कोल्हापूर, प्रतिनिधीः काहीही केले तरी विरोधक बोलत राहणारच, त्याला मी महत्त्व देत नाही. सामान्य माणसाचा विश्वास आहे, तोपर्यंत मला काळजी करण्याचे कारण नाही. सामान्यांचा विश्वास हीच माझी ताकद आहे, असा विश्वास राधानगरी-भुदरगड मतदारसंघातील शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि महायुतीचे उमेदवार प्रकाश आबिटकर यांनी `महाराष्ट्र दिनमान`शी बोलताना व्यक्त केला.
दहा वर्षांच्या काळात विकासकामांतून मतदारसंघाचा चेहरा-मोहरा बदलला. आगामी काळात पर्यटनाच्या माध्यमातून विकास साधण्याबरोबरच शैक्षणिक विकास आणि रोजगारवाढीसाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगून आबिटकर म्हणाले, माझ्या मतदार संघातील मतदार हा परिणामाची पर्वा न करता, राजकारण बाजूला ठेवणारा आहे. चांगल्या गोष्टींच्या पाठिशी राहणारा आहे. शंकर धोंडी पाटील यांच्यासारख्या लढवय्या नेत्याला निवडून देणारा हा मतदारसंघ आहे. लोकसभेच्या निवडणुकीत सगळा जिल्हा एका बाजूला असताना दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या पाठिशी खंबीरपणे राहणारा हा मतदारसंघ आहे. माझ्या मतदारसंघातील लोक पारख करणारे आहेत. त्यांच्या पारखीतूनच मी वर आलो आहे. माझ्यासारख्या कार्यकर्त्याने निवडणुकीला उभे राहणे हे सुध्दा एक स्वप्न वाटायचे. लोकांनी ते सत्यात उतरवले. त्यांच्या जोरावरच मी लढत आहे.
सध्या मतदारांच्यात उत्स्फूर्तता असल्याचे सांगून ते म्हणाले, विकासासाठी सातत्याने काम केले आहे. पहिल्या टर्म मध्ये काही वेळा लोकांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसते. आमच्या मतदारसंघात मात्र, चित्र वेगळे आहे. पहिल्या टर्म सारखी परिस्थिती आता आहे. लोकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे यावेळची निवडणूक आम्ही मोठ्या फरकाने जिंकू असा विश्वास आहे. महिला, तरुण व ज्येष्ठांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
आमदारकीच्या काळात केलेल्या विकासकामांसंदर्भात सांगताना ते म्हणाले, मी तरूण आणि नव्या विचारांचा कार्यकर्ता आहे. तरूण पिढीला आवश्यक होती ती कामे केली. त्या कामात मूलभूत गरजा होत्या. त्यामध्ये महत्त्वाची गरज म्हणजे रस्ते. महाराष्ट्रातील भौगोलिकदृष्ट्या अत्यंत विस्तारीत असा ३५० गावे व वाड्यावस्तांना जोडणारा हा मतदार संघ आहे. इथल्या मुख्य रस्त्यांची अत्यंत वाईट अवस्था होती. पाण्याचे प्रश्न, धरणांचे प्रश्न, पाझर तलाव, साठवण तलाव, अनेक ठिकाणी याची आवश्यकता होती. मी त्यावर लक्ष दिले. संघर्ष यात्रा काढली, ती आता विकास यात्रा बनली आहे. धनगरवाड्यावर लाईट, नवीन दवाखाने, गावागावातील मंदिरे, रस्ते, आरोग्य सुविधा, महाराष्ट्रातील सगळ्यात सुंदर शाळा माझ्या मतदार संघातील आहेत. संघर्षापासून सुरुवात करून माझा मतदार संघ आता विकासात्मक वाटचाल करणारा झाला आहे.
दुर्गम व मागास अशा मतदारसंघात आता पर्यटनाच्यादृष्टीने चांगल्या संधी निर्माण झाल्याचे सांगून आबिटकर म्हणाले, राधानगरी धरण व अभयारण्याच्या पर्यटनाकडे लक्ष देणार आहोत. मुख्यमंत्र्यांच्या सहकार्याने प्राधिकरणाच्या माध्यमातून पर्यटन वाढीसाठी काम करत आहोत. रांगणा व भुदरगड किल्ला संवर्धन व पर्यटनासाठी काम करायचे आहे, यात दुर्ग पर्यटन, जल पर्यटन पुढच्या पाच वर्षात अत्यंत चांगले काम करणार आहे. मतदारंसघात तीन एमआयडीसी मंजूर केल्या आहेत. आजऱ्यातील एमआयडीसी विस्तारीत जागेसाठी मुख्यत्र्यांनी मान्यता दिली आहे. आचारसंहितेनंतर त्याचे उदघाटन होईल. भुदरगड तालुक्यात एमआयडीसी मार्गी लागेल. सिंचनाचा प्रश्न मार्गी लावला आहे. त्यामुळे गावातला माणूस शेतीकडे वळला आहे. तसेच शेतीपूरक कामे ही मतदार संघात होत आहेत. गेली दहा वर्षात सगळ्या आरोग्याच्या सुविधा चांगल्या प्रकारे झाल्या डेव्हलप केल्या आहेत. कोल्हापूर जिल्हायातील सगळ्यात चांगल्या आरोग्य केंद्रांच्या इमारती माझ्या मतदार संघात आहेत.
विरोधकांच्याकडून होणा-या आरोपांसंदर्भात विचारले असता ते म्हणाले, आरोप दोन प्रकारचे आहेत. एक आहे आबिटकरांची प्रॉपर्टी. राजकारण वेगळे आणि व्यवसाय वेगळा. राजकारणी लोकांनी व्यवसाय करायचा नाही का? आम्ही प्रामाणिकपणे, नैतिकता पाळून व्यवसाय करतोय. शैक्षणिक सुविधांसाठी शिक्षण संकुल उभारले, कारखाना उभारला, यामधून विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय होईल, हजारो तरुणांना रोजगार मिळेल. याबद्दल तक्रार करण्याचे कारण समजू शकत नाही.