कोल्हापूर : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाने बैठका सुरू केल्या आहे. मुंबईत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील मतदार संघांचा आढावा घेतला. जिल्ह्यातील दहा मतदारसंघापैकी कोल्हापूर उत्तर मतदार संघ शिवसेनेने लढवावा, अशी जोरदार मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात कोल्हापूर उत्तरचा आग्रह धरला जाईल, असे आश्वासन ठाकरे यांनी दिले. कोल्हापूर उत्तरसाठी जो उमेदवार दिला जाईल त्यांच्या पाठीशी सर्व पदाधिकारी, शिवसैनिक राहतील. कोणत्याही परिस्थितीत ही जागा निवडून आणली जाईल, असा निर्धारही शिवसेना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
‘मातोश्री’वर झालेल्या आढावा बैठकीला माजी खासदार विनायक राऊत, आमदार मिलिंद नार्वेकर, कोल्हापूर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर उपस्थित होते. ठाकरे यांनी दहाही मतदारसंघाचा आढावा घेतला. कोल्हापूर उत्तर, राधानगरी, शिरोळ, हातकणंगले, शाहूवाडी या मतदारसंघात शिवसेनेला जिंकण्याची चांगली संधी आहे. या मतदार संघाचा आग्रह धरावा, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील परिस्थिती ठाकरे यांनी जाणून घेतली. सध्या हा मतदार काँग्रेसकडे असला तरी १९९० पासून या मतदार संघात पाचवेळा शिवसेनेचा विजय झाला आहे. हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने या मतदार संघात पक्षाला मोठी संधी आहे. उद्धव ठाकरे या मतदारसंघात जो उमेदवार देतील त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची ग्वाहीही पदाधिकाऱ्यांनी दिली. शिष्टमंडळात शिवसेना उप नेते आणि जिल्हा प्रमुख संजय पवार, जिल्हा प्रमुख विजय देवणे, शहर प्रमुख रवीकिरण इंगवले, सुनील मोदी, उप प्रमुख दिनेश साळोखे यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.
दक्षिण महाराष्ट्र
कोल्हापूर; प्रतिनिधी : धुळ्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री रोहिदास चुडामण पाटील (वय ८४) यांचे आज (दि.२७) सकाळी धुळे येथे निधन झाले. काँग्रेसचे धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांचे ते वडील होत. त्यांच्यावर उद्या (दि.२८) सकाळी धुळ्यातील एस.एस.व्ही.पी.एस. कॉलेजच्या मैदानात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ( Rohidas Patil )
गेल्या फेब्रुवारी महिन्यात रोहिदास पाटील ( Rohidas Patil ) त्यांच्या कोल्हापुरातील मुलीला भेटण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांची प्रकृती अचानक बिघडली होती. त्यांना उपचारासाठी तत्काळ खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना फुप्फुसाचा आजार असल्याचे निदान झाले होते. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. उपचारानंतर धुळ्याला परतले होते. मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नव्हती. त्यांच्यात पश्चात पुत्र, आमदार कुणाल पाटील आणि विनय पाटील, मुलगी स्मिता पाटील असा परिवार आहे. कोल्हापुरातील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर पाटील यांचे ते सासरे होत.
आभाळ कोसळले!!
आमचे वडील आदरणीय दाजीसाहेब आज आपणा सर्वांना सोडून गेले.🥺 सातत्याने ५ दशके येथील माती आणि माणसे समृध्द व्हावी म्हणून मांडलेला लोकसेवेचा झंझावात आज शांत झाला आहे. उत्तर महाराष्ट्र आणि धुळे जिल्ह्याला आकार प्राप्त व्हावा यासाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले.
आदरणीय… pic.twitter.com/6g3FU9sFvI
— Kunal Patil (@Kunal_R_Patil) September 27, 2024
हेही वाचा :
कोल्हापूर; प्रतिनिधी : एसटी बसमध्ये गळा आवळून जावयाचा खून केल्याची घटना कोल्हापुरात (Kolhapur Crime News) घडली. सासू, सासऱ्यानेच हा खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाची सूत्रे हलवत अवघ्या आठ तासांत संशयितांना बेड्या ठोकल्या. गडहिंग्लज-कोल्हापूर एसटी बसमध्ये ही घटना घडली. तेव्हा रात्रीच्या वेळी अवघे पाच प्रवाशी बसमध्ये होते. संदीप रामगोंडा शिरगावे (वय ३०, रा. चिंचवाड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) असे मृताचे नाव आहे. हणमंताप्पा यल्लाप्पा काळे (वय ४८), सावत्र सासू गौरवा हणमंताप्पा काळे (३०, दोघे रा. हुनिगनाळ, ता. गडहिंग्लज) अशी संशयितांची नावे आहेत. पँटच्या नाडीने हा खून केल्याचे स्पष्ट झाले आहे.
शाहूपुरी पोलिसांनी खुनाच्या तपासाची माहिती दिली. बुधवारी सकाळी मध्यवर्ती बसस्थानक परिसरात एका युवकाचा मृतदेह आढळला. त्याच्या गळ्यावर व्रण होते. मृताच्या खिशात डायरी होती. त्यात मोबाईल नंबर होता. पोलिसांनी या नंबरवर संपर्क साधून मृताची ओळख पटवली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात एक जोडपे मृतदेह एका दुकानाजवळ ठेवत असल्याचे दिसून आले. हेच दोघे गडहिंग्लज एसटी स्टँडवरील सीसीटीव्हीतही दिसून आले. शाहूपुरी पोलिसांनी गडहिंग्लज पोलिसांच्या सहकार्याने संदीप शिरगावेची पत्नी करुणाला दाखवले. ते दोघे आपले आईवडील असल्याचे तिने सांगितले. पोलिसांनी हणमंताप्पा आणि गौरवाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता दोघांनी खुनाची कबुली दिली.
