सांगली; प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क आहे. सुमारे २ हजार ४८२ मतदान केंद्रांवर आरोग्य विभागाच्यावतीने पथके तैनात करण्यात आली आहेत. मतदान केंद्रांवर अत्यावश्यक औषध किट पुरविण्यात येणार आहे. तसेच आरोग्य कर्मचारी व समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ यांनी दिली. (Sangli News)
डॉ. वाघ म्हणाले, मतदारांच्या आरोग्याची काळजी आरोग्य विभागाकडून घेतली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या सूचनेनुसार सर्व मतदान केंद्रांवर आवश्यक प्राथमिक उपचारासाठी औषध किट व व्हिलचेअर सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर एक आशा व आरोग्य कर्मचारी व समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदानादिवशी मतदान प्रक्रिया सुरू झाल्यापासून मतदान पूर्ण होईपर्यंत पुरेशा औषध किटसह कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.
प्रत्येक केंद्रावर व्हिलचेअर उपलब्ध करून दिली जाणार आहे. मतदान व निकालादिवशी जिल्ह्यातील खासगी २६ रुग्णालये अधिग्रहित केली असल्याची माहिती डॉ. वाघ यांनी दिली. (Sangli News)
मतदान केंद्रांवर रुग्णवाहिका तैनात
मतदानाच्या दिवशी १०८ क्रमांकाच्या २४ रुग्णवाहिका, आरोग्य विभागाकडील ६८ रुग्णवाहिका, प्राथमिक आरोग्य केंद्रांतील १५, जिल्हा रुग्णालयाकडील ३, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडील ३ रुग्णवाहिका तैनात असणार आहेत, अशीही माहिती डॉ. वाघ यांनी दिली