मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने केलेल्या घोषणेनुसार, राज्यात ‘सीएनजी’च्या किमती दोन रुपये किलोने वाढल्या आहेत. मुंबईसह राज्यातील इतर ठिकाणी या नवीन किमती लागू करण्यात आल्या आहेत. मुंबईत आधी ‘सीएनजी’ची किमत ७५ रुपये प्रतिकिलो होती. त्यानंतर आता यात दोन रुपयांनी वाढ झाली असून आता सीएनजी ७७ रुपये प्रतिकिलोवर विकले जाणार आहे. ‘सीएनजी’च्या किमती वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला चांगलाच फटका बसणार आहे. ‘सीएनजी’च्या किमती वाढल्याने टॅक्सी, ऑटो रिक्षा चालकांवर चांगलाच परिणाम होणार आहे. टॅक्सी, ऑटो रिक्षा या सीएनजी गॅसवर चालतात. तसेच देशात डिझेलवर चालणाऱ्या वाहनांमध्ये सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांची संख्या जास्त आहे. सीएनजीच्या दरात वाढ झाल्याने वाहनचालकांसह प्रवाशांनाही फटका बसू शकतो. (CNG)
मुंबई
मुंबईः गाईतील तीव्र वाढ नियंत्रित न केल्यास भारतीय अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान होऊ शकते. बँकिंग क्षेत्र नियामक रिझर्व्ह बँकेने नोव्हेंबर महिन्यासाठी जारी केलेल्या बुलेटिनमध्ये या गोष्टी सांगितल्या आहेत. रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, सणासुदीच्या काळात खपातील वाढ आणि कृषी क्षेत्रातील पुनर्प्राप्ती यांनी चालू आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या दुसऱ्या तिमाहीत अर्थव्यवस्थेला आधार दिला आहे आणि मागणीतील मंदीची भरपाई केली आहे; परंतु महागाई दरातील अनियंत्रित वाढ खऱ्या अर्थव्यवस्थेला हानी पोहोचवू शकते.
अर्थव्यवस्थेच्या स्थितीबाबत रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे, की ऑक्टोबर महिन्यात किरकोळ महागाई दरात मोठी झेप घेतली गेली आहे आणि हे सप्टेंबरमध्ये महागाईबाबत रिझर्व्ह बँकेने दिलेल्या इशाऱ्यांचे समर्थन करते. रिझर्व्ह बँकेने बुलेटिनमध्ये म्हटले आहे, की खाद्यपदार्थ आणि खाद्यतेलांच्या किमतीत झपाट्याने वाढ झाल्यामुळे महागाई वाढली आहे. रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, जे लोक घरी काम करतात किंवा घरी स्वयंपाक करतात त्यांच्या वेतनात वाढ झाल्यामुळे लोकांच्या राहणीमानावर खर्चाचा दबाव वाढला आहे.
वस्तू आणि सेवांमध्ये इनपुट खर्च वाढल्यानंतर या वस्तूंच्या विक्रीच्या किमतींवर लक्ष ठेवण्याची गरज रिझर्व्ह बँकेने व्यक्त केली आहे. रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, महागाईमुळे शहरी भागात आधीच उपभोगाची मागणी कमी होत आहे आणि यामुळे कॉर्पोरेटस्च्या कमाई आणि भांडवली खर्चावरही परिणाम झाला आहे. अशा स्थितीत महागाईचा दर कोणत्याही नियंत्रणाशिवाय वाढू दिला, तर उद्योग आणि निर्यातीसह अर्थव्यवस्थेचे नुकसान होईल.
महागाईमुळे शहरी भागात वापर कमी होत असल्याचे रिझर्व्ह बँकेनेही मान्य केले आहे. ‘एफएमसीजी’ कंपन्यांनी जाहीर केलेल्या दुसऱ्या तिमाहीच्या निकालांमध्येही या कंपन्यांनी याचाच पुनरुच्चार केला आहे. ‘एफएमसीजी’ कंपन्यांनी सांगितले, की महागाईमुळे शहरी भागातील ‘एफएमसीजी’ आणि खाद्यपदार्थांच्या मागणीवर परिणाम झाला आहे. ‘नेस्ले’चे ‘सीईओ’ सुरेश नारायण यांनी सांगितले, की ज्यांच्याकडे पैसे आहेत ते खूप खर्च करतात; पण मध्यमवर्गीयांचे हात घट्ट बांधले आहेत. ऑक्टोबर २०२४ मध्ये किरकोळ महागाईचा दर ६.२१ टक्क्यांच्या १४ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे, तर खाद्यान्न महागाईचा दर ११ टक्क्यांच्या जवळपास १०.८७ टक्के होता.
