अमेरिकेच्या “मॅडनेस”मध्ये एक ऐतिहासिक सातत्य आहे. डोनाल्ड ट्रम्प त्याचीच पुढची पायरी आहेत. गेल्या ८० वर्षात अमेरिकेने जगाला फरफटत नेले. “मी म्हणेन ती पूर्व दिशा” म्हणत जगाला फरफटत नेणारा जगाच्या पाठीवर एकमेव देश म्हणजे अमेरिका! आणि डोनाल्ड ट्रम्प त्याच अमेरिकेचे प्रमुख आहेत. (Trump Tariff War)
– संजीव चांदोरकर
- १९४४
- दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक आर्थिक आणि वित्त क्षेत्राला आकार देण्यासाठी अमेरिकेने ब्रेटन वूड्स आंतरराष्ट्रीय परिषदेत आपले सारे वजन वापरले. आपल्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देऊन अमेरिकेने हे केले. डॉलर हे चलन सोन्याशी निगडीत केले. इतर देशांच्या चलनांचे विनिमय दर डॉलरशी निगडित केले. त्यामुळे सर्व देशांना आपली आय आर निर्यात डॉलर मुद्दे करण्यास भाग पडले. डॉलर जगाची रिझर्व्ह करन्सी बनू लागली. (Trump Tariff War)
- १९७१
- राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी ब्रिटन गुड्स मध्ये चलनाचे विनिमय दर कसे ठरवायचे याबाबत झालेला आंतरराष्ट्रीय करार एकतर्फी रद्द केला. सर्व राष्ट्रांचे विनिमय दर आता फ्री फ्लोटिंग झाले. सर्वच जगात अनिश्चितता तयार झाली. त्याला प्रतिक्रिया देत खनिज तेल उत्पादन करणाऱ्या राष्ट्रांच्या संघटनेने खनिज तेलाचे भाव काही पटींनी वाढवले. सर्व राष्ट्रांमध्ये परकीय चलनाचे अरिष्ट तयार झाले.
- १९९५
- जनरल एग्रीमेंट ऑन ट्रेड अँड टेरिफ (GATT) या संस्थेचे डायरेक्टर ऑर्थर डंकेल यांनी जागतिक व्यापार संघटना अर्थात वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला. त्यात अमेरिकेचा पुढाकार होता. १९९५ मध्ये WTO स्थापन देखील झाली. देशांतर्गत पेटंट कायद्यात बदल, देशांचे अर्थसंकल्प कसे बनवायचे, देशांच्या सरकारांनी देशांतर्गत सबसिडी किती आणि कोणाला द्यायची या संबंधात दडपण आणले गेले. जागतिक व्यापाराची, देशांतर्गत अर्थव्यवस्थेची घडी पार बदलली. (Trump Tariff War)
- २००८
- अमेरिकेतील मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी, घरबांधणी क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी , कमी व्याजदर आकारून, गृह कर्जाचा अक्षरशः महापूर आणला गेला. ज्यांना गृहकर्ज फेडता येणे अशक्य होते अशा गरीब, सब प्राईम नागरिकांना गृहकर्ज वाटली गेली. ती कर्जे सिक्युरिटायझेशन सारख्या वेगवेगळ्या मार्गाने स्टॉक मार्केटवर ट्रेड होऊ लागली. जगभरातून वित्त भांडवल त्यात ओतले जाऊ लागले. आणि अपेक्षेप्रमाणे गृह कर्जाच्या या लाखो गरीब ग्राहकांची कर्जे थकित होऊ लागली. मार्केट कोसळले. हे गृह कर्ज मार्केट आणि त्यात गुंतवले गेलेले जागतिक भांडवलात एवढे मोठे होते, की त्यातून जागतिक वित्त क्षेत्र, बँकिंग आणि एकूणच जागतिक अर्थव्यवस्था दरीत कोसळण्याची शक्यता तयार झाली. (Trump Tariff War)
- २०२५
- डोनाल्ड ट्रम्प यांचा दुसरा राष्ट्राध्यक्ष पदाचा कार्यकाळ सुरू झाला. अमेरिकेच्या शत्रु राष्ट्रांनाच नाही तर अनेक दशकांच्या मित्र राष्ट्रांना देखील त्यांनी आयात करांचा बडगा उगारला आहे. अमेरिका प्रणित जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत, गेल्या अनेक दशकात अनेक उद्योगांसाठी ग्लोबल व्हॅल्यू चेन तयार झाल्या आहेत. त्यातून अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेच्या पेडी एकमेकात गुरफटल्या आहेत. आंतरराष्ट्रीय उत्पादनाचे हे मॉडेलच मुळात आयात निर्यातीवर अवलंबून आहे. ते ट्रम्प यांच्या अमेरिकेमुळे कोलमडून पडणार आहे. आयात कर लादून, अनेक देशांवर दडपण आणून त्यांच्याकडून अमेरिकेसाठी अनेक सवलती पदरात पाडून घेतल्या जाणार आहेत. खनिजे, खाणीवर अधिकार, लष्करी साधनसामुग्री खरेदी करण्यास भाग पाडणे, राजनैतिक गटात येण्यास भाग पाडणे इत्यादी. आयात कर तर फक्त फ्रंट आहे. (Trump Tariff War)
- डोनाल्ड ट्रंप जे काही करत आहेत ते समजून घेण्यासाठी ही ऐतिहासिक शृंखला उपयोगी पडेल.
- शेवटचे :
इथे अमेरिका या नावाचा कोणी व्हिलन नाही. इथे अमेरिका म्हणजे अमेरिकेतील शासक वर्ग. औद्योगिक, वित्त भांडवल आणि संरक्षण साहित्य उद्योग. अमेरिकन नागरिक, तेथील संस्कृती, तेथील अकादेमिक विश्व वेगळे आहेत. नाहीतर अंगावर यायला लागतील. तुम्ही अमेरिकेला कशाला जाता. तुम्ही अमेरिकन फेसबुक, ट्विटर कशाला वापरता. या शाळकरी लोकांकडे दुर्लक्ष करा.
हेही वाचा :
तामिळनाडूच्या राज्यपालांची कृती ‘बेकायदा’ आणि चुकीची
शेअर बाजार वधारला