भारतात १९२० च्या सुमारास हिंदू-मुस्लिम समाजामधील तेढ वाढत चालली होती. १९२०-२३ नंतर भारतातील अनेक शहरांमध्ये धार्मिक दंगली आणि नंतर तणावाचे वातावरण निर्माण होत होते. १९२३ साली अकरा, १९२४ साली अठरा,१९२५ साली सोळा तर १९२६ साली पस्तीस हिंदू-मुस्लिम दंगली झाल्या. (Nagpur Riots)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना १९२५ साली झाली. त्याच्याशी या घटनांचा संबंध जोडण्यात येतो. नागपूरमध्ये १९२३ आणि पुढे १९२७ मध्ये मोठ्या दंगली झाल्या. औरंगजेबाच्या कबरीच्या विषयावरून नागपूरमध्ये झालेल्या ताज्या दंगलीमुळे नागपूरमधील जुन्या दंगलींच्या आठवणी ताज्या झाल्या.
१९२० च्या दशकात भारतात धार्मिक तेढ वाढत चालली होती. हिंदू-मुस्लिम ओळखींचे राजकीयीकरण होत होते. धार्मिक मिरवणुकांद्वारे शक्तिप्रदर्शन केले जात होते. त्याद्वारे वातावरण तापवले जात होते. हिंदू महासभा आणि मुस्लिम लीग या संघटनांच्या वाढत्या प्रभावामुळे समाजात धार्मिक ध्रुवीकरण वाढले होते.
नागपूरची १९२३ ची दंगल
नागपूरच्या १९२३च्या दंगलीबाबत विकिपीडियावर जी माहिती उपलब्ध आहे, ती अशीः
हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी १९२३ साली मिरवणूक काढली. ती मशिदीच्या समोरून नेली. मशिदीसमोरून जाताना मिरवणुकीमध्ये मोठ्या आवाजात वाद्ये वाजविली, हे दंगलीचे मुख्य कारण बनले. या दंगलीनंतर केशव बळिराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची १९२५ मध्ये स्थापना केली. (Nagpur Riots)
१९२३च्या दंगलीला उत्तर देण्यासाठी म्हणून संघ सरसावला. पूर्वी मशिदीसमोरुन शांततेत मिरवणूका नेण्याचा संकेत होता. तो मोडण्यासाठी १९२७ च्या गणेश मिरवणूकीमध्ये हेडगेवारांनी मुद्दाम मोठ्याने ढोल वाजवत, मिरवणूक मशिदी समोरून नेली. यातून धार्मिक ध्रुवीकरणास सुरुवात झाली.
४ सप्टेंबर रोजी लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने हिंदूंनी सालाबादप्रमाणे मिरवणूक काढली होती, ती मिरवणूक ज्यावेळी महाल इलाक्यातील मशिदीसमोर पोहोचली त्यावेळी स्थानिक मुस्लिमांनी ती मिरवणूक तेथुन पुढे नेण्यास मज्जाव केला. मिरवणूकीच्या दिवशीच दुपारच्या वेळी जेव्हा हिंदू लोक आपल्या घरांमध्ये आराम करत होते तेव्हा अनेक मुस्लिम तरुण अल्लाहू अकबरच्या आरोळ्या ठोकत सुरे, चाकू घेऊन झुंडीने हिंदू इलाक्यात दाखल झाले. (Nagpur Riots)
हेडगेवार यांच्या घरावर दगडफेक
हेडगेवार यांच्या घरावर मुस्लिम युवकांनी दगडफेक केली, त्यावेळी हेडगेवार नागपूरात आपल्या घरी नव्हते. रा.स्व.संघाचे कार्यकर्ते ह्या समस्येला तोंड देण्यासाठी लाठ्या घेऊन महाल इलाक्याच्या गल्ल्यांमध्ये आले, ज्यामुळे वातावरण आणखीनच चिघळले.
वॉशिंगटन पोस्टच्या बातमीनुसार या दोन दिवसाच्या दंगलीमध्ये एकूण २२ जणांनी आपले प्राण गमावले आणि जवळपास १०० लोक गंभीर जखमी झाले.