मुंबई; प्रतिनिधी : महाराष्ट्र विधानसभेसाठी बुधवारी संध्याकाळी एक्झिट पोल जाहीर झाले. यातील बहुतेक एक्झिट पोलमध्ये, महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये काँटे की टक्कर होणार असल्याचे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. तथापि, महायुती आणि मविआच्या नेत्यांकडून मात्र विजयाचे दावे-प्रतिदावे केले जात आहेत. किंबहुना, आमचेच सरकार येणार असल्याचा ठाम विश्वासही व्यक्त केला जात आहे.
प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी एक्झिट पोल काहीही सांगत असले तरी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचीच सत्ता येणार असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार येईल. तेही काँग्रेसच्या नेतृत्वात येणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने प्रचारादरम्यान ‘व्होट जिहाद,’ अशी टीका करत होते, मग ब्राह्मणांनी भाजपाला मतदान केले तर आम्ही काय त्याला ब्राह्मणांचा जिहाद म्हणायचे का? असा सवालही पटोलेंनी केला आहे.
दुसरीकडे, महाविकास आघाडीला सत्तास्थापनेसाठी बहुमत मिळेल, असा विश्वास शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. महाविकास आघाडीला १६० ते १६५ जागा निश्चित मिळतील, असे भाकीतही त्यांनी केले. शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांचा पराभव निश्चित होणार असून, आम्ही आणि आमचे सर्व मित्रपक्ष बहुमताचा आकडा पार करणार आहोत, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
ठाकरे गटाचे प्रवक्ते अंबादास दानवे यांनीही असाच विश्वास व्यक्त केला आहे. आम्ही तळागाळातील माणसाशी जोडले गेलो आहोत. त्यामुळे मविआला पूर्ण बहुमत मिळेल. जनतेने विद्यमान सरकारविरोधात उठाव केला आहे. त्यामुळे सर्वेक्षणातून काहीही येवो, आघाडीला पूर्ण बहुमत मिळणारच आणि महायुतीचा सुपडासाफ होणारच असे, दानवे यांनी म्हटले आहे.
महायुतीच्या नेत्यांनीही आमचेच सरकार येणार असल्याचे म्हटले आहे. एक्झिट पोल म्हणतात त्यानुसार महायुतीचेच सरकार येईल. महाराष्ट्रातील एकूण चित्र पाहता महायुतीचेच सरकार येईल, असे स्पष्ट दिसत आहे, असे राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
सामान्य जनतेसाठी महायुतीचे सरकार सत्तेवर यावे, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटले आहे. साईबाबांनी मला प्रत्येक गोष्ट दिली. सामान्य जनतेसाठी आम्ही पुन्हा सत्तेत यावे, अशी भूमिका केसरकर यांनी बोलून दाखवली.
एक्झिट पोल काहीही येवोत, राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार येईल. तेही काँग्रेसच्या नेतृत्वात येणार आहे.
नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष काँग्रेस
महायुतीचेच सरकार येईल. महाराष्ट्रातील एकूण चित्र पाहता महायुतीचेच सरकार येईल, असे स्पष्ट दिसत आहे.
