उदय कुलकर्णी, मुंबई
`बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकर` ही भाऊ पाध्ये यांची कादंबरी १९६७मध्ये प्रथम प्रकाशित झाली. २०१३ मध्ये तिची चौथी आवृत्ती शब्द पब्लिकेशनने प्रकाशित केली आहे. भाऊ पाध्ये यांच्या साहित्यकृतींमध्ये या कादंबरीला मानाचे स्थान आहे. चौथ्या आवृत्तीला सुप्रसिद्ध समीक्षक हरिश्चंद्र थोरात यांची पाठराखण आहे. (Bhau Padhye`s Barrister Aniruddha Dhopeshwarkar)
कादंबरीत अनिरुद्ध धोपेश्वरकर याचं सध्या वय बत्तीस. त्याचे वडील पब्लिक प्रॉसिक्युटर होते. निवृत्त झाल्यावरही त्यांनी स्वतंत्र प्रॅक्टिस केली आणि गडगंज पैसा कमावला. अनिरुद्ध त्यांचा एकुलता एक मुलगा. शिक्षणात हुशार होता. मेडल्स जिंकत होता. त्यामुळे त्याला विलायतेला शिक्षणाला पाठवलं. आणि बार अॅट लॉ ही पदवीही घ्यायला लावली. पण हायकोर्टात पाऊल टाकल्यापासूनच त्याला या पेशात स्वारस्य वाटेनासं झालं. त्यातच तो एक केस हरतो. त्यामुळे एका गरीब विधवा स्त्रीची मालमत्ता तिच्या ताब्यातून जाते. याचं अनिरुद्धला फार दु:ख होतं. तो प्रॅक्टीस सोडायचं ठरवतो. (Bhau Padhye`s Barrister Aniruddha Dhopeshwarkar)
केशरची झाली प्रियंवदा
कॉलेजमध्ये असताना त्याने प्रेमात पडून लग्न केलं आहे. त्याच्या बायकोचं माहेरचं नाव केशर. त्याला वाटत असतं हे नाव तिने बदलवू नये. पण अनिरुद्धच्या घरच्यांनी तिचं नाव प्रियंवदा ठेवायचं ठरवलं. तिनेही त्याला मान्यता दिली. ती गरीब घराण्यातील. अनिरुद्ध श्रीमंत घराण्यातील. तिचं म्हणणं होतं तिला काही तरजोडी कराव्या लागतील. आणि त्या करायला ती तयार आहे. लग्नापूर्वी ती गाणं गात होती. तिचे वडील चांगले गायक होते. परंतु ज्या वेळेस अनिरुद्ध इंग्लंडला गेला होता त्यावेळेस तिने गाणे सोडून दिले. ते तर अनिरुद्धला फारच खटकत आहे. ती स्वतः गात नाहीच. गाण्यांच्या मैफिली वगैरे यातही तिला इंटरेस्ट नाही. ती फक्त अनिरुद्धने करिअर कसे वाढवावे यावरच बोलत असते. (Bhau Padhye`s Barrister Aniruddha Dhopeshwarkar)
बोरिवलीला अनिरुद्धचं टुमदार घर होतं. आजूबाजूला झाडी होती. परंतु प्रियंवदाने ते घर सोडायला लावलं. आणि अगदी मागे लागून एका सहकारी सोसायटीमध्ये राहायला आणलं. इथे तिचे वनिता मंडळ, बॅडमिंटन, ब्रिजचे डाव सुरू आहेत. पती-पत्नींमध्ये आता भयंकर अंतर पडलेलं आहे. मनाने तर हा एकदम दूर गेलेला आहे. प्रियंवदाच्या मते तिचा नवरा अयशस्वी वकील आहे. कर्तृत्वशून्य आहे. तिचा अगदी आग्रह आहे याने काहीतरी केलंच पाहिजे, त्याला कसली महत्त्वाकांक्षा नाही. प्रगती करायचं इच्छा नाही. अनिरुद्धला मात्र तिचं वागणं-बोलणं सगळं हिशेबी, खोटं वाटतं. एकदा अशा दृष्टीने बघायला लागल्यावर तिच्या प्रत्येक गोष्टीत काही कावा दिसणं साहजिकच. हा नायक मग सगळ्यापासूनच दुरावतो. तुटत जातो आणि मित्राच्या गावात जाऊन राहतो. भाऊ पाध्ये यांनी या नायकाविषयी त्याचे परात्म व्यक्तिमत्व आहे, कादंबरीत अस्तित्व विचार आहे असे लिहिलेले आहे.