संदीप शिरगावेचा दहा वर्षापूर्वी करुणाशी विवाह झाला होता. दोघांना पाच वर्षांचा मुलगा आहे. संदीप खासगी वाहनावर चालक होता. त्याला दारुचे व्यसन होते. तो पत्नीला सतत मारहाण करत असे. या त्रासाला कंटाळून ती माहेरी आली. तिने घटस्फोटासाठी अर्जही दाखल केला आहे. दरम्यान, सोमवारी २३ सप्टेंबर रोजी संदीप गडहिंग्लजला आला. त्याने पुन्हा पत्नीशी वाद घातला. सासूसासऱ्यांनाही शिवीगाळ केली. पत्नी करुणाने संदीपला पैसे देत तू परत गावी जा, असे बजावले. त्यानंतर संदीप गडहिंग्लज बसस्थानकावर आला. गडहिंग्लज-कोल्हापूर विना वाहक बसने तो कोल्हापूरकडे निघाला. त्याच बसमधून हणमंताप्पा आणि गौरवा कोल्हापूरकडे प्रवास करत होते. आपल्या मुलीला त्रास देणाऱ्या जावयाचा काटा काढायचा निर्णय दोघांनी घेतला. संदीप दारुच्या नशेत झोपला होता. त्यांनी एका सीटवर संदीपला मध्ये बसवले. गौरव्वाने त्याचे तोंड दाबून धरले. त्यानंतर हणमंताप्पाने नाडीने गळा आवळून त्याचा खून केला. कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानक परिसरात बस आल्यावर दोघांनी त्याचा मृतदेह बसमधून उतरवला आणि स्वच्छतागृहाजवळील एका बंद दुकानाजवळ ठेवून ते पळून गेले. खुनाची घटना कुणी पाहिली नाही, या अविर्भावात ते निर्धास्तपणे गावांकडे परतले. पण सीसीटीव्हीत हे दोघे कैद झाल्याने पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या.
हेही वाचा :
सतीश घाटगे
कोल्हापूर:
भाजपचे चाणक्य आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बुधवारी, २५ सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांनी कमळाबरोबरच ज्या मतदार संघात मित्रपक्षांना जागा जाईल त्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान केले पाहिजे, असे बजावले. घड्याळ आणि धनुष्यबाणाला मतदान केले नाही तर आपले सरकार सत्तेवर येणार नाही, याची जाणीव ठेवली पाहिजे, या शब्दांत त्यांनी भाजपचे प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांसमोर भूमिका स्पष्ट केली. त्यांची ही भूमिका राज्यातील प्रमुख मित्रपक्ष शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट यांना आश्वस्त करणारी ठरली आहे.
भाजपचा पश्चिम महाराष्ट्र कार्यकर्त्यांचा मेळावा कोल्हापुरात पार पडला. यावेळी अपक्ष आमदार प्रकाश आवाडे आणि त्यांचे पुत्र राहुल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे भाजपने पश्चिम महाराष्ट्रात बाजी मारल्याचे मानले जात आहे. विधानसभा तोंडावर असताना आवाडेंच्या प्रवेशाने इचलकरंजीसह हातकणंगले मतदारसंघात भाजपचे बळ वाढणार आहे.
मेळाव्यात अमित शहा यांनी कार्यकर्त्यांच्या मनातील नैराश्य घालवून त्यांना आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न केला. लोकसभा निवडणुकीत भाजपचा ‘४०० पार’चा नारा होता. मात्र भाजपला २३८ जागा मिळाल्या. त्यामुळे काही प्रमाणात कार्यकर्ते नाराज होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा विक्रम केल्याचे कार्यकर्त्यांच्या मनावर ठसवून देण्याचा प्रयत्न शहा यांनी केला. गेल्या दहा वर्षात मोदींच्या नेतृत्वाखाली जगात भारताचा दबदबा वाढला आहे. लोकसभा निवडणुकीवेळी विरोधकांनी घटना बदलणार, आरक्षण जाणार, असा अपप्रचार केला. त्यामुळे आपल्या जागा घटल्या. पण विरोधकांच्या फेक नॅरेटिव्हला लोकोपयोगी योजनांतून विधानसभा निवडणुकीत उत्तर देण्याचे आवाहन शहा यांनी कार्यकर्त्यांना केले. गेल्या तीन लोकसभा निवडणुकांमध्ये मिळून काँग्रेसला जेवढ्या जागा मिळाल्या त्यापेक्षा जास्त जागा २०२४ च्या निवडणुकीत भाजपला मिळाल्या, याकडे शहा यांनी लक्ष वेधले. निवडणूक जिंकण्यासाठी भाजप लढत नाही. भारताला महासत्ता बनवण्यासाठी, आत्मनिर्भर बनवण्यासाठी भाजप लढतो, याचा पुनरुच्चारही केला.
