सातारा : प्रशांत जाधव
फलटण मतदारसंघाचा गेल्या पन्नास वर्षांचा आढावा घेतला तर अनेक दिग्गज नेत्यांनी या मतदारसंघात आपले नशीब आजमावले, मात्र खरी लढाई ही रामराजे नाईक- निंबाळकर आणि दिवंगत आमदार चिमणराव कदम यांच्या घराण्यातच झाली आहे. या मतदारसंघाचे दिवंगत आमदार चिमणराव कदम यांनी सलग तीन वेळा प्रतिनिधित्व केले व त्यांना तीन वेळा पराभवही पत्करावा लागला. माजी जलसंपदा मंत्री रामराजे नाईक- निंबाळकर यांनी या मतदारसंघावर गेली तीस वर्षे पकड ठेवली आहे.
१९७८ सालच्या निवडणुकीत फलटण मतदारसंघात जनता पक्षाकडून विजयसिंह मालोजीराव नाईक-निंबाळकर आणि राष्ट्रीय काँग्रेसकडून चिमणराव कदम यांच्यात लढत झाली. या लढतीत नाईक-निंबाळकर यांना ३२ हजार ११, तर चिमणराव कदमांना ३० हजार ५३९ मते मिळाली होती. अटीतटीच्या या लढतीत नाईक-निंबाळकर यांचा १ हजार ४७२ मतांनी विजय झाला होता. पुलोद सरकारच्या प्रयोगानंतर पुन्हा १९८० साली निवडणूक लागली आणि या निवडणुकीत चिमणराव कदम आणि हिंदुराव नाईक-निंबाळकर यांच्यात लढत झाली. यामध्ये चिमणराव कदम यांनी ४६ हजार २१० मते मिळवत नाईक-निंबाळकर यांचा २३ हजार ३०२ मतांनी पराभव केला होता. सलग दोन निवडणुकीत कदम आणि नाईक-निंबाळकर या घराणांच्यात लढत झाल्यानंतर १९८५ सालची निवडणूक ही नाईक-निंबाळकर घराण्याशिवाय पार पडली. या निवडणुकीत चिमणराव कदम यांना तिकीट नाकारत पक्षाने राजाराम भोसले तथा बॅरिस्टर भोसले यांना उमेदवारी दिल्याने कदम अपक्ष लढले. ही लढत चिमणराव कदम आणि राजाराम भोसले यांच्यात झाली आणि कदमांनी भोसले यांचा १० हजार मतांनी पराभव केला. १९९० सालातील निवडणूक देखील नाईक-निंबाळकर घराण्याशिवाय आणि भाजपाच्या फलटणच्या राजकीय पटलावरील उदयाने झाली. ही निवडणूक काँग्रेसकडून चिमणराव कदम, भाजपाकडून विजयराव बोरावके, शरद पवारांचे विश्वासू असलेले सुभाषराव शिंदे यांच्यात झाली. या तिरंगी लढतीत चिमणराव कदम यांनी ५४ हजार मते मिळवून २९ हजारांच्या मताधिक्याने विजय खेचला होता.
१९९५ साली रामराजे यांच्या रूपाने पुन्हा नाईक-निंबाळकर घराण्याचा फलटणच्या राजकारणात प्रवेश झाला. या निवडणुकीत काँग्रेसकडून चिमणराव कदम, तर रामराजे नाईक-निंबाळकर हे अपक्ष मैदानात उतरले होते. अटीतटीच्या लढतीत रामराजेंनी चिमणराव कदम यांचा ४२ हजार मतांनी पराभव केला. याच काळात रामराजेंनी राज्यातील अपक्ष आमदारांचे नेतृत्व करून कृष्णा खोरे विकास महामंडळ स्थापनेच्या प्रक्रियेला गती दिली. पुढे रामराजेंच्या राजकारणाने गती घेतली. त्यानंतर रामराजे यांनी १९९९ साली चिमणराव कदम यांचा ३१ हजार मतांनी तर २००४ साली रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचा ४० हजार मतांनी पराभव करत फलटणवर एकहाती वर्चस्व प्रस्थापित केले. त्यानंतर हा मतदारसंघ राखीव झाल्यामुळे प्रस्थापितांच्या संघर्षाची धार कमी झाली असली तरी शीतयुद्ध सुरूच राहिले. २००९ साली रामराजे यांनी दीपक चव्हाण यांच्यावर विश्वास टाकत त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून विधानसभेच्या रिंगणात उतरवले. एक शिक्षक असलेल्या चव्हाण यांना सलग तीनवेळा विधानसभेत प्रतिनिधित्व करता आले. आमदार चव्हाण यांनी २००९ साली शिवसेनेचे बाबूराव माने यांचा ३९ हजारांनी, तर २०१४ व २०१९ साली दिगंबर आगवणे यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. २०१९ साली फलटणच्या इतिहासात सर्वात जास्त १ लाख १७ हजार मते मिळवण्याचा विक्रम चव्हाण यांच्या नावावर आहे. आतापर्यंतच्या निवडणुकांचा निकाल पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थापनेपासून इथल्या जनतेने खासदार शरद पवार यांच्या विचारांना साथ दिली आहे.