मैत्रिणींचा सहवास
आयव्ही आणि क्लारा या नायकाच्या दोन मैत्रिणी. त्यांच्या सहवासात तो हास्यविनोद करतो. पण ते तेवढ्यापुरतंच. त्याला संबंध जोडायचे नाहीत. स्वत:ची प्रतिष्ठा पणाला लावून तो आयव्हीचे संकट स्वत:वर ओढवून घेतो. तोही त्याचा सगळ्यापासून दूर जाण्याचा एक मार्ग आहे. (Bhau Padhye`s Barrister Aniruddha Dhopeshwarkar)
या नायकाला आयुष्य निरर्थक वाटत आहे. काही करावसं वाटत नाही. समाजाच्या दांभिकतेचा उबग आलेला आहे. सोसायटीतले लोक कोजागिरीला जमून काही कार्यक्रम करतात. अगदी तेच ते- नेहमीसारखे. त्याचाही त्याला कंटाळा आला आहे. त्याच्या मनात अनेक गोष्टींची खदखद आहे. त्यातूनच तो दूर जातो. पण विशेषतः बायकोची दांभिकता त्याला अतिशय खटकते आहे. जे काही बायकोला करायचं आहे ते फक्त स्टेटससाठी. समाजातील आपल्या स्थानासाठी आणि ती अत्यंत हिशेबीपणाने वागते असं त्याच्या मनात आहे.
दांभिक स्त्रियांची चित्रणे
अशा काही स्त्रियांची चित्रणं साहित्यात आणि सिनेमात आलेली आहेत. रॉबर्ट रेडफोर्ड दिग्दर्शित १९८०च्या `ऑर्डिनरी पीपल` या सिनेमातील आईसुद्धा अशी अतिदांभिक आहे. फक्त स्टेटसला जपणारी आहे. तिला आपल्या मुलाविषयीसुद्धा काही खऱ्या भावना आहेत की नाही असा प्रश्न पडतो. एकदा तिचा दांभिकपणा उघड झाला की त्या आईला घरातून निघून जाण्याशिवाय पर्याय राहात नाही. अशा दांभिक स्त्रिया साहित्य-सिनेमातून दिसतात. तसे दांभिक पुरुष आपल्याला साहित्यात दिसतात का? काही नक्कीच असतील. एक जुनी कथा आठवते. त्यातील नायक अत्यंत हुशार. पण हिशेबीपणाने वागणारा. तो कॉर्पोरेट एक्झिक्युटीव्ह. अशा पुरूषाला सहसा कॉर्पोरेट क्षेत्रातील दाखवलं जातं का हाही प्रश्न आहे. पुरुष थेटच हक्काने हवं ते करत व करवून घेत असल्याने कदाचित पुरूषांची अशी चित्रणं नसतील. (Bhau Padhye`s Barrister Aniruddha Dhopeshwarkar)
नुसता बसून राहणारा नवरा…
आता इथे स्त्रीवादाचा वगैरे मुद्दा आणायचा नाही. परंतु अनिरुद्धची बायको प्रियंवदा हिच्या दृष्टिकोनातून बघितलं तर आपला नवरा काहीही न करता नुसता बसून आहे हे कुठल्या स्त्रीला आवडेल? चारचौघी नाटकातही जी मधली मुलगी आहे तिचा नवरा काहीच करत नाही. नुसते विनोद करत असतो. शेवटी ती वैतागून म्हणते, जसे काही पुरुष असतात जे त्यांची पत्नी खूप सुंदर असते त्यावरच खुश असतात. आणि त्या सुंदर पत्नीलाच मिरवत असतात. तसे मी ह्या माझ्या नवऱ्याला मिरवणार. हा किती विनोद करतो आणि किती देखणा दिसतो हेच मिरवणार. (Bhau Padhye`s Barrister Aniruddha Dhopeshwarkar)
प्रियंवदाने एक जीवनशैली अंगीकारली आहे. विशेषतः ती गरिबीतून आली आणि आता तिला श्रीमंती दिसते आहे. तर त्याचा तिला मोह होतो पण तिच्याविषयी सहानुभूती नाही. किंवा तिला समजून घेण्याचा प्रयत्न दिसत नाही. एलकुंचवारांच्या `पार्टी` ह्या १९७६च्या नाटकात उच्चभ्रू लोक आहेत. त्यांचा दांभिकपणा दाखवलेला आहे. (आणखीही बरंच काही त्यात आहे) पण नंतर अनेक वर्षांनी एलकुंचवार या नाटकाविषयी म्हणाले, उच्चभ्रूवर्गाच्या जगण्यातील गुंते समजून न घेता, मी त्यांच्याबाबत जजमेंटल झालो आणि टीका केली.