उद्धव ठाकरेंवर टीका टाळली
अमित शहा यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणे टाळले. दुसरीकडे काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर नेहमीप्रमाणे टीकास्त्र सोडले. शरद पवार यांना नेस्तानाबूत केल्यावरच राज्यात भाजपची विजयी मालिका सुरू होणार आहे, असे सांगताना विधानसभा निवडणुकीत शरद पवार हेच लक्ष्य असणार असा सूचक इशारा देण्यासही ते विसरले नाहीत. आगामी हिवाळी अधिवेशनात वफ्फ बोर्डासंबंधी विधेयक मंजूर करणारच. राहुल गांधी यांनी ते रोखून दाखवावे, असे आव्हान त्यांनी दिले.
पवार, ठाकरे गटाचे कार्यकर्ते फोडा
राष्ट्रवादी शरद पवार, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नाराज कार्यकर्ते फोडा, असे जाहीर आवाहन शहा यांनी केले. विरोधी पक्षातील लोक आपल्या पक्षात आले तर भाजप कार्यकर्त्यांचे काय होणार, अशी भीती बाळगू नका. गेली दहा वर्षे आम्ही तुम्हाला काय देऊ शकलो नाही तर विरोधी पक्षातून आलेल्यांना काय देणार, असा प्रश्न त्यांनी केला. शहा यांनी हे वक्तव्य करण्यापूर्वीच आवाडे पितापुत्रांना पक्षात प्रवेश दिल्याने शहा यांचे वक्तव्य कोणासाठी, असा प्रश्नही कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला असावा. आवाडे पितापुत्रांना व्यासपीठावर आणण्याची जबाबदारी माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्यावर देऊन पक्षशिस्त, पक्षनिष्ठा कशी बाळगली जाते, असा उदो उदो सभागृहात केला जात असला तरी ही बाब कार्यकर्त्यांना चांगलीच खटकल्याचे बोलले जात आहे.
पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला जादा जागा मिळतील, असा विश्वास अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. लोकसभेतील नॅरेटिव्ह कमी करुन दलित, आदीवासींसाठी विविध योजना राबवल्याने ते मतदार भाजपकडे वळतील. लाडकी बहीण योजनेमुळे महिलांची मते भरभरुन मिळतील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. त्याचवेळी महिला प्रामाणिक असतात तर पुरुष बेईमान असतात, असे वक्तव्य केले. त्यांचे हे वक्तव्य अंगलट येणार की मतदार ते खिलाडूवृत्तीने स्वीकारतील, ते पहावे लागेल.
एकंदरीतच शहा यांनी निवडणुका जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला असला तरी जागावाटप झाल्यानंतर तळागाळातील कार्यकर्ता पक्षाचा प्रचार कसा करणार, यावर भाजपचे यश अवलंबून राहणार आहे.
. . . . . .
सतीश घाटगे; कोल्हापूर : कोल्हापूरचा सांस्कृतिक मानबिंदू असलेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या (Keshavrao Bhosale Theatre) पुनर्उभारणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २५ कोटींचा निधी जाहीर केला. पण तो निधी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी महापालिकेच्या खात्यावर वर्ग करून घेण्यासाठी लोकप्रतिनिधींसह प्रशासनाची कसोटी लागणार आहे. नाट्यगृह उभारणीचे काम वेगाने सुरू व्हावे, यासाठी कलाकार आणि जनतेचा रेटा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर तांत्रिक बाबी पूर्ण करुन राज्य सरकारकडून निधी मिळवण्यासाठी जिल्हा प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.
आठ ऑगस्ट २०२४ रोजी रात्री नाट्यगृहाला भीषण आग लागली. त्यात नाट्यगृह भस्मसात झाले. समस्त करवीरकर दु:खाच्या सागरात बुडून गेले. त्यानंतर नाट्यगृह उभारण्यासाठी दुसऱ्याच दिवशी लोकप्रतिनिधी, कलाकार, तंत्रज्ञ, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी वज्रमूठ बांधली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कोल्हापूरला तातडीने भेट दिली. नाट्यगृहाच्या पुनर्उभारणीसाठी २५ कोटी निधी देण्याची घोषणा केली. खासदार शाहू छत्रपती, आमदार सतेज पाटील, ऋतुराज पाटील, जयश्री जाधव, जयंत आसगांवकर यांनी प्रत्येकी १ कोटी निधी देण्याची घोषणा केली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही एक कोटीचा निधी जाहीर केला. कोल्हापूरची अस्मिता असलेले केशवराव भोसले नाट्यगृह उभारणीसाठी निधी कमी पडू देणार नाही, या शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आश्वस्त केले.
राज्य सरकार आणि लोकप्रतिनिधींकडून निधीची घोषणा झाली. मात्र महापालिका प्रशासनाकडून टेंडर नोटीस काढण्यासाठी लागणाऱ्या तांत्रिक बाबींची पूर्तता करावी लागणार आहे. त्यासाठी महापालिकेची दमछाक होत आहे. दुसरीकडे नाट्यगृहाला (Keshavrao Bhosale Theatre) लागलेल्या आगीबाबत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करणे, स्ट्रक्चरल ऑडिट, शॉर्ट टेंडर नोटीस काढणे आदी बाबींची पूर्तता करावी लागणार आहे. त्यासाठी विलंब होत असल्याने कलाकार आणि सामान्य जनतेकडूनही रेटा वाढत आहे. स्ट्रक्चरल ऑडिटचा प्राथमिक अहवाल आला आहे. मात्र नाट्यगृहातील मलबा हटवल्याशिवाय ऑडिट करता येणे शक्य नाही, असे स्ट्रक्चरल करणाऱ्या कंपनीने स्पष्ट केले आहे. मलबा हटवल्यानंतर स्ट्रक्चरल ऑडिट पुन्हा नव्याने करण्यात येणार असून त्यानंतर अंतिम अहवाल येणार आहे. सध्या मलबा हटवण्याचे काम सुरू झाले आहे.
