कोलकाता : आयपीएलमध्ये मंगळवारी शेवटच्या चेंडूपर्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात लखनौ सुपरजायंट्स संघाने कोलकाता नाइट रायडर्सचा ४ धावांनी निसटता पराभव केला. लखनौच्या ३ बाद २३८ धावांचा पाठलाग करताना कोलकात्याला २० षटकांत ७ बाद २३४ धावांपर्यंतच मजल मारता आली. (Lucknow Wins)
इडन गार्डनवर रंगलेल्या या सामन्यात दोन्ही संघांकडून धावांचा पाऊस पडला आणि चौकार-षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली. कोलकात्याने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. एडन मार्करम आणि मिचेल मार्श या जोडीने लखनौतर्फे वेगवान सुरुवात करताना १०.२ षटकांत संघाला ९९ धावांची सलामी दिली. हर्षित राणाने मार्करमला बाद करून ही जोडी फोडली. मार्करम ४ चौकार व २ षटकारांसह २८ चेंडूंमध्ये ४७ धावा करून परतला. त्यानंतर मार्श आणि निकोलस पूरन यांनीही दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचली. मार्शने ४८ चेंडूंमध्ये ६ चौकार व ५ षटकारांसह ८१ धावांची खेळी केली. मार्श बाद झाल्यावर पूरनने फटकेबाजीची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. त्याने अब्दुल समदसोबत तिसऱ्या विकेटसाठी केलेल्या ५१ धावांच्या भागीदारीमध्ये समदचा वाटा केवळ ६ धावांचा होता. पूरनने यंदाच्या आयपीएलमधील तिसरे अर्धशतक झळकावताना ७ चौकार व ८ षटकारांच्या साहाय्याने ३६ चेंडूंमध्ये नाबाद ८७ धावा फटकावल्या. (Lucknow Wins)
विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकात्यानेही झंझावाती सुरुवात केली. सलामीवर क्विंटन डीकॉक बाद होऊनही त्यांनी पॉवर-प्लेमध्ये १५ च्या सरासरीने ९० धावा केल्या होत्या. सुनील नरेन १३ धावांत ३० धावा करून बाद झाल्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे आणि व्यंकटेश अय्यर यांनी फटकेबाजी सुरू ठेवली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी करताना बाराव्या षटकात कोलकात्याला दीडशे धावांचा टप्पा ओलांडून दिला. शार्दुल ठाकूरने रहाणेला बाद करून कोलकात्याच्या धावसंख्येला ब्रेक लावला. रहाणेने ३५ चेंडूंमध्ये ८ चौकार व २ षटकारांसह ६१ धावा केल्या. सोळाव्या षटकात अय्यर ४५ धावांवर बाद झाल्यानंतर कोलकात्यासाठी आव्हान आणखीच कठीण बनले. रिंकू सिंहने अखेरच्या षटकापर्यंत फटकेबाजी करत विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या. डावाच्या अखेरच्या तीन चेंडूंवर विजयासाठी तीन षटकारांची आवश्यकता असताना रिंकूने दोन चौकार व एक षटकार लगावला. परिणामी, कोलकात्याला चार धावांनी पराभव पत्करावा लागला. रिंकूने १५ चेंडूंमध्ये ६ चौकार व २ षटकारांसह नाबाद ३८ धावा केल्या. कोलकात्याकडून आकाश दीप व शार्दुल यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या. (Lucknow Wins)
या विजयानंतर लखनौचा संघ ६ गुणांसह गुणतक्त्यात चौथ्या स्थानी पोहोचला आहे. कोलकात्याचा संघ सहाव्या स्थानावर असून त्यांच्या खात्यात ५ सामन्यांअखेर ४ गुण आहेत.
संक्षिप्त धावफलक : लखनौ सुपरजायंट्स – २० षटकांत ३ बाद २३८ (मिचेल मार्श ८१, निकोलस पूरन नाबाद ८७, एडन मार्करम ४७, हर्षित राणा २-५१, आंद्रे रसेल १-३२) विजयी विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स – २० षटकांत ७ बाद २३४ (अजिंक्य रहाणे ६१, व्यंकटेश अय्यर ४५, रिंकू सिंह नाबाद ३८, आकाश दीप २-५५, शार्दुल ठाकूर २-५२).
हेही वाचा :
ध्रुव-तनिशाची विजयी सलामी
भारतीय महिला संघ जाहीर