दोन दिवसानंतर सरकारने शहरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी सैन्याला पाचारण केले. ह्या दंगलीच्या निमित्ताने रा.स्व.संघाच्या एकूण १६ शाखांनी शहरभर आपल्या ‘स्वयंसेवकांची फौज’ हिंदूंच्या ‘रक्षणासाठी’ खडी केली होती.
विकिपीडियावर ही माहिती उपलब्ध आहे.
१९२७ मधील नागपूर दंगल
१९२७ साली नागपूरमध्ये घडलेली दंगल ही भारतातील हिंदू-मुस्लिम तणावाच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण घटना होती. नागपूरमध्ये आधीच १९२३ साली मोठी दंगल झाली होती. या दंगलीनंतर हिंदू समाजाच्या संघटनाची गरज जाणवली. १९२५ साली डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) स्थापन केला. यामुळेच १९२७ साली दंगल भडकण्याची पार्श्वभूमी तयार झाली. (Nagpur Riots)
४ सप्टेंबर १९२७ रोजी नागपूरमध्ये महालक्ष्मी पूजनाची मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक महाल परिसरातून जात होती, जो प्रामुख्याने मुस्लिमबहुल भाग होता. मिरवणुकीत मोठ्या आवाजात संगीत वाजवले जात असल्यामुळे स्थानिक मुस्लिमांनी त्यास आक्षेप घेतला.
या घटनेबाबत दोन मतप्रवाह दिसून येतात.
१) काहींच्या मते मुस्लिमांनी मिरवणुकीला अडवण्याचा प्रयत्न केला.
२) काहींच्या मते मोठ्या आवाजातील संगीतामुळे वाद उफाळला.
वाद मिटवण्यासाठी प्रयत्न झाले, पण तोडगा निघू शकला नाही. काही वेळातच संघर्षाचे रूपांतर मोठ्या हिंसाचारात झाले आणि संपूर्ण नागपूरमध्ये धार्मिक दंगल उसळली. (Nagpur Riots)
दंगलीचे स्वरूप
दंगल तब्बल तीन दिवस सुरू राहिली. दोन्ही समुदायांमधील जमावांनी एकमेकांवर हल्ले केले. दगडफेक, जाळपोळ, हत्याकांड घडले. हिंदू वस्त्यांवरील मुस्लिम हल्ले आणि मुस्लिम वस्त्यांवरील हिंदू हल्ले वाढत गेले. पोलिसांनी परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, पण हिंसाचार मोठ्या प्रमाणावर पसरला.
दंगलीचे परिणाम
अधिकृत आकडेवारीनुसार दंगलीत २२ जण ठार आणि १०० हून अधिक जखमी झाले. काही अहवालांनुसार मृतांची संख्या अधिक असू शकते.
आरएसएसची भूमिका
१९२५ मध्ये स्थापन झालेल्या आरएसएससाठी (RSS) साठी ही पहिली मोठी सामाजिक चाचणी होती. संघाच्या स्वयंसेवकांनी हिंदू वस्त्यांचे संरक्षण करण्यासाठी संघटित प्रयत्न केले. आरएसएस संघटना अधिक बळकट होण्यास या दंगलीचा उपयोग झाला.
नागपूरमधील सामाजिक फूट वाढली:
या दंगलीने नागपूरमधील हिंदू-मुस्लिम सौहार्द बिघडले. दोन्ही समुदायांमधील संबंधांवर दीर्घकालीन परिणाम केला. समाजामध्ये धार्मिक ध्रुवीकरण वाढले.
प्रशासनाची कारवाई
तो काळ ब्रिटिश राजवटीचा होता. सरकारने संचारबंदी लागू केली. नागपूरमध्ये पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला. सैन्याला पाचारण करण्यात आले.
