धनाजी पाटील, बिद्री : राधानगरी विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीत आमदार प्रकाश आबिटकरांनी ३८,५७२ एवढ्या मताधिक्याने विजय खेचून विजयाची हॅटट्रिक करत मतदारसंघात इतिहास घडविला. महाआघाडीचे के. पी. पाटील आपला पराभव रोखू शकले नाहीत. त्यांचे दाजी ए.वाय. पाटील यांची उमेदवारी के.पीं.च्या पराभवास अंशतः कारणीभूत ठरली. मतदारसंघातील ऐंशी हजार लाडक्या बहिणींनी आमदार आबिटकरांचा विजय सुकर केला. आजपर्यंत कुणीही विजयाची हॅटट्रिक केली नाही.
आज गारगोटी येथील तालुका क्रीडा संकुल, जवाहर बाल भवन येथे मतमोजणीस प्रारंभ झाला. सुरवातीला टपाली मतमोजणी करण्यात आली. त्यात आमदार आबिटकरांना १२५० ची आघाडी मिळाली. पहिल्या फेरीत आबिटकर यांना ३९२५ मते मिळाली. तर के.पी.पाटील यांना २२४९ मते मिळाली. ए. वाय. पाटील यांना १३२५ मते मिळाली.
पहिल्या फेरीतच आबिटकरांनी १६७६ मतांची आघाडी घेतली. त्यानंतर वाढता वाढता वाढेप्रमाणे प्रत्येक फेरीगणिक आघाडी घेत राहिले. के.पीं.ना एकाही फेरीत आघाडी घेता आली नाही. तृतीयस्थानी ए. वाय. राहिले. प्रत्येक फेरीत के.पीं.ना, ए.वाय.ची मते आघाडी मिळविण्यासाठी अडसर ठरत होती.
मेहुणे-पाहुण्यांच्या गोळाबेरीजमध्ये शिंदे सेनेचे प्रकाश आबिटकर यांची निर्णायक आघाडी कायम राखली. विसाव्या फेरीअखेर आबिटकरांनी निर्णायक २६०७४ मतांनी आघाडी घेत विजयाकडे आगेकूच केली. एकतिसाव्या शेवटच्या फेरीत आबिटकर १,४२,१२५, के. पी. पाटील १,०४,१६ व ए. वाय. पाटील यांना १७,९४२ मते मिळाली.
मतदारसंघातून उद्धव सेनेचे माजी आमदार के. पी. पाटील यांनी आबिटकरांच्या पुढे तगडे आव्हान निर्माण केले होते. कधी नव्हे ती राधानगरी तालुक्यातील काँग्रेस के.पी.पाटील यांच्या मागे एकवटली होती. झाडून सारे मातब्बर नेते त्यांच्यामागे होते. तसेच उबाठाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदार सतेज पाटील यांच्यावर के.पीं.च्या विजयाची धुरा दिली होती. आदमापूरच्या मेळाव्यात के.पीं.ची मोठी वातावरणनिर्मिती झाली होती. कोल्हापूर उत्तर उमेदवार धुमशानमुळे सतेज पाटील यांची के.पीं.ना रसद वेळेवर मिळाली नाही. मतदारसंघातील झाडून सर्व नेते के.पीं.च्या मागे उभे होते, पण सर्वसामान्य मतदार आबिटकरांच्या सोबत राहिले. आमदार आबिटकर सुरुवातीपासूनच नेते कुणाकडेही असले तरी जनता माझ्यासोबत आहे यावर ठाम होते. मतपेटीतून तसेच चित्र मिळाले. आमदार आबिटकर यांनी केलेली विकासकामे, उत्तम संपर्क, तरुणाईला भावणारे व्यक्तिमत्व, सुख-दु:खाला धावून येणारा आमदार अशी त्यांची प्रतिमा होती, तिलाच जनतेने मतपेटीतून बळ दिल्याचे दिसत आहे.
जनता आमदार असेल
मी नाही, जनता आमदार. मतदारसंघातील प्रत्येक गावात पोहोचलेली विकासकामे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या लाडक्या योजना सर्वसामान्य नागरिकांना दिल्या तसेच मतदारांशी असलेला थेट संपर्क यामुळे लोकांनी अतिशय उत्स्फूर्त अभुतपूर्व विजय मला दिला आहे. यामुळे यापुढे मी आमदार नसून जनता आमदार असेल.
-प्रकाश आबिटकर, विजयी उमेदवार