पर्थ, वृत्तसंस्था : बॉर्डर-गावसकर मालिकेतील पर्थ कसोटी क्रिकेट सामन्याचा दुसरा दिवसही भारताचा ठरला. शनिवारी भारताने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १०४ धावांत संपवून ४६ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर, यशस्वी जैस्वाल आणि लोकेश राहुल या भारताच्या सलामीवीरांनी दिवसअखेरपर्यंत दिलेल्या १७२ धावांच्या नाबाद सलामीच्या जोरावर भारताने ही आघाडी २१८ धावांपर्यंत वाढवली होती.
जैस्वाल आणि राहुल यांनी दुसऱ्या डावात अस्सल कसोटी फलंदाजीचे प्रदर्शन घडवले. धावा काढण्याची घाई न करता आणि त्यासाठी धोकादायक फटके न खेळता या दोघांनी खेळपट्टीवर टिकून राहण्यास प्राधान्य दिले. काही प्रमाणात त्यांना खेळपट्टीचीही साथ लाभली. पहिल्या दिवशी चेंडूला उसळी आणि स्विंग देणारी पर्थची खेळपट्टी दुसऱ्या दिवशी बऱ्यापैकी संथ झाली होती. त्याचा पुरेपूर फायदा घेत या दोघांनीही नाबाद अर्धशतके झळकावली. ही जोडी फोडण्यासाठी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी हरप्रकारे प्रयत्न करून पाहिले. परंतु, जैस्वाल व राहुल यांनी त्यांचे प्रयत्न फोल ठरवले. खेळ थांबला, तेव्हा जैस्वालने १९३ चेंडूंमध्ये ७ चौकार आणि २ षटकारांसह ९० धावांवर, तर राहुल १५३ चेंडूंमध्ये ४ चौकारांसह ६२ धावांवर खेळत होता.
तत्पूर्वी, सकाळच्या सत्रात भारताने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १०४ धावांत संपवला. काल ७ बाद ६७ अशी अवस्था झालेल्या ऑस्ट्रेलियाचा डाव अलेक्स केरी आणि मिचेल स्टार्क यांनी पुढे सुरू ठेवला. परंतु, बुमराहने दिवसाच्या दुसऱ्याच षटकात केरीला बाद करून ही जोडी फोडली. त्यानंतर, हर्षित राणाने नॅथन लायनला माघारी पाठवले. स्टार्कने अकराव्या क्रमांकावरील जोश हेझलवूडच्या साथीने प्रतिकार सुरू ठेवत ऑस्ट्रेलियाचे शतक धावफलकावर लावले. परंतु, राणाने उपाहारापूर्वी त्याला बाद करत ऑस्ट्रेलियाचा डाव संपवला. स्टार्कने ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक २ धावांची खेळी केली. भारतातर्फे बुमराहने ५, तर राणाने ३ विकेट घेतल्या.
संक्षिप्त धावफलक : भारत – पहिला डाव सर्वबाद १५० आणि दुसरा डाव ५७ षटकांत बिनबाद १७२ (यशस्वी जैस्वाल खेळत आहे ९०, लोकेश राहुल खेळत आहे ६२) विरुद्ध ऑस्ट्रेलिया – पहिला डाव ५१.२ षटकांत सर्वबाद १०४ (मिचेल स्टार्क २६, अलेक्स केरी २१, जसप्रीत बुमराह ५-३०, हर्षित राणा ३-४८).