महाराष्ट्र
महायुतीकडून तरुणांच्या स्वप्नावर नांगर फिरवण्याचे काम : नाना पटोले
मुंबई; विशेष प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून दहा दिवस झाले तरी राज्याचे मुख्यमंत्रीपद रिक्त आहे. बेरोजगारांची मोठी संख्या राज्यात असून लाखो तरूण मुले-मुली नोकरीची अपेक्षेने वाट पाहत आहेत. असे असतानाच सरकारने पुन्हा एकदा कंत्राटी भरती सुरू करून सुशिक्षित तरुणांना नोकर भरतीच्या दिलेल्या आश्वासनाला हरताळ फासला आहे. काँग्रेस पक्षाचा कंत्राटी नोकर भरतीला तीव्र विरोध आहे. कंत्राटी भरती रद्द करा अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.
राज्यात जवळपास २.५ लाख सरकारीपदे रिक्त आहेत. विविध विभागातील मागासवर्गीय पदांचा अनुशेषही भरला नाही. असे असताना कंत्राटी भरती सुरू करण्याबाबत ते म्हणाले की, काँग्रेसचा त्याला तीव्र विरोध आहे. याप्रश्नी काँग्रेस नेहमीच तरुण मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे. यापूर्वी भाजपा युती सरकारने सुरु केलेल्या कंत्राटी पद्धतीच्या नोकर भरतीला तीव्र विरोध केला होता. मागील सरकारमधील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राटी भरती करणार नाही असे जाहीर करून ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द केला होता.
यानंतरही आरोग्य विभाग व एमपीएससीच्या माध्यमातून कंत्राटी पद्धतीने लिपीक व टंकलेखक भरण्यास सरकारने परवानगी दिली होती. अमरावती जिल्हा सत्र न्यायालय व एस. टी. महामंडळ यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी विभागीय कार्यालयात कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करण्यासाठी जाहिरात दिली आहे.
भाजपा युती सरकारच्या काळात तहसीलदार व नायब तहसीलदार पदाचीही कंत्राटी भरती करण्याची जाहिरात प्रसिद्ध केली होती. विशेष म्हणजे कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करण्याची कंत्राटे भाजपाच्याच बगलबच्च्यांच्या कंपनीला दिली जातात. विधानसभा निवडणुकीत भाजपा युतीने नोकर भरतीचे आश्वासनही दिले होते. त्याचा विसर पडलेला दिसत आहे. राज्यात प्रचंड बेरोजगारी वाढली आहे. अजून नव्या सरकारची स्थापनाही झालेली नाही. तरी, लगेच एस. टी. महामंडळाने तिकटांचे दर वाढवून जनतेच्या खिशाला कात्री लावण्यास सुरुवात केली आहे. भाजपा सरकारने आतापासूनच जनतेला लुटण्याचे काम सुरु केले असून कंत्राटी भरती व एस.टी. भाडेवाढ पाहता हे सरकार लाडक्या बहिणीला २१०० रुपये, शेतकऱ्यांची कर्जमाफी, वीजमाफी, शेतमालाला हमीभाव देतील, असे वाटत नाही असेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रमध्ये महायुतीला अपयश आले होते. यानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले. या निवडणुकीत महाविकास आघाडीला ५० जागाही जिंकता आल्या नाहीत. तर महायुतीने २३५ जागा जिंकल्या. विधानसभा निवडणुकीतील यशाचे श्रेय महायुतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला दिले आहे. आम्ही मुख्यमंत्री लाडकी बहिण योजने अंतर्गत महिलांना दर महिन्याला २,१०० रूपये असे आश्वासने विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने दिले होते. यामुळे राज्यातील महिलांनी बहुमताने राज्याची सत्ता महायुतीकडे दिली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीचा वाढीव हप्ता रूपये महिलांना कधी मिळणार याची प्रतिक्षा आहे.
