Home » Blog » Cheater arrested : आयपीएस अधिकाऱ्याच्या पतीकडून २५ कोटीला गंडा

Cheater arrested : आयपीएस अधिकाऱ्याच्या पतीकडून २५ कोटीला गंडा

शासकीय कोट्यातून घरे मिळवून देण्याचे आमीष

by प्रतिनिधी
0 comments
Cheater arrested

मुंबई : महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या ठकसेन पतीचा फसवणुकीचा आणखी एक प्रताप चव्हाट्यावर आला आहे. शासनाच्या कोट्यातून घर मिळवून देण्याच्या आमिषाने पुरुषोत्तम प्रभाकर चव्हाण याने २० जणांना २५ कोटीला गंडा घातला आहे. मुंबई आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेने त्याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. चव्हाण सध्या सक्त वसुली संचालनालयाच्या ईडी कोठडीत आहे. तो होमगार्ड व नागरी संरक्षण विभागातील अधीक्षक रश्मी करंदीकर यांचा पती आहे. याबाबत त्याचा लवकरच जबाब नोंदविण्यात येणार असल्याचे तपास अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. (Cheater arrested)

२६३ कोटीच्या आयकर परताव्यामध्ये फसवणूक केल्याप्रकरणी वर्षभरापूर्वी ईडीने त्याच्यावर कारवाई केली आहे. त्याबाबतच्या चौकशीतून पुरुषोत्तम चव्हाणने दादर, प्रभादेवी, ठाणे आणि पुण्यात घर मिळवून देण्याच्या आमिषाने अनेकांची फसवणूक केल्याची बाब समोर आली होती. त्यांनी याबाबत मुंबई पोलिसांना कळविले होते. त्यानंतर आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने (इओडब्लू) तपास करून सायन येथील ५७ वर्षीय व्यावसायिक केदार देगवेकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यासह अन्य १९ जणांची चव्हाणने फसवणूक केली आहे. विशेष म्हणजे करंदीकर ज्या शासकीय निवासस्थानी राहतात त्या कुलाबा पोलीस ठाण्यातील वरच्या मजल्यावर असलेल्या फ्लॅटमध्ये बोलवून त्याने ही फसवणूक केली आहे. (Cheater arrested)

ईडीला पहिल्यांदा अनियमितता आढळून आली. २६३ कोटी रुपयांच्या आयकर परतावा (आयटीआर) फसवणूक प्रकरणात चव्हाणच्या भूमिकेची चौकशी करत असताना ही अनियमितता उघडकीस आली.

याप्रकरणी चव्हाणसह प्रसाद देसाई, संजय पाटील, गणेश पाटील, दीपक मोरे, एन. डी. निर्मळे, गोविंद सावंत, शशांक लिमये, यशवंत पवार, सहाय्यक उपनिबंधक आणि परळ-सेवरी मुद्रांक नोंदणी कार्यालयातील अधिकारी आणि मुख्य गुन्हेगाराला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे डुप्लिकेट कागदपत्रे तयार करण्यास मदत करणारे इतर लोक समाविष्ट आहेत.

एफआयआरनुसार, चव्हाण यांनी मंत्रालय आणि इतर सरकारी विभागांमधील आपल्या प्रभावाचा वापर करून सरकारी कोट्यातील मालमत्ता (जमीन आणि फ्लॅट) सवलतीच्या दरात विकण्याच्या बहाण्याने इतर आरोपींच्या खात्यातून त्यांच्या खात्यात पैसे स्वीकारून तक्रारदार आणि इतर लोकांची फसवणूक केली. (Cheater arrested)

त्याने ठाणे ५ येथील उपनिबंधक कार्यालयात आणि परळ-सेवरी येथील मुद्रांक नोंदणी कार्यालयात त्यांच्या मालमत्ता नोंदणीकृत असल्याचे भासवले. आरोपींनी बनावट कागदपत्रांचे फोटो काढले आणि ते खरे असल्याचे भासवून पीडितांना पाठवले. त्यांच्या छायाप्रतीही दिल्या, आधी  पैसे द्यावे लागतील आणि नंतर ते सरकारकडे जमा करतील आणि त्यानंतर सरकारी कोट्यातून घरवाटपाची प्रक्रिया पूर्ण होईल आणि आम्हाला ताबा मिळेल, ज्याला मी सहमती दर्शविली, असे तक्रारदार केदार देगवेकर यांनी एफआयआरमध्ये म्हटले आहे.

१९ जणांची फसवणूक

माझ्याप्रमाणेच आरोपींनी इतर १९ पीडितांकडून पैसे घेतले आणि त्यांना बनावट विक्री कराराची कागदपत्रे दिली ज्यात सरकारी कोट्यातील फ्लॅट्समधील अधिकृत विक्रेत्यांची नावे प्रसाद देसाई, संजय पाटील, गणेश पाटील, दीपक मोरे, एन. डी. निर्मले, गोविंद सावंत, शशांक लिमये आणि यशवंत पवार अशी होती, असे देगवेकर यांनी त्यांच्या जबाबात म्हटले आहे. (Cheater arrested)

करंदीकर यांचाही घेणार जबाब

आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग लवकरच आयपीएस रश्मी करंदीकर यांच्याकडे याप्रकरणी चौकशी करून त्यांचा जबाब नोंदवणार आहे. तसेच गुन्हा घडलेल्या शासकीय निवासस्थानाची झडती घेण्यात येणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

चव्हाण ‘ईडी’च्या ताब्यात

२६३ कोटींच्या आयकर परताव्याचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी ईडीने गेल्यावर्षी गुन्हा दाखल केला. निवृत्त आयकर अधिकाऱ्याना पकडल्यानंतर चव्हाणला २० मे रोजी अटक करण्यात आली. सध्या तो तुरुंगात आहे. फसवणुकीच्या गुन्ह्यात त्याला लवकरच ताब्यात घेण्यात येणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा :

 शिवसेनेच्या अशोक धोडींची ‘दृष्यम’ स्टाईल हत्या!

पक्ष बदलायचा असेल तर जनादेशाला सामोरे जा

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00