प्रियंवदाचे लग्नानंतर नाव बदलणे याबद्दल नायक पूर्ण दोष फक्त तिला देतो. याने स्वत: काय केलं? लग्नानंतर गाणं तिने बंद केलं ही खरं तर तेव्हाची नेहमीची पद्धत होती. मुली कला जोपासायच्या ते लग्न होईपर्यंत. शिकायच्या तेही लग्न होईपर्यंत. आणि लग्न व्हावं म्हणून. प्रियंवदाही अशी एक सामान्य स्त्री आहे. (Bhau Padhye`s Barrister Aniruddha Dhopeshwarkar)
कोणत्या कारणामुळे तुटलेपण ?
दुसरे असे की बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकरला बायकोशिवाय पुढे जाता आलं असतं. परंतु जणू काही तिने त्याचं खच्चीकरणच केलं आणि त्या तिरिमिरीत पुढच्या सगळ्या वाटा त्याने स्वतःहूनच बंद करून टाकल्या. वकिली व्यवसायात इंटरेस्ट नाही. आणि इतर काही तो करू शकत नाही. कारण त्याच्याकडे दुसरं कुठलं क्वालिफिकेशन नाही असं तो म्हणतो. आयुष्याचा त्याला उबग आलेला आहे. पण कोणत्या कारणांनी की केवळ तो आतूनच तुटला आहे? कादंबरीत त्यासाठी इतर मुद्दे कमी आहेत. दांभिक बायको आणि त्यामुळे झालेला नवऱ्याचं अध:पतन हाच मुख्य मुद्दा असल्यासारखे होते. समाजातील दांभिकता याविषयी सुरुवातीला उल्लेख आहे. नंतर कादंबरीतून तसे काही येत नाही. किंवा आयुष्याची निरर्थकता तो एकदा सुरुवातीला म्हणतो. पुढेही त्याचा काही उल्लेख नाही. तो आतून तुटला आहे ते जणू बायकोमुळे. प्रियंवदा सामान्य आहे. तिला सामान्य लोकांसारखं जगायचं आहे.
पण हा बॅरिस्टर तरी काय वेगळा आहे. त्यात काय वेगळे गुण आहेत? तो आतून तुटला आहे तर त्या दिशेने कादंबरी जात नाही. तो मुख्यत: बायकोवर टेपर ठेवत आहे. पुढे तो मित्राच्या गावी जाऊन व्यवस्थित राहतो. आणि अडचणीत सापडलेल्या त्याच्या मैत्रिणीला मनापासून मदत करतो. बायको तिथे आल्यावर पुन्हा ती मॅन्युपलेट करत आहे वाटल्यावर पुन्हा दुरावतो. कादंबरीचा शेवटसुद्धा बायकोवरच आहे. ह्याने कसा पुन्हा तिच्यापासून पळ काढला. बायकोविषयी तक्रार करत राहतो जणू तीच त्याच्या आयुष्याच्या केंद्रस्थानी आहे. व्यावहारिक फुटपट्ट्या लावून या नायकाकडे बघू नये असं म्हणावं तर तो समाजाविषयी, त्याच्या तुटलेपणाविषयी काही फार बोलत नाही. इथे हा काही स्त्रीवादी दृष्टिकोनातून विचार केलेला नाही. उलट स्त्रीला बाजूला ठेवून लेखकाने विचार केलेला नाही असे म्हणत आहे. (Bhau Padhye`s Barrister Aniruddha Dhopeshwarkar)
पन्नास वर्षापूर्वीच्या कादंबरीला आजच्या निकषात बघू नये. पण लेखकाने तेव्हाच एकांगी लिहिलेले होते असे तर म्हणता येईल. भाऊ पाध्ये हे मोठं नाव आणि या कादंबरीचेही मोठं नाव आहे. तिच्याबद्दल असं लिहिणं ही ईशनिंदा वाटू शकेल. पण पुन्हा वाचताना जसे जाणवले तो एक विचार लिहिला आहे.
हेही वाचा :
‘डीआरडीओ’च्या क्षेपणास्त्रांकडून अचूक लक्ष्यभेद
बीडच्या बॉम्बस्फोटाचे सूत्रधार कोण ?