कोल्हापूर : प्रतिनिधी : कितीही धमक्या आल्या तरी घाबरणार नाही. माझी लेखणीची, जिभेची तलवार चालणारच. दडवून, दडपून ठेवलेला सत्य इतिहास जनतेपुढे निर्भिडपणे मांडणार, असा ठाम निर्धार इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी व्यक्त केला. शिव-शंभू, फुले, आंबेडकर सन्मान परिषदेत सावंत यांचा अभिनेते किरण माने आणि ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांच्या हस्ते बहुजन नायक पुरस्काराने गौरव करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना सावंत बोलत होते. हिंदू बहुजन महासंघाने परिषदेचे आयोजन केले होते.(Sanman Parishad)
इतिहास अभ्यासक सावंत यांनी कोल्हापूरची लाल माती, पंचगंगेचे पाणी आणि छत्रपती शिवराय, शंभूराजे, महात्मा फुले, राजर्षी शाहू, डॉ. आंबेडकर यांच्या विचारांच्या ताकदीमुळे कोरटकरसारख्या प्रवृत्तीला निडरपणाने तोंड देण्याची ताकद मिळाल्याचे सांगितले. ते म्हणाले, शिवरायांच्या महाराष्ट्रात शिवाजी महाराजांविषयी कोरटकरच्या विखारी वक्तव्यामुळे मी अस्वस्थ होऊन सोशल मिडियावर पोस्ट केली. त्यानंतर झोपलेला बहुजन समाज जागा झाला. शिवरायांचे रक्त अजूनही जिवंत आहे, याची प्रचिती मिळाली. (Sanman Parishad)
गेल्या दहा वर्षात सत्य बोलायचे किंवा धाडसाने बोलायचे नाही अशी रचना राजकर्त्यांकडून नियोजनपूर्वक केली जात आहे. सत्य बोलणाऱ्या नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, गौरी लंकेश, कलबुर्गी यांना संपवून टाकले. त्यांचे मारेकरीही अजून सापडत नाहीत याकडे इतिहास अभ्यासक सावंत यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले, लोकांमध्ये भीती निर्माण केली जात आहे. भीती घालण्याचे काम सनातनी मंडळी पूर्वीपासून करत आहेत. पण आपण त्यांना भ्यायचे नाही. त्यांच्यासमोर शड्डू ठोकून उभे रहायचे. आपण शड्डू ठोकून उभे राहिलो तर कोरटकरसारख्या मंडळींना हैद्राबाद, चेन्नईला पळावे लागते. निडरपणे उभे राहिलो तर समाजही आपल्या बाजूने राहतो.
कोरटकर प्रकरणामुळे निडरतेची ताकद नाशिकपासून नागपूरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात पसरली आहे, असे सांगून सावंत म्हणाले, आपण सर्वांनी आता व्यक्त झाले पाहिजे. आपण व्यक्त झालो तर या प्रतिगामी ताकदीशी मुकाबला करु. त्यासाठी खरा इतिहास लोकांसमोर सांगण्याचे काम अखंडपणे करु, असेही ते म्हणाले. (Sanman Parishad)
‘छावा’ चित्रपटातील खोटा इतिहास उघड केला
ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी मला ‘छावा’ चित्रपट पाहायला सांगितले आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी संभाजीराजेंचा खरा इतिहास त्यांनी माझी मुलाखत घेऊन जाणून घेतला. ‘छावा’ चित्रपटात खोटा इतिहास दाखवला आहे. त्या चित्रपटात शिर्केंना खलनायक दाखवले आहे, पण संभाजीराजेंना पकडून देणारा खरा इतिहास मी सांगितला. त्याचे अस्सल संदर्भ सांगितले. नाटक, सिनेमा, कांदबऱ्यांतून संभाजीराजेंना कसे बदनाम केले हे सांगितले. त्यामुळे अनेक प्रतिगामी दुखावले गेले आणि त्यातून कोरटकरचे विखारी वक्तव्य बाहेर आले, असेही सावंत यांनी सांगितले.