छगन भुजबळ, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस
मुंबई; विशेष प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीचे मतदान सुरु असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांदिवली मतदारसंघात अनधिकृतपणे भेट दिली. शिवसेनेचे उमेदवार दिलीप लांडे यांच्यासाठी रोड शो करून मतदान करण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री शिंदे यांची ही कृती आदर्श आचारसंहितेचा भंग करणारी आहे. शिंदे आणि दिलीप लांडेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तक्रार महाविकास आघाडीचे उमेदवार नसीम खान यांच्या मुख्य पोलिंग एजंट गणेश चव्हाण यांनी निवडणूक अधिकाऱ्याकडे केली आहे. (Naseem Khan)
तक्रारीत असे म्हटले आहे की, निवडणूक आयोगाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार मतदानाच्या दिवसापूर्वी ४८ तास इतर मतदार संघातील उमेदवार किंवा कोणतेही राजकीय नेते यांना स्वतःच्या मतदारसंघाव्यतिरिक्त इतर मतदार संघात प्रवेश करण्यास मनाई आहे. असे असताना मुख्यमंत्री शिंदे यांनी चांदिवलीतील शिवसेनेचे उमेदवार लांडे यांच्यासाठी मतदान सुरु असताना दुपारी ३च्या सुमारास काजुपाडा घास कंपाऊंड ते सेंट ज्युड हायस्कूल भागात रोड शो केला. शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन केले. रोड शो काढलेल्या भागात अनेक मतदान केंद्रे आहेत. हा आचारसंहितेचा उघड भंग आहे. त्यामुळे शिंदे यांच्यावर कारवाई करावी.
मुंबई : प्रतिनिधी : महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदारसंघांसाठी बुधवारी मतदान पार पडले. त्यापाठोपाठ ’एक्झिट पोल’ समोर आले आहेत. त्यांतील निष्कर्षानुसार महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात सत्तास्थापनेसाठी जोरदार चुरस होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. वेगवेगळ्या संस्थांच्या मतचाचणीत वेगवेगळे निष्कर्ष काढले असले, तरी त्यातून एक समान मुद्दा म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडीत जागांचा फारसा फरक राहणार नाही. भाजप हा सर्वांत मोठा पक्ष ठरेल, असे सर्वच संस्थांचे निष्कर्ष असले, तरी भाजपसह सर्वंच पक्षांच्या जागा मागच्या वेळच्या तुलनेत घटणार आहेत. अर्थात मागच्या वेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अविभाजित होते.
‘इलेक्टोरल एज’ यांच्या महाराष्ट्राच्या’एक्झिट पोल’नुसार महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचा अंदाज वर्तवला आहे. भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष असल्याचा अंदाजही यामधून वर्तवण्यात आला आहे. भाजपने सर्वाधिक १४८ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. ‘एक्झिट पोल’च्या अंदाजानुसार, भाजपला ७८ जागा मिळू शकतात. २०१९ च्या तुलनेत भाजपच्या २७ जागा कमी होत असल्याचे दिसते. अंदाजानुसार, राज्यात महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल. महाविकास आघाडीला राज्यात १५० जागांवर यश मिळेल, असा अंदाज वर्तवला. आघाडीत काँग्रेसला ६० जागा मिळतील, असा अंदाज आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ४६ आणि शिवसेना ठाकरे गटाला ४४ जागांवर यश मिळेल, असे या संस्थेच्या अहवालात म्हटले आहे.
‘इलेक्टोरल एज’च्या ’एक्झिट पोल’च्या अंदाजानुसार, भाजपला ७८ जागा मिळतील, तर शिवसेना शिंदे गटाला फक्त २६ जागांवर समाधान मानावे लागले. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त १४ जागा मिळतील, असा अंदाज आहे. अपक्ष आणि इतर पक्षांना राज्यात २० जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भाजपला २४ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे, तर काँग्रेस १७ टक्के मते घेऊ शकते. शिवसेनेला १० आणि ठाकरे गटाला १५ टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला १४, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला फक्त ६ टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे.
‘पोल डायरी’ने जाहीर केलेल्या ‘एक्झिट पोल’मध्ये महाविकास आघाडीला धक्का बसत आहे. या पोलमध्ये महायुतीला १२२ ते १८६ जागा आहे, तर महाविकास आघाडीला ६९ ते १२१ जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ‘पोल डायरी’च्या या ‘एक्झिट पोल’मुळे महाविकास आघाडीचे टेन्शन वाढले आहे. चाणक्य आणि अन्य काही संस्थांनी महायुतीला कौल दिला असला, तरी लोकशाही आणि ‘झी’च्या मतदानोत्तर चाचणीत महाविकास आघाडीला कौल दिला आहे.
