मुंबई : प्रतिनिधी : नागपूर येथे दोन गटात झालेल्या दंगलप्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत निवेदन दिले. नागपूरमधील घटनाक्रम सभागृहात कथन करुन त्यांनी पोलिसांवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना सोडणार नाही, असा इशारा दिला. त्यांनी सर्व धर्मीय, जाती जमातीच्या महाराष्ट्रातील जनतेला शांततेचे आवाहन केले. (CM Statement)
महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथे औरंगजेबाच्या कबर आंदोलनावरुन सोमवारी रात्री दंगल झाली. या दंगलीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन दिले. फडणवीस म्हणाले, औरंगजेबाची कबर हटवावी या मागणीसाठी काल राज्यभर आंदोलन झाले. नागपूरमध्ये काल दुपारी आंदोलन झाले. आंदोलकांनी औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर तोडून टाकली. त्यानंतर या आंदोलनाच्याविरोधात एका गटाने आंदोलन केले. आंदोलकांनी धार्मिक मजकूर असलेले पुस्तक जाळले असा आरोप एका गटाने केला. त्यावर पोलिस ठाण्यामध्ये एका गटाच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर दुसऱ्या गटावरही पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. (CM Statement)
एकीकडे दोन्ही गटावर पोलिस ठाण्यात गुन्हा सुरू असताना दुसरीकडे दंगलग्रस्त भागात नियोजनपद्धतीने दंगल घडवण्यात आली अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात दिली. अनेक ठिकाणी दगड जमा करण्यात आल्याचे दिसून आले. काही टॅक्टरमध्ये आणि इमारतीवर दगड जमा करुन ठेवल्याचे दिसून आले. या दंगलीत तीन पोलिस अधिकाऱ्यांवर हल्लेखोरांनी हल्ला केला. एका डीसीपीवर कुऱ्हाडीने हल्ला केला गेला. सहा पोलिस कर्मचारी आणि सात ते आठ नागरिक जखमी झाले आहेत. एका नागरिकांवर आयसीवर उपचार सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. हल्लेखोरांनी अनेक वाहनांना लक्ष केल्याने मोठे नुकसान झाले. एक जेसीबीही जाळून टाकला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (CM Statement)
दंगलखोरांनी पोलिसांवर हल्ला केला असून तीन पोलिस अधिकारी गंभीर जखमी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. हल्लेखोर कोणत्याही गटाचा असो, पण पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही, असा इशारही त्यांनी दिला. संशयितांना ताब्यात घेतले असून दंगल घडवणाऱ्या मास्टरमाईंडला शोधून त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सध्या नागपूरची परिस्थिती नियंत्रणात असून तिथे संचारबंदी लावण्यात आली आहे. दंगलीचे लोण राज्यात पसरू नये यासाठी राज्यभर पोलिसांना अलर्ट देण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. (CM Statement)
हेही वाचा :
सुनीता विल्यम्स चा परतीचा प्रवास सुरू