प्रा. प्रशांत नागावकर :
क्रांतिसिंह नाना पाटील नगर मित्र मंडळ, कोल्हापूर यांनी विद्यासागर अध्यापक यांनी लिहिलेलं आणि मुरलीधर बारापात्रे दिग्दर्शित केलेलं ‘साखर खाल्लेला माणूस’ हे नाटक हौशी स्पर्धात्मक पातळीवर सादर झाले. साखर गोड असते हे मान्य बंदी प्रमाणापेक्षा जास्त खाल्ल्याने काय होते हे सर्वांनाच माहीत आहे. सादरीकरणाच्या पातळीवर या नाटकासंदर्भात असेच काहीतरी झाले. पण हे नाटक लिखाणाच्या पातळीवर एक क्लिन कॉमेडी म्हणून उल्लेखनीय आहे. एक स्वभावनिष्ठ नर्मविनोदी नाटक असे त्याचे रूप आहे. हे नाटक हौशी राज्य नाट्य स्पर्धेत यापूर्वीच सादर झाले होते. त्यानंतर हेच व्यावसायिक रंगभूमीवर आले. चंद्रकांत कुलकर्णी यांनी व्यावसायिक स्तरावर हे नाटक दिग्दर्शित केले. (sakhar khallela manus)
या नाटकात प्रशांत दामले या दिग्गज कलाकाराने प्रमुख व्यक्तिरेखा साकारली होती. सहाजिकच या नाटकाने त्यावेळी फार्सिकल कॉमेडी म्हणून लौकिक प्राप्त केला होता व व्यावसायिकदृष्ट्या ते यशस्वी ठरले होते. प्रशांत दामले यांच्या करिश्म्यामुळे नाटकाचा प्रयोग रंगतदार होत होता. आता या स्पर्धेच्या निमित्ताने पुन्हा एकदा हे नाटक रंगभूमीवर सादर झाले. पण पूर्वीच्या दोन्ही सादरीकरणाच्या तुलनेने हे नाटक अभिनयाच्या पातळी उभे राहिलेच नाही.
विलास देशपांडे व त्यांची तद्दन गृहिणी छापाची बायको माधवी आणि या दोघांची आधुनिक विचारांची ऋचा नावाची मुलगी. तिचे ओंकार ह्या डॉक्टरी पेशातील साध्याभोळ्या तरुण मुलाशी प्रेमसंबंध असतात. विलास देशपांडे यांना डायबेटीसचे निदान झाल्यानंतर त्यांच्या अस्थिर, अस्वस्थ अशा मनोवस्थेतून उद्भवणाऱ्या गमतीजमती या नाटकाच्या केंद्रस्थानी आहे. तसेच ते ऋचा आणि विलास, म्हणजे बाप-बेटीतल्या भिन्न दृष्टिकोनातून निर्माण होणाऱ्या गोंधळाचीही गंमत सांगते. थोडक्यात, दोन पिढ्यांतला मजेशीर संघर्ष हा या नाटकाचा गाभा आहे, ज्याला आवरण आहे मधुमेही माणसाच्या विनाकारण चिडचिडीचे, कशानेही समाधान न होणाऱ्या त्याच्या वृत्तीचे. त्यांना जावई म्हणून सरळ वळणाचा ओंकार चालत नाही, त्यामुळे ते मुलीच्या प्रेमसंबंधात वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. त्यापूर्वी मुलीचे खूप वेळ घराबाहेर राहणे, तिच्या पार्ट्या आदी सर्वांमुळे ते जास्तच अस्वस्थ असतात. त्यामुळे अशा ह्या चिडचिड्या माणसाच्या रक्तातली साखर वाढते आणि एकदाचा त्यांना मधुमेह होतो. (sakhar khallela manus)
शेवटी, ऋचा एक अनुमान काढते. ते म्हणजे, विलास यांना भविष्य सुरक्षित करण्यात इंटरेस्ट आहे, तर तिला मात्र वर्तमानातलं स्वातंत्र्य हवंय. दुसरी गोष्ट, उलटं चालण्याच्या स्पर्धेतून विलासला कळून चुकलेले समाधानी जगण्याचे तत्त्वज्ञान. आयुष्याचं रीळ उलटं करुन पूर्वीच्या निर्भर आनंदी जगण्याचं रहस्य शोधायचं, हे त्याला आपसूक कळतं आणि सगळ्या चिंता मिटतात.
कोल्हापुरातील सागर अध्यापक हे नाव नाटककार म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहेत. मागील दोन वर्ष राज्य नाट्य स्पर्धेत सातत्याने नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन करून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. त्यांनी अत्यंत नर्मविरोधी शैलीमध्ये, मिश्किल तर काही उपरोधिक संवादाच्या माध्यमातून संहितेची मांडणी केली आहे. कोणताही विनोद त्यांनी ओढून ताणून आणण्याचा प्रयत्न केला नाही. या नाटकात विनोद माणसाच्या स्वभावाच्या विसंगतीतून निर्माण होतो आणि तोही नैसर्गिकपणे निर्माण होते हेच या नाटकाच्या लिखाणातील यशस्वीतेचे वैशिष्ट्य.
