महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : बरेली (यूपी) येथील एका महिलेच्या पोटाची शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी तब्बल दोन किलो केस काढले. संबंधित महिला अतिदुर्मिळ अशा ‘Trichophagiaने ग्रस्त होती. हा एक अतिदुर्मिळ मानसिक आजार आहे. त्यात रुग्णाला केस चघळण्याची सवय जडते. करगैणा येथील या महिलेला वयाच्या पाचव्या वर्षांपासून स्वत:चेच केस चघळण्याची सवय जडली. गेली १६ वर्षे हा प्रकार सुरू होता. केस पोटात गेले आणि ते पोटाच्या पोकळीत साचून राहिले. आतड्याच्या काही भागांतही हे केस साचले होते. त्यामुळे तिला नीट जेवण जात नसे. सतत उलट्या होत असत. नातेवाईकांनी तिला रूग्णालयात दाखल केले. २० सप्टेबरला सिटी स्कॅन केले असता पोटात मोठ्या प्रमाणात केस साचल्याचे आढळले. त्यानंतर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून ते केस काढण्याचा निर्णय घेतला. २६ सप्टेबरला तिच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. (Health News)
देश-विदेश
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांच्या तेहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) या पक्षाच्या वतीने सरकार विरोधात निदर्शने केली जात आहेत. सलग दोन दिवस आंदोलन सुरू असल्याने इस्लामबाद मध्ये तणावाचे वातावरण आहे. निदर्शने व अशांततेच्या परिस्थितीमुळे रावळपिंडी व इस्लामाबाद मध्ये काही ठिकाणी मोबाईल फोन ची सेवा बंद करण्यात आली आहे. दरम्यान,जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या कांड्या फोडल्या आहेत. (Imran Khan)
माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा आदेश येई पर्यंत आंदोलन सुरू राहील तसेच खैबर पख्तुनख्वाचे मुख्यमंत्री अली अमीन गंडापूर यांना अटक केल्यास पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम स्वाती आंदोलनाचे नेतृत्व करतील, असेही तेहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाने स्पष्ट केले आहे.
आंदोलन सुरूच राहील
माजी पंतप्रधान इम्रान खान यांना पाकिस्तान सरकारने विविध आरोपांखाली ५ ऑगस्ट २०२३ रोजी अटक केली होती. काही प्रकरणांमध्ये न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले आहे. सध्या ते रावळपिंडी येथील आदिलाला कारागृहात आहेत. इम्रान खान यांच्या सुटकेच्या मागणीसह न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य आणि वाढत्या महागाईचा निषेध करणे यासाठी हे शनिवारपासून सरकारविरोधातील आंदोलन सुरु झाले आहे. (Imran Khan)
हेही वाचा :
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क :
नवी दिल्ली : हरियाणा विधानसभेसाठी शनिवारी चुरशीने ६५ टक्के मतदान झाले. त्यानंतर लगेचच एक्झिट पोलचे (मतदानोत्तर चाचण्या) अंदाज जाहीर करण्यात आले. त्यानुसार हरियाणामध्ये काँग्रेस तर जम्मू-काश्मिरमध्ये काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्स आघाडी सर्वांधिक जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हरियाणा विधानसभेत काँग्रेस पूर्ण बहुमताने सत्तेवर येईल, असा निष्कर्ष बहुतेक सर्व सर्वेक्षणांत व्यक्त करण्यात आला आहे. या दोन्ही ठिकाणची मतमोजणी ८ ऑक्टोबरला होणार आहे. (Elections)
हरियाणात ९० जागांसाठी १०३१ उमेदवार आपले नशिब आजमावत आहेत. त्यांमध्ये १०१ महिला उमेदवार आहेत. येथे काँग्रेस, भाजपसह राष्ट्रीय लोकदल आणि जननायक जनता पार्टी हे प्रमुख पक्ष रिंगणात होते.