ऐतिहासिक महत्त्व
१९२७ मधील नागपूर दंगल ही फक्त स्थानिक घटना नव्हती. ती देशव्यापी धार्मिक तणावाचा भाग होती. १९२३ ते १९२७ दरम्यान संपूर्ण भारतात तब्बल १३० दंगली झाल्या होत्या. या दंगलींचे महत्त्व मुख्यतः आरएसएसच्या उदयाशी जोडले जाते. या दंगलीनंतर नागपूरच्या सामाजिक वातावरणात कायमस्वरूपी धार्मिक तणाव निर्माण झाला. त्याचबरोबर आरएसएसच्या वाढीला चालना मिळाली. (Nagpur Riots)
वि. रा. करंदीकर यांच्या पुस्तकातील तपशील
डॉ. वि. रा. करंदीकर यांचे `तीन सरसंघचालक` या नावाचे एक पुस्तक आहे. संघविचारांच्या या पुस्तकातही या दंगलीसंदर्भात तपशील दिला आहे. तो असाः
ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात मुसलमानांना उद्देशून एक पत्रक वाटले गेले. पत्रकाचे शीषर्क होते, फातेहारव्वानी म्हणजे पुण्यतिथी.
पत्रकात म्हटले होतेः “मुसलमान बंधूंना कळवण्यात येत आहे की, तीन वर्षांपूर्वी चार सप्टेंबर १९२४ या दिवशी सय्यद मीरसाहेब याला नागपूरमध्ये वीरमरण प्राप्त झाले. त्याची स्मृती जागवण्यासाठी चार सप्टेंबर १९२७ या दिवशी नबाब मोहल्ल्यातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. ती महाल भागातून वॉकर रस्त्याकडे जाऊन गांजाखेत मागनि हंसापुरीत जाईल. हा जुलूस निधण्याच्या आधी बारा वाजता सर्वांनी नबाबपुऱ्याच्या मशिदीत जमावे आणि मिरवणुकीत सामील व्हावे. हे केल्याने मिरवणुकीची शान आणि जोष वाढेल, व सर्वांना पुण्यप्राप्ती होईल.” पत्रकाच्या खाली हुसेन शरीफ अशी स्वाक्षरी होती.
करंदीकरांनी पुस्तकात पुढे म्हटले आहे की, `चार सप्टेंबरला आधी ठरल्याप्रमाणे सुमारे शंभरसव्वाशे स्वयंसेवक मोहितेवाड्याच्या भिंतीच्या आड मुकाट्याने गोळा झाले. सर्वांच्या हातांत लाठ्या होत्या. एकूण सोळा तुकड्या पाडण्यात आल्या, आणि त्यांची योग्य त्या ठिकाणी पाठवणी करण्यात आली. सारे सूत्रचालन अण्णाजी सोहनी यांच्याकडे होते. डॉ. मुंजे यांच्या घरापासून महालापर्यंतच्या निरनिराळ्या गल्ल्यांच्या तोंडाशी या तुकड्यांना दबून बसण्यास सांगितले. त्याप्रमाणे ती ती तुकडी आपापल्या नियोजित ठिकाणी गेली. हिंदूंच्या या सावधानतेची मुसलमानांना काहीही कल्पना नव्हती. त्यातच डॉ. हेडगेवार परगावी गेले आहेत हे सर्वत्र प्रसृत झाल्यामुळे मुसलमान अधिक निर्धास्त होते. प्रचंड जमाव गोळा करून ते मिरवणुकीच्या निमित्ताने रस्त्यांवरून चालू लागले आणि “अल्ला हो अकबर” आणि “दीन दीन” अशा घोषणा उठू लागल्या.`
`दुपारी दोन वाजता ठरल्याप्रमाणे मुसलमानांची मिरवणूक निघाली. लाठ्या, भाले, जंबिये, एवढेच नव्हे, तर काही जणांच्या हातात तलवारी होत्या. महाल भागाजवळ येताना मुसलमानांच्या घोषणांचे आवाज वर चढू लागले. “अल्ला हो अकबर” आणि “दीन दीन” हे आवाज दुरून ऐकू येताच घराघरांत गंभीर वातावरण पसरले, पण गल्ल्यागल्ल्यांतून असलेले स्वयंसेवक जणू मिरवणूक जवळ येण्याची वाटच पाहात होते. थोड्याच वेळात सरळ रस्त्याने चाललेल्या मिरवणुकीतील काही लोक आरडाओरडा करीत वाईकरांच्या गल्लीत शिरले. त्या अरुंद गल्लीत शिरलेल्या लोकांवर तात्काळ तेथे तोंडाशी असलेल्या स्वयंसेवकांनी लाठीचे सणसणीत प्रहार केले. चारसहा मुसलमान रक्तबंबाळ होताच ते मागे फिरले. व मिरवणूकही मागे फिरून रस्त्याला लागली. त्यानंतर मुसलमानांनी इतर दहापाच गल्ल्यांतून शिरण्याचा प्रयत्न केला, पण तेथेही सपाटून मार खावा लागला. असा प्रकार घडताच मिरवणुकीतील लोकांची पळापळ झाली, आणि सारा जमाव मिळेल त्या रस्त्याने पसार झाला.` असेही करंदीकरांनी पुस्तकात नमूद केले आहे.
