मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने केलेल्या घोषणेनुसार, राज्यात ‘सीएनजी’च्या किमती दोन रुपये किलोने वाढल्या आहेत. मुंबईसह राज्यातील इतर ठिकाणी या नवीन किमती लागू करण्यात आल्या आहेत. मुंबईत आधी ‘सीएनजी’ची किमत ७५ रुपये प्रतिकिलो होती. त्यानंतर आता यात दोन रुपयांनी वाढ झाली असून आता सीएनजी ७७ रुपये प्रतिकिलोवर विकले जाणार आहे. ‘सीएनजी’च्या किमती वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला चांगलाच फटका बसणार आहे. ‘सीएनजी’च्या किमती वाढल्याने टॅक्सी, ऑटो रिक्षा चालकांवर चांगलाच परिणाम होणार आहे. टॅक्सी, ऑटो रिक्षा या सीएनजी गॅसवर चालतात. तसेच देशात डिझेलवर चालणाऱ्या वाहनांमध्ये सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांची संख्या जास्त आहे. सीएनजीच्या दरात वाढ झाल्याने वाहनचालकांसह प्रवाशांनाही फटका बसू शकतो. (CNG)
महाराष्ट्र
छत्रपती संभाजीनगर : रणजित खंदारे
मराठा आरक्षणाबाबत दुटप्पी भूमिका घेऊन मराठा-ओबीसी वाद निर्माण करून आंदोलन मोडीत काढल्याचा आंदोलकांकडून तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना फोडल्याचा त्या पक्षातील कार्यकर्त्यांकडून भाजपवर आरोप केले जात आहेत. मराठवाड्यात या दोन्ही घटकांच्या रोषाला सत्ताधारी महायुतीला सामोरे जावे लागले. मात्र शेवटच्या दोन दिवसांत या रोषाला उतारा म्हणून ‘दामोजीरावांना’ मैदानात उतरवल्याची चर्चा आता गावोगावी सुरू आहे. दरडोई २०० पासून दहा हजारांवर पोहोचलेला ‘दामोजीरावां’चा जोश या रोषाला थोपवेल का, हे शनिवारी निकालानंतर स्पष्ट होईल.
पाचवीला पूजलेला दुष्काळ, दिवसेंदिवस महाग होत चाललेले शिक्षण, वाढती बेरोजगारी, बेभाव विकावा लागणार शेतीमाल अशा चक्रव्युहात सापडलेल्या नेतृत्वहीन झालेल्या मराठवाड्यात मराठा आरक्षणाची ठिणगी पेटली. परिणामी येथे आरक्षण आंदोलनाची धगही जास्त होती. या आंदोलनाची मुख्य रणभूमीच जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी हे गाव होते. मनोज जरांगे यांचे आंदोलन मोडून काढण्यासाठी या गावात झालेला लाठीचार्ज मराठा आंदोलकांच्या चांगलाच जिव्हारी लागलेला आहे. या घटनेनंतर हे आंदोलन महाराष्ट्रभर पसरले. त्यातच महायुती सरकार एकीकडे मराठा समाजासाठी आरक्षण देण्याची भाषा करत असतानाच भाजपशी जवळीक असलेले काही कार्यकर्ते याला राजरोसपणे विरोध करत न्यायालयातही गेले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सगेसोयऱ्याचा जीआर काढण्याचे आश्वासन जरांगे यांना दिले होते. मात्र तो जीआर निघाला नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षातील ज्येष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ यांची मराठा आरक्षणाबाबतची भूमिका, या सर्व घडामोडींमागे प्रामुख्याने भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा छुपा पाठिंबा असल्याचा आरोप जरांगे व मराठवाडा मराठा आंदोलक करत आहेत. यातूनच जरांगे यांनी ही विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता.
पत्रकार परिषद घेऊन काही मतदारसंघात उमेदवार देणार तर काही मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांना पाडणार अशी भूमिका जाहीर केली होती. परंतु दुसऱ्या दिवशीच त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला व या निवडणुकीत मराठा आंदोलकांनी स्थानिक पातळीवर भूमिका घ्यावी, असे जाहीर केले होते.
