लंडन : कामावर येताना तिने स्पोर्ट्स शूज घातले म्हणून तिला कामावरून काढून टाकण्यात आले. इतर कर्मचाऱ्यांनीही तसेच शूज घातले होते. मात्र केवळ तिच्यावरच कारवाई करण्यात आली. तिने कामगार न्यायाधिकरणाचे दरवाजे ठोठावले. कंपनीला भरपाईपोटी तिला ३२ लाख रुपये द्यावे लागले.(Compensation)
एलिझाबेथ बेनासी असे या महिलेचे नाव. ती मॅक्सिमस यूके सर्व्हिसेसमध्ये काम करत होती. ही कंपनी इंग्लंड सरकारच्या कार्मिक आणि निवृत्ती मंत्रालयासाठी सेवा पुरवते. बेनासी १८ वर्षांची होती तेव्हा तिने कंपनी जॉइन केली होती. मात्र अवघ्या तीन महिन्यांतच तिला कंपनीतून काढून टाकण्यात आले.(Compensation)
तिने न्यायाधिकरणाला सांगितले की, कंपनी व्यवस्थापकाने तिच्या शूजवर आक्षेप घेतला. तिला ‘मुलांसारखे’ वागवले जाते, असाही आरोप तिने केला. तिचे बहुतेक सहकारी वीस वयोगटातीलच होते. त्यांनीही माझ्यासारखेच शूज घातले होते, परंतु त्यांच्याबद्दल आक्षेप घेण्यात आला नाही. मलाच लक्ष्य केले जात होते. एकटे पाडले जातेय, असे वाटत होते. हे सगळे नियोजनपूर्वक होत होते, असे मला वाटते, असे तिने न्यायाधिकरणाला सांगितले.
रोजगार न्यायाधिकरणाने क्रॉयडन येथे झालेल्या सुनावणीत बेनासीची बाजू घेतली. बेनासीशी व्यवहार करताना कंपनीने तिच्या केवळ ‘दोष’ शोधले.
‘ती नवीन होती. ती ड्रेस कोडशी परिचित नसावी. त्यामुळे हा एक स्पष्ट अन्याय होता,’ असे मत न्यायाधीश फॉरवेल यांनी नोंदवले.
मॅक्सिमस यूके सर्व्हिसेसने बचाव करण्याचा प्रयत्न केला. पण न्यायाधिकरणाने ते मान्य केले नाही.
हेही वाचा :
मोस्ट वाँटेड दहशतवादी मसूद अझरला हृदयविकाराचा झटका
अफगाण फौजांचे पाकला प्रत्युत्तर