जम्मू-काश्मिर विधानसभेच्या ९० जागांसाठी तीन टप्प्यांत मतदान झाले. येथील एक्झिट पोलनुसार, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही, असे दिसते. तथापि, काँग्रेस नॅशनल कॉन्फरन्सला सर्वाधिक जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
भाजपचे हॅट्ट्रिकचे स्वप्न धुळीला…
हरियाणात ९० जागांसाठी अत्युंत चुरशीने झालेल्या बहुचर्चित निवडणुकीत हॅट्ट्रिक साधण्याच्या भाजपच्या आशा धुळीस मिळाल्या आहेत. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीतील सलग दोन विजयानंतर यंदा तिसरा विजय संपादन करून हॅट्ट्रिक साधू, अशी आशा बाळगून भाजप निवडणूक रिंगणात उतरला होता. निवडणुकीपूर्वी तेथे राज्यातील नेतृत्वही बदलण्यात आले. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याऐवजी नायबसिंग सैनी यांच्याकडे मुख्यमंत्रिपद सोपवण्यात आले. तथापि, नेतृत्वबदलाच्या या प्रयोगाचा निकालावर अनुकूल परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे दहा वर्षे सत्तेपासून दूर असलेल्या काँग्रेसचे सत्तेकडे पुनरागमन होत असताना मुख्यमंत्रिपदासाठी भूपिंदर सिंग हुडा हे प्रबळ दावेदार मानले जातात. (Elections)
जम्मू-काश्मिरमध्ये मतदारांचा उत्साह
दरम्यान, जम्मू-काश्मिरची यावेळची निवडणूक अनेक अर्थाने ऐतिहासिक मानली जात आहे. २०१९ मध्ये दुसऱ्यांदा सत्तेवर आल्यानंतर केंद्रातील भाजप सरकारने कलम ३७० हटवले आणि जम्मू-काश्मिर आणि लडाख असे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश केले. त्यानंतर झालेली ही निवडणूक मतदारांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे उल्लेखनीय ठरली आहे. जम्मू विभागातील उधमपूर, कठुआ आणि सांबा येथे ७० टक्क्यांहून अधिक मतदानाचा विक्रम नोंदला गेला. आज शेवटच्या टप्प्यात उधमपूर येथे ७६.०९ टक्के मतदान झाले. काश्मिर खोऱ्यातील बारामुल्ला, सोपोर यांसारख्या विभाजदनवाद्यांचे पूर्वापार वर्चस्व असलेल्या मतदारसंघांतही आधीच्या निवडणुकीच्या तुलनेत मतदारांचा लक्षणीय सहभाग दिसून आला.
विविध सर्वेक्षणानुसार, हरियाणाचे अंदाज
एक्झिट पोल – काँग्रेस – भाजप- जेजेपी – राष्ट्रीय – लोकदल इतर
इंडिया टुडे-सी व्होटर — ५०ते५८, २०ते२८, — ,– १०ते१६
दैनिक भास्कर — ४४ते५४, १९ते२९, ०ते१, १ते५, ४ते९
रिपब्लिक मॅट्रिज — ५५ते६२, १८ते२४, ०ते३, ३ते६, २ते५
पीपल्स पल्स — ५५, २६, ०ते१ ,२ते३, ३ते५
विविध सर्वेक्षणानुसार, जम्मू-काश्मिरचे अंदाज
एक्झिट पोल – काँग्रेस – भाजप – नॅ. काँ. +काँग्रेस – पीडीपी इतर
इंडिया टुडे- सी व्होटर — २७ ते ३२, ४०ते४८, ६-१२, ६-११
दैनिक भास्कर — २०ते२५, ३५ते४०, ४ते७, १२ते१६
पीपल्स पल्स — २३ते२७, ४६ते५०, ७ते११, ४ते५
गुलिस्ताँ न्यूज — २८ते३०, ३१ते३६, ५ते७, ८ते१६
एक्झिट पोल म्हणजे काय?
एक्झिट पोल अर्थांत मतदानोत्तर चाचणी प्रत्यक्ष निवडणुकीदरम्यान केली जाते. सर्व टप्प्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याचे निष्कर्ष जाहीर केले जातात. एक्झिट पोल घेणाऱ्या यंत्रणांचे प्रतिनिधी मतदान करून मतदान केंद्राबाहेर आलेल्या मतदारांना प्रश्न विचारून त्यांचा कल जाणून घेतात. मतदारांनी दिलेल्या उत्तरावर आधारित निष्कर्ष आणि अनुमान काढले जाते.
कोल्हापूर; प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ज्या विचारधारेने विरोध केला होता त्याच विचारधारेविरोधात काँग्रेस पक्ष लढत आहे. याच विचारधारेने राम मंदिर, संसद भवन उद्घाटनाला आदिवासी राष्ट्रपतींना आमंत्रित केले नाही. देशात ही विचारधारा हजारो वर्षे सुरू असून, तिच्यात काहीही फरक पडलेला नाही. त्यामुळे ही राजकीय लढाई नसून विचारधारेची लढाई आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी यांनी शनिवारी येथे केले. (Rahul Gandhi)
कसबा बावडा येथील भगवा चौकात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण राहुल गांधी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांची प्रमुख उपस्थिती होती.
सर्वसामान्य रयत सुखी व्हावी यासाठी छत्रपती शिवाजी महाराज लढले. शिवाजी महाराजांची विचारधारा आणि संविधानाची भूमिका एकच आहे. हा देश सर्वांचा आहे, कुणावरही अन्याय करायचा नाही, सर्वांना सोबत घेऊन जायचे, अशी शिकवण त्यांनी दिली. शिवाजी महाराजांचे विचार म्हणजे २१ व्या शतकातील हे संविधान आहे. शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज नसते तर संविधान निर्माण झाले नसते, असे सांगत खासदार राहुल गांधी यांनी संविधानाची प्रत उंचावून दाखविली. यावेळी उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवत त्यांना भरभरुन दाद दिली.