मुंबई; विशेष प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीच्या पूर्व रात्री भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी बिटकॉइन प्रकरणात एका कथित माजी आयपीएस अधिकाऱ्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या संभाषणाची कथित ऑडिओ क्लिप जारी करून खळबळ उडवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र पटोले आणि सुळे यांनी हे आरोप फेटाळून लावले. या क्लिपमधील आवाज आपला नसल्याचे जाहीर करीत याप्रकरणी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याची तयारी त्यांनी दर्शवली.
विधानसभा निवडणुकीत पराभव दिसत असल्याने भाजपाकडून आमची बदनामी करण्यासाठी हे कुभांड रचल्याचा आरोपही त्यांनी केला. माध्यमांनी याबाबत योग्य वार्तांकन करावे. विनाकारण बदनामी करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पटोले यांनी दिला आहे.
पटोले म्हणाले की, मतदानाच्या दिवशी माध्यमांना हाताशी धरून बिटकॅाईन प्रकरणी माझ्यावर खोटे आरोप करून काँग्रेस पक्षाची व माझी बदनामी करण्याचा खोडसाळपणा भाजपाने केला आहे. माध्यमांनी या प्रकरणाची व्यवस्थित माहिती घेऊन वार्तांकन केले पाहिजे. दुर्देवाने भाजपच्या इशाऱ्यावर खोडसाळपणे आमची बदनामी करण्याचा प्रयत्न काहीजणांकडून सुरु आहे तो माध्यमांनी तत्काळ थांबवावा अन्यथा खोट्या बातम्या देणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही .
सुप्रिया सुळे यांनीही आपल्यावरील आरोपाचा इन्कार करताना म्हणाल्या की, निवडणुकीत पराभव दिसत असल्याने भाजपाकडून जाणीवपूर्वक बदनामी केली जात आहे. राज्यात आणि देशात त्यांचे सरकार असताना ते या प्रकरणाचा सविस्तर तपास का करत नाहीत?, त्या कथित संभाषणातील आवाज हा माझा नाही. आपण कोणत्याही चौकशीला आपण तयार आहोत. विनोद तावडे पैसे वाटप प्रकरणामुळे भाजपाचा खरा चेहरा समोर आल्याने ते लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी असले प्रकार करत आहेत याचा आरोपी त्यांनी केला.
मुंबई; प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीत मतदान केंद्रावर मोबाईलचा दुरुपयोग होईल, असा दावा निवडणूक आयोगाने केला होता. उच्च न्यायालयाने त्याला मान्यता देताना मतदान केंद्रावर मोबाईल नेण्याची परवानगी नाकारली आहे. तसेच याबाबत आयोगाने काढलेले परिपत्रक योग्यच आहे असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
मतदान केंद्रापासून शंभर मीटर अंतरापर्यंत मोबाईल वापरण्यास निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिक तसेच वयोवृद्ध महिलांना मतदान केंद्रावर नातेवाईकांशी संपर्क साधता येत नाही. त्यामुळे त्यांची गैरसोय होते. तसेच ओळखपत्र व इतर कागदपत्रे मतदान केंद्रावर नेणे अडचणीचे असल्यामुळे ‘डिजी लॉकर’ सेवेचा वापर करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी अॅड. उजाला यादव यांनी याचिकेव्दारे केली होती. याबाबत मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या. अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली. आयोगाच्यावतीने ज्येष्ठ विधीज्ञ आशुतोष कुंभकोनी यांनी युक्तिवाद करताना निवडणुका पारदर्शक, निष्पक्षपणे व सुरळीत पार पाडण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे स्पष्टीकरण दिले. त्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला.
मुंबई : वृत्तसंस्था : ग्लोबल ब्रोकरेज फर्म ‘एचएसबीसी’ने भारताबाबतच्या रणनीतीवर नवीन नोट जारी करताना ओव्हरवेट आउटलुकसह सकारात्मक भूमिका कायम ठेवली आहे. अहवालानुसार, २०२५ च्या अखेरीस सेन्सेक्स ९० हजार ५२० पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्याच्या पातळीपेक्षा सुमारे १५ टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते.
