वॉशिंग्टन : व्यापारयुद्ध असो वा आणखी काही चीन आपली बाजू शेवटपर्यंत लढवेल, असा निर्धार चीनने केला आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी आपल्या देशाची बाजू ठामपणे मांडली. ‘न्यूयॉर्क टाइम्स’शी बोलताना त्यांनी हा निर्धार व्यक्त केला. (China’s stand)
चीनने अमेरिकेला जशास तसे उत्तर देण्याची तयारी केली आहे. चीनवरील आयातशुल्क वाढवल्याच्या विरोधात चीनने वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनकडे दाद मागितली आहे. त्यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या करधोरणाला चीन अजिबात नमणार नाही, असे स्पष्ट झाले आहे.
अमेरिकेने चिनी मालावरील आयातशुल्क दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय कॅनडा आणि मेक्सिकोवरही जबर आयात शुल्क लादले आहे. भारतावर किती आयात कर लादणार याची स्पष्टता अद्याप नसली तरी ते कधीही लादले जाऊ शकते. या पार्श्वभूमीवर जागतिक पातळीवर व्यापारयुद्ध लादण्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर चीननेही अमेरिकेसमोर नमते न घेण्याची भूमिका जाहीर केली आहे. (China’s stand)
ट्रम्प प्रशासनाने सर्व चिनी आयातीवरील कर १० टक्क्यांवरून २० टक्के केले आहे, त्याला प्रत्युत्तर म्हणून चीननेही अमेरिकन चिकन, गहू, मका आणि कापसावर १५ टक्के कर लादला. तसेच ज्वारी, सोयाबीन, डुकराचे मांस, गोमांस, सीफूड, फळे, भाज्या आणि दुग्धजन्य पदार्थांवर १० टक्के कर लादला.
आर्थिक उपाययोजनांच्या माध्यमातून अमेरिका चीनवर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत असल्याची टीका लिन यांनी त्यांच्या निवेदनात केली आहे. ‘‘फेंटानिलसारखा क्षुल्लक मुद्दा पुढे करत चिनी माल आयातीवर अमेरिकेने शुल्क वाढ केली आहे. आम्ही आमचे हक्क आणि हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी आम्ही करत असलेले प्रतिउपाय पूर्णपणे कायदेशीर आणि आवश्यक आहेत,’’ असे ते म्हणाले. त्यामुळे येऊ घातलेल्या संकटासाठी केवळ अमेरिकाच जबाबदार राहील, असा इशाराही लिन यांनी दिला आहे. (China’s stand)
‘‘आमच्या प्रयत्नांना मान्यता देण्याऐवजी, अमेरिकेने चीनवर दोषारोप करण्याचा प्रयत्न केला आहे. शुल्क वाढवून चीनवर दबाव आणण्याचा आणि ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला आहे. ते आम्हाला मदत केल्याबद्दल शिक्षा करत आहेत. यामुळे अमेरिकेची समस्या सुटणार नाही. आमच्या अंमली पदार्थविरोधी संवाद आणि सहकार्याला धोका निर्माण होईल,’’ याकडे लिन यांनी लक्ष वेधले.
हेही वाचा :
‘हिंदीया’ निर्माण करण्याचे मोदी सरकारचे धोरण
अभिनेत्रीने १४ किलो सोने कसे आणले…?