मराठा आंदोलकांचा भाजपबरोबरच त्यांच्यासोबत सत्तेत असलेल्या शिंदे व पवार गटावरही निवडणुकीत रोष दिसून येत होता.
शिवसेनेचे मराठवाड्यात गावपातळीवर संघटन मजबूत होते. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचेही या भागात प्राबल्य होते. मात्र हे दोन्ही पक्ष फुटले. दोन्ही पक्षांचे चिन्हही फुटलेल्या गटांकडेच गेले. या सर्व घडामोडींमागे भाजपच आहे, असा आरोप करणाऱ्या या दोन्ही पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये भाजपबरोबरच फुटून बाहेर पडलेल्या आमदारांवर मोठा रोष होता. त्यामुळे भाजपबरोबरच गद्दारांना पाडा अशी या कार्यकर्त्यांची भूमिका होती. मराठा आंदोलकांचीही भाजपसह महायुतीच्या उमेदवारांना पाडा अशी भूमिका होती. लोकसभा निवडणुकीत याचा फटका महायुतीला मोठ्या प्रमाणात बसला होता. कारण मराठवाड्यातील लोकसभेच्या छत्रपती संभाजीनगर वगळता इतर सातही जागी महायुतीला पराभव पत्करावा लागला होता.
या पार्श्वभूमीवर ही विधानसभा निवडणूक पाडापाडा विरुद्ध दामोजीराव अशी झाल्याचे बोलले जात आहे.
मुंबई; विशेष प्रतिनिधी : उद्योगपती गौतम अदानी यांनी कंत्राटे मिळवण्यासाठी २ हजार कोटींची लाच दिल्याच्या आरोपावरून अमेरिकेच्या कोर्टाने अटक वॉरंट काढले आहे. ही केंद्रातील सरकारसाठी लाजिरवाणी घटना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मदतीने गौतम अदानींनी देश-विदेशात मोठ्या प्रमाणात कंत्राटे मिळवून देशाला लुटले आहे. भ्रष्टाचाराचे आरोप करून कोणतीही चौकशी न करता मोदी सरकारने मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये टाकले, पण अमेरिकेच्या तपास यंत्रणांच्या तपासात अदानीने मोठ्या प्रमाणात लाच देऊन कंत्राटे मिळवल्याचे स्पष्ट झाल्यानंतरही भ्रष्ट अदानींना अटक का केली जात नाही? भारत सरकारने चौकशी करून गौतम अदानींना जेलमध्ये टाकावे, ही लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची मागणी रास्तच आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात ते म्हणाले, की पंतप्रधान मोदी यांच्या सहकार्याने व सरकारी यंत्रणांच्या मदतीने अदानी देशाला लुटत आहे. विमानतळ, बंदरे, ऊर्जानिर्मितीसह सर्वच क्षेत्रांत अदानीची मक्तेदारी सुरू असून त्याला जबाबदार मोदी आहेत. अदानीला देश-विदेशातील कंत्राटे देण्यासाठी ते मदत करत आहेत हे उघड आहे. धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या नावाखाली स्थानिकांना बेघर करण्याचा डाव आखून लाखो कोटींची मुंबईतील जमीन अदानीच्या घशात घातलेली आहे. विरोधी पक्षनेते या नात्याने राहुल गांधी यांनी अदानीवर कारवाई करण्याची केलेली मागणी रास्तच असून, अमेरिका जर गौतम अदानीच्या भ्रष्टाचाराबद्दल अटक वॉरंट काढू शकते तर भारत सरकार का कारवाई करू शकत नाही? देशाला लुटणाऱ्यांना जेलमध्ये टाकले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
मुंबईः गाईतील तीव्र वाढ नियंत्रित न केल्यास भारतीय अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान होऊ शकते. बँकिंग क्षेत्र नियामक रिझर्व्ह बँकेने नोव्हेंबर महिन्यासाठी जारी केलेल्या बुलेटिनमध्ये या गोष्टी सांगितल्या आहेत. रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, सणासुदीच्या काळात खपातील वाढ आणि कृषी क्षेत्रातील पुनर्प्राप्ती यांनी चालू आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या दुसऱ्या तिमाहीत अर्थव्यवस्थेला आधार दिला आहे आणि मागणीतील मंदीची भरपाई केली आहे; परंतु महागाई दरातील अनियंत्रित वाढ खऱ्या अर्थव्यवस्थेला हानी पोहोचवू शकते.