करंदीकर पुढे लिहितात, `महाल भागात हा अनुभव आल्यामुळे मग एकाट्याटुकट्या व्यक्तीला मारहाण करीत मिरवणूक चिटणीस उद्यानाकडे वळली. पण महालात घडलेल्या प्रकाराची वार्ता तेथे पोचली होती आणि त्यामुळे धीर येऊन तेथील हिंदू अंगावरच्या वस्त्रांनिशी घराघरातून बाहेर पडले, आणि त्यांनी मुसलमानांचा काठ्यांनी यथेच्छ समाचार घेतला. संध्याकाळच्या अंधाराच्या वेळी उरलेसुरले सारे मुसलमान भालदारपुऱ्याकडे परत गेले. `
`पुढील तीन दिवस ही झुंबड चालू होती. ठिकठिकाणी हल्ले प्रतिहल्ले झाले. पण सर्वत्र हिंदूंनी कणखरपणाने प्रतिकार केला. एका मुसलमानाने घरातून गोळीबार केला, त्यात धुंडिराज लोहगावकर हा स्वयंसेवक ठार झाला. त्यामुळे प्रक्षुब्ध झालेल्या हिंदूंच्या जमावाने मुसलमानांची काही घरे व एक मशीद आगी लावून भस्मसात केली. इतका प्रकार झाला, आणि मग आरक्षक व सैनिक बंदोबस्तासाठी आले. त्यांच्या आश्रयाने मुसलमान लोकांना नागपूरमधून पळ काढून बायकामुलासह गोंड राजाच्या किल्ल्याचा आश्रय घ्यावा लागला. शंभराच्या संख्येत जखमी झालेले मुसलमान रुग्णालयात पोचले, तर दहापंधरा ठार झाले, चारपाच हिंदूही मृत्यू पावले. ` अशी नोंद पुस्तकात आहे.
दंगलीने संघाला बळ
संघविचाराच्या लेखकाने लिहिलेल्या पुस्तकातील दंगलीचे वर्णन वाचल्यानंतर त्यावेळच्या दंगलीमागे कशा रितीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नियोजन होते, हे लक्षात येते. निश्चितपणे या दंगलीने संघाला बळ मिळाले.
पश्चिम महाराष्ट्रात २००९ साली मिरजमध्ये झालेल्या दंगलीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाने पश्चिम महाराष्ट्रात हातपाय पसरले. आपली मुळे घट्ट केली.
२०२४च्या निवडणुकीच्या आधीही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दंगली झाल्या. त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाने केला.
औरंगजेबाच्या कबरीचा विषय रिलेव्हंट आहे का, या प्रश्नावर रा. स्व. संघाचे सुनील आंबेकर यांनी नाही, असे उत्तर दिल्याचे सगळीकडे प्रसिद्ध झाले आहे.
त्यानंतर टाइम्स ऑफ इंडियाच्या प्रतिनिधीने त्यांना नंतर नीट विचारले असता ते म्हणाले, औरंगजेब हा विषय आज अप्रासंगिक आहे, मात्र त्याच्या कबरीचा मुद्दा अप्रासंगिक झालेला नाही.
कोणताही हिंसाचार देशाच्या आरोग्यासाठी चांगला नाही, असेही त्यांनी म्हटले. मात्र औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा अप्रासंगिक झालेला नसल्याचे त्यांचे वक्तव्य भविष्यातील अनेक शक्यतांचे सूचन करते, हे लक्षात घ्यायला हवे.