दरम्यान, नाट्यगृह (Keshavrao Bhosale Theatre) उभारण्यासाठी आठ कंपन्यांनी तयारी दर्शवली आहे. या कंपन्यांनी जिल्हा प्रशासनातील अधिकारी, आर्किटेक्ट, रंगकर्मींचे प्रतिनिधी यांच्यासमोर प्रेझेंटेशन केले आहे. त्यानंतर नाटगृह उभारणीसाठी एखाद्या कंपनीची निवड करावी लागणार आहे. त्यानंतर शॉर्ट टेंडर काढले जाणार आहे.
या तांत्रिक बाबी युद्धपातळीवर पूर्ण करण्यासाठी प्रशासन कार्यरत आहे. पण विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता दहा ते पंधरा दिवसांत लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यापूर्वी सर्व तांत्रिक बाबी पूर्ण करुन शॉर्ट टेंडर नोटीस प्रसिद्ध करावी लागेल. सांस्कृतिक विभागाकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवावा लागणार आहे. मंजुरीनंतर मंत्रिमंडळात निर्णय होऊन निधी महापालिकेच्या खात्यावर वर्ग होणार आहे. हा निधी लवकर वर्ग व्हावा यासाठी लोकप्रतिनिधींकडून प्रयत्न होत आहेत. दुसरीकडे घाईगडबडीने प्रक्रिया झाली तर पारदर्शीपणे काम होणार नाही, अशी भीती तज्ज्ञांकडून होत आहे. कलावंत आणि कलारसिकही नाट्यगृह उभारणीचे काम लवकर सुरू करावे यासाठी आंदोलनाचा पवित्रा घेत आहेत. अशा कात्रीत सध्या महापालिका आणि जिल्हा प्रशासन आहे.
हेही वाचा :
कृष्णात व. चौगले; कोल्हापूर : केंद्र सरकारने आयात शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतल्याने खाद्यतेलाच्या किमती वाढल्या आहेत. सूर्यफूल, शेंगदाणा, सोयाबीन आणि पाम तेलाच्या (Cooking Oil) किमतीत किलोमागे २५ ते ३० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे १५ किलो डब्याची किंमत अडीचशे ते तीनशे रुपयांनी वाढली आहे. साहजिकच याचा थेट फटका ग्राहकांना बसणार आहे.
ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच नवरात्र आणि विजयादशमीचा उत्साह असतो. महिन्याच्या शेवटी दिवाळी आहे. त्याआधीच खाद्यतेलाच्या दरात वाढ झाली आहे. केंद्र सरकारने आयात शुल्कात वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाची आवक होऊन देशातही भाव कमी झाले होते. याचा फटका देशांतर्गत उत्पादित होणाऱ्या सोयाबीनसह तेलबिया पिकांच्या दरावर झाला होता. त्यामुळे आयात शुल्कात वाढ करण्याची मागणी शेतकरी, प्रक्रियादार, रिफायनरीज करत होत्या. (Cooking Oil)
केंद्र सरकारने, कच्च्या तेलावरील मूलभूत आयात शुल्क २० टक्के वाढवली आहे. आतापर्यंत कच्च्या तेलाच्या आयातीवर कोणतेही शुल्क आकारले जात नव्हते. पण, आता ते २० टक्के करण्यात आले आहे. दुसरीकडे रिफाइंड तेलावरील मूळ आयात शुल्क १२.५ टक्क्यांवरून ३२.५ टक्के करण्यात आला आहे. त्याचा परिणाम म्हणून तेलाचे दर वाढणार आहेत. कस्टम ड्युटी वाढली असल्याने आता खाद्यतेलाचे प्रभावी शुल्कही वाढणार आहे. क्रूड पाम, सोयाबीन आणि सूर्यफूल तेलावरील प्रभावी शुल्क आतापर्यंत ५.५ टक्के होते. पण ते आता २७.५ टक्के करण्यात आले आहे. तसेच, शुद्ध सूर्यफूल तेल, शुद्ध पाम तेल आणि शुद्ध सोयाबीन तेलाची प्रभावी किंमत आधी १३.७५ टक्के होती ती आता ३५.७५ टक्के झाली आहे.
खाद्यतेलाचा किलोचा दर
- सरकी : १४६ ते १८०
- शेंगतेल : २०० ते २४०
- सोयाबीन : १४६ ते १८०
- सूर्यफूल : १२५ ते १५०
खाद्यतेलाचा भाव (१५ लिटरसाठी)
- सूर्यफूल : १७५०-२१०० (भाववाढ -३५० रुपये)
- सोयाबीन : १६९०-१९८० (भाववाढ – २९० रुपये)
गेल्यावर्षी तीन हजाराच्या पुढे गेलेल्या तेलाच्या डब्याचा दर १५०० ते १६०० पर्यंत खाली आला होता. मात्र, केंद्र सरकारने सोयाबीनला दर देताना खाद्यतेलाचे दर वाढवले आहेत. यामुळे सर्वसामान्य लोकांचे जगणे मुश्किल होणार आहे.