दरम्यान, राज्य सरकारने असे जाहीर केले होते की, महिलांना २,१०० रूपये मिळण्यासाठी ७ ते १० महिन्यांचा कालावधी लागू शकतो. तर, लाडक्या बहिणचा नियमित हप्ता नोव्हेंबरमध्ये दिला जाणार असे जाहीर केले. परंतु, नोव्हेंबर उलटून गेला तरी या महिन्याचा हप्ता महिलांना अजूनही मिळालेला नाही.
महायुतीच्या जाहीरनामा समितीचे अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी लाडकी बहिण योजनेबद्दल मोठे विधान केले आहे. त्यांच्या विधानावरून असे दिसते की, महिलांना २१०० रुपये मिळण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी ‘दी इंडियन एक्सप्रेस’ मुलाखत दिली. यात त्यांनी त्यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महायुतीची भूमिका, निवडणुकीआधी दिलेलं आश्वासन व त्यावरील वाढीव खर्चाबाबत भूमिका मांडली.
यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले की, निवडणुकीच्या जाहीरनाम्यात महायुतीने आश्वासन दिले होते की, लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दिल्या जाणाऱ्या रकमेत वाढ करू. महिलांना १,५०० रुपयांऐवजी २,१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. हे आश्वासन तुम्ही पूर्ण कराल का? कारण राष्ट्रवादीने (अजित पवार) सांगितले की, हे केवळ एकनाथ शिंदे यांचं आश्वासन होते. यावर सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, “आम्ही १०० टक्के ते आश्वासन पूर्ण करू.
महिलांना दिली जाणारी रक्कम १,५०० रुपयांवरून २,१०० रुपये अशी वाढवली नाही. तर, देशभरात आमची प्रतिमा खराब होईल. निवडणुका जिंकल्यानंतर आश्वासन पूर्ण न करणारे अशी आमची प्रतिमा देशभर पसरवली जाईल. मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे की, आपण आपल्या शब्दांवर ठाम राहायला पाहिजे. महायुतीचा जाहीरनामा समितीचा अध्यक्ष या नात्याने मी आमच्या जाहीरनाम्यातून, संकल्प पत्रातून दिलेली आश्वासनं धुळीस मिळू देणार नाही.
महायुती सरकारमध्ये प्रत्येक पात्र महिलेला २,१०० रुपये देण्याची क्षमता आहे. मला वाटत नाही की, आमचा कोणताही मित्रपक्ष याला विरोध करेल. वाढीव रक्कम कधीपासून दिली जाणार? जानेवारी की जुलै, कोणत्या महिन्यापासून ही वाढीव रक्कम द्यायची यावर चर्चा केली जाईल. आम्ही गेल्या वर्षी भाऊबीजेच्या दिवशी ही योजना लागू केली होती. त्यामुळे आम्ही पुढील वर्षी भाऊबीजेपासून ती रक्कम वाढवू शकतो.
पुणे : शिरूर शहरातील सतरा कमानी पुलाजवळ पुणे-नगर महामार्गावर रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीस भरधाव वेगात आलेल्या बसची जोरदार धडक बसली. या अपघातात मोटरसायकलवरील तरुण जागीच ठार झाला. दत्तात्रय शिवराम शिंदे (वय ३६ वर्षे, रा शिंदेवाडी मलठण ता शिरूर जि. पुणे) असे मृत तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी विकास शिवराम शिंदे यांनी शिरूर पोलिसांत फिर्याद दिली आहे. याबाबत लक्झरी बस क्रमांक एम. पी. १३. झेड. इ.९७४८ वरील चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Accident)
मुंबईः राज्यात नवे सरकार स्थापन होताच प्रवाशांच्या खिशाला झळ बसण्याची शक्यता आहे. कारण लालपरीचा प्रवास महागणार आहे. राज्य परिवहन महामंडळाकडून एसटीची १४ ते १५ टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव शासनाकडे देण्यात आला आहे. त्यामुळे लालपरीचा प्रवास महाग होणार आहे. सरकार स्थापन झाल्यावर भाडेवाढीच्या प्रस्तावावर निर्णय घेतला जाईल.
