मुंबई : प्रतिनिधी : औरंगजेब एक उत्तम प्रशासक होता. सध्या औरंगजेबाची देशात चुकीच्या पद्धतीने प्रतिमा रंगवली जात आहे, असे मत समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी व्यक्त केले. त्यांच्या विधानाचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगलाच समाचार घेतला. शिंदे यांनी ‘औरंग्या’ अशा शब्दात उल्लेख करत आझमी यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे आणि भाजपचे आमदार राम कदम यांनीही आझमी यांच्या विधानावर जोरदार टीका केली. (Abu azmi)
आमदार अबू आझमी औरंगजेबाचे कौतुक करताना म्हणाले, औरंगजेबाच्या काळात भारताची सीमा अफगाणिस्तान आणि ब्रह्मदेशापर्यंत होती. त्यावेळी आपला जीडीपी २४ टक्के होता. भारत देशाची ओळख त्यावेळी ‘सोने की चिडिया’ अशी होती. मग त्या औरंगजेबाला वाईट म्हणू का? असा प्रश्न आझमींनी केला. औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना अतिशय वेदना देऊन मारले त्याचे काय?, असा प्रश्न आझमींना केला असता त्यावर ती राजकीय लढाई होती, असे उत्तर देऊन आझमी निघून गेले. (Abu azmi)
आझमींच्या विरोधाचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, “छावा चित्रपट पाहून अंगावर शहारे येतात. इतिहास आपल्याला माहीत आहे. औरंग्याने ४० दिवस छत्रपती संभाजी महाराजांचे हाल केले, त्यांचे हाल हाल केले. त्यांचे डोळे काढले, नखे काढली, जीभ छाटली, चामडी सोलून काढली, असे अत्याचार करणाऱ्या औरंग्याला चांगला प्रशासक म्हणणे हे अत्यंत दुर्दैवी आहे.” (Abu azmi)
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी औरंग्याने हिंदूची मंदिरे तोडली. गरीबांना लुटले, आयाबहिणींवर अत्याचार केले. धर्म परिवर्तन करायला भाग पाडले. असा माणूस चांगला प्रशासक कसा असू शकतो. त्याला चांगला प्रशासक म्हणणाऱ्या अबू आझमींनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. देशभक्त संभाजी महाराजांचा त्यांनी अपमान केला आहे. या राज्यात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान या राज्यात कोणीही सहन करणार नाही. अबू आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणीही शिंदे यांनी केली. (Abu azmi)
हेही वाचा :
‘महाराष्ट्र मे दो गुंडे, कोकाटे और मुंडे …!