बीजिंग : अमेरिका आणि चीनदरम्यानचे करयुद्ध थांबण्याची चिन्हे दिसत नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे व्यापारी भागीदार देशांवरील कराची अंमलबजावणी ९० दिवस लांबणीवर टाकली असली तरी चीनला त्यातून सूट दिलेली नाही. चीनने अमेरिकेसमोर माघार घेतलेली नाही. चीनवरील आयात शुल्क थेट १४५ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून चीननेही तेवढेच आयातशुल्क अमेरिकेवर लादण्याचा इशारा दिला आहे. किंबहुना, त्याची अंमलबजावणीही लगेच केली जाईल, असे म्हटले आहे.(Trade war)
९० दिवसांची स्थगिती
डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक देशांवरील आयातशुल्काला ९० दिवसांची स्थगिती दिली. चीनवरील आयातशुल्क थेट १४५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे संकेत दिले. त्यामुळे चीन आणि अमेरिका यांच्यातील ‘टॅरिफ वॉर’ आणखी तीव्र झाले आहे. ट्रम्प यांनी चीनवर आधी १०४ टक्के आयात कराची घोषणा केली आणि त्यानंतर चीननेही जोरदार प्रत्युत्तर दिले. अमेरिकेवर ८४ टक्के वाढीव आयात कर लादण्याची घोषणा केली. आता अमेरिकेने चीनवरील आयातशुल्क थेट १२५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे संकेत दिले. चीनने जोरदार प्रत्युत्तर दिले. (Trade war)
चीन कुणाच्या धमक्यांना भीक घालणार नाही. चीन कुणालाही घबरत नाही. चीनने गेल्या ७० वर्षात अत्यंत कष्टाने आणि मेहनतीने यश मिळवले आहे. त्यामुळेच आम्ही आमच्या पायावर उभे आहोत.
शी जिनपिंग
चीन शनिवारपासून लादणार कर
चीन आता शनिवारपासून अमेरिकन वस्तूंवर १२५ टक्के कर लादणार असल्याची माहिती आली आहे. चीनच्या अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारपासून अमेरिकन वस्तूंवर १२५ टक्के कर लादण्यात येईल. चीनवर अमेरिकेने लादलेले अतिरिक्त आयातशुल्क आंतरराष्ट्रीय आणि आर्थिक व्यापार नियमांचे उल्लंघन आहे. हे निर्णय पूर्णपणे एकतर्फी आणि जबरदस्तीने लादल्याचे चीनच्या अर्थ मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे.
ट्रम्प यांचेच हसे होईल : चीन
या व्यापारयुद्धाच्या पार्श्वभूमीवर चीनने म्हटले आहे की, यापुढे अमेरिका जाहीर करत असलेल्या कसल्याची अतिरिक्त शुल्काच्या घोषणेवर चीन उत्तर देणार नाही. अमेरिका आता कितीही कर लादू दे, आता त्याला काहीही अर्थ राहणार नाही. जागतिक अर्थव्यवस्थेत त्याचेच हसे होणार आहे, असा दावाही चीनने केला आहे. (Trade war)