कोल्हापूर; प्रतिनिधी : पाच वर्षाच्या मुलीचे अपहरण करुन कर्नाटक हद्दीतून पळून जाणाऱ्या संशयिताला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी अपहरणकर्ता आणि त्याला मदत करणाऱ्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी १२ तासात गुन्ह्याचा छडा लावून मुलीची सुटका केली. (Kolhapur crime)
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाईची माहिती दिली. या गुन्ह्यातील संशयित संतोष सुरेश माळी (वय ३३, रा. यादव नगर) याला दारुचे व्यसन असून त्याच्या व्यसनाला कंटाळून एक महिन्यापूर्वी तिची पत्नी निघून गेली. पत्नीची बहिण नकुशा कुमार चव्हाण व तिच्या घरातील लोकांनी आपल्या पत्नीला लपवून ठेवल्याचा आणि पळून जाण्यास मदत केल्याचा संशय संतोषला होता. त्यामुळे तो मेव्हणीच्या घरच्यांवर चिडून होता. मंगळवारी (दि. ३) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास संतोष माळी आणि त्याचा सहकारी प्रथमेश शिंगे मोटारसायकलरुन राजारामपुरीतील शाहूनगर येथे आले. त्याने मेव्हणी नकुशा चव्हाण हिच्या ताब्यातील पाच वर्षाच्या मुलीस हिसकावून घेत मोटार सायकलवरुन पळ काढला. त्यानंतर नकुशा चव्हाण यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात मुलीचे अपहरण केल्याची फिर्याद दिली. (Kolhapur crime)
मुलीचे अपहरण केल्यानंतर काही वेळाने संतोष् माळी याने नकुशा चव्हाणला फोन केला. ‘माझ्या पत्नीला समोर आणा नाही, तर तुमच्या मुलीला मारुन टाकणार’ अशी धमकी दिली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मुलीची सुटका करण्याचा आदेश दिला. पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक चेतन मसुटगे, वैभव पाटील, गजानन गुरव, महेंद्र कोरवी, योगेश देसाई, विशाल खराडे, प्रदीप पाटील यांचे तपास पथक नेमले. पोलिसांनी तांत्रिक पुराव्याच्या आधारे तपास सुरू केला पण संशयिताने मोबाईल बंद ठेवला होता. त्यामुळे त्याची माहिती मिळत नाही. पोलिसांनी संतोष माळी याच्या मित्र, नातेवाईकांकडून माहिती घेतली. संतोष माळी याने त्याच्यासोबत असलेल्या प्रथमेश शिंगे याला निपाणीच्यापुढे असलेल्या तवंदी घाटात सोडून तो निपाणीच्या दिशेने गेला असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्याकडून कळाली. पोलिसांनी सीमाभागात तपास सुरू केला. संशयित निपाणी अर्जुननगर येथे गेल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी संतोष माळी याची मोटार सायकल शोधून संतोष आणि अपहरण केलेल्या मुलीची सुटका केली. मुलीला तिची आई नकुशा चव्हाण यांच्या ताब्यात दिले.
या गुन्ह्याच्या तपासात पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर,सहाय्यक पोलिस निरीक्षक चेतन मसुगटे, पोलिस हवालदार वैभव पाटील, गजानन गुरव, महेंद्र कोरवी, योगेश गोसावी, विशाल खराडे, प्रदीप पाटील, संतोष बरगे, परशुराम गुजरे, प्रविण पाटील, नामदेव यादव, कृष्णात पिंगळे, चालक राजेंद्र वरंडेकर, सायबरचे सहास पाटील यांचा सहभाग होता.
#कोल्हापूर_पोलीस #उत्कृष्ट_कामगिरी
राजारामपुरी पोलीस ठाणे हद्दीतील 5 वर्षाच्या मुलीचे अपहरण करणारे रेकॉर्ड वरील 2 गुन्हेगारांचा 12 तासाच्या आत शोध घेऊन अपहरित मुलीची केली सुटका. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांची कामगिरी. pic.twitter.com/Waf7yElyY3— कोल्हापूर पोलीस -KOLHAPUR POLICE (@KOLHAPUR_POLICE) December 4, 2024
हेही वाचा :