‘एचएसबीसी’ने यापूर्वी १,००,०८० हे लक्ष्य ठेवले होते. भारताचा आर्थिक विकास जरी थोडा मंदावला असला, तरी तो अजूनही मजबूत स्थितीत आहे. तथापि, इक्विटी मार्केटमध्ये काही आव्हाने आणि जोखीम कायम आहेत. मिडकॅप-स्मॉलकॅप किंवा लार्जकॅप ब्रोकरेज फर्मने सांगितले, की भारताची स्थिर वाढ असूनही, अधिक स्मॉलकॅप आणि मिडकॅप समभागांमध्ये प्रति शेअर सर्वाधिक कमाई (ईपीएस) वाढ दिसून येत आहे. व्यापक बाजारपेठेतील या कंपन्यांमध्ये ३० टक्के दराने वाढ अपेक्षित आहे. याउलट, लार्ज कॅप स्टॉकसाठी हा वाढीचा दर १२ टक्के असण्याचा अंदाज आहे. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांना लार्ज कॅप समभागांमध्ये सर्वाधिक रस आहे, ज्यांची वाढ आता मंद होत आहे.
‘ब्रोकरेज फर्म’च्या विश्लेषकांचा असा विश्वास आहे, की मंदी असूनही, भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. या नोटमध्ये २०२५ साठी आशियातील सर्वाधिक पसंतीच्या स्टॉकची यादीही प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत फक्त दोन भारतीय समभाग ॲक्सिस बँक आणि किम्स समाविष्ट आहेत. नोटमध्ये म्हटले आहे, की ‘किम्स’ला कॅपेक्स अपसायकल आणि भारतातील आरोग्य सेवांमध्ये वाढती मागणी यांचा फायदा होण्याची अपेक्षा आहे. ॲक्सिस बँकेचे मूल्यांकन आकर्षक दिसते. कंपनी देशाच्या आर्थिक क्षेत्रात गुंतवणुकीसाठी एक मजबूत पर्याय म्हणून उदयास येत आहे.
जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असूनही, भारतीय बाजारपेठेबाबत काही धोके आहेत. नोटमध्ये म्हटले आहे, की उच्च कमाई मल्टिपल धोका असल्याचे सिद्ध होऊ शकते. कमाईच्या वाढीवर आणखी दबाव असल्यास, गुंतवणूकदार त्यांच्या स्थितीचे पुनर्मूल्यांकन करतील. अल्पावधीत इक्विटी मार्केटशी संबंधित जोखीम बाजाराच्या कामगिरीवर परिणाम करू शकतात; परंतु दीर्घकालीन दृष्टिकोन सकारात्मक राहतो.
मुंबई : जमीर काझी : विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असताना भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे हे विरारमधील हॉटेल विवांतामध्ये लाखोंच्या रोकडीसह सापडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलला घेराव घालून, तर सुमारे चार तास तावडे व नालासोपारा विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार राजन नाईक यांना कोंडून ठेवत हॉटेलला घेराव घातला. त्यांच्याजवळील बॅगेतून कोट्यवधीची रोकड मिळाली आहे. पैशाचा हिशेब असलेली डायरी सापडली आहे. या प्रकरणाने संतप्त झालेल्या बविआ कार्यकर्ते व भाजपाचे समर्थक यांच्यात जोरात राडेबाजी झाली. तुळीज पोलिसांनी याबाबत तावडे आणि भाजपा उमेदवार नाईक यांच्याविरोधात आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तावडे हे पाच कोटी रुपये घेऊन वाटण्यासाठी आले होते, अशी माहिती आपल्याला भाजपाच्या एका नेत्याकडून मिळाली होती. त्यानुसार कार्यकर्त्यांनी तेथे धाव घेत त्यांना पकडले असल्याचा आरोप बविआचे प्रमुख आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केला.
तावडेंच्या ‘विरार कॅश’ प्रकरणाने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून, या प्रकरणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपा व महायुतीवर कडाडून टीका केली आहे. सोशल मीडियावरून त्याबाबत व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. सर्वस्तरांतून भाजपवर टीकेची झोड उठली आहे. राजकीय नेत्यांनी मतदानाच्या ४८ तासांपूर्वी मतदारसंघ सोडणे अपेक्षित असते, मात्र तरीही विनोद तावडे मतदारसंघात काय करीत होते, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
नालासोपारा मतदारसंघात ‘बविआ’चे आमदार क्षितीज ठाकूर आणि भाजपाचे उमेदवार राजन नाईक यांच्यात लढत होत आहे. मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास क्षितीज ठाकूर आणि त्यांचे कार्यकर्ते विवांता हॉटेलमध्ये पोहोचले. त्यावेळी तेथे भाजपाचे महासचिव विनोद तावडे, नालासोपाराचे उमेदवार राजन नाईक आणि अन्य पदाधिकारी बसले होते. बविआच्या समर्थकाने हॉटेलमध्ये शिरून त्यांच्या बॅगा तपासल्या. त्यामध्ये लिफाफ्यामध्ये रोकड होती. तसेच त्यांच्याकडील बॅगेतील डायऱ्याही ताब्यात घेतल्या. त्यामध्ये व्यक्तींची नावे आणि आकडे असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे हॉटेलमध्ये एकच गोंधळ उडाला.