– अजित पोवार, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, (युवा आघाडी)
हेही वाचा :
कोल्हापूर; प्रतिनिधी : गणेशोत्सव संपला की पितृ पंधरवडा सुरू होतो. या पंधरा दिवसांत तिथीनुसार एक दिवस महालय असतो. बोली भाषेत त्याला महाळ, म्हाळ असेही म्हणतात. पितृ पंधरवड्यात आपल्या पूर्वजांची आठवण म्हणून महाळ घातला जातो. महाळाच्या नैवेद्यात मोहराच्या भाजीला (Mohar Bhaji) मान असतो.
महाळाच्या नैवेद्य बनवताना भेंडी, काटे भेंडी, दोडका, मेथी, चवळीच्या शेंगा, आळू, रानकारली, गवारी या भाजांचा समावेश असतो. पण सर्वांत महत्त्वाची भाजी म्हणजे मोहर. मोहर ही पश्चिम घाटात उगवणारी जंगली भाजी. या भाजीचा वेल केवळ पावसाळ्यात उगवतो. पश्चिम महाराष्ट्रासह सह्याद्री घाटात गाबोळी, शेंडवेल, चाईचा मोहोर, मुळशीची भाजी, मांदा, येलरगंडू या नावानेही ती ओळखले जाते. Dioscorea pentaphylla असे तिचे शास्त्रीय नाव आहे. (Mohar Bhaji)
पावसाळ्यात मोहराच्या कंदाला कोंब फुटतात, पाने येतात. या कोवळ्या पानाला घोटवेल म्हणतात. या पानांचीही भाजी केली जाते. मोहोराचा वेल झाडाच्या आधारे पंधरा ते वीस फूट वाढतो. पावसाळ्यानंतर मोहराचा वेल कोमेजून जातो, पण त्याचे कोंब जमिनीवर तसेच राहतात. पावसाळा सुरू झाला की पुन्हा कोंब फुटतात. हे निसर्गचक्र वर्षोनवर्ष सुरू राहते. कोल्हापूर जिल्ह्यात गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, शाहूवाडी, पन्हाळा तालुक्याच्या जंगलभागात ही भाजी उगवते. कोल्हापूर शहराजवळील कात्यायणी, हणबरवाडी, दऱ्याचे वडगाव या परिसरातही ही भाजी येते.
पितृपंधरवड्यात मोहरला मोठी मागणी
सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये मोहराच्या वेलाला मोहरीसारखी बारीक गोल फळे धरतात. त्याचे झुपके आंब्याच्या मोहरासारखेच असतात. पितृपंधरवड्यात या भाजीला मोठी मागणी असते. या काळात भाजी विक्रेतेही ‘मोहर घ्या मोहर,’ अशी हाकाटी देत गल्लोगल्ली फिरत असतात. मंडईतही मोहराचे ढीग दिसतात. घरात आणलेली भाजी निवडून स्वच्छ केली जाते. त्यानंतर बारीक चिरुन गरम पाण्यात उकळून पिळून घेतली जाते. बारीक कांदा, लसूण, जिरे, मोहरीच्या तेलाची फोडणी देऊन मिरची किंवा तिखटाचा वापर केला जातो. तिची चव अप्रतिम असते. मोहोराची भाजी आयुर्वेदात गुणकारी मानली आहे. ती शक्तिवर्धक आहे. अंगाला सूज आली असेल मोहोराचा कंद गरम करुन बांधला जातो.
मोहराची भाजी आरोग्यदायी आहे. म्हाळाच्या नैवेद्यात पूर्वापार या भाजीला स्थान आहे. ती भाजी शक्तिवर्धक आहे.
– अनिल चौगुले, पर्यावरण अभ्यासक
हेही वाचा
- सतीश घाटगे
कोल्हापूर: करवीर नगरीला आता शारदीय नवरात्रोत्सवाचे वेध लागले आहेत. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या श्री अंबाबाई मंदिरात युद्धपातळीवर उत्सवाची तयारी सुरू आहे. मंदिरातील जुना गरुड मंडप उतरवण्यात येत आहे. पण नवरात्रोत्सवात गरुड मंडपाचा फील येण्यासाठी गरुड मंडपाची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे. गणेशोत्सवाची सांगता झाल्यानंतर करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरातील नवरात्रोत्सवाची तयारी जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भातील बैठकांचे सत्र सुरू आहे.
गरुड मंडपाची प्रतिकृती उभारणार
मंदिराच्या पश्चिमेला असलेल्या नक्षीदार कमानीच्या गरुड मंडपातील लाकडी खांबांना वाळवी लागली आहे. तो धोकादायक बनल्याने उतरवण्यात येत आहे. वैशिष्ट्यपूर्ण गरुड मंडपामुळे मंदिराच्या सौंदर्यात भर पडते. दर शुक्रवारी तसेच नवरात्रोत्सवात प्रत्येक दिवशी देवीची पालखी गरुड मंडपातील सदरेवर विराजमान होते.
जीर्ण झालेला गरुड मंडप उतरवण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. असून नवरात्रोत्सवात गरुड मंडपाची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे. या ठिकाणीच देवीची पालखी आणि नियमित विधी होणार आहेत.
-शिवराज नायकवडे, सचिव, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती.
