महाराष्ट्र दिनमान : हत्ती हे अत्यंत बुद्धिमान आणि सामाजिक प्राणी म्हणून ओळखले जातात. त्यांच्यात सामूहिकपणे काम करण्याचे आकलन असते. इतरांच्या भावनिक स्थितीचा अंदाज घेण्याबरोबरच परोपकारी वर्तनाचीही क्षमता असते. त्यामुळे, जंगली हत्ती आपल्या साथीदारांसोबत कसे वर्तन करतात, हे जाणून घेण्यासाठी वन्यजीव शास्त्रज्ञांनी एक अभ्यास केला. भारताच्या ईशान्य भागात जंगली हत्तींच्या सामाजिक वर्तनाचे ठोस पुरावे मिळाले आहेत. दोन वेगळ्या प्रसंगांमध्ये प्रौढ नर हत्तींनी मादी हत्तींचे प्राण वाचवले. या घटनेने हत्तींच्या सामाजिक आणि भावनिक बुद्धिमत्तेवर प्रकाश टाकला आहे. (Elephant)
हा अभ्यास भारतीय वन्यजीव कोष (WWF), आसाम वन विभाग, केंब्रिज विद्यापीठ, आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघ (IUCN) आदी संस्थांनी मिळून केला आहे. बायोट्रोपिका नामक संशोधनपत्रिकेमध्ये यासंदर्भातील वृत्तांत प्रसिद्ध झाला आहे. जंगली पशूंच्या जगात परोपकारी व्यवहार कशा रितीने चालतो, यासंदर्भातील महत्त्वाची निरीक्षणे त्यामध्ये नोंदवण्यात आली आहेत. प्राणी एकमेकांशी संबंधित असले तरच परस्परांची मदत करतात, अशी सर्वसाधारण धारणा आहे. या पारंपरिक धारणेला छेद देणारे निष्कर्ष या अभ्यासातून पुढे आले आहेत.
आसामच्या सोनितपूरमध्ये यासंदर्भातील संशोधन करण्यात आले. जंगली हत्तींना जीपीएस कॉलर लावल्यानंतर त्यांच्या हालचाली टिपून माणूस आणि हत्तींच्या संघर्षाच्या कारणांचा अभ्यास करण्याच्या योजनेअंतर्गत हे संशोधन करण्यात आले. सोनाई रुपाई वन्यजीव अभयारण्य आणि अड्डाबरी चहा उद्यान या ठिकाणांचा अभ्यासात समावेश होता. (Elephant)
या दोन्ही ठिकामी संशोधकांनी एका मोठ्या झुंडीतून एका वयस्कर हत्तीणीला शांत करून तिला जीपीएस कॉलर लावले. झुंडीतले बाकीचे हत्ती खूप दूर निघून गेल्यानंतर एक वयस्कर हत्ती मादीजवळ आला.
आसामच्या सोनाई रुपाई वन्यजीव अभयारण्यात एक विनादातांचा नर हत्ती होता, ज्याला मखना म्हटले जाते. अड्डाबारी चहा उद्यानात एक टस्कर हत्ती होता. संशोधक समूहांच्या उपस्थितीचा धोका असतानाही दोन्ही हत्तींनी हत्तीणींना शुद्धीवर आणून त्यांना तिथून दूर घेऊन गेले. संशोधकांच्या मते ही एक अनपेक्षित अशी घटना आहे. (Elephant)
या अभ्यासात असे आढळून आले आहे की, जंगली हत्ती संकटात असलेल्या इतर हत्तींची मदत करतात. सोनितपूर, आसाममधील अभ्यासात, एका वयस्क मादी हत्तीला ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम (GPS) कॉलर लावण्यासाठी शांत केले असता, एका नर हत्तीने धोका असूनही मादीला सुरक्षित स्थळी नेले.
संशोधकांनी म्हटले आहे की, अशा प्रकारचे परोपकारी काम सहानुभूती आणि काळजीपोटी होऊ शकते. कोणत्याही तात्कालिक फायद्याचा विचार न करता हत्ती इतरांना मदत करतात. (Elephant)
प्राणी जगतातील एका सांस्कृतिक व्यवहारावर या अभ्यासातून प्रकाश पडतो. वन्यप्राण्यांच्या व्यवस्थापनासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. हत्तींच्या केवळ संख्येचा विचार न करता त्यांचे जीवनमान उंचावण्याची तसेच ते अधिक सुरक्षित करण्याची आवश्यकताही या अभ्यासातून व्यक्त झाली आहे. हत्तीसह अन्य काही प्राणी विचार करतात, भावना समजून घेतात, हे या अभ्यासातून समोर येत असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.
हत्ती हे केवळ जंगली प्राणी नसून, संवेदनशील आणि जाणिवांनी युक्त प्राणी आहेत. त्यांच्यासोबतचा व्यवहार अधिक आदरपूर्वक आणि संवेदनशीलतेने करण्याची आवश्यकताही अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. (Elephant)
(डाऊन टू अर्थच्या सौजन्याने)