सध्या देशात दोन विचारधारांची लढाई सुरू आहे. संविधानातून समता, एकता निर्माण करणे ही एक विचारधारा आहे. दुसरीकडे संविधान बदलण्याबाबतची विचारधारा आहे. दुसरी विचारधारा देशातील संस्था संपवत आहेत. लोकांना घाबरवत आहेत, धमकावत आहेत, असे सांगून राहुल गांधी म्हणाले, ही मंडळी शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक होतात, पण कृती नेमकी शिवाजी महाराजांच्या विचारांविरोधात करतात. त्यांना तुम्ही विचारा, शिवाजी महाराजांना नमस्कार करता तर मग शिवाजी महाराजांच्या विचारातून प्रेरित झालेल्या संविधानाला वाचवता का? गरिबांचे सरंक्षण करता का? (Rahul Gandhi)
काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी महाराजांची विचारधारा जपण्याचे आणि संविधान वाचवण्याचे काम करायचे आहे. तुम्ही हे करणे म्हणजे शिवाजी महाराज यांचे विचार जपणे आहे, असे आवाहन राहुल गांधी यांनी केले. शिवाजी महाराज यांची विचारधारा महाराष्ट्राच्या या भूमीतून आली. मी ज्या ज्यावेळी महाराष्ट्रात येतो तेव्हा मला तुमच्यात सतत शिवाजी महाराजांचा विचार दिसतो. शिवाजी महाराजांच्या विचाराचे रक्षण करणे म्हणजेच संविधानाचे रक्षण करणे होय, असे सांगून भाषणाच्या प्रारंभीच राहुल गांधी यांनी काल (शुक्रवारी) संध्याकाळी विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने कार्यक्रमासाठी येऊ शकलो नाही, असे स्पष्ट करत सर्वांची माफी मागितली.
काँग्रेसचे विधिमंडळातील नेते आमदार सतेज पाटील म्हणाले, कसबा बावडा ही राजर्षी शाहूंची जन्मभूमी आहे. याच भूमीत ज्यांनी भारत जोडो यात्रा काढून सर्वसामान्य माणसाला बळ दिले त्या राहुल गांधी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होत आहे, याचा मनस्वी आनंद होत आहे. आगामी काळात तुम्हाला पाहिजे असलेले, तुमच्या विचारांचे, सर्वांना न्याय देणारे सरकार आणू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विधानसभेतील विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार, माजी आमदार उल्हास पवार यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार रजनीताई पाटील, प्रणिती शिंदे, आमदार विश्वजीत कदम, भाई जगताप, नसीम खान, ऋतुराज पाटील, राजूबाबा आवळे, जयंत आसगांवकर, जयश्री जाधव, डॉ. डी.वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी पाटील, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, मधुरिमाराजे छत्रपती, आदींची प्रमुख उपस्थिती होती. (Rahul Gandhi)
डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, आमदार ऋतुराज पाटील यांनी स्वागत केले. यावेळी राहुल गांधी यांच्या हस्ते मूर्तिकार सतीश घारगे यांचा सत्कार करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समितीतील सर्व कार्यकर्त्यांची राहुल गांधी यांच्याशी आमदार सतेज पाटील यांनी भेट घडवून आणली. मानसिंग जाधव यांनी आभार मानले.
नियत चांगली असावी लागते
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजकोट किल्ल्यावरील कोसळलेल्या मूर्तीसंदर्भात बोलताना राहुल गांधी म्हणाले, त्यांनी शिवाजी महाराज यांची मूर्ती बनविली, पण थोड्याच दिवसांत मूर्ती तुटली. मूर्ती बनविण्यामागची नियत चांगली असावी लागते. त्याचबरोबर मूर्ती बनविली तर महाराजांची विचारधाराही जपली पाहिजे, असा टोलाही त्यांनी भाजप-शिंदे शिवसेना सरकारला लगावला.
राहुल गांधी यांनी घेतला पुतळ्याचा फोटो
छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण झाल्यावर राहुल गांधी भारावून गेले. त्यांनी स्वतःच्या मोबाईलमध्ये पुतळ्याचा फोटो काढून घेतला. चबुतरा परिसरात जाऊन त्यांनी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले. तसेच आ. सतेज पाटील आणि मूर्तिकार सतीश घारगे यांच्याकडूनही माहिती जाणून घेतली.
आई अंबाबाईच्या कृपेने पावन झालेल्या, छत्रपती शाहूंच्या करवीर नगरीत आज छत्रपती शिवरायांच्या बहुशस्त्रधारी पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण विरोधी पक्षनेते श्री. राहुलजी गांधी यांच्या हस्ते झाले.
या वेळी मंचावर महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष श्री. नाना पटोलेजी, महाराष्ट्र काँग्रेस… pic.twitter.com/ZFchnZyTgP
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) October 5, 2024
हेही वाचा :
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : ईराणने मंगळवारी (दि.१) इस्रायलवर क्षेपणास्त्रे डागल्यामुळे मध्यपूर्वेत युद्धाचा भडका उडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ईराणने २०० क्षेपणास्त्रे डागल्याचे इस्रायलने म्हटले आहे, तर आपण ४०० क्षेपणास्त्रे डागल्याचा दावा ईराणने केला आहे. इस्रायलवरील हल्ला ही आत्मसंरक्षणार्थ केलेली कारवाई असल्याचे इराणने सांगितले आहे, तर ईराणने फार मोठी चूक केली असून त्यांना जबर किंमत मोजावी लागेल, असा इशारा इस्रायलचे अध्यक्ष बेंजामिन नेत्यान्याहू यांनी दिला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी इस्रायलच्या पाठीशी उभे राहण्याची ग्वाही दिली आहे.
