कागल : जिल्ह्यातील चर्चेचा मतदारसंघ ठरलेल्या कागल विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार वैद्यकीय शिक्षणमंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) हसन मुश्रीफ हे सहाव्यांदा विजयी झाले आहेत. त्यांनी डबल हॅटट्रिक केली आहे, तर जिल्ह्यात डबल हॅटट्रिक करणारे पहिले आमदार ठरले आहेत. समरजितसिंह घाटगे (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष) यांच्यावर त्यांनी ११ हजार ६३२ मतांनी हा विजय संपादन केला आहे. मुश्रीफ यांना एक लाख ४५ हजार २५७ मते मिळाली, तर समरजितसिंह घाटगे यांना एक लाख ३३ हजार ६२५ मते मिळाली. या निवडणुकीत पालकमंत्री मुश्रीफ हे सहाव्यांदा विजयी होऊन विजयाचा षटकार मारणार, की समरजितसिंह घाटगे हे त्यांची विकेट घेणार याकडे राज्याचे लक्ष लागले होते. दोघांमधील लढत काट्याची टक्कर अशीच होती.
दक्षिण महाराष्ट्र
राधानगरी : भुदरगड विधानसभेचे विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर यांनी सलग तिसऱ्यांदा निवडून येत हॅटट्रिक केली आहे. या मतदारसंघातून हॅटट्रिक करणारे आबिटकर पहिले आमदार ठरले आहेत. यावेळी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत महायुती शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार प्रकाश आबिटकरांनी प्रारंभापासूनचे मताधिक्य शेवटच्या फेरीपर्यंत टिकवून ठेवले. परिणामी तालुक्यात दोनदा निवडून आलेला आमदार तिसऱ्यांदा निवडून येत नाही या शक्यतेला आबिटकरांनी सुरुंग लावला. गेल्या दोन निवडणुकांप्रमाणे याही वेळी ३८,५७२ मताधिक्याने विजय मिळविला आहे. गेली दहा वर्षे केलेली कामे, तरुण चेहरा, युवावर्गाचा पाठिंबा, कामाची तत्परता, मतदारसंघातील जनसंपर्क व वाड्या-वस्त्यांपर्यंत असलेला वावर या आबिटकरांच्या जमेच्या बाजू होत्या. (Prakash Abitkar)
सातारा, प्रतिनिधी : अतंत्य चुरशीने झालेल्या विधानसभा निवडणुकीत वाढलेला मतदानाचा टक्का हा महायुतीच्या फायद्याचा ठरला आहे. जिल्ह्याने पहिल्यांदाच शरद पवारांची साथ सोडताना काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते माजी मंत्री बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे यांना पराभवाची धुळ चारली आहे. जिल्ह्यातील आठही मतदारसंघावर महायुतीचा झेंडा फडकला असून महाविकास आघाडीचा एकही उमेदवार विजयी न झाल्याने तीन्ही पक्षांचा जिल्ह्यात सुफडासाफ झाला आहे. (Satara Election)
विधानसभा निवडणूक लागल्यापासून सर्वच पक्षांच्या नेत्यांनी पश्चिम महाराष्ट्रावर जास्तीचे लक्ष दिले होते. एकीकडे बालेकिल्ला सावरण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी खास प्रयत्न केले होते. तर, दुसरकीकडे पवारांचा हाच बालेकिल्ला हस्तगत कण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी प्रचाराची आखणी केली होती. असे असले तरी शरद पवारांच्या सभांना मिळत असलेला प्रतिसाद पाहून सातारा जिल्ह्यात कराड उत्तर, फलटण, कोरेगाव, माण हे मतदारसंघ त्यांच्या पक्षाला मिळतील असे अनेकांचे अंदाज होते.
मात्र, हे अंदाज फोल ठरवत कराड उत्तरमधून भाजपाचे मनोज घोरपडे यांनी राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचा पराभव केला. कोरेगावमधून शिवसेनेचे महेश शिंदे यांनी माजी मंत्री शशिकांत शिंदे यांचा दुसर्यांदा पराभव केला आहे. माणमधून भाजपाचे जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादीचे प्रभाकर घार्गे यांचा पराभव करून विजयाचा चौकार मारला आहे. कराड दक्षिण या मतदारसंघात काँग्रेसचे जिल्ह्यातील एकमेव आमदार असलेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पुन्हा जिंकतील असे वाटत होते. मात्र, भाजपाचे अतुल भोसले यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव करून जायंट किलर म्हणून विधानसभेत जाणार आहेत.