ही एक अत्यंत यशस्वी आणि ताकदीची संहिता. पण सादरीकरणाच्या पातळीवर दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रज्ञ यांनी निराशा केली. ह्याचं कारण कलावंतांनी स्वीकारलेली अभिनयशैली. दिग्दर्शक मुरलीधर बारापात्रे यांनी संपूर्ण नाटकाची केलेली विस्कळीत रचना. येथे दिग्दर्शकाने कलाकारांना इतकी मोकळीक दिली की साधे रंगभूमीचे भानही त्यांना ठेवता आले नाही, की कलाकारांनी दिग्दर्शकाचे ऐकले नाही, हे कळायला मार्ग नाही पण याचा परिणाम मात्र नाटक सुरुवातीपासून शेवटपर्यंत उभे राहिले नाही. कदाचित प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या टाळ्या शिट्ट्या त्यांचा उत्साही प्रतिसाद यातून कलाकारांना असे वाटत होते की आपला अभिनय दर्जेदार होतोय. पण खरी गोष्ट म्हणजे लिखाणाच्या पातळीवर तिथल्या नर्मविनोदी संवादांना प्रेक्षक भरभरून दात देत होते. पण हे कलाकारांना न कळल्यामुळे ते स्वतःचे भान हरवून विचित्र अंगविक्षेप करू लागले होते.
समग्र नाटकाचा विचार करता या पद्धतीच्या अतिरिक्त अंगविक्षेपाची गरज आहे का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. नाटकातल्या पहिल्याच प्रसंगात घड्याळ सापडत नाही म्हणून पराकोटीचा चिडलेला विलास दिसतो. त्याच्या चिडण्याचं कारण माधवीला हास्यास्पद वाटतं. तर तो आणखीनच संतापतो. बकाबका खात सुटतो. ही प्री-डायबेटिक स्टेज आहे. यात विलास हा शाब्दिक कोट्या आणि शारीरिक हालचालींतून विनोद निर्माण करण्याच्या स्थितीत नसून त्याची अवस्था हाच एक विनोद झाला आहे. पण हे लक्षात न घेता विलासच्या भूमिकेत असणारे सयाजी कुंभार हे नाटक विनोदी आहे म्हणून आपल्याला लाफ्टर काढायचे आहेत, हे डोक्यात ठेवू अत्यंत विचित्र अशा हालचाली आणि अंगविक्षेप करतात. गोमूत्र पिण्याची ॲक्शन न करता गायीची अवस्था दाखवतात. ह्याने हसू जरूर येतं, पण ते व्यक्तिरेखेपासून लांब जाते. त्यांच्या अभिनयातील हा विक्षिप्तपणा पुढे पुढे वाढत जातो. (sakhar khallela manus)
मनीषा नायक यांनी स्वीकारलेली कृत्रिम शैली आणखी वेगळी आहे. सरळ साध्या गृहिणीच्या व्यक्तिरेखेत उगीच काहीतरी वेगळे करण्याच्या प्रयत्नात काही शब्दांवर अनावश्यक जोर देतात, काही शब्द विनाकारण ताणतात, गरज नसताना सर्व शरीर वाकवणं आणि प्रचंड बडबडीने वेंधळेपणा उभा करण्याचा प्रयत्न करणे यामागचे प्रयोजन कळत नाही. त्यांनीही आपल्याला काही करून लाफ्टर काढायचे आहेत, असा समज करून घेतला असावा असं वाटत राहातं. या दोन प्रमुख कलाकारांच्या या अभिनय शैलीमुळे नाटक आपला स्वाभाविक सूर हरवून बसले. (sakhar khallela manus)
तेजस्वी कुलकर्णीने ऋचाची भूमिका मोनोटोनस केली आहे. तिच्या अनावश्यक हालचाली रसभंग करीत होत्या. आपण प्रेग्नंट आहोत हे सांगण्यापूर्वी तिने काही विचार केलेला जाणवत नाही, हीच गोष्ट पुढे नाट्य घडवणार आहे याची एक हिशोबी तयारी तिच्या आधीच्या वर्तनातून दिसायला हवी होती.
राजेंद्र चौगुले यांनी आपली भूमिका ठिकठाक करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला दिसतो. पण त्याचा संयत सूर विनोदाच्या उत्सवात क्षीण होतो. एकूणच सादरीकरणाच्या पातळीवर नाटक अत्यंत निरस झाले. अतिरिक अभिनयाने मळमळ मात्र नक्कीच सुरू झाली.
- नाटक : साखर खाल्लेला माणूस
- लेखक : विद्यासागर अध्यापक
- सादकर्ते : क्रांतिसिंह नाना पाटील नगर मित्र मंडळ, कोल्हापूर
- दिग्दर्शक/प्रकाश योजना : मुरलीधर बारापात्रे
- नेपथ्य : सयाजी कुंभार
- संगीत : अनुजा कुलकर्णी
- रंगभूषा : सदानंद सूर्यवंशी
- वेशभूषा : मनीषा नायक/तेजस्विनी कुलकर्णी
- भूमिका आणि कलावंत
- माधवी : मनीषा नायक
- विलास : सयाजी कुंभार
- डॉ. ओमकार : राजेंद्र चौगुले
- ऋचा : तेजस्विनी कुलकर्णी
हेही वाचा :
धमाल संहिता पण निरस सादरीकरण
आशयपूर्ण सादरीकरण
राज कपूर : एक पूर्ण सिनेमापुरुष