अर्थव्यवस्थेच्या स्थितीबाबत रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे, की ऑक्टोबर महिन्यात किरकोळ महागाई दरात मोठी झेप घेतली गेली आहे आणि हे सप्टेंबरमध्ये महागाईबाबत रिझर्व्ह बँकेने दिलेल्या इशाऱ्यांचे समर्थन करते. रिझर्व्ह बँकेने बुलेटिनमध्ये म्हटले आहे, की खाद्यपदार्थ आणि खाद्यतेलांच्या किमतीत झपाट्याने वाढ झाल्यामुळे महागाई वाढली आहे. रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, जे लोक घरी काम करतात किंवा घरी स्वयंपाक करतात त्यांच्या वेतनात वाढ झाल्यामुळे लोकांच्या राहणीमानावर खर्चाचा दबाव वाढला आहे.
वस्तू आणि सेवांमध्ये इनपुट खर्च वाढल्यानंतर या वस्तूंच्या विक्रीच्या किमतींवर लक्ष ठेवण्याची गरज रिझर्व्ह बँकेने व्यक्त केली आहे. रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, महागाईमुळे शहरी भागात आधीच उपभोगाची मागणी कमी होत आहे आणि यामुळे कॉर्पोरेटस्च्या कमाई आणि भांडवली खर्चावरही परिणाम झाला आहे. अशा स्थितीत महागाईचा दर कोणत्याही नियंत्रणाशिवाय वाढू दिला, तर उद्योग आणि निर्यातीसह अर्थव्यवस्थेचे नुकसान होईल.
महागाईमुळे शहरी भागात वापर कमी होत असल्याचे रिझर्व्ह बँकेनेही मान्य केले आहे. ‘एफएमसीजी’ कंपन्यांनी जाहीर केलेल्या दुसऱ्या तिमाहीच्या निकालांमध्येही या कंपन्यांनी याचाच पुनरुच्चार केला आहे. ‘एफएमसीजी’ कंपन्यांनी सांगितले, की महागाईमुळे शहरी भागातील ‘एफएमसीजी’ आणि खाद्यपदार्थांच्या मागणीवर परिणाम झाला आहे. ‘नेस्ले’चे ‘सीईओ’ सुरेश नारायण यांनी सांगितले, की ज्यांच्याकडे पैसे आहेत ते खूप खर्च करतात; पण मध्यमवर्गीयांचे हात घट्ट बांधले आहेत. ऑक्टोबर २०२४ मध्ये किरकोळ महागाईचा दर ६.२१ टक्क्यांच्या १४ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे, तर खाद्यान्न महागाईचा दर ११ टक्क्यांच्या जवळपास १०.८७ टक्के होता.
नागपूर; प्रतिनिधी : ‘भाजपच्या कार्यकर्त्यांना वाटते की आमचाच मुख्यमंत्री व्हावा, तीच स्थिती शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांची आहे. सरकार महायुतीचेच येईल. मात्र मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार सर्वसहमतीने ठरवला जाईल,’ असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, राज्यात भाजप-शिवसेना महायुतीचे सरकार शंभर टक्के येणार आहे. कारण, केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा फायदा ज्या-ज्या वर्गाला झाला आहे किंवा होणार आहे, तो वर्ग आमच्या बाजूने आहे. वीजबिल माफीमुळे शेतकरी, लाडक्या बहिणी आमच्या बाजूने आहेत. गरिबांना अन्नधान्याचा पुरवठा, यामुळे जनता आमच्यासोबत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या ५८-५९ योजना सुरू आहेत. त्यामुळे, शहरी वर्गालाही केंद्र आणि राज्य सरकार एकत्र राहिले, तर महाराष्ट्र क्रमांक एकचे राज्य होईल, असे वाटते, असे बावनकुळे म्हणाले.
