Home » Blog » Communist Party of India : भारतीय कम्युनिस्ट पक्षाची शताब्दी

Communist Party of India : भारतीय कम्युनिस्ट पक्षाची शताब्दी

कम्युनिस्ट विचारधारा कालबाह्य झालेली नाही, होणार नाही. जोपर्यंत जगात अन्याय-अत्याचार आहे, शोषण आहे: तोपर्यंत डावा विचार या ना त्या आकारात समोर येत राहील.

by प्रतिनिधी
0 comments
Communist Party of India

प्रा. अविनाश कोल्हे

विसाव्या शतकाच्या सुरूवातील भारतीय राजकारणातील दोन महत्त्वाच्या घटना म्हणजे ऑक्टोबर १९२५ मध्ये नागपुर येथे स्थापन झालेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि २६ डिसेंबर १९२५ रोजी कानपूरमध्ये स्थापन झालेला भारतीय कम्युनिस्ट पक्ष. आता कम्युनिस्ट पक्षाचे शताब्दी वर्ष सुरू झाले आहे. त्याकाळी देशातील कामगार चळवळीचे केंद असलेल्या कानपूरमध्ये २५ ते २७ डिसेंबर दरम्यान देशाभरातील डाव्या विचारसरणीचे कार्यकर्ते एकत्र आले होते. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला जगाच्या इतिहासावर दूरगामी परिणाम करणारी घटना म्हणजे ऑक्टोबर १९१७ मध्ये लेनिनच्या नेतृत्वाखाली कम्युनिस्टांनी रशियात केलेली कामगार क्रांती! रशियात झालेली कामगार क्रांती फक्त रशियापुरती मर्यादित राहिली नाही. यातून जगभरच्या तरुणांनी प्रेरणा घेतली आणि जगातील अनेक देशांत कम्युनिस्ट पक्ष स्थापन झाले. भारत याला अपवाद नव्हता. कम्युनिस्ट पक्षाच्या स्थापनेबद्दल वाद आहेत. काही अभ्यासकांच्या मते भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना ताश्कंद येथे १७ ऑक्टोबर १९२० रोजी झाली.  (हे ताश्कंद लालबहादुर शास्त्रीजींच्या मृत्यूमुळे भारतीयांना माहिती असते). यात एम एन रॉय, अबानी मुखर्जी, मोहम्मद अली मोहम्मद शफाक वगैरे होते. असे असले तरी २६ डिसेंबर १९२५ ही तारीख ढोबळमानाने मान्य झालेली आहे. (Communist Party of India)

रशियन क्रांतीनंतर जगभर उत्साह

आज ज्याला जगभर ‘कम्युनिझम’ म्हणून ओळखले जाते, त्या तत्त्वज्ञानाचा जनक म्हणजे जर्मन तत्त्वज्ञ कार्ल मार्क्स (१८१८-१८८३). त्याने २१ फेब्रुवारी १८४८ रोजी ‘कम्युनिस्ट जाहीरनामा’ प्रसिद्ध केला. (आज हा जाहीरनामा जगातल्या जवळजवळ सर्व भाषांत उपलब्ध आहे.) रशियन क्रांतीचा नेता लेनिन (१८७०-१९२४) फक्त राजकीय नेताच नव्हता तर विचारवंत होता. त्याने अनेक महत्त्वाची पुस्तकं लिहिली. त्यातील Marxism and Revisionism (1908), Imperialism the Highest state of Capitalism (1916) ही पुस्तकं फार महत्त्वाची समजली जातात. १९१७ साली रशियात क्रांती झाल्यानंतर जगभरच्या डाव्या शक्तींत उत्साह संचारला.

लोकमान्य टिळक यांच्यासारखे नेते जगभरच्या घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून असायचे. प्रा. जे. व्ही. नायक यांच्यासारख्या अभ्यासकांच्या मते जानेवारी १८८१ मध्ये टिळकांनी ‘म-हाठा’ या त्यांच्या इंग्रजी साप्ताहिकात परदेशात मार्क्सवर प्रसिद्ध झालेले लेख पुनर्मुद्रित केले होते. खरं तर ह्या घटनेच्या कितीतरी अगोदर खुद्द मार्क्सने भारतातील स्थितीबद्दल १८५३ ते १८६१ दरम्यान अमेरिकेतील ‘न्यूयॉर्क डेली ट्रिब्यून’ मध्ये लेखमाला लिहिली होती. (Communist Party of India)