मिळालेल्या माहितीनुसर, मागील तीन वर्षांपासून एसटीचे तिकीट दर स्थिर होते. तीन वर्षांपासून तिकीट दरात कोणतीही भाडेवाढ झाली नसल्याचे सांगत परिवहन महामंडळाकडून शासनाकडे भाडेवाढीचा प्रस्ताव सादर केला आहे. उत्पन्नाच्या तुलनेत खर्च भागत नसल्याचेही कारण देण्यात आले आहे. ही भाडेवाढ मंजूर झाल्यास प्रवाशांना १०० रुपयांच्या तिकिटावर १५ रुपये जादा मोजावे लागतील. सुरुवातीला परिवहन विभागाने १२.३६ टक्क्यांची किरकोळ वाढ सुचवली होती. मात्र, नंतर महामंडळात झालेल्या चर्चेनंतर त्यात सुधारणा करून १४.१३ टक्के करण्यात आली. यापूर्वी २७ नोव्हेंबर २०२१ रोजी लालपरीची भाडेवाढ झाली होती.
दरम्यान, एसटी वाचविण्यासाठी सरकारला भाडेवाढीला मंजुरी द्यावी लागेल, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी म्हटले आहे. सरकारने विविध योजनांच्या सवलतीचे पैसे महामंडळाला दिले नाहीत, असेही ते म्हणाले. एकीकडे सरकार योजनांच्या घोषणा करत सुटले आहे. दुसरीकडे त्या विविध सवलतींचे पूर्ण सवलत मूल्य सरकार देत नाही. दर महिन्याला ३५० कोटी रुपये किंवा त्यापेक्षा कमी पैसे दिले जातात; मात्र उर्वरित पैसे दिले जात नाही. सरकारकडे डिझेलचे १५० कोटी देणे बाकी आहे. वेळ आल्यास डिझेलसाठी गाड्या थांबू शकतात, अशी भीती श्रीरंग बरगे यांनी व्यक्त केली आहे.
तूट भरण्यासाठी भाडेवाढ
गेल्या अनेक दिवसांपासून एसटी महामंडळाला दररोज १५ कोटींच्या आसपास तोटा सहन करावा लागतो. ही तूट भरून काढण्यासाठी तसेच कर्मचाऱ्यांचे वाढलेले वेतन सुरळीत देण्यासाठी त्यासोबतच इंधनाचा वाढता दर, सुट्ट्या भागांची वाढती किंमत भागविण्यासाठी ही भाडेवाढ आवश्यक असल्याचे सांगण्यात येत आहे. एसटी महामंडळाकडून पाठवण्यात आलेल्या या प्रस्तावाबाबत राज्य सरकार यावर नेमका काय निर्णय घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मुंबईः राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा सुरू असताना काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक त्यांच्या मूळगावी दरे येथे गेले होते. तेव्हापासून राजकारणात विविध चर्चांना उधाण आले होते. त्यांची तब्येत बिघडल्यामुळे ते आराम करण्यासाठी गावी गेल्याचे सांगण्यात आले होते. शिंदे यांनी आज (दि.१) माध्यमांशी संवाद साधला. या वेळी बोलताना सत्ता स्थापन होत असताना गावी जायचे नाही का, असा सवाल त्यांनी केला आहे. मी नेहमीच गावी येत असतो, असेही ते म्हणाले.
महायुतीमध्ये समन्वयाचा अभाव नाही. मुख्यमंत्री कोण असेल याचा निर्णय नरेंद्र मोदी, अमित शाह घेतील. मी माझी भूमिका याआधीच स्पष्ट केली आहे. भाजपचे वरिष्ठ जो निर्णय घेतील, त्याला शिवसेनेचा पाठिंबा असेल, असे स्पष्टीकरण शिंदे यांनी दिले. माध्यमांमध्ये उपमुख्यमंत्रिपदासाठी खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. या सर्व चर्चा माध्यमांमध्ये सुरू आहेत. आमची अमित शहा यांच्यासोबत एक बैठक झाली आहे. आता तिनही पक्षांच्या नेत्यांची दुसरी बैठकदेखील लवकर होणार आहे. त्या बैठकीत चर्चा होऊन महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय होईल, असे ते म्हणाले.