महाद्वारात उभे राहिले की गरुड मंडपातून थेट समोर अंबाबाईचे मुखदर्शन घडते. नवरात्रोत्सवात गरुड मंडपाची उणीव भासू नये म्हणून देवस्थान समितीने गरुड मंडपाची हुबेहूब प्रतिकृती उभारण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आठवड्यात सपाटीकरण झाल्यावर नक्षीदार खांब, कौलारु छप्पर असलेला मंडप उभारण्यात येणार आहे. या प्रतिकृतीच्या ठिकाणी उत्सवकाळात अंबाबाईची पालखी विराजमान होणार आहे. शिवाय येथून पूर्वीप्रमाणेच मुखदर्शनाची सोय करता येईल का, याची चाचपणी करण्यात येणार आहे.
यंदा भाविकांची संख्या वाढणार
शनिवार, रविवार आणि सलग सुट्ट्या, दोन शुक्रवार आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदा भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. ते लक्षात घेता गतवर्षी प्रमाणे यंदाही दर्शनरांगेची सोय शेतकरी संघाच्या बझारमध्ये करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. उत्सवकाळात पावसाची शक्यता आणि ऑक्टोबर हिटचा विचार करुन शेतकरी बझारमध्ये दर्शन मंडप उभारण्यासाठी जिल्हा प्रशासन आग्रही आहे.
महापालिकेच्यावतीने मंदिर परिसरातील रस्त्यांच्या डागडुजीचे आणि पॅचवर्कचे काम करण्यात येणार आहे. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन नऊ ठिकाणी पार्किंगची सोय करण्यात येणार आहे. शहरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी रिंगरोडवर वाहने थांबवण्याचा विचार सुरू आहे. केएमटीने भाविकांसाठी शटल सर्व्हिस द्यावी, अशी सूचनाही पुढे आली आहे. भाविकांसाठी ६४ ठिकाणी स्वच्छतागृहांची सोय करण्यात येणार आहे. सुरक्षेच्यादृष्टीने सीसीटीव्हींची संख्या वाढवण्यात येणार आहे.
सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
अंबाबाई मंदिरात सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यासाठी १५० हून अधिक संस्था आणि कलाकारांचे अर्ज आले आहेत. या अर्जांची छाननी करण्यात येत आहे. नऊ दिवसांत १०० संस्थांना देवीच्या दरबारात आपली सेवा देण्याची संधी उपलब्ध करुन दिली जाणार आहे.
कोल्हापूरः डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांनी बांधकाम क्षेत्रात दिलेले योगदान अतुलनीय आहे. एखादा इंजिनियर किवा आर्किटेक्ट किती गतीने व भव्य काम करू शकतो याची प्रचिती त्यांनी आपल्या कामातून दिली आहे. बांधकाम क्षेत्रासाठी त्यांनी दिलेले योगदान हे कोल्हापूरच नव्हे तर देशभरातील इंजिनिअर्ससाठी प्रेरणादायी आणि मार्गदर्शक असल्याचे गौरवोद्गार जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी काढले. असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट अँड इंजनिअर्स कोल्हापूरच्यावतीने हॉटेल सयाजीच्या मेघ मल्हार सभागृहात आयोजित ‘इंजिनिअर्स डे’ कार्यक्रमात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते डॉ. संजय डी. पाटील यांना असोसिएशनचे मानद सदस्यत्व प्रदान करून सन्मानित करण्यात आले. असोसिएशनच्या ५३ वर्षांच्या इतिहासात हा सन्मान मिळवणारे डॉ. पाटील हे तिसरे सन्मानमूर्ती ठरले आहेत.
डॉ. संजय डी. पाटील यांचे कार्य अतुलनीयः जिल्हाधिकारी
यावेळी बोलताना डॉ. संजय डी. पाटील यांच्या कार्याचा गौरव करताना जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, डॉ. संजय डी. पाटील यांनी केलेल्या कामाचे कॅल्क्युलेशन केले असता त्यांनी आजपर्यंत एक हजार एकर एरिया कव्हर करेल एवढे प्रचंड बांधकाम केले आहे. त्याशिवाय आणखी पाचशे एकर एरिया व्यापेल असे काम सुरू आहे. हे सर्व काम बघता त्यांनी किती तास काम केले असेल? या सर्वातून किती मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून दिला याचा विचार केला तर हे सर्व काम अतुलनीय असेच आहे.
कोल्हापुरातील पर्यटन विकास असो की पूरस्थिती किंवा नागरिकांच्या कोणत्याही समस्या सोडविण्यासाठी आर्किटेक्ट अँड इंजिनिअर असोसिएशनचे नेहमीच मोठे योगदान असते. कोल्हापूरच्या विकासात संघटनेचे मोठे योगदान आहे. जिल्ह्याच्या प्रगतीसाठीच्या कोणत्याही प्रकल्पात तांत्रिक सहाय्य व अन्य मदतीसाठी असोसिएशन नेहमीच अग्रभागी राहिले आहे. यापुढेही असोसिएशनचे असेच सहकार्य राहील याची खात्री असल्याचे जिल्हाधिकारी येडगे यांनी सांगितले.
