कोल्हापूर; प्रतिनिधी : जिल्ह्यातील दहाही विधानसभा मतदारसंघांतील मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. शनिवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. दहा मतदारसंघांतील २५ लाख ३२ हजार ६५७ मतांची मोजणी होणार आहे. सकाळी अकरा वाजेपर्यंत मतदानाचा कल स्पष्ट होणार आहे. मतमोजणीची प्रक्रिया दुपारी चार वाजेपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. (Kolhapur)
यंदा महिलांनी उत्फुर्तपणे मतदान केले असून चंदगड विधानसभा मतदारसंघात पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांचे मतदान जास्त झाले आहे. या मतदारसंघात पुरुष आणि महिला मतदानामध्ये महिलांचे २१४४ मतदान जास्त आहे.
दहा विधानसभा मतदारसंघांसाठी स्वतंत्र मतमोजणी ठिकाणे निश्चित केली असून कोल्हापूर शहरात कोल्हापूर उत्तर, कोल्हापूऱ् दक्षिण आणि करवीर मतदारसंघाची मोजणी होणार आहे. कोल्हापूर उत्तर आणि करवीर मतदारसंघाची मतमोजणी रमणमळा येथील शासकीय गोदामांच्या इमारतीत होणार आहे. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील मतमोजणी राजारामपुरीतील व्ही.टी. पाटील सभागृह ताराराणी विद्यापीठात होणार आहे. मतमोजणीच्यावेळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. निकालानंतर मिरवणुका काढण्यास बंदी घातली आहे. मतदान केंद्र परिसरात वाहतूकीस बंदी घातली असून पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात येणार आहे.
सकाळी आठ वाजता मतमोजणीस सुरुवात होणार असून सर्वप्रथम टपाली मतदानाची मोजणी होणार आहे. त्यानंतर ईव्हीएम मतमोजणीस सुरुवात होणार आहे. प्रत्येक मतमोजणी केंद्रात १४ टेबलांची व्यवस्था केली असून कोल्हापूर दक्षिण आणि हातकणंगले मतदारसंघात १६ टेबलांची व्यवस्था केली आहे. (Kolhapur)