ईरानने मंगळवारी रात्री इस्रायलच्या तेल अवीव, जेरुसलेमसह इतर शहरांवर क्षेपणास्त्रे डागली. ईराणने डागलेली १८० क्षेपणास्त्रे निकामी केल्याचा दावा इस्रायलने केला आहे. इस्रायली लष्कराने आपल्या सर्व नागरिकांना बंकरमध्ये लपण्याचा सल्ला दिला. ईरानचे सर्वोच्च नेते खोमनेई यांनी हल्ल्याचे आदेश दिले. हल्ल्यात मोसादचे मुख्यालय उद्ध्वस्य झाल्याचा दावा इराकी टीव्हीने केला आहे.
पाच महिन्यापूर्वी म्हणजेच एप्रिलमध्ये इराणने इस्रायलवर जवळपास ११० बॅलिस्टीक मिसाईल्स आणि ३० क्रूझ मिसाईल्सने हल्ला केला होता. त्या तुलनेत ताजा हल्ला अनेक पटींनी मोठा आहे. स्थानिक वेळेनुसार, रात्री पावणेआठच्या सुमारास (भारतीय प्रमाणवेळेनुसार, रात्री १० वाजून १५ मिनिटांनी) तेल अवीव आणि आसपासच्या परिसरामध्ये आकाशामध्ये काही क्षेपणास्त्रे दिसून आली.
दुसरीकडे आपला बदला पूर्ण झाला असून जोपर्यंत इस्रायल हल्ला करणार नाही, तोपर्यंत आपण पुढचे पाऊल उचलणार नसल्याचे ईराणने म्हटले आहे. त्याचवेळी आपल्या जमिनीवर कुणी हल्ला केला, किंवा हल्ला करणा-यांना मदत केली, तर त्यांनाही किंमत चुकवावी लागेल, असा अप्रत्यक्ष इशारा ईराणने अमेरिकेला दिला आहे.
ईराण आणि इस्रायलमधील युद्धाची शक्यता बळावत चालली असून यामुळे जगावर अण्वस्त्र हल्ल्याचे संघटही घोंघावत आहे. ईराणकडेही अण्वस्त्र हल्ला करण्याची क्षमता असल्याचे म्हटले जाते, परंतु त्यासंदर्भातील अधिकृत नोंद नाही. इस्रायलवरील हल्ल्यानंतर ईराणचे सर्वोच्च नेते खोमनेई सुरक्षित अज्ञात स्थळी आहेत. आणखी काही दिवस ते सुरक्षित ठिकाणीच राहतील, असे सांगण्यात येते.
या हल्ल्यानंतर ईराण आणि इस्रायल यांच्यात मानसिक पातळीवरील युद्धही सुरू झाले असल्याचे पाहावयास मिळते. क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे इस्रायलचे मोठे नुकसान झाले असून त्यांची आयर्न डोम ही अत्याधुनिक सुरक्षा प्रणाली अपयशी ठरल्याचा दावा ईराणकडून करण्यात येत आहे. तर जगातील सर्वश्रेष्ठ सुरक्षा प्रणालींमधील एक असलेल्या आयर्न डोमने इराणी क्षेपणास्त्रे निकामी केली आणि हवेतच मारून टाकली, असे इस्रायलने म्हटले आहे. या दाव्या- प्रतिदाव्यांवरून सोशल मीडियावर दोन्ही देशांच्या समर्थकांमध्येही तुंबळ लढाई सुरू असल्याचे पाहावयास मिळते.
इस्रायलवरील हल्ल्याचा मोठा परिणाम जागतिक बाजारपेठेवर झाला असून अमेरिकन आणि युरोपियन शेअर्सचे भाव वेगाने कोसळले. सुरक्षित गुंतवणूक मानल्या जाणा-या सोन्याच्या दराने उसळी घेतली असून ते २६०० डॉलर प्रतितोळा अशा विक्रमी किंमतीवर पोहोचले. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी मध्य पूर्वेतील या संघर्षाचा निषेध केला असून ही संघर्ष थांबला पाहिजे, असे म्हटले आहे.
अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इस्रायल-ईराण संघर्षाला विशेष महत्त्व आले आहे. अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हारीस यांनी इस्रायलच्या मागे ठामपणे उभे राहण्याची ग्वाही दिली असून माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र आपण अध्यक्ष असतो, तर ही वेळच येऊ दिली नसती, असे म्हटले आहे.
RAW FOOTAGE: Watch as Iranian missiles rain over the Old City in Jerusalem, a holy site for Muslims, Christians and Jews.