मेडिकल कॉलेजच्या सर्वाधिक उंच इमारतीचे काम हाती
डॉ. संजय पाटील म्हणाले, शिक्षण क्षेत्राबरोबरच बांधकाम क्षेत्राची सुरुवातीपासूनच प्रचंड आवड असल्याने आर्किटेक्ट आणि इंजिनिअर्स यांच्याशी नेहमीच अटॅचमेंट आहे. या संघटनेचा भाग होण्याची संधी यानिमित्ताने मिळाली आहे. गेल्या चाळीस वर्षांत अडीच हजाराहून अधिक सिव्हील इंजिनिअर्स आणि दोन हजाराहून अधिक आर्किटेक्ट आमच्या संस्थेतून पास आउट झाले आहेत. आर्किटेक्चर विभागाचा निकाल नेहमीच १०० टक्के लागत असून १६ विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल मिळवले आहे. आमच्या माजी विद्यार्थ्यांचे कन्स्ट्रक्शन क्षेत्रात मोठे योगदान आहे. कोल्हापूरच्या विकासात आणि प्रगतीत असोसिएशनचे मोठे योगदान असून यापुढेही कोल्हापूरच्या विकासात सदैव पुढाकार घेईल याची आपल्याला खात्री आहे.
प्रत्येक कन्स्ट्रक्शनमध्ये यापुढे रेन वाटर हार्वेस्टिंग सिस्टीमचा वापर करावा, अशी सूचना डॉ. पाटील यांनी दिली.
कोल्हापूरमध्ये मेडिकल कॉलेजची सर्वाधिक उंच इमारत बांधण्याचे काम हाती घेतले आहे. त्याचबरोबर हॉटेल सयाजीचे विस्तारीकरणही सुरु केले आहे. कोल्हापूरमध्ये खूप टलेंट असून हॉटेलच्या २३ मजली इमारतीच्या कामासाठी आर्किटेक्ट काम कोल्हापूरची सुरुची संभाजी पाटील ही मुलगी करत असल्याचा सार्थ अभिमान असल्याचेही त्यांनी सांगितले.
असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे यांनी प्रास्ताविकात असोसिएशनच्या कामाची माहिती दिली. यावेळी वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही व्ही कार्जींन्नी यांनी इंजिनियर्स डे निमित्त विशेष व्याख्यानात डॉ.एम विश्वेश्वरय्या यांनी अभियांत्रिकी क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कृष्णात जमदाडे यांनी केले तर आभार असोसिएशनचे उपाध्यक्ष विजय चोपदार यांनी मानले. यावेळी असोसिएशनचे सचिव राज डोंगळे, अल्ट्राटेक सिमेंटचे शीतलराज सिंदखेडे, अविनाश जेऊरकर, सागर छांगनी यांच्यासह आर्किटेक्ट अँड इंजिनियर्स असोसिएशनचे संचालक आणि सदस्य उपस्थित होते.
- चैतन्य दिलीप रुद्रभटे
स्वातंत्र्यापूर्वी फलटण संस्थानचे भूतपूर्व अधिपती कै. श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांनी आपटे आणि मफतलाल यांना प्रोत्साहन देत न्यू फलटण शुगर वर्क्स हा खाजगी साखर कारखाना १९३० च्या दशकात साखरवाडी येथे सुरु केला. स्वातंत्र्यानंतर १९५७ साली श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून श्रीमंत मालोजीराजेंनी निरा खोऱ्यात सहकारी चळवळ उभी केली. आणि खऱ्या अर्थाने फलटण तालुक्याचा संपन्नतेच्या दिशेने प्रवास सुरु झाला. फलटणच्या विकासाचे हे मॉडेल आजूबाजूच्या तालुक्यात राबवायला सुरुवात झाली. लगत असलेल्या बारामती तालुक्यात माळेगाव आणि सोमेश्वर येथेही कारखाने उभे झाले. हे कारखाने उभारण्यात श्रीमंत मालोजीराजे यांनी मदतच केली. पण, येथेच बारामती आणि फलटण तालुक्याच्या विकासाची स्पर्धा सुरु झाली.
आणखी वाचा – महाराष्ट्रचा अंगार सहजासहजी विझवता येणार नाही!
कालांतराने पुलाखालून बरेच पाणी गेले. यशवंतराव चव्हाणांच्या राजघराण्यांना विरोध करण्याच्या भूमिकेमुळे फलटणचे श्रीमंत मालोजीराजे यांना राजकीय साठमारीचा फटका बसला. पण, तिकडे बारामती तालुक्यात शरद पवार यांचं राजकारण बहरत गेलं. तसाच बारामतीचा विकासही बहरत गेला. दरम्यानच्या काळात श्रीमंत मालोजीराजे यांच्यानंतर फलटणला माजी आमदार कै. हरिभाऊ निंबाळकर, माजी आमदार कै. कृष्णचंद्र भोईटे, माजी आमदार कै. श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार कै. चिमणराव कदम यांनी फलटणची धुरा सांभाळली. बारामतीच्या विकासाला आणि शरद पवारांना विरोध करत फलटणचे माजी आमदार चिमणराव कदम यांनी विधानसभा गाजवली. पण, फलटणचा विकास हा जेवढा श्रीमंत मालोजीराजे यांनी केला होता तेवढाच राहिला. आणि बारामती तालुका हा प्रचंड पुढे गेला.
