कोल्हापूर : प्रतिनिधी : गेल्या तीस पस्तीस वर्षांपासून अधिक काळ कोल्हापूरसह आजूबाजूच्या राज्यात निसर्गप्रेमी म्हणून परिचित असलेले, प्रत्यक्ष फिल्डवर राहून काम करणारे ज्येष्ठ पक्षी आणि फुलपाखरू तज्ज्ञ आणि ग्रीन गार्डस् संस्थेचे संस्थापक फारूख म्हेतर ( वय ५२) यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाने निसर्ग पर्यावरण प्रेमी कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे. (Farukh Mhetar death)
त्यांच्या मागे आईवडील, पत्नी, दोन मुले आणि भाऊ असा परिवार आहे. त्यांचा दफनविधी बागल चौक येथील दफनभूमी येथे शनिवारी (५ एप्रिल) संध्याकाळी झाला.
तीस वर्षांपूर्वी हाताच्या बोटावर मोजण्याइतपत कार्यकर्ते पर्यावरणावर काम करत होते. त्यामध्ये फारुक म्हेतर यांचे नाव घ्यावे लागेल. त्यांनी वृक्षप्रेमी कार्यकर्त्यांचे जाळे तयार करण्याचा प्रयत्न केला. तरुणांना विविध पक्षी आणि प्राण्यांची ओळख करून देण्यासाठी कोल्हापूरच्या डोंगरदऱ्या पालथ्या घातल्या. त्यातूनच त्यांनी वन्यप्रेमी कार्यकर्ते तयार केले. त्यांनी शिवाजी विद्यापीठ आणि ग्रीन गार्डस या माध्यमातून दहा दिवसीय पर्यावरण अभ्यासक्रम सुरू केला होता.(Farukh Mhetar death)
ग्रीन गार्डस् संस्थेच्या लायब्ररीमधून पक्षी आणि फुलपाखरांच्या विविध जातींच्या अभ्यासासाठी मार्गदर्शन सातत्याने केले जात होते.
राधानगरी, देवराईवर विशेष माहितीपट
फारूख म्हेतर यांनी यांनी राधानगरी, देवराई यांच्यावर विशेष माहितीपट काढले होते. त्यांचा तिलारी राखीव क्षेत्रावर विशेष अभ्यास होता. फुलपाखरांचे महत्त्व आणि निसर्गाचे जतन या माध्यमातून ते महाराष्ट्रातील विविध संस्थांशी जोडले होते. निसर्ग रॅली, निसर्ग ट्रेक आदींसारखे उपक्रम त्यांनी सुरू केले होते. जंगल वाचनात त्यांचा विशेष हातखंडा होता. इदरगंज बॉक्साईट उत्खनन थांबविण्यासाठी त्यांनी लढा दिला होता.(Farukh Mhetar death)
संशोधकांचा मार्गदर्शक
वन विभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांबरोबरच पीएचडीसाठी संशोधन करणारे संशोधक त्यांचे मार्गदर्शन घेत. डोंगरदऱ्यांमध्ये राहणाऱ्या वस्तीमधील ग्रामस्थांना एकत्र करत वनस्पतींचे रक्षण करण्याचा ते प्रयत्न करत असत. जंगल वाचावे, त्याचबरोबर तेथील युवकांना रोजगार कसा मिळेल यासंबंधी स्थानिक तरुणांना ते सतत मार्गदर्शन करीत. कोल्हापूरच्या जंगलात कोणता प्राणी कोणत्यावेळी कोठे पाहायला मिळेल, याचा त्यांचा अत्यंत सूक्ष्म अभ्यास होता.
कोल्हापूरच्या मंगळवार पेठेसारख्या वस्तीमध्ये फुलपाखरांचे जतन करण्याचा कृतिशील उपक्रम त्यांनी सुरू केला होता. वनविभाग तसेच शिवाजी विद्यापीठात त्यांनी फुलपाखरू उद्यान निर्मिती केली होती. फुलपाखरांसाठीच्या खाद्य वनस्पतींच्या बीया गोळा करून संपूर्ण भारतभर ते मोफत पाठवत असत. त्यांच्या निधनामुळे निसर्ग अभ्यासक गमावल्याच्या भावना व्यक्त होत आहेत.
हेही वाचा :
सत्यशोधकी पत्रकारितेचा ज्ञाननिर्मितीवर भर
‘बेअक्कल आणि भंपक कृषिमंत्री’