This is the target of the Iranian regime: everyone. pic.twitter.com/rIqUZWN3zy
— Israel Defense Forces (@IDF) October 1, 2024
हेही वाचा :
दोन भारतीय लेखिकांचा मानवतेसाठी एल्गार, नाकारले आंतरराष्ट्रीय पुरस्कार
नवी दिल्ली : साहित्य पुरस्कारांचे राजकारण सातत्याने चर्चेत असताना आणि गावपातळीवरील पुरस्कारांसाठीही लेखकांची चढाओढ पाहायला मिळत असताना दोन लेखिकांनी आंतरराष्ट्रीय पुरस्कार नाकारण्याचे धैर्य दाखवले आहे. आदिवासी लेखिका जेसिंता केरकेट्टा आणि भारतीय वंशाच्या लेखिका झुम्पा लाहिरी (Jhumpa Lahiri ) अशी त्यांची नावे असून आपल्या कृतीतून त्यांनी मानवतेचा आवाज बुलंद केला आहे. (Jhumpa Lahiri – Jacinta Kerketta)
Jhumpa Lahiri – Jacinta Kerketta : जेसिंता केरकेट्टा : रूम टू रीड यंग ऑथर
आदिवासी कवयित्री, लेखिका आणि स्वतंत्र पत्रकार जेसिंता केरकेट्टा (Jacinta Kerketta ) यांना लहान मुलांसाठी लिहिलेल्या ‘जिरहुल’ या कवितासंग्रहासाठी यूएस एड आणि रूम टू रीड इंडिया ट्रस्टतर्फे संयुक्तपणे ‘रूम टू रीड यंग ऑथर ऑफ २०२४’ हा पुरस्कार जाहीर झाला होता.
पॅलेस्टाईनमध्ये हजारो मुले मारली जात असताना यूएस एड आणि बोईंगशी संबंधित कोणताही पुरस्कार मी स्वीकारणार नाही, असे जेसिंता केरकेट्टा यांनी सांगितले. २०२३ मध्ये पॅलेस्टाईनमध्ये हजारो मुले आणि महिला मारल्या जात असताना, भारतातील मुलांच्या चांगल्या शिक्षणासाठी रूम टू रीड इंडिया ट्रस्टने बोईंग संस्थेसोबत सहकार्य केले होते. एकाच शस्त्राने हजारो मुले मारली जात असताना शस्त्रास्त्रांचा व्यापार आणि मुलांची चिंता एकत्र कशी चालते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

जेसिंता केरकेट्टा – रूम टू रीड यंग ऑथर
जेसिंता म्हणाल्या, “भारतात बालसाहित्यासाठी फारच कमी लेखन केले जात आहे. अशा परिस्थितीत लहान मुलांसाठी लिहिलेल्या पुस्तकाला पुरस्कार मिळणे हे कोणत्याही लेखकाला प्रोत्साहन ठरू शकते. पण त्याचबरोबर हेही लक्षात ठेवावे लागेल की, जेव्हा मुलांसाठी चांगले जग घडवण्यात जर या लोकांचा सहभाग नसेल, तरमग या पुरस्काराचे काय करायचे? “जिरहुल” हा काव्यसंग्रह २०२४ मध्ये प्रकाशित झाला आहे. आदिवासी भागातील जंगलात असलेल्या अनेक फुलांवरच्या कविता त्यात आहेत. या कविता सामाजिक-राजकीय जाणिवेच्या आहेत.
झुम्पा लाहिरी : नोगुची संग्रहालय पुरस्कार
पॅलेस्टिनी एकतेचे प्रतीक म्हणून ‘केफीयेह’ (स्कार्फ) परिधान केलेल्या तीन कर्मचाऱ्यांना काढून टाकल्याच्या निषेधार्थ अमेरिकेच्या नोगुची संग्रहालयाकडून पुरस्कार स्वीकारण्यास भारतीय वंशाच्या लेखिका झुम्पा लाहिरी यांनी नकार दिला आहे. १९९९ मध्ये इंटरप्रिटर ऑफ मेलडीज या लघुकथा संग्रहासाठी त्यांना पुलित्झर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

झुम्पा लाहिरी : नोगुची संग्रहालय पुरस्कार
जपानी-अमेरिकन डिझायनर आणि शिल्पकार इसामू नोगुची यांनी सुमारे चाळीस वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या या संग्रहालयाने, त्यांचे कर्मचारी त्यांच्या कामाच्या वेळेत ‘राजकीय संदेश, घोषणा किंवा चिन्हे’ असलेले कपडे किंवा उपकरणे वापरू शकत नाहीत, असे ऑगस्टमध्ये जाहीर केले होते. इसामू नोगुची पारितोषिकाची सुरुवात २०१४ मध्ये करण्यात आली होती. इसामू नोगुची प्रमाणेच, नाविन्यपूर्ण भावना, उत्कृष्ट कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलतेसाठी वचनबद्ध असलेल्या व्यक्तिंना दरवर्षी पुरस्कार दिला जातो, असे संग्रहालयाच्या वेबसाइटवर म्हटले आहे. या पुरस्काराच्या आधीच्या विजेत्यांमध्ये नॉर्मन फोस्टर, डेविड अडजाये, तोशिको मोरी आणि टाडाओ एंडो यांचा समावेश आहे. “आमच्या नवीन ड्रेस कोड धोरणाच्या निषेधार्थ झुम्पा लाहिरी यांनी २०२४ चा पुरस्कार नाकारला असल्याचे संग्रहालयाने एका निवेदनाद्वारे जाहीर केले आहे.
