मुंबई : विशेष प्रतिनिधी : ठाणे जिल्ह्यातील १४१-उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातील भरारी पथक क्र.३ व ६ मधील खंडणीखोर तिघा पोलिसांसह सहा कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उल्हासनगर महापालिकेचे कर्मचारी लिपिक, संकेत चनपूर, संदीप शिरसवाल व मुकादम, अण्णासाहेब बोरूडे पोलीस हवालदार, विश्वनाथ ठाकूर, कॉन्स्टेबल राजरत्न बुकटे अशी त्यांची नावे आहेत. निवडणूक कामात कर्तव्यात कसूर केल्याने निवडणूक निर्णय अधिकारी विजयानंद शर्मा यांच्याद्वारे रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
बबन आमले, रा.भांडूप (पश्चिम) हे १८ ऑक्टोबरला रोजी पहाटेच्या सुमारास म्हारळ नाका, उल्हासनगर नं.१ या ठिकाणाहून त्यांचे मित्र नितीन शिंदे यांच्यासह त्यांच्या कारमधून फूल उत्पादक शेतकऱ्यांकडील फुले विक्री करून त्या मालाचे पैसे त्यांना घरपोच देण्यासाठी रोख स्वरूपात रक्कम ७.५० लाख घेऊन जात होते. त्यावेळी भरारी पथकाचे प्रमुख संदीप शिरसवाल व संकेत चनपूर यांनी आमले यांच्याकडील पैशाबाबत ‘तुमच्यावर गुन्हा दाखल होईल, पैसे जप्त करून ते परत मिळणार नाही,’अशी भिती घातली. या रक्कमेपैकी ८५ हजार काढून घेतले होते. त्यानंतर संबंधित व्यक्तीने पोलीस उप-आयुक्त यांच्याकडे १९ ऑक्टोबरला तक्रार केली होती.
या घटनेचे गांभीर्य पाहता याबाबत पोलीस विभागाने अधिक तपास करून संपूर्ण घटनेचा अहवाल विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विजयानंद शर्मा यांच्याकडे सादर केला. पोलीस उपआयुक्तानी याबाबत तपास करून व संबंधितांचे जाबजबाब नोंदवून घेऊन निवडणूक निर्णय अधिकारी शर्मा यांना प्रथम अहवाल सादर केला होता. त्यानुसार संबंधित कर्मचाऱ्यांवर तत्काळ प्रशासकीय कारवाईसाठी संबंधित विभागांना अहवाल पाठविला. त्यानुसार संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात आली.