अनेक भाजप कार्यकर्त्यांची इच्छा आहे फडवीस हेच मुख्यमंत्री असावेत, असा सवाल केला असता ते म्हणाले, आमचाच नेता मुख्यमंत्री व्हावा, असे वाटणे स्वाभाविक आहे. राष्ट्रवादीलाही अजित पवार आणि शिवसेनेला एकनाथ शिंदे व्हावेत. शेवटी निर्णय केंद्रीय आणि राज्यातील नेतृत्वाने बसून करायचा असतो, असे बावनकुळे म्हणाले.
मुंबई; प्रतिनिधी : महाराष्ट्र विधानसभेसाठी बुधवारी संध्याकाळी एक्झिट पोल जाहीर झाले. यातील बहुतेक एक्झिट पोलमध्ये, महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये काँटे की टक्कर होणार असल्याचे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. तथापि, महायुती आणि मविआच्या नेत्यांकडून मात्र विजयाचे दावे-प्रतिदावे केले जात आहेत. किंबहुना, आमचेच सरकार येणार असल्याचा ठाम विश्वासही व्यक्त केला जात आहे.
प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी एक्झिट पोल काहीही सांगत असले तरी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचीच सत्ता येणार असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार येईल. तेही काँग्रेसच्या नेतृत्वात येणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने प्रचारादरम्यान ‘व्होट जिहाद,’ अशी टीका करत होते, मग ब्राह्मणांनी भाजपाला मतदान केले तर आम्ही काय त्याला ब्राह्मणांचा जिहाद म्हणायचे का? असा सवालही पटोलेंनी केला आहे.
दुसरीकडे, महाविकास आघाडीला सत्तास्थापनेसाठी बहुमत मिळेल, असा विश्वास शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. महाविकास आघाडीला १६० ते १६५ जागा निश्चित मिळतील, असे भाकीतही त्यांनी केले. शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांचा पराभव निश्चित होणार असून, आम्ही आणि आमचे सर्व मित्रपक्ष बहुमताचा आकडा पार करणार आहोत, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
ठाकरे गटाचे प्रवक्ते अंबादास दानवे यांनीही असाच विश्वास व्यक्त केला आहे. आम्ही तळागाळातील माणसाशी जोडले गेलो आहोत. त्यामुळे मविआला पूर्ण बहुमत मिळेल. जनतेने विद्यमान सरकारविरोधात उठाव केला आहे. त्यामुळे सर्वेक्षणातून काहीही येवो, आघाडीला पूर्ण बहुमत मिळणारच आणि महायुतीचा सुपडासाफ होणारच असे, दानवे यांनी म्हटले आहे.
महायुतीच्या नेत्यांनीही आमचेच सरकार येणार असल्याचे म्हटले आहे. एक्झिट पोल म्हणतात त्यानुसार महायुतीचेच सरकार येईल. महाराष्ट्रातील एकूण चित्र पाहता महायुतीचेच सरकार येईल, असे स्पष्ट दिसत आहे, असे राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
सामान्य जनतेसाठी महायुतीचे सरकार सत्तेवर यावे, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटले आहे. साईबाबांनी मला प्रत्येक गोष्ट दिली. सामान्य जनतेसाठी आम्ही पुन्हा सत्तेत यावे, अशी भूमिका केसरकर यांनी बोलून दाखवली.
एक्झिट पोल काहीही येवोत, राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार येईल. तेही काँग्रेसच्या नेतृत्वात येणार आहे.
नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष काँग्रेस
महायुतीचेच सरकार येईल. महाराष्ट्रातील एकूण चित्र पाहता महायुतीचेच सरकार येईल, असे स्पष्ट दिसत आहे.