सातारा मतदारसंघात भाजपाचे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शिवसेना (उबाठा) पक्षाचे अमित कदम यांचा मोठ्या फरकाने पराभव केला आहे. वाई मतदारसंघात राष्ट्रवादीचे मकरंद पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या अरूणादेवी पिसाळ यांचा पराभव करून विजयाचा चौकार मारला आहे. फलटण मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार पक्षापेक्षा मोठा धक्का रामराजे नाईक निंबाळकर यांना असून गेली तीस वर्षे त्यांचे वर्चस्व असलेल्या त्यांच्या मतदारसंघ दीपक चव्हाण यांचा पराभव भाजपाच्या सचिन पाटील यांनी केला. पाटण मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी शिवसेना (उबाठा) पक्षाचे हर्षल कदम आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे बंडखोर सत्यजित पाटणकर यांचा पराभव केला आहे. (Satara Election)
सातारा जिल्ह्यात आठपैकी एकाही मतदारसंघात महाविकास आघाडीला विजयी होता आले नसल्याने सातारा आता भाजपाचा आणि महायुतीचा बालेकिल्ला असल्याचे चित्र आहे. बाळासाहेब पाटील, पृथ्वीराज चव्हाण, शशिकांत शिंदे दीपक चव्हाण यांचे पराभव हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्यांना आत्मचिंतन करायला लावणारे आहेत. शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीला सातारा जिल्ह्यातून क्लीन स्वीप मिळालेला आहे. 1978 ते 1999 काँग्रेसचा त्यानंतर 1999 ते 2024 पर्यंत राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणारा सातारा जिल्हा आता महायुतीचा बालेकिल्ला म्हणून पुढे आला आहे . भारतीय जनता पार्टीने अतिशय कौशल्यपूर्ण अशी राजकीय डावपेच आखत राष्ट्रवादीच्या वर्चस्वाखाली असलेला जिल्हा ताब्यात घेतला. या निकालामुळे जोशात असलेेली महायुती आगामी काळात होणार्या जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला धोबीपछाड देण्यासाठी तयार झाली आहे.
ठळक मुद्दे
- आ.जयकुमार गोेरे, आ.मकरंद पाटील चौथ्यांदा विधाससभेत
- आ.सचिन पाटील,आ.मनोज घोरपडे,आ.अतुल भोसले पहिल्यांचा विधानसभेत जाणार
- आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले मताधिक्याने पाचव्यांदा विधानसभेत
- आ. महेश शिंदे दुसर्यांचा विधानसभेत
- आ.शंभूराज देसाईं, आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात पालकमंत्री पदासाठी चुरस
- विधान परिषदेचे आ. शशिकांत शिंदे यांची पराभवाची मालिका सुरूच
या दिग्गजांचा पराभव
या दिग्गजांचा पराभव काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,कराड उत्तरचे सलग पाचवेळा आमदार असलेले माजी मंत्री बाळासाहेब पाटील, माजी मंत्री शशिकांत शिंदे, फलटणचे तीनवेळा आमदार राहिलेले दीपक चव्हाण यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
कोल्हापूर; प्रतिनिधी : लोकसभा निवडणूकीतील पराभव विसरुन महायुतीने विधानसभा निवडणूकीत दोनशेहून अधिक जागांवर आघाडी घेऊन सत्तास्थापनेकडे आश्वासक वाटचाल केली आहे. महाविकास आघाडीला दारुण पराभवास सामोरे जावे लागत असून मतदानाचा कलात त्यांचा आकडा ५० च्या आसपास स्थिर आहे. भाजपने १२५ अधिक जागांवर आघाडी घेतल्याने भाजपचा मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झाले असून केंद्रीय नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करणार की, सरप्राईज चेहरा देणार हे सायंकाळपर्यंत स्पष्ट होईल. (Mahayuti)
आज (दि.२३) सकाळी आठ वाजल्यापासून २८८ विधानसभा मतदारसंघात मतमोजणीस सुरुवात झाली. सुरुवातीपासून महाविकास आघाडीने पहिल्या