चित्रपटांत खोटे पत्ते घालण्याचे काम : किरण माने
अभिनेते किरण माने यांनी विशिष्ट प्रवृत्ती चित्रपटातून छुपा प्रचार करत असून त्यातून बहुजन समाजाची माथी भडकावली जात आहेत. चित्रपटात खोटे पत्ते घालण्याचे काम केले जात आहे. चित्रपट खरा नसतो. अशावेळी सत्य सांगणारी माणसे खूप कमी आहेत. इंद्रजीत सावंत यांच्यासारख्या सत्य सांगणाऱ्या माणसांना बळ देण्यासाठी समाजाने पुढे आले पाहिजे, असे सांगितले. (Sanman Parishad)
विखुरलेला समाज एकसंध करूया : चोरमारे
अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे म्हणाले, राष्ट्रपुरुषांनी महाराष्ट्र घडवण्याचे मोठे काम केले. पण आता हे राष्ट्रपुरुष विविध समाजात विभागले गेल्याने समाज विखुरला आहे. विखुरलेल्या समाजाला एकत्र करण्याची सुरुवात राजर्षी शाहूंच्या समतानगरीतून झाली पाहिजे. सत्ताधारी मंडळी सरकारला अडचणीत येणारे विषय येऊ नयेत म्हणून वेगवेगळे विषय आणत आहेत. शिवाजी विद्यापीठाचे नाव बदलावे, अशी मागणी पुढे येत आहे. भाजपमध्चे गेलेले नवहिंदुत्ववादी महाडिक, नरके, माने, यड्रावकर ही मंडळी कुणाच्या तरी नादाला लागून ही मागणी रेटत आहेत. ज्या शिवाजी विद्यापीठात शिकले त्यातील छत्रपतींचे नाव काढण्याच्या षड्.यंत्रात सहभागी होत आहेत. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे सरकारची नाचक्की झाली, त्यावरून लक्ष वळवण्यासाठी अबू आझमीला उठवून बसवले आणि औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा सत्ताधा-यांनी पुढे आणला. हे राजकारण समजून घेतले पाहिजे. पुरोगामी कोल्हापुरात वारंवार दंगली घडवून इथले वातावरण बिघडवण्याचे काम केले जात आहे. दंगलीनंतर सद्भावना मिरवणूक काढून इथल्या लोकांची जबाबदारी संपत नाही. धार्मिक दंगलीच्या काळात मराठा समाजासह बहुजन समाजाने मुस्लिम समाजाची ढाल बनून उभे राहिले पाहिजे.
कीर्तनकार नितिन पिसाळ म्हणाले, महाराष्ट्रात ८५ टक्के बहुजन समाज आहे. त्यांच्या अनेक संघटना आहेत. या संघटनांनी स्वत:चा अहंकार सोडून प्रतिगामी विचारांना हरवण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. यावेळी जयदीप शेळके, उदय लाड, संजय पटकारे, प्रविण पाटील, निलेश सुतार, शुभम शिरहट्टी, विश्वविक्रम कांबळे, सागर गवळी, प्रमोद पाटील, ओंकार नलवडे यांचा बहुजन योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला. यावेळी सरोजनी पाटील, वसंतराव मुळीक, चंद्रकांत यादव, शिवराजसिंह गायकवाड, धैयर्शिल घाटगे, संदीप देसाई, डॉ. डी.आर.भोसले, किरण पटवर्धन, शिवाजी खोत, पंडित केसरे, शिवाजी कांबळे, अरुण सावंत, डॉ. अनिल माने आदी उपस्थित होते. शिवप्रबोधिनीचे संस्थापक अध्यक्ष विजय पाटील यांनी स्वागत केले. हर्षल सुर्वे यांनी प्रास्ताविक केले. संपतराव चव्हाण पाटील यांनी आभार मानले.
हेही वाचा :
भाजपने हिंदुत्व सोडले का?
कामरांवर जगभरातून धनवर्षाव!