आम्ही जनतेला उत्तरदायित्व आहोत. महायुतीमध्ये समन्वयाचा अभाव नाही. विरोधकांना काही काम राहिले नाही. त्यांच्याकडे विरोधी पक्ष नेता होण्याइतके संख्याबळ नाही. झारखंडमध्ये त्यांचा विजय झाला. लोकसभेतही ते जिंकले, मग तेव्हा ईव्हीएम मशीन चांगले होते का? असा सवाल विरोधकांना केला आहे. शिंदे म्हणाले की, लाडक्या बहिणींनी, लाडक्या शेतकऱ्यांनी आम्हाला भरभरून प्रेम दिले. सर्वांच्या प्रेम आणि आशीर्वादामुळे महायुतीचे सरकार प्रचंड बहुमताने आले आहे. निवडणुकीच्या काळात खूप धावपळ झाली. मी एका दिवसात ८-१० सभा घेतल्या. माझ्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात सुटी घेतली नव्हती. धावपळीमुळे थकवा आला होता. त्यामुळे मी आराम करण्यासाठी गावाकडे आलो होतो. गावी आलो की, वेगळे समाधान मिळते. आता माझी तब्येत ठीक आहे, असे ते म्हणाले.
नागपूरः लोकसंख्या वाढीच्या दरात (प्रजनन दर) घट झाल्याबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी चिंता व्यक्ती केली आहे. लोकसंख्येच्या दरात होत असलेली घट चिंतेचा विषय आहे. लोकसांखिकीच्या नियमानुसार लोकसंख्येचा वृद्धीदर २.१ पेक्षा कमी नसावा, असे ते म्हणाले.
नागपुरात एका कार्यक्रमात बोलताना भागवत म्हणाले की, आधुनिक लोकसंख्या विज्ञानानुसार, जेव्हा एखाद्या समाजाची संख्या (प्रजनन दर) २.१ पेक्षा कमी होते, तेव्हा तो समाज जगातून नष्ट होतो. त्या समाजावर कोणतेही संकट न येताही तो समाज नामशेष होतो. याचप्रकारे अनेक भाषा, अनेक समाज नष्ट झाले. त्यामुळे लोकसंख्या वाढीचा दर २.१ च्या खाली जाता कामा नये. आपल्या देशाने १९९८ किंवा २००२ मध्ये लोकसंख्या धोरण तयार केले.
लोकसंख्येचा वृद्धी दर २.१ च्या खाली जाता कामा नये, असे त्यात नमूद करण्यात आले आहे. जर आपण लोकसंख्या वाढीचा दर २.१ विचारात घेतला, तर आपल्याला दोनपेक्षा अधिक मुलांची गरज आहे. तीन तर असायलाच हवीत. लोकसंख्येचे विज्ञान हेच सांगते. समाज टिकायला हवा यासाठी संख्या महत्त्वाची आहे.
भारतात आदर्श प्रजनन दर २.१ इतका आहे. याचा अर्थ एका महिलेने तिच्या जीवन काळात सरासरी २.१ मुलांना म्हणजेच २ पेक्षा अधिक मुलांना जन्म द्यायला हवा. हा आकडा जागतिक आरोग्य संघटनेने निश्चित केला आहे. देशातील लोकसंख्या स्थिर राखण्यासाठी २.१ प्रजनन दर गरजेचा आहे. असे न झाल्यास लोकसंख्येचे असंतुलन बिघडू शकते. एका महिलेला सरासरी किती मुले यावरून त्या देशाचा किंवा समाजाचा प्रजनन दर समजतो.
