हेमा समितीचा अहवाल समोर आल्यानंतर ‘असोसिएशन ऑफ मल्याळम मुव्ही आर्टिस्ट’ म्हणजेच (AMMA) ची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते मोहनलाल यांनीही AMMAच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून असोसिएशनच्या काही सदस्यांवर मल्याळम सिनेविश्वातील कलाकारांकडून लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले होते. त्यामुळे अभिनेते सिद्दीकी यांनी AMMA च्या सरचिटणीसपदाचा आणि दिग्दर्शक रंजित यांनी केरळ चलचित्र अकादमीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.
“AMMA समितीच्या काही सदस्यांवर कलाकारांनी केलेल्या आरोपांनंतर नैतिक आधारावर या कार्यकारिणीला बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन महिन्यांत निवडणुकीनंतर नवीन समिती स्थापन केली जाईल,” असे असोसिएशनने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. राजीनामा देणाऱ्यांमध्ये मोहनलाल यांच्यासह AMMAचे उपाध्यक्ष जयन चेरथला आणि जगदीश, सहसचिव बाबूराज, खजिनदार उन्नी मुकुंदन आणि कार्यकारी समिती सदस्य अन्सीबा हसन, सरयू मोहन, विनू मोहन, टिनी टॉम, अनन्या, सुरेश कृष्णा, कलाभवन शाजोन, सूरज वेंजारामूडू, जोमोल, जॉय मॅथ्यू आणि टोव्हिनो थॉमस यांचा समावेश आहे.
मल्याळम कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेते असूनही या संपूर्ण प्रकारावर मोहनलाल यांनी मौन बाळगल्यामुळे सोशल मीडियावर देखील चर्चांना उधाण आले होते.