कॉम्रेड डांगे यांचे योगदान

भारतातील सुरुवातीच्या कम्युनिस्ट चळवळीचा विचार करताना श्रीपाद अमृत डांगे (१८९९-१९९१) यांच्या योगदानाची तपशीलात चर्चा करावी लागते. भारतीय समाजाला डावा विचार समजावा म्हणून त्यांनी भरपूर लेखन केले. त्यांनी १९२१ साली प्रसिद्ध झालेले ‘गांधी विरुद्ध लेनिन’ हे पुस्तक लिहून गांधीविचारांच्या मर्यादा अधोरेखित केल्या. १९२२ साली डांगेंनी ‘सोशॅलिस्ट’ हे वृत्तपत्र सुरू केले. नंतर १९२७ ‘क्रांती’ हे साप्ताहिक सुरू केले. त्यांचे तात्त्विक विवेचन करणारे ‘प्राचीन इतिहासाची रूपरेषा’ हे पुस्तक १९४९ साली प्रसिद्ध झाले होते.

पार्टीने तेलंगण भागात १९४७ साली सशस्त्र उठावाचा प्रयत्न केला. मात्र उठावावरून पार्टीत तीव्र मतभेद निर्माण झाले. पी सी जोशींसारखे नेते ‘उठाव मागे घ्यावा आणि सनदशीर मार्गाने शेतक-यांचे प्रश्न सोडवावे’ या मताचे होते. पण तेव्हाचे पार्टीचे सचिव बी टी रणदिवे सशस्त्र उठाव चालू ठेवण्याच्या बाजूचे होते. एवढेच नव्हे तर तेलंगणातील यशापासून स्फूर्ती घेऊन हा सशस्त्र लढा देशभर न्यावा, अशी त्यांची इच्छा होती. दोन्ही गटांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. शेवटी १९४८ साली पार्टीचे सचिव झालेल्या रणदिवेंना १९५० साली हटवून चंद राजेश्वर राव यांना सचिवपदी नेमले. एप्रिल १९५१ मध्ये आचार्य विनोबा भावेंच्या मध्यस्थीमुळे सरकारने अटक केलेल्या पार्टीच्या अनेक कार्यकर्त्यांना सोडले. (Communist Party of India)

भारतातील पहिल्या सार्वत्रिक निवडणूका २५ ऑक्टोबर १९५१ ते २१ फेब्रुवारी १९५२ दरम्यान संपन्न झाल्या. या निवडणुकांत अपेक्षेप्रमाणे काँग्रेसने दणदणीत यश मिळवले. या पक्षाला एकुण ४९९ जागांपैकी ३६४ जागा जिंकल्या होत्या. दुसरा कमांक कम्युनिस्ट पक्षाचा होता. पक्षाला १६ जागा मिळाल्या होत्या. तिस-या कमांकावर समाजवादी पक्ष होता. या पक्षाला १२ जागा मिळाल्या होत्या. भारतीय जनसंघाला तीन जागा मिळाल्या होत्या.

केरळमध्ये कम्युनिस्टांचे यश

यानंतर १९५७ साली दुस-या सार्वत्रिक निवडणूका आल्या. याही निवडणूका भारताने यशस्वीपणे जिंकल्या. यातसुद्धा काँग्रेसने सत्ता कायम राखली. मात्र दक्षिण भारतातील केरळ या चिमुकल्या राज्याने इतिहास घडवला. या राज्यात भारतीय कम्युनिस्ट पार्टी सत्तेत आली. जगाच्या इतिहासात असे प्रथम घडत होते. जगात कम्युनिस्ट जेथे जेथे सत्तेत होते तेथे तेथे त्यांनी सशस्त्र कांती करूनच सत्ता हस्तगत केली होती. या सरकाने गरीबांसाठी अनेक कार्यकम राबवले. त्यामुळे हे सरकार प्रचंड लोकप्रिय झाले. यामुळे नेहरू सरकार घाबरले आाणि जुलै १९५९ मध्ये कलम ३५६ वापरून राज्य सरकार बडतर्फ केले.

