ब्राझिलिया : भारताचे अभिनाश जामवाल आणि हितेश गुलिया या बॉक्सरनी वर्ल्ड बॉक्सिंग कप स्पर्धेमध्ये अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अभिनाशने ६५ किलो, तर हतेशने ७० किलो गटात अंतिम फेरी गाठली असून सुवर्णपदक जिंकण्यासाठी त्यांना केवळ एका विजयाची आवश्यकता आहे. (Abhinash)
ब्राझीलच्या फॉझदो इगुआकू शहरात ही स्पर्धा सुरू आहे. उपांत्य फेरीत २२ वर्षीय अभिनाशने इटलीच्या जिआनलुईजी मालंगा याचा ५-० असा एकतर्फी पराभव केला. रिंगमधील वेगवान वावर आणि भक्कम बचावामुळे अभिनाशने उपांत्य लढतीत प्रतिस्पर्ध्याला कोणतीही संधी दिली नाही. मूळचा हिमाचल प्रदेशातील मंडीचा असणाऱ्या अभिनाशने या सामन्यात आपल्या उंचीचा खुबीने वापर केला. पाचपैकी चार पंचांनी सामन्याच्या पहिल्या व तिसऱ्या राउंडमध्ये अभिनाशच्या बाजूने ३० गुणांचा कौल दिला. पहिल्याच राउंडमध्ये अभिनाशने एकदा जिआनलुईजीला ठोशाने खालीही पाडले. या काउंटडाउनवेळी जिआनलुईजी पुन्हा खेळण्यासाठी उभा राहिला असला, तरी अभिनाशची बरोबरी त्याला करता आली नाही. अंतिम फेरीत अभिनाशसमोर ब्राझीलच्याच युरी रेईसचे आव्हान आहे. (Abhinash)
तत्पूर्वी, ७० किलोच्या उपांत्य सामन्यात हितेशने फ्रान्सच्या माकन ट्रॅओरला ५-० असे पराभूत केले. या सामन्याच्या सुरुवातीपासूनच हितेशने प्रतिस्पर्ध्यावर इतकी आघाडी घेतली होती, की तिसऱ्या राउंडमध्ये एका पेनल्टी गुणाचा फटका बसूनही निकालावर फरक पडला नाही. याबरोबरच, वर्ल्ड बॉक्सिंग कपची अंतिम फेरी गाठणारा तो भारताचा पहिलाच बॉक्सर ठरला. अंतिम सामन्यात हितेशची लढत इंग्लंडच्या ओडेल कमारा याच्याशी होईल. ५५ किलो गटात मात्र भारताच्या मनीष राठोडचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले. कझाखस्तानच्या नूरसुल्तान अल्तायनबेकने मनीषला ०-५ असे नमवले. ५० किलो गटामध्येही भारताच्या जदुमणी सिंह मांदेंगबामला उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. उझबेकिस्तानच्या आसिल्बेक जालिलोवने जदुमणीवर चुरशीच्या सामन्यात ३-२ अशी मात केली. (Abhinash)
हेही वाचा :
दिल्लीची विजयाची हॅट्ट्रिक
भारताच्या सिफत कौरला सुवर्ण