडीचा दरवाजा उघडतात. पुढे समाजात अखंड ज्ञानगंगा प्रवाहित राहील अशी भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी आणि हरीपाठा ही साहित्य रचना करतात. वारकरी संप्रदायाचा पाया होण्याचा मान त्यांना मिळतो तो मुक्ताबाई यांनी काढलेल्या समजुतीमुळे.

जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या शिष्या संत बहिणाबाई शिवूरकर यांनी तर-

संत कृपा झाली lइमारत फळा आली ll

या अभंगाद्वारे वारकरी संप्रदायाचे डॉक्युमेंट करून ठेवलेले आहे. केवळ स्रिया म्हणून महिलांना जी दुय्यम वागणूक दिली जात होती, ती दूर करून संत चळवळीने त्यांना बरोबरीचे स्थान दिले. त्याचेच प्रतिबिंब आपल्याला संविधानात दिसते. 

भारतीय संस्कृतीमध्ये संतांच्या प्रबोधन चळवळीने स्त्रियांविषयी एक उदार दृष्टिकोन या मातीत रुजवला. आणि याचेच प्रतिबिंब आपल्याला भारतीय संविधानामध्ये पाहायला मिळाले. भारतीय संविधानाने महिलांना जे अधिकार दिलेले आहेत त्या अधिकाराच्या बळावर या देशातल्या अनेक महत्त्वाच्या पदांवर महिलांना बसण्याचा मान मिळाला यावरून आपलं संविधान किती श्रेष्ठ आहे हे आपल्याला दिसून येतं. देशामध्ये राष्ट्रपतीपद हे घटनात्मकदृष्ट्या सर्वोच्च पद मानलं जातं. या राष्ट्रपतीपदावर बसण्याचा मान आपल्याच महाराष्ट्राच्या कन्या असणार्‍या प्रतिभाताई पाटील तसेच द्रौपदी मुर्मू यांना मिळाला. पंतप्रधानपदी बसण्याचा मान एका महिलेला इंदिरा गांधी यांच्या रूपाने मिळाला. इंदिरा गांधीनी आपल्या कारकिर्दीत मजबूत आणि कणखर भूमिका घेत त्यांनी ज्या ज्या वेळी परकीय आक्रमणे झाली त्यावेळी देशाचा प्रमुख म्हणून देशाचे रक्षण केले आहे. भारताला पाकिस्तानचा वेळोवेळी डिवचण्याचा प्रयत्न असतो. अशावेळी इंदिरा गांधींनी सर्जिकल स्ट्राइकसारख्या भानगडी न करता थेट पाकिस्तानचे दोन तुकडे करून टाकले. हा भारतीय संविधानाने एका महिलेला दिलेला अधिकार आणि त्या अधिकाराचा त्यांनी केलेला योग्य वापर आपल्याला दिसून येतो. भारताचा राज्यकारभार चालवणारे लोकसभा हे एक सभागृह आहे. या लोकसभेच्या पीठासनपदी बसण्याचा मानसुद्धा मीराकुमार, सुमित्रा महाजन यांच्या रूपाने महिलांना मिळाला. अशा विविध क्षेत्रांत महिलांनी पुरुषांच्या बरोबरीने आघाडी घेतली आहे. आपले संविधान प्रगल्भ आणि मजबूत असल्याचे हे लक्षण आहे. या संविधानाची मूल्ये जर संपूर्ण भारतीयांच्या मनामध्ये रुजली तर खऱ्या अर्थाने आपला देश प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू शकेल असा विश्वास मला वाटतो.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00