भारतीय कम्युनिस्ट पक्षात फूट

भारतीय कम्युनिस्ट पक्षात १९६४ साली फूट पडली. ऑक्टोबर १९६२ मध्ये साम्यवादी चीनने भारतावर अचानक हल्ला केला. यामुळे भारतातील कम्युनिस्टांची पंचाईत झाली. तेव्हा कम्युनिस्ट पक्षाच्या सचिवपदी श्रीपाद अमृत डांगे होते. १३ जानेवारी १९६२ रोजी पक्षाचे सचिव अजय घोष यांचा मृत्यू झाला. त्यांच्यानंतर डांगे सचिव झाले. डांगेंना हा हल्ला म्हणजे आक्रमण वाटत होते. पक्षातील एक गट या भूमिकेबद्दल नाराज होता. या गटाने डांगेच्या भूमिकेला आव्हान दिले. यातून शेवटी पक्षात १९६४ साली फूट पडली आणि ज्योती बसू, प्रमोद दासगुप्ता, बसवपुनैय्या, नंबुद्रीपाद वगैरे बाहेर पडले आणि त्यांनी नोव्हेंबर १९६४ रोजी ‘मार्क्सवादी भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माकप) स्थापन केली. या फुटीला आंतरराष्ट्रीय राजकारणाचा एक आयाम होता. डांगे गटाला म्हणजे भारतीय कम्युनिस्ट पक्षाला (भाकप) ढोबळ मानाने ‘रशियावादी म्हणत तर माकपला ‘चीनवादी’ म्हणत. म्हणून माकपच्या अधिवेशनात माओचे फोटो हमखास आढळतात. (Communist Party of India)

सोविएत युनियनचे विघटन 

१९९० साली सोव्हिएत युनियनचे विघटन झाल्यापासून जगभर डाव्या चळवळीची पिछेहाट झाली. याला भारत अपवाद नाही. जून २०२४ मध्ये अस्तित्वात आलेल्या लोकसभेत माकपाचे चार तर भाकपाचे दोन खासदार आहेत. केरळ राज्यात आज माकपच्या नेतृत्वाखाली डावी आघाडी सत्तेत आहे. हा एकमेव अपवाद वगळता हे पक्ष भारतीय संघराज्यातील इतर कोणत्याही राज्यांत सत्तेत नाही. भारतीय डाव्यांची महत्त्वाची मर्यादा डॉ. आंबेडकरांना जाणवली होती. बाबासाहेबांना भारतीय मनाची धर्माची भूक माहिती होती. म्हणूनच त्यांनी ‘धर्मांतर केले, ‘धर्मत्याग’ नाही. मात्र त्यांना डाव्यांची आर्थिक मांडणीसुद्धा मान्य होती. म्हणूनच त्यांनी ‘भारतातील सर्व जमीन सरकारच्या मालकीची असावी, अशी मागणी केली होती. बाबासाहेबांनी १९३६ साली स्थापन केलेल्या पहिल्या राजकीय पक्षाचे नाव होते- स्वतंत्र मजुर पक्ष.

असे असले तरी हा पक्ष, कम्युनिस्ट विचारधारा कालबाह्य झालेली नाही, होणार नाही. जोपर्यंत जगात अन्याय-अत्याचार आहे, शोषण आहे: तोपर्यंत डावा विचार या ना त्या आकारात समोर येत राहील. जगाचा इतिहास साक्ष देतो की आधुनिक काळात मार्क्सवाद ही एकमेव विचारधारा आहे, जी उघडपणे, ठसठशीतपणे गोरगरीबांची, दुर्बलांची बाजू घेते आणि त्यांच्या न्याय्यहक्कांसाठी लढते.

आता म्हणजे एकविसाव्या शतकातल्या नव्या पिढीच्या डाव्या नेत्यांनी भारतीय समाजाच्या आकलनात बदल केलेला आहे. आता त्यांना जातीव्यवस्थेचे अस्तित्व आणि तिच्या भयानक परिणामांचा अंदाज आला आहे. जुलै २०२४ पासून भाकपने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जातनिहाय जनगणना परिषद आयोजित करून जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे, ही मागणी रेटून धरली आहे. एवढेच नव्हे तर सहा सप्टेंबर २०२४ रोजी या मागणीसाठी कोल्हापूरला राज्यव्यापी परिषद घेतली होती. हे बदल स्वागतार्ह आहेत. (Communist Party of India)

हेही वाचा :

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00