हिंदूंना अधिक मुले असावीत
देशात एक समान लोकसांखिकी योजना नसल्यास देशातील लोकसंख्येचा संतुलन बिघडण्याचा धोका आहे. त्यामुळे भारतीय लोकशाही धोक्यात असल्याचे संघाकडून सातत्यानं सांगण्यात येत आहे. हिंदूंना अधिक मुले असावीत, अशी विधाने भाजपचे काही नेते करत सांगतात. विशेष म्हणजे संघाशी अधिक जवळीक असणाऱ्या भाजप नेत्यांकडूनच अशी विधाने केली जातात.
शरद पवार गटाच्या नेतेपदी आव्हाड तर, मुख्य प्रतोदपदी रोहित पाटील यांची निवड
मुंबई, विशेष प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीत दारुण अपयशाला सामोरे जावे लागलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विधानसभेतील गटनेतेपदी आमदार जितेंद्र आव्हाड यांची निवड करण्यात आली आहे. तर मुख्य प्रतोद म्हणून रोहित पाटील व प्रतोदपदी उत्तम जानकर यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत याबाबतचा निर्णय एकमताने घेण्यात आले असल्याचे माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिले.
रोहित पाटील हे दिवंगत नेते आर.आर. पाटील यांचे सुपुत्र व देशातील सर्वात तरुण आमदार आहेत. कमी वयात पक्षाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. बैठकीत विधिमंडळ पक्षाच्या नेत्यांबाबत निर्णय झाला नाही. बैठकीसाठी आज (दि.१) ९ सदस्य उपस्थित होते, बीडचे आमदार संदीप क्षीरसागर मतदारसंघात जाहीर कार्यक्रम असल्याने उपस्थित नव्हते. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने १० जागा जिंकल्या आहेत. त्यात, तासगाव मतदारसंघातून रोहित पाटील तर माळशिरस मतदारसंघातून उत्तम जानकर विधानसभेत पोहोचले आहेत.
राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालात महाविकास आघाडीला अपेक्षित यश आलं नसून केवळ ४९ जागांवर विजय मिळाला आहे. त्यामध्ये, शिवसेना ठाकरे गट २० जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला, तर काँग्रेसने १७ जागा जिंकल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाला केवळ १० जागांवर यश मिळाले आहे. त्यामुळे, महायुतीमधील एकाही पक्षाकडे विरोधी पक्षनेतेपद मिळेल, एवढे संख्याबळ नाही. मात्र, महाविकास आघाडीमधील पक्षांकडून विधिमंडळ गटनेते आणि प्रतोपदी पक्षातील नवनिर्वाचित आमदारांची नियुक्ती केली जात आहे.
मारकवाडीतील ग्रामस्थ पुन्हा करणार मतदान
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांच्या मारकवाडी गावातील ग्रामस्थांनी ईव्हीएम मशीनवर अविश्वास दाखवत पुन्हा एकदा सोमवारी (दि.२) प्रतीकात्मक मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. यातून बॅलेट पेपरवर मतदान घेऊन ग्रामस्थ पूर्णपणे पाठीशी असल्याचे दिसून येईल , असा त्यांचा दावा असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.
भूम : जय म्युझिकल अँन्ड मोबाईल शॉपीमध्ये दि. १९ रोजी दोघांनी चोरी केली होती. या प्रकपणी मोहन बागडे यांनी पोलिसांत फिर्याद नोंदवली होती. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने मुद्देमालासह चोरांना पकडले आहे. (Dharashiv)
या प्रकरणी फिर्यादी मोहन बागडे (रा. शिवाजीनगर, वेताळ रोड भूम) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जय म्युझिकल अँड मोबाईल शॉपी दुकानाचे शटर उचकटून विविध कंपन्यांचे मोबाईलसह इतर साहित्य असा एकूण ६ लाख ८९ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला होता.
तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करून संशयित आरोपी राजा काळे आणि सुभाष चव्हाण यांना ताब्यात घेतले. चोरीतील ५ लाख 35 हजार दोनशे रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.