हेही वाचा
- रोहन चौधरी
परराष्ट्र धोरण आणि देशांतर्गत राजकारण हे वेगळे असल्याच्या गैसमजूतीतून परराष्ट्र धोरणात राज्यांची देखील भूमिका असू शकते याबद्दल आपण सारेच अनभिज्ञ आहोत. आजपर्यंत शिवसेनेची भारत-पाकिस्तानबद्दल अथवा तामिळनाडूतील दोन्ही पक्षांची श्रीलंकेविषयी अथवा भारत-बांग्लादेश संबंधात पश्चिम बंगालची असणारी भूमिका या निमित्ताने परराष्ट्र धोरणातील राज्यांची आणि प्रादेशिक पक्षांच्या भूमिकेची चर्चा व्हायची. परंतु या चर्चेचा परीघ हा प्रासंगिक राजकारणापुरता सीमित होता. महाराष्ट्रासारख्या राज्यात मुंबई सारखे जागतिक वित्तीय केंद्र असून देखील परराष्ट्र धोरणात प्रभाव टाकण्यात महाराष्ट्र अपयशी ठरला.
१९९१ नंतर जागतिकीकरणाचा स्वीकार करून देखील राज्ये ही कधीच परराष्ट्र धोरणाच्या मध्यवर्ती स्थानी आली नाहीत. पारंपरिक दृष्ट्या केंद्र सरकारची परराष्ट्र धोरणावर असणारी पोलादी पकड आणि प्रादेशिक पक्षांची असणारी संकुचित राजकीय भूमिका यामुळे ना केंद्र सरकारने राज्यांना परराष्ट्र धोरणाच्या प्रवाहात आणले ना राज्यांनी परराष्ट्र धोरणाला विशेष महत्व दिले.
परराष्ट्र धोरणात राज्यांचे महत्त्व
२१व्या शतकात जागतिक सामर्थ्याचे मूळ नेमके कशात आहे या प्रश्नाचे उत्तर शोधल्यास भारतीय परराष्ट्र धोरणात राज्यांचे महत्त्व समजून येईल. जागतिक राजकारणाचा प्रवास हा ‘सीमा सुरक्षेकडून’ ‘मानवी सुरक्षेकडे’ चालला आहे. मानवाच्या सर्वांगीण प्रश्नाला भेडसावणाऱ्या प्रश्नांची उत्तरे जो देश देईल तो देश भविष्यात जागतिक राजकारणावर वर्चस्व प्रस्थापित करेल. २१व्या शतकातील मानवी समस्यांचे मूळ हे जागतिकीकरणात आहे. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेतूनच शहरीकरण, स्थलांतर, पर्यावरण आणि आर्थिक समतोल या समस्यांना जग सामोरे जात आहे. कोणताही देश लष्करी किंवा आर्थिकदृष्ट्या कितीही बलाढ्य असला तरी या समस्यांवर एकट्याने मात करणे हे निव्वळ अशक्य आहे. हीच गोष्ट भारताला देखील लागू आहे. भारताची भौगोलिक आणि राजकीय रचना पाहता केंद्र सरकार स्वतःच्या बळावर या समस्यांना सामोरे जाऊ शकत नाही. त्यासाठी केंद्र सरकारला राज्यांची मदत घ्यावीच लागेल. भारतातील राज्यांची भूमिका देखील अलीकडच्या काळात बदलत आहे. बहुतांश राज्यात राजकीय अस्मिता इतक्या तीव्र झाल्या आहेत कि राष्ट्रीय हितापेक्षा राज्यांच्या हिताला प्राधान्य दिले जात आहे. हे चित्र बदलणे गरजेचे आहे.
पुण्यात वाढते लोंढे
जागतिकीकरणाचा फायदा घेऊन ज्या देशांनी आपला विकास केला आहे त्यामध्ये भारताचा क्रमांक वरचा आहे. पुण्यासारखे नव्याने उदयास आलेले शहर हे या विकासाचे प्रातिनिधिक उदाहरण आहे. म्हणूनच किंबहुना जी-२० च्या शहरीकरण आणि पायाभूत सुविधा सारख्या महत्वाच्या प्रश्नावर पुण्यात बैठक आयोजित केली गेली. पुण्यात व्यवसाय नोकरीनिमित्त येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून जवळपास भारतातील सर्वच शहरात ही परिस्थिती आहे. भारतात शहरी नियोजन क्षेत्रामध्ये काम करणारे विविध सरकारी विभाग आहेत. केंद्र सरकार, राज्य सरकार, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अशा विविध विभागामार्फत शहरीकरणाचे नियोजन होते. १९९१ साली आर्थिक उदारीकरणाचे स्वीकारलेले धोरण आणि त्याच्या पुढच्याच वर्षी ७३ व्या घटनादुरुस्तीनुसार निर्माण केलेली पंचायत राज व्यवस्था हे निव्वळ योगायोग नाही. जागतिकीकरणाचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचा तो एक मार्ग होता. परंतु नंतरच्या काळात अनियंत्रित बेसुमार अशा शहरीकरणामुळे जागतिकीकरणाचा फायदा होण्याऐवजी तोटाच होऊ लागला.