दोन हजार कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
कार्यकर्त्यांनी तावडे यांना घेराव घालत हे पैसे कुठून आले, अशी विचारणा केली. पोलिसांनी या प्रकरणात तातडीने कारवाई करावी, अशी घोषणाबाजीही सुरू केली. या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. हॉटेलबाहेर सुमारे २ हजारावर कार्यकर्त्यांचा जमाव होता. भाजपा आणि तावडेंविरोधात जमावाने जोरदार घोषणाबाजी सुरू ठेवली. त्यामुळे तावडे यांना बाहेर पडणे अशक्य होते. ते तेथेच बसून राहिले. आमदार क्षितीज ठाकूर त्यांना डायरी दाखवत त्याबाबत जाब विचारू लागले. यावेळी हॉटेलमध्ये पैसे घेण्यासाठी काही महिलाही आल्या होत्या. त्या वरच्या मजल्यावर थांबून राहिल्या.
नऊ लाखांची रोकड सापडली
कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे निवडणूक आयोगाचे पथक तेथे पोहोचले. त्यांनी हॉटेलची झडती सुरू केली. त्यामध्ये ४०९ क्रमांकाच्या रूममध्ये नऊ लाख ९३ हजार रुपयांची रोकड सापडली. कार्यकर्त्यांनी हॉटेलच्या सर्व खोल्यांची तपासणी करून पंचनामा करण्याची मागणी केली. थोड्या वेळात ‘बविआ’चे प्रमुख हितेंद्र ठाकूरही हॉटेलमध्ये पोहोचले. तावडे यांच्यासमवेत त्यांनी घडलेला प्रकार पत्रकारांना सांगितला. त्यानंतर पोलिसांच्या बंदोबस्तात तावडे हे ठाकूर यांच्या गाडीत बसून निघून गेले. यावेळी कार्यकर्त्यांनी भाजपविरोधात घोषणा दिल्या.
भाजपच्या नेत्याकडून टीप : हितेंद्र ठाकूर
हॉटेल विवांता येथे विनोद तावडे हे पाच कोटी रुपये घेऊन आले असल्याची माहिती मला भाजपाच्या एका नेत्यानेच दिली होती. कार्यकर्त्यांच्या गराड्यात सापडल्यानंतर विनोद तावडे यांनी मला २५ वेळा फोन करून माझी चूक झाली, मला सोडवा, अशी विनंती केली होती. मात्र मी याबाबत निवडणूक आयोग आणि पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी यासाठी ठाम आहे, असे ‘बविआ’चे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
ते म्हणाले, ‘विनोद तावडे यांनी रात्रीतून अनेक कार्यकर्त्यांना पैसे वाटले. त्यानंतर उरलेल्या कार्यकर्त्यांना पैसे वाटण्यासाठी आज विवांतामध्ये बैठक घेण्यात आली होती. त्यांच्याजवळ सापडलेल्या डायरीमध्ये कुणाला किती रक्कम दिली याची आकडेवारी देण्यात आली आहे. तसेच हॉटेलमध्ये पैसे घेण्यासाठी काही महिला आल्या होत्या, असे सांगून त्यांनी कार्यकर्त्यांनी मोबाईलमध्ये घेतलेले व्हिडिओ दाखवले. त्यामध्ये काळ्या रंगाची बॅगही दिसून येत आहे. याशिवाय एक डायरीही दिसते.