फलटण-बारामतीचे वैर संपुष्टात
१९९५ साली श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर अपक्ष आमदार म्हणून निवडून आल्यानंतर बारामती आणि फलटणमधील हे विळ्या भोपळ्याच वैर बाजूला केलं. शरद पवारांशी जुळवून घेतलं. याच दरम्यान १९९८ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत फलटणचे कै. हिंदुराव नाईक निंबाळकर हेदेखील खासदार म्हणून निवडून गेले. त्यांनी बारामती, फलटण, लोणंद रेल्वे मार्गाची संकल्पना समोर आणली. या रेल्वे मार्गाच्या पहिल्या संकल्पनेला बारामतीकरांचा विरोध होता. बारामतीतील बागायती जमीन यात जात आहेत, हे कारण पवारांनी त्याला दिलं होत. पण, बारामतीकरांच्या उरावरुन रेल्वे नेणार, अस म्हणत कै. हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी बारामतीच्या जिरायती भागातून रेल्वे मार्ग काढला. आणि त्याचे काम आत्ता सुरु आहे. त्यांनी निरा देवघर सिंचन प्रकल्पासाठी पदयात्रा काढली. याच काळात आमदारकी मिळवल्यानंतर श्रीमंत रामराजे यांची फलटण विधानसभा मतदार संघावर पकड वाढली.
आणखी वाचा – शरद पवारांच्या राजकारणाचे काय होणार?
श्रीमंत रामराजेंनी शरद पवारांच्या मदतीने धोम बलकवडी, निरा देवघर या फलटणला वरदायिनी ठरलेल्या धरणांची उभारणी केली. कमिन्ससारखी मल्टीनॅशनल कंपनी येथे औद्योगिक वसाहतीत आली. कमिन्स फलटणला आल्यावर देखील सुप्रिया सुळे नाराज झाल्या होत्या. कमिन्सच्या उदघाटनप्रसंगी सुप्रिया सुळेंनी ही कंपनी बारामती तालुक्यात आली नसल्याची जाहीर नाराजी देखील बोलून दाखवली होती. मागून येऊन का होईना बारामती एवढी नाही पण धिम्या गतीने फलटणच्या विकासाची घोडदौड सुरु झाली होती. २०१४ नंतर देशात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीने आपला वरचष्मा राखून ठेवला. २०१९ नंतर तर राज्याच्या राजकारणात अनाकलनीय बदल झाले. आणि फलटण तालुक्यातही तितकेच बदल झाले. बारामतीचे विरोधक कै. हिंदुराव नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव रणजितसिंह नाईक निंबाळकर हे भारतीय जनता पक्षातून खासदार झाले. शरद पवारांना विरोध करणारा मोदींचा पठ्ठ्या म्हणून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिल्लीत आपली ओळख तयार केली. राज्यात आणि देशात शरद पवारांचे कट्टर विरोधी म्हणून ओळख असणाऱ्या रणजितसिंह यांना दिल्लीतून आणि नागपूरमधून ताकद मिळू लागली.
आणखी वाचा – अजित पवारांची कसोटी
२०१९ नंतर राज्यात तयार झालेल्या विचित्र राजकीय परिस्थितीत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचीही द्विधा मनस्थिती झाल्याची प्रचिती अनेकांना आली. त्याला कारणही तसच होत, सत्तेच्या माध्यमातून फलटण तालुक्यात श्रीमंत रामराजे यांचे विरोधक रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आपले पाय पसरवायला सुरुवात केली होती. पण, दस्तुरखुद्द अजित पवारांनी भाजपच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे निमित्तच श्रीमंत रामराजेंना मिळाले. आणि श्रीमंत रामराजे अजित पवारांसोबत भाजपकडे वळले.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील यांनी रणजितसिंह यांचा पराभव केला. हा पराभव करण्यात श्रीमंत रामराजे यांनी महत्वाची भूमिका बजावली. तालुक्यातील स्थानिक विरोधक नेस्तनाबूत करण्याची संधी श्रीमंत रामराजे यांनी सोडली नाही. पण, हा पराभव फक्त रणजितसिंह यांनाच नव्हे तर भारतीय जनता पार्टीच्या देखील जिव्हारी लागला. इथेच खरी राजकीय टस्सल सुरु झाली.
रामराजेंविरोधात नागपूरहून रसद
झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी रणजितसिंह पुढे आलेच पण, श्रीमंत रामराजे यांच्या वर्चस्वाला संपवण्यासाठी सध्या थेट नागपूरहून रसद पुरविली जाऊ लागली आहे. या वचपा काढण्याच्या प्रयत्नात भारतीय जनता पार्टीने मायक्रो प्लॅनिंग करत फलटण तालुका पोखरण्याचे काम सध्या सुरु केले आहे. ज्यांनी मदत केली, त्या प्रल्हादराव साळुंखे पाटील, महायुतीतील घटक पक्षाचे श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर यांच्यापासून ते सर्वसामान्य कार्यकर्त्यापर्यंत प्रत्येकाला राज्यातल्या भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी ताकद देण्याचे काम सुरु केले आहे. एव्हाना माजी जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांना भारतीय जनता पार्टीत घेऊन आम्ही काय करु शकतो, याची जाणीव सुद्धा श्रीमंत रामराजे यांना करुन दिली आहे. मात्र, फलटण आणि बारामतीमधील जी विकासाची स्पर्धा सुरु होती, ती या वचपा काढण्याच्या प्रयत्नात कुठेतरी थांबणार तर नाही ना? असा सवाल आता उपस्थित होत आहे. सध्या फलटणला जी वर्चस्ववादाची लढाई सुरु झाली आहे. त्या लढाईला माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार आणि उपमख्यमंत्री ना. अजित पवार खतपाणी घालणार की निरा खोऱ्यात सुरु असलेले विकासात्मक राजकारण पुढे आणणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. कारण आगामी काळात फलटणच्या राजकारणासाठी आणि भवितव्यासाठी या दोघांचीही भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.