छगन भुजबळ, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस
मुंबई; विशेष प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीचे मतदान सुरु असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांदिवली मतदारसंघात अनधिकृतपणे भेट दिली. शिवसेनेचे उमेदवार दिलीप लांडे यांच्यासाठी रोड शो करून मतदान करण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री शिंदे यांची ही कृती आदर्श आचारसंहितेचा भंग करणारी आहे. शिंदे आणि दिलीप लांडेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तक्रार महाविकास आघाडीचे उमेदवार नसीम खान यांच्या मुख्य पोलिंग एजंट गणेश चव्हाण यांनी निवडणूक अधिकाऱ्याकडे केली आहे. (Naseem Khan)
तक्रारीत असे म्हटले आहे की, निवडणूक आयोगाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार मतदानाच्या दिवसापूर्वी ४८ तास इतर मतदार संघातील उमेदवार किंवा कोणतेही राजकीय नेते यांना स्वतःच्या मतदारसंघाव्यतिरिक्त इतर मतदार संघात प्रवेश करण्यास मनाई आहे. असे असताना मुख्यमंत्री शिंदे यांनी चांदिवलीतील शिवसेनेचे उमेदवार लांडे यांच्यासाठी मतदान सुरु असताना दुपारी ३च्या सुमारास काजुपाडा घास कंपाऊंड ते सेंट ज्युड हायस्कूल भागात रोड शो केला. शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन केले. रोड शो काढलेल्या भागात अनेक मतदान केंद्रे आहेत. हा आचारसंहितेचा उघड भंग आहे. त्यामुळे शिंदे यांच्यावर कारवाई करावी.
मुंबई : प्रतिनिधी : महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदारसंघांसाठी बुधवारी मतदान पार पडले. त्यापाठोपाठ ’एक्झिट पोल’ समोर आले आहेत. त्यांतील निष्कर्षानुसार महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात सत्तास्थापनेसाठी जोरदार चुरस होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. वेगवेगळ्या संस्थांच्या मतचाचणीत वेगवेगळे निष्कर्ष काढले असले, तरी त्यातून एक समान मुद्दा म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडीत जागांचा फारसा फरक राहणार नाही. भाजप हा सर्वांत मोठा पक्ष ठरेल, असे सर्वच संस्थांचे निष्कर्ष असले, तरी भाजपसह सर्वंच पक्षांच्या जागा मागच्या वेळच्या तुलनेत घटणार आहेत. अर्थात मागच्या वेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अविभाजित होते.
‘इलेक्टोरल एज’ यांच्या महाराष्ट्राच्या’एक्झिट पोल’नुसार महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचा अंदाज वर्तवला आहे. भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष असल्याचा अंदाजही यामधून वर्तवण्यात आला आहे. भाजपने सर्वाधिक १४८ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. ‘एक्झिट पोल’च्या अंदाजानुसार, भाजपला ७८ जागा मिळू शकतात. २०१९ च्या तुलनेत भाजपच्या २७ जागा कमी होत असल्याचे दिसते. अंदाजानुसार, राज्यात महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल. महाविकास आघाडीला राज्यात १५० जागांवर यश मिळेल, असा अंदाज वर्तवला. आघाडीत काँग्रेसला ६० जागा मिळतील, असा अंदाज आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ४६ आणि शिवसेना ठाकरे गटाला ४४ जागांवर यश मिळेल, असे या संस्थेच्या अहवालात म्हटले आहे.
‘इलेक्टोरल एज’च्या ’एक्झिट पोल’च्या अंदाजानुसार, भाजपला ७८ जागा मिळतील, तर शिवसेना शिंदे गटाला फक्त २६ जागांवर समाधान मानावे लागले. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त १४ जागा मिळतील, असा अंदाज आहे. अपक्ष आणि इतर पक्षांना राज्यात २० जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भाजपला २४ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे, तर काँग्रेस १७ टक्के मते घेऊ शकते. शिवसेनेला १० आणि ठाकरे गटाला १५ टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला १४, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला फक्त ६ टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे.
‘पोल डायरी’ने जाहीर केलेल्या ‘एक्झिट पोल’मध्ये महाविकास आघाडीला धक्का बसत आहे. या पोलमध्ये महायुतीला १२२ ते १८६ जागा आहे, तर महाविकास आघाडीला ६९ ते १२१ जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ‘पोल डायरी’च्या या ‘एक्झिट पोल’मुळे महाविकास आघाडीचे टेन्शन वाढले आहे. चाणक्य आणि अन्य काही संस्थांनी महायुतीला कौल दिला असला, तरी लोकशाही आणि ‘झी’च्या मतदानोत्तर चाचणीत महाविकास आघाडीला कौल दिला आहे.