आदर्श शहरांची वानवा
गांधीनगर, चंदीगड वगळता भारतात आज कोणतेही शहर आदर्शवत नाही आहे हे कटू सत्य आहे. अहमदाबाद, हैदराबाद, पुणे, बेंगलोर या सारखी नवी शहरे असो अथवा मुंबई, कोलकत्ता, दिल्ली किंवा चेन्नई सारखी जुनी शहरे असो शहरीकरणाच्या बाबतीत भारताच्या नियोजनाचा फज्जा उडाला आहे हे मान्य करावे लागेल. राजकीय घटकांकडून मेट्रो, रस्ते, उड्डाणपूल याचे कितीही दावे केले तरी सामान्य शहरी माणसाच्या वाट्याला सुरक्षित आणि सुलभ प्रवास हा महागच आहे. बेंगलोर सारख्या शहरातील पाण्याची तीव्र टंचाई असो अथवा चेन्नईसारखे शहर पाण्याखाली जाणे असो. इतकेच नव्हे तर कोल्हापूर-सांगली सारखी छोटी शहरे देखील वारंवार पुराच्या पाण्याखाली जाणे असो. नवी-जुनी, छोटी-मोठी कोणतीच शहरे जगाला हेवा वाटावीत अशी नाही आहेत. राजकीय पातळीवर देखील जगाला दाखवून द्यावे असे काही आश्वासक चित्र नाही आहे.
स्थलांतरितांचा द्वेष
महाराष्ट्रासारख्या जागतिकीकरणात अग्रेसर असणाऱ्या राज्यात देखील सत्तेचा ‘राजमार्ग’ हा स्थलांतरीत उत्तर भारतीयांच्या द्वेषावर अवलंबून आहे. बेंगलोर सारख्या तंत्रज्ञानाच्या राजधानीत देखील आसाम मधील विद्यार्थ्यांना ‘हाकलून’ लावले गेले आहे हे विदारक वास्तव आहे. या समस्येला जितकी प्रशासकीय प्रक्रिया जबाबाबदार आहे तितकाच राजकीय दृष्टिकोन देखील जबाबदार आहे. परराष्ट्र धोरणातील बदल आणि जाणीव हे भारतातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचलेलेच नाही आहेत. थेट परकीय गुंतवणुकीचे अधिकार केंद्राला आणि पायाभूत सुविधा निर्माण करण्याची जबाबदारी स्थानिक शासनावर, हे चित्र बदलले पाहिजे. परराष्ट्र धोरणावर आपला जेवढा हक्क आहे तितकाच हक्क राज्यांचा आहे याची जाणीवच केंद्र सरकारला अजूनही होत नाही आहे. मुख्यमंत्र्यांचे काम जागतिक व्यापार संघटेनच्या परिषदेस निव्वळ उपस्थित राहणे हे नसून आदर्शवत शहरे उभारणे हे देखील महत्वाचे काम आहे. महापौर, नगरसेवक, जिल्हापरिषद, सरपंच हि निव्वळ राजकीय शोभेची पदे नसून शहरीकरणाच्या नियोजनातील हे सर्व अत्यंत महत्वाचे घटक आहेत हे लोकप्रतिनिधींना आणि जनतेला समजावून सांगावे लागणार आहे. विकेंद्रीकरणाची प्रक्रिया नुसती कागदावर असून चालणार नाही तर ती राजकीय संस्कृतीत उतरवावी लागणार आहे. महापौराला शोभेचे पद म्हणून न ठेवता संवैधानिक अधिकार द्यावे लागतील. नगरसेवकांची राजकीय पत आणि प्रतिमा सुधारावी लागेल.
सह्याद्री आपल्या कुशीतून बाहेर पडेल का?
भारतातील प्रत्येक राज्याकडे स्वतःची अशी गुणवैशिष्ट्ये आहेत. मुंबई सारखे जागतिक अर्थव्यवस्थेचे केंद्र असणारे महाराष्ट्र, परदेशात व्यापारानिमित्त स्थायिक झालेला गुजराती समाज, अरब देशांना आपल्या आरोग्यसेवेने प्रभावित करणारा केरळ, भारतीय संस्कृतीने आशियाला प्रभावित करणारा तामिळनाडू, छत्तीसगडची आदर्शवत सार्वजनिक वितरणप्रणाली यांचे भारताच्या परराष्ट्र धोरणात अनन्यसाधारण योगदान आहे. जगाला या सर्वांची ओळख करून द्यावी लागेल. राज्यांना आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव देखील करून द्यावी लागेल. जागतिक राजकारणात भारताचा प्रभाव निर्माण करण्यासाठी राज्यांना आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना परराष्ट्र धोरणाच्या केंद्रस्थानी आणावेच लागेल. त्यासाठी भारतातला प्रत्येक घटक हा भारतीय सामर्थ्याचा ‘राजदूत’ आहे हे बिंबविण्यास सुरवात करावी लागेल. स्थलांतर, शहरीकरण आणि पर्यावरण या समस्येवर जगाने अनुकरण करावे असा आदर्श आपल्याला निर्माण करावा लागेल. यापार्श्वभूमीवर परराष्ट्र धोरणात राज्य स्वतंत्रपणे आपला प्रभाव दाखवू शकतात ही जाणीव राज्यांना होणे आवश्यक आहे. महाराष्ट्राचे आर्थिक सामर्थ्य, भौगोलिक स्थान, सामाजिक सौहार्द, राजकीय संस्कृती पाहता सह्याद्रीला पुन्हा एकदा हिमालयाला बळकट करण्यासाठी जावे लागेल. प्रश्न आहे सह्याद्री आपल्या कुशीतून बाहेर पडेल का?
