देवघर; वृत्तसंस्था : अन्न, बेटी आणि मातीची सुरक्षा हा या निवडणुकीत सर्वात मोठा मुद्दा आहे. भाजप एनडीए सरकार रोटी, बेटी आणि झारखंडच्या मातीशी खेळू देणार नाही, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी येथे दिला. पंतप्रधान मोदी झारखंड दौऱ्यावर आहेत. ते देवघर येथे प्रचार सभेत बोलत होते.
ते म्हणाले, की अवघ्या दोन दिवसांनी आम्ही धरती आबा, बिरसा मुंडा यांची दीडशेवी जयंती साजरी करणार आहोत. धरती आबांची जयंती भारताच्या कानाकोपऱ्यात साजरी होणार आहे. लोकशाहीच्या पहिल्या उत्सवात तुम्ही सर्व जुने विक्रम मोडीत काढले आहेत. सर्वत्र एकच गुंजन आहे, ‘रोटी, बेटी और माती की हाक, झारखंडमध्ये भाजप-एनडीए सरकार.’ मोदी म्हणाले, की मी एक व्हिडीओ पाहिला. तिथे स्थानिक रहिवाशांना पाणी मिळणेदेखील कठीण झाले आहे. सीता सोरेन यांचे नाव घेत ते म्हणाले, की काँग्रेस सीता सोरेनला शिव्या देते. काँग्रेस आदिवासी मुलींचा अपमान करते.
द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली होती; पण काँग्रेसने त्यांचा पराभव करण्यासाठी सर्व शक्ती वापरली, अशी टीका करून मोदी म्हणाले, की मी झारखंडमध्ये याआधी जिथे जिथे गेलो आहे, तिथे परकीयांच्या घुसखोरीची सर्वात मोठी चिंता आहे. झारखंडी अभिमान, झारखंडी ओळख ही तुम्हा सर्वांची ताकद आहे. मी अभिमानाने सांगतो, की मी झारखंडी आहे. ही ओळख हरवली तर काय होईल याची कल्पना करा. सांथाल प्रदेशातील आदिवासींची संख्या जवळपास निम्मी झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. आदिवासींची संख्या अशीच कमी होत राहिली तर काय होईल. तुमची पाणी, जंगल जमीन, सर्व काही दुसऱ्यांच्या ताब्यात जाईल, असे पंतप्रधान म्हणाले.
या परिस्थितीतून आदिवासी कुटुंबांना वाचवायचे आहे आणि झारखंडलाही वाचवायचे आहे. आज झारखंडची ओळख बदलण्याचे मोठे षडयंत्र सुरू आहे. घुसखोरांना कायमचे रहिवासी बनवण्यासाठी प्रत्येक चुकीचे काम केले गेले, अशी टीका त्यांनी केली.
घुसखोरांना अभय
झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसच्या राजवटीत बाहेरून आलेल्या घुसखोरांना कायमस्वरूपी रहिवासी बनवण्यासाठी चुकीचे काम करण्यात आले आहे. यासाठी रात्रभर ठोस कागदपत्रे तयार करण्यात आली. आदिवासी मुलींची लग्नाच्या नावाखाली फसवणूक होते. या घुसखोरांनी तुमचा रोजगार आणि रोटी हिरावून घेतली. यावर येथील सरकारने येथे कोणतीही घुसखोरी झाली नसल्याचे न्यायालयाला सांगितले, असा आरोप मोदी यांनी केला.