नवी दिल्ली : सध्या आंबेडकरांच्या नावे जप करण्याची जणू फॅशनच आली आहे. देवाच्या नावे एवढा जप केला असता तर सात वेळा स्वर्ग मिळाला असता, असे वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत केले. त्यांच्या या वक्तव्याचा विरोधी पक्षांनी तीव्र शब्दांत निषेध केला. (Amit Shah)
शाह यांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद संसदेच्या दोन्ही सभागृहात उमटले. विरोधी सदस्यांनी शाह यांनी माफी मागावी, अशी मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे गदारोळ उडाला. या गदारोळात लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि वायनाडच्या खासदार प्रियांका गांधी यांच्यासह विरोधी पक्षांच्या खासदारांनी बुधवारी संसदेच्या आवारात अमित शाह यांनी यांच्या वक्तव्याविरोधात निदर्शने केली. तसेच त्याचा निषेधही केला. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, आपचे खासदार संजय सिंह आणि आरजेडीचे खासदार मनोज सिन्हा आदींनी आंदोलनात सहभाग घेतला. (Amit Shah)
शाह यांच्या वक्तव्यावरून भाजप आणि आरएसएसच्या नेत्यांना आंबेडकरांबद्दल किती द्वेष आहे ते दिसून आले. त्यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणीही यावेळी विरोधी पक्षाच्या खासदारांनी केली.
शाह यांनी माफी मागावी
काँग्रेसचे खासदार मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, ‘ शाह यांनी बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाचा अपमान केला आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेचा आदर करायचा नाही हे त्यांची मनुस्मृती आणि आरएसएसची विचारधारा स्पष्ट करते. त्यांच्या वक्तव्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन देशातील जनतेची माफी मागितली पाहिजे.’ (Amit Shah)
मुखवटा गळून पडला
आंबेडकरांविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे भाजप आणि अमित शाह यांचा मुखवटा गळून पडला आहे. संविधानाची ७५ वर्षाची गौरवशाली परंपरा आहे. मात्र लोकशाहीच्या मंदिरातच शाह यांनी आंबेडकरांविरुद्ध अवमानास्पद टिपणी केली. त्यातून त्यांची आणि भाजपची जातीयवादी, दलितविरोधी मानसिकता स्पष्ट दिसते, अशा शब्दांत तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अमित शाह यांच्यावर प्रहार केला आहे. लोकसभेत त्यांच्या २४० जागाच आहेत. असे असताना त्यांचे वर्तन आक्षेपार्ह आहे. मग ४०० जागांचे त्यांचे स्वप्न साकार झाले असते तर देशाचे किती नुकसान झाले असते, याची कल्पना केलेली बरी. डॉ. आंबेडकरांचे योगदान पूर्णपणे पुसून टाकण्यासाठी त्यांनी इतिहासाचे पुनर्लेखन केले असते, अशी भीतीही बॅनर्जी यांनी ‘एक्स’वर पोस्ट करीत व्यक्त केली आहे.
काँग्रेस स्वत:चे पाप लपवू शकत नाही : मोदी
दरम्यान, शाह यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांगलाच समाचार घेतला. ‘काँग्रेस स्वत:चे पाप लपवू शकत नाही. त्यांनी अनेक वर्षे केलेली गैरकृत्ये लपून राहतील, असे त्यांना वाटत असेल तर ते गंभीर चूक करत आहेत,’ अशा शब्दांत मोदी यांनी काँग्रेसला प्रत्युत्तर दिले. भारतीय संविधानाच्या शिल्पकाराचा काँग्रेसने सातत्याने अवमान केल्याचा पुनरूच्चारही त्यांनी केला.
एका घराण्याच्या नेतृत्वाखालील पक्षाने डॉ. आंबेडकरांचा वारसा नष्ट करण्यासाठी आणि अनुसूचित जाती/जमातींना अपमानित करण्यासाठी दरवेळी घाणेरडे राजकारण केले, ते भारतातील जनतेने वेळोवेळी पाहिले आहे. काँग्रेसने निवडणुकीत दोनदा आंबेडकरांचा पराभव केला. पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यांच्या विरोधात प्रचार केला. काँग्रेसने त्यांना भारतरत्न नाकारला, याकडेही मोदी यांनी लक्ष वेधले.
The mask has fallen!
As Parliament reflects on 75 glorious years of the Constitution, HM @AmitShah chose to TARNISH this occasion with DEROGATORY remarks against Dr. Babasaheb Ambedkar, that too in the temple of Democracy.
This is a display of BJP’s CASTEIST and ANTI-DALIT…
— Mamata Banerjee (@MamataOfficial) December 18, 2024
हेही वाचा :