इंफाळः आसाममधील सिलचर शहरातून जिरीबाममार्गे इंफाळला अत्यावश्यक वस्तू घेऊन जाणारे दोन ट्रक अतिरेक्यांनी पेटवून दिले. ही घटना जिरीबामपासून ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या तामेंगलाँगमधील तौसेम पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लाहंगनोम गाव आणि जुने केफुंदाई गावादरम्यान घडली.
जिरीबामच्या मोटबुंग गावात गोळीबार सुरू झाला आहे. सततच्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने २००० अतिरिक्त केंद्रीय सुरक्षा दल पाठवले आहेत. २० नवीन कंपन्या तैनात केल्यानंतर, मणिपूरमध्ये रॅपिड ॲक्शन फोर्ससह केंद्रीय दलांच्या २१८ कंपन्या असतील. यामध्ये इंडो-तिबेट बॉर्डर पोलिसांचाही समावेश आहे. दुसरीकडे, जिरीबामच्या मदत शिबिरातून बेपत्ता झालेल्या सहा जणांचा सुगावा न लागल्याने मैतेई लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. दरम्यान, १३ मैतेई संघटनांनी २४ तासांच्या बंदची हाक दिली आहे. महिला आंदोलकांनी यापूर्वीही अनेक रस्ते अडवले आहेत.
बेपत्ता महिला आणि मुलांच्या सुरक्षिततेसाठी लोकांनी जिरीबाममध्ये मेणबत्त्या पेटवल्या. या सर्वांचा शोध घेण्यात सुरक्षा दल व्यस्त आहेत. पोलिसांनी बनावट चकमकीचे निवेदन जारी केले. सोमवारी झालेल्या चकमकीत १० संशयित अतिरेक्यांच्या मृत्यूनंतर जिरीबाममध्ये परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण आहे. कुकी संघटना याला बनावट चकमक म्हणत तपासाची मागणी करत आहेत. मणिपूर पोलिसांनी लेखी निवेदनात आरोपांना उत्तर दिले आहे. त्यात म्हटले आहे, की जाकुरधोर येथील ‘सीआरपीएफ’ चौकीवर अतिरेक्यांनी आरपीजी, स्वयंचलित शस्त्रांसह जड शस्त्रांनी हल्ला केला. प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात दहशतवादी ठार झाले. प्रत्युत्तरादाखल गोळीबार झाला नसता, तर मोठे नुकसान झाले असते.
दरम्यान, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते ओकराम इबोबी सिंग म्हणाले, की गेल्या काही दिवसांपासून राज्यातील परिस्थिती बिकट झाली आहे. आम्ही सत्तेचे भुकेले नाही. ६ निरपराधांचे अपहरण झाल्याचे स्पष्ट दिसत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अजूनही गप्प का आहेत? हे विविध राज्ये किंवा देशांमधील युद्ध नाही, तर एका राज्यातील समुदायांमधील संघर्ष आहे. यावर केंद्र आणि राज्याने फार पूर्वीच तोडगा काढायला हवा होता.