(लेखक आंतरराष्ट्रीय प्रश्नांचे अभ्यासक आणि दिल्लीच्या जेएनयुमध्ये अध्यापक आहेत.)
रांची
झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. प त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता. रांची येथे झालेल्या समारंभात चंपई सोरेन यांनी समर्थकांसह भाजप प्रवेश केला. या वेळी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान, आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व सरमा उपस्थित होते. रांची तसेच दिल्लीत आपल्यावर पाळत ठेवल्यानंतर भाजप प्रवेशाला बळ मिळाल्याचे सोरेन यांनी नमूद केले. काँग्रेसने आदिवासी अस्मिता धोक्यात आणल्याचा आरोप करुन भाजप आदिवासींना न्याय देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मेहनत घेऊन झारखंड मुक्ती मोर्चामध्ये काम केले. मात्र माझा अवमान करण्यात आला. तो मी सहन करू शकत नाही, असे ते म्हणाले.
चंपई सोरेन यांच्या भाजप प्रवेशाने आदिवासीबहुल जागांवर भाजपला लाभ होईल. चंपई हे झारखंड मुक्ती मोर्चाचे सर्वेसर्वा शिबू सोरेन यांचे निकटवर्तीय मानले जातात. झारखंड टायगर म्हणून चंपई ओळखले जातात. हेमंत सोरेन तुरुंगात गेल्यावर दोन फेब्रुवारीला चंपई यांच्याकडे झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे आली. मात्र हेमंत यांना जामीन मिळाल्यावर चंपई यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागले. अपमानास्पदरीत्या पदावरून काढल्याचा आरोप चंपई यांनी केला होता.
नवी दिल्ली
यूपीएस (युनिफाइड पेन्शन योजना) मधील ‘यू’ म्हणजे मोदी सरकारचा ‘यू-टर्न’ आहे, अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. दलित, आदिवासी आणि मागासवर्गीयांसाठी युनिफाइड पेन्शन योजना अन्यायकारक असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
युनिफाइड पेन्शन योजनेअंतर्गत पूर्ण पेन्शन मिळविण्यासाठी २५ वर्षे सेवा देणे बंधनकारक असल्याचे सांगून खरगे म्हणाले, अनेक राज्यांमध्ये, आरक्षित श्रेणीसाठी सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा चाळीस वर्षे आहे. यूपीएसमध्ये हीच मर्यादा ३७ वर्षे आहे. चार जूनला सत्तेच्या अहंकारावर जनतेच्या शक्तिने विजय मिळवला आहे. लाँग टर्म कॅपिटल गेन/इंडेक्सेशनसंदर्भातील निर्णय अर्थसंकल्पात मागे घेण्यात आला. वक्फ विधेयक जेपीएसकडे पाठवण्यात आले. इतरही अनेक निर्णय मागे घेण्यात आले आहेत. तीच गत युपीएसची होईल,’’ असे खरगे म्हणाले.
काँग्रेसच्या टीकेला प्रत्युत्तर देताना माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले, पंतप्रधान मोदी समाजाच्या विविध प्रश्नांबद्दल संवेदनशील असून, ते सार्वजनिक हिताचे निर्णय घेतात. खरगे यांनी हिमाचल प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणामध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या आपल्या निवडणुकीतील आश्वासनावर ‘यू-टर्न’ का घेतला, हे देशाला सांगावे.
नवी दिल्ली ः तरुण मोठ्या संख्येने राजकारणात प्रवेश करण्यासाठी उत्सुक आहेत. त्यासाठी त्यांना फक्त योग्य संधी आणि मार्गदर्शनाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात केले. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या तरुणांनी राजकारणात येण्याचे आवाहन स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांनी केले होते. त्यावर घराणेशाहीमुळे संधी मिळत नसल्याची तक्रार अनेक तरुणांनी केल्याचे मोदींनी यावेळी नमूद केले.
सामूहिक प्रयत्नांतूनच सामान्य तरुणांना राजकारणाचे दरवाजे उघडू शकतील, असे सांगून पंतप्रधान मोदी म्हणाले की, यावर्षी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात मी राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या एक लाख तरुणांना राजकीय व्यवस्थेशी जोडले जाण्याचे आवाहन केले होते, त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. तरुण मोठ्या संख्येने राजकारणात प्रवेश करण्यास उत्सुक असल्याचे लक्षात आले. मला देशभरातून तरुणांचा विविध माध्यमांतून प्रतिसाद मिळत आहे. त्यात घराणेशाहीचे राजकारण नवीन प्रतिभेला चिरडत असल्याचे अनेकांनी नमूद केले आहे, असे मोदी म्हणाले.