कोल्हापूर : डॉ. तारा भवाळकर यांनी आपल्या संशोधनातून लोकसाहित्यातील आदिमतेबरोबरच अद्यतनता अधोरेखित केली आणि लोकसाहित्याच्या अभ्यास, संशोधनाला व्यापक आयाम प्रदान केले, असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांनी बुधवारी (९ एप्रिल) केले. (Bhawalkar felicitated)
शिवाजी विद्यापीठाचा प्राचार्य रा. कृ. कणबरकर पुरस्कार डॉ. मोरे यांच्या हस्ते लोकसाहित्याच्या अभ्यासक तथा ९८व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांना प्रदान करण्यात आला. त्या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते. (Bhawalkar felicitated)
डॉ. भवाळकर यांना शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात डॉ. मोरे यांच्यासह कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते कणबरकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, रक्कम रु. १,५१,००० चा धनादेश, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
डॉ. सदानंद मोरे म्हणाले, लोकसाहित्याच्या अभ्यासाचे उद्दिष्ट हे केवळ इतिहासाचा अभ्यास करणे नव्हे, तर आधुनिक परिप्रेक्ष्यातून परंपरा समजून घेण्याचा अभ्यास आहे. ही बाब तारा भवाळकर यांनी त्यांच्या अवघ्या लोकसाहित्याच्या अभ्यासातून आणि संशोधनातून सिद्ध केली आहे. लोकसाहित्याने आणि लोकसंस्कृतीने लोकांनाही सामावून घेण्याचा दबाव तत्कालीन व्यवस्थेवर निर्माण केला. म्हणून लोकांशी निगडित माहितीचे संकलन असणारा अथर्व चौथा वेद म्हणून सामावून घेतला गेला, याचे अत्यंत वस्तुनिष्ठ विश्लेषण ताराबाईंनी केले आहे. (Bhawalkar felicitated)
सत्काराला उत्तर देताना डॉ. तारा भवाळकर यांनी मराठी भाषेच्या वाटचालीचा, तिच्या प्रवाहीपणाचा आणि लोकसाहित्यातील तिच्या अस्तित्वखुणांचा तपशीलवार वेध घेतला. मातृभाषेवर उत्तम पकड असल्यास कोणत्याही क्षेत्रात तिचा प्रभावी वापर करणे सहजशक्य असल्याचे त्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, विद्यापीठांनी शिक्षण हे पदव्यांसाठी नव्हे, तर शहाणपणा विकसित करण्यासाठी द्यावे आणि विद्यार्थ्यांनीही ते त्याच भावनेने घ्यावे. ज्ञानाच्या क्षेत्रातले अवरुद्ध होत चाललेले प्रवाह अनिरुद्ध होण्यासाठी काम करण्याची गरज शिक्षण क्षेत्रात निर्माण झाली आहे. (Bhawalkar felicitated)
कोल्हापूरविषयीचा जिव्हाळा व्यक्त करताना डॉ. भवाळकर म्हणाल्या, कोल्हापूर ही कलानगरी आहे. चित्र, शिल्प, संगीत, चित्रपट आणि नाट्य अशा सर्वच कला इथे फुलल्या. त्यामुळे कोल्हापूरमध्ये नाटकाचे सादरीकरण करताना नेहमीच अभिमान आणि आनंद वाटला. ही करवीरनगरीच्या समृद्ध आणि संपन्नतेचा कळस राजर्षी शाहू महाराजांच्या क्रांतीने चढविला आहे, याचे कृतज्ञ स्मरण बाळगणे आवश्यक आहे. शिवाजी विद्यापीठाशी कुलगुरू डॉ. कणबरकर यांच्या कारकीर्दीपासून विविध भूमिकांतून स्नेह वृद्धिंगत झाल्याचेही त्यांनी सांगितले.
‘माझा ग्रंथसंग्रह आता शिवाजी विद्यापीठाचा’
आपल्याकडील सर्व ग्रंथसंपदा शिवाजी विद्यापीठाला प्रदान करीत असल्याची घोषणा या प्रसंगी डॉ. तारा भवाळकर यांनी यावेळी केली. ‘माझा ग्रंथसंग्रह हा आता आपला आहे,’ अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी यामध्ये कळीची भूमिका बजावल्याचेही त्यांनी नमूद केले.
कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के अध्यक्षीय मनोगतात म्हणाले, भारतीय लोकसंचिताचा डॉ. तारा भवाळकर यांनी अत्यंत सूक्ष्मपणे आणि संवेदनशीलतेने वेध घेतलेला आहे. त्याच्या पाऊलखुणा त्यांच्या साहित्याबरोबरच ‘मायवाटेचा मागोवा’सारख्या उपक्रमांतूनही उमटलेल्या आहेत. त्याचा लाभ घ्यायला हवा. विद्यापीठाला त्यांनी ग्रंथसंपदा देण्याचा निर्णय घेतला, त्याचे स्वागत करतानाच विद्यापीठाच्या राजर्षी शाहू लोकविद्या केंद्राला त्यांनी पुढील दहा वर्षांच्या वाटचालीचा आराखडा आखून दिला, याबद्दलही त्यांचा कृतज्ञ आहे. (Bhawalkar felicitated)
पुरस्कार निवड समितीचे सदस्य प्राचार्य डॉ. बाबासाहेब खोत यांनी स्वागत, प्रास्ताविक आणि परिचय करून दिला. मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे यांनी मानपत्राचे वाचन केले. डॉ. अरुण कणबरकर यांनी डॉ. तारा भवाळकर यांचा कणबरकर कुटुंबीयांतर्फे सत्कार केला. कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले. माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, बी.पी. साबळे, प्रा. अविनाश सप्रे, बी.एम. हिर्डेकर, सुरेश शिपूरकर, रणधीर शिंदे, डॉ. प्रभंजन माने यांच्यासह कणबरकर कुटुंबीय उपस्थित होते.
हेही वाचा :
आरक्षण मर्यादा वाढवणार
‘दीनानाथ’ची आणखी एका प्रकरणात चौकशी