कार्यकर्त्यांना मार्गदर्शनासाठी आलो होतो : तावडे
दरम्यान, मतदानादिवशी कशा पद्धतीने कार्यकर्त्यांनी काम करावे, हे सांगण्यासाठी कार्यकर्त्यांची बैठक घेण्यासाठी येथे आलो होतो, मात्र मी पैसे वाटण्यासाठी आलो असल्याचा क्षितीज ठाकूर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा समज झाला. निवडणूक आयोगाने हॉटेलमधील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासावे आणि योग्य ती कारवाई करावी, असे विनोद तावडे या प्रकरणावर म्हणाले.
वसई : प्रतिनिधी : भाजपचे राष्ट्रीय सचिव वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. विरारच्या एका हॉटेलमध्ये निवडणुकीसाठी पैसे वाटत असल्याचा आरोप त्यांच्यावर बहुजन विकास आघाडीचया कार्यर्त्यांनी केला. यामुळे हॉटेल परिसरात बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. भाजप आणि बविआ कार्यकर्ते आपापसात भिडले असून पोलिसांनी हॉटेल सिल केले आहे. आमदार क्षितीज ठाकूर ही घटनास्थळी होते. यामुळे तणाव वाढला. बविआच्या कार्यकर्त्यांनी तावडे यांना घेरून त्यांच्यावर पैशांची पाकिटे रिकामी केली.
हॉटेलमधून भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे महिलांना वाटर करत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला. या माहिती सगळीकडे पसरताच दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते हॉटेलमध्ये जमू लागले. बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते थेट हॉटेलमध्ये शिरले. यानंतर आमदार क्षितीज ठाकूर देखील हॉटेलमध्ये दाखल झाले. तिथे येऊन त्यांनी हॉटेलमध्ये सापडलेली पैशाची पाकिटे दाखवली. यामुळे भाजप आणि बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. हॉटेल परिसरात तणाव निर्माण झाल्यामुळे पोलिस हॉटेलमध्ये पोहोचले. आणि अधिक कुमक मागवली. या घटनेमुळे पोलिसांनी हॉटेल सिल केले आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली आहे.
बविआ कार्यकर्त्यांनी तावडेंवर पैसे उधळले
हॉटेलमध्ये शिरलेल्या बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विनोड तावडे यांना घेरले. तिथे सापडलेली पैशाची पाकिटे घेवून त्यातील पैसे विनोड तावडे यांच्या अंगावर उधळले. विनोड तावडे यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. हॉटेलमध्ये उपस्थित कार्यकर्त्यांना मतदानाचे नियम मी सांगत होते. आणि मी आयुष्यात कधी पैसे वाटलेले नाहीत असे विनोड तावडे म्हणाले.
पोलीस आणि निवडणूक आयोगाने चौकशी करावी- विनोद तावडे
या प्ररकणावर बोलताना विनोज तावडे म्हणाले की, घडलेल्या सगळ्या प्रकरणाची पोलिस आणि निवडूक आयोगाने चौकशी करावी. बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांना कोणीतरू चुकीची माहिती दिली आहे. हॉटेलमध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आलो होतो.
पुढे ते म्हणाले की, मतदाना दिवशी आचारसंहिता, मतदान यंत्रे कशी सील केली जातात. आक्षेप नोंदवायचा असेल तर काय करावे?. अशा असे मार्गदर्शन करण्यासाठी मी तिथे गेलो होते. परंतु, बहुजन आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर आणि आमदार क्षीतिज ठाकूर यांचा असा गैरसमज झाला की, आम्ही पैसे वाटप करत आहे. या प्रकरणाची पोलिस आणि निवडणूक आयोगाला चौकशी करू द्या. हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज त्यांना मिळू देत. मी गेल्या ४० वर्षांपासून राजकारणात आहे. हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर मला चांगले ओळखतात. सगळा पक्ष मला ओळखतो. पण, तरीही निवडणूक
आयोगाने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी
याबद्दल निवडणूक आयोग आणि पोलिस यांना चौकशी करू द्या. त्यांना सीसीटीव्ही फुटेज मिळू द्या. मी ४० वर्षांपासून पक्षात आहे. अप्पा ठाकूर आणि क्षितिज मला चांगले ओळखतात. संपूर्ण पक्ष मला ओळखतो. तरीही माझा विश्वास आहे की निवडणूक आयोगाने याची निष्पक्ष चौकशी करावी.”