मुंबई; विशेष प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीच्या पूर्व रात्री भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी बिटकॉइन प्रकरणात एका कथित माजी आयपीएस अधिकाऱ्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या संभाषणाची कथित ऑडिओ क्लिप जारी करून खळबळ उडवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र पटोले आणि सुळे यांनी हे आरोप फेटाळून लावले. या क्लिपमधील आवाज आपला नसल्याचे जाहीर करीत याप्रकरणी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याची तयारी त्यांनी दर्शवली.
विधानसभा निवडणुकीत पराभव दिसत असल्याने भाजपाकडून आमची बदनामी करण्यासाठी हे कुभांड रचल्याचा आरोपही त्यांनी केला. माध्यमांनी याबाबत योग्य वार्तांकन करावे. विनाकारण बदनामी करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पटोले यांनी दिला आहे.
पटोले म्हणाले की, मतदानाच्या दिवशी माध्यमांना हाताशी धरून बिटकॅाईन प्रकरणी माझ्यावर खोटे आरोप करून काँग्रेस पक्षाची व माझी बदनामी करण्याचा खोडसाळपणा भाजपाने केला आहे. माध्यमांनी या प्रकरणाची व्यवस्थित माहिती घेऊन वार्तांकन केले पाहिजे. दुर्देवाने भाजपच्या इशाऱ्यावर खोडसाळपणे आमची बदनामी करण्याचा प्रयत्न काहीजणांकडून सुरु आहे तो माध्यमांनी तत्काळ थांबवावा अन्यथा खोट्या बातम्या देणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही .
सुप्रिया सुळे यांनीही आपल्यावरील आरोपाचा इन्कार करताना म्हणाल्या की, निवडणुकीत पराभव दिसत असल्याने भाजपाकडून जाणीवपूर्वक बदनामी केली जात आहे. राज्यात आणि देशात त्यांचे सरकार असताना ते या प्रकरणाचा सविस्तर तपास का करत नाहीत?, त्या कथित संभाषणातील आवाज हा माझा नाही. आपण कोणत्याही चौकशीला आपण तयार आहोत. विनोद तावडे पैसे वाटप प्रकरणामुळे भाजपाचा खरा चेहरा समोर आल्याने ते लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी असले प्रकार करत आहेत याचा आरोपी त्यांनी केला.
बारामती; प्रतिनिधी : विरोधकांकडून मतदारांना धमक्या देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या मातोश्री शर्मिला पवार यांनी केला. बारामती मतदारसंघातील काही केंद्रांवर कार्यकर्त्यांमध्ये वादावादीचे प्रकार घडले. शहरातील महात्मा गांधी बालक मंदिर परिसरात दोन्ही पवार गट आमने सामने आले. त्यानंतर वाद झाला. त्यावर शर्मिला पवार यांनी प्रतिक्रिया दिली.
मतदारांना घड्याळाच्या शिक्क्यांच्या स्लिपचे वाटप करत त्यांना धमकावल्याचा आरोप शर्मिला पवार यांनी केला. यावरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मतदारांना दिलेल्या चिठ्ठ्यांच्या मागे घड्याळाचा शिक्का असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमधील स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून कार्यकर्त्यांना धमकावले जात असल्याच्या तक्रारीही आल्या असल्याचे त्या म्हणाल्या.
त्या म्हणाल्या, मतदारांकडे चिठ्ठ्या होत्या. त्यावर शिक्के मारून आत सोडले जात आहे. इतर ठिकाणी बूथवर फिरत होते. तेव्हा आमच्या कार्यकर्त्याला धमक्या आल्या. संपवतो, खल्लास करतो, अशी भाषा येथे सुरू आहे. हवे असेल तर सीसीटीव्ही कॅमेरे तपासा अशी मागणीही त्यांनी केली.
अजित पवार यांनी आरोप फेटाळले
शर्मिला पवार यांनी केलेले आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फेटाळले. मी एवढ्या निवडणुका लढल्या, पण कधीही आमच्या कार्यकर्त्यांनी अशी वक्तव्य केलेली नाहीत. माझा कार्यकर्ता असे कधीही वागणार नाही. तसे काही घडलेले असेल तर तिथल्या सीसीटीव्हीमध्ये सगळे रेकॉर्ड झालेले असेल, निवडणूक अधिकारी ते तपासतील, असे अजित पवार म्हणाले.