लखनौ, वृत्तसंस्था : लक्ष्य सेन, प्रियांशू राजावत या अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या मानांकित बॅडमिंटनपटूंनी सईद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेमध्ये पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. महिला एकेरीत अग्रमानांकित पी. व्ही. सिंधूनेही उपांत्यपूर्व फेरी गाठली असून द्वितीय मानांकित मालविका बनसोडचे आव्हान दुसऱ्या फेरीत संपुष्टात आले.
जागतिक क्रमवारीत चौदाव्या स्थानी असणाऱ्या लक्ष्यने दुसऱ्या फेरीत इस्रायलच्या डॅनिल डुबोव्हेंकोचा ३५ मिनिटांत २१-१४, २१-१३ असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीत लक्ष्यचा सामना भारताच्याच मेईराबा लुवांग मैस्नामशी होईल. प्रियांशू राजावतने व्हिएतनामच्या ले डक फॅटला ३३ मिनिटांत २१-१५, २१-८ असे पराभूत केले. पुढील फेरीत त्याच्यापुढे व्हिएतनामच्या ग्युएन हाईडांगचे आव्हान आहे.
महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत सिंधूने भारताच्या इरा शर्मावर २१-१०, १२-२१, २१-१५ असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. ४९ मिनिटे रंगलेल्या या सामन्यात इराने सिंधूला कडवी लढत दिली. उपांत्यपूर्व फेरीत सिंधू चीनच्या डाई वांगविरुद्ध खेळणार आहे. भारताच्या श्रियांशी वालिशेट्टीने मालविकाला २१-१२, २१-१५ असे सरळ गेममध्ये हरवले. श्रियांशीचा सामना चीनच्या वू लुओ यू हिच्याशी होईल. पुरुष दुहेरीमध्ये भारताच्या हरिहरन आणि रुबेन कुमार या द्वितीय मानांकित जोडीने दुसऱ्या फेरीमध्ये थायलंडच्या फारान्यू काओसामांग व तानाडोन पुन्पानिच या जोडीचे आव्हान २१-१८, २१-१७ असे मोडून काढले. उपांत्यपूर्व फेरीत त्यांचा सामना सून वेन जून-झू यी जून या जोडीशी होईल. महिला दुहेरीमध्ये तनिशा क्रॅस्टो आणि अश्विनी पोनप्पा या अग्रमानांकित जोडीने तैवानच्या चेन सू यू-यी एन सिएह या जोडीचा २१-१९, ८-२१, २१-१२ असा पराभव केला. पुढील फेरीत त्यांचा सामना भारताच्याच प्रिया कोंजेंगबम-श्रुती मिश्रा या पाचव्या मानांकित जोडीशी होणार आहे.