पर्थ; वृत्तसंस्था : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी बॉर्डर-गावसकर कसोटी क्रिकेट मालिकेसाठी भारतीय संघाने आजपासून (दि.१३) सरावाला सुरुवात केली. पर्थ येथे या मालिकेतील पहिला सामना रंगणार असून दोन दिवसांपूर्वीच भारतीय खेळाडू येथे दाखल झाले होते. तथापि, या सरावाबाबत गोपनीयता बाळगण्यात आली असून नेट्सभोवती पडदे लावण्यात आले आहेत. (border gavaskar trophy)
भारताचे काही खेळाडू मंगळवारी स्टेडियमवर सरावासाठी आले होते. रिषभ पंत, यशस्वी जैस्वाल, लोकेश राहुल यांनी सुमारे तासभर फलंदाजीचा सराव केला. विराट कोहली, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांसारख्या अनुभवी खेळाडूंनी मात्र सरावापासून दूर राहणे पसंत केले. बुधवारी मात्र कोहली सरावास उपस्थित होता. ऑप्टस स्टेडियमवर पहिल्या कसोटीसाठी बनवण्यात येणारी खेळपट्टी ही वेगवान गोलंदाजीस पूरक असण्याची शक्यता आहे. त्यामुळे, जैस्वालसह अन्य भारतीय फलंदाजांनी मुख्यतः उसळत्या चेंडूंवर फलंदाजीचा सराव केला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आलेल्या भारतीय संघामध्ये विशेषतः गोलंदाजी आघाडीमध्ये नवोदित खेळाडूंचा समावेश आहे. त्यामुळेच, बुमराह, अश्विन, जडेजा या अनुभवी गोलंदाजांवरील जबाबदारी वाढली असून बुधवारी या तिघांनीही नेट्समध्ये गोलंदाजी केली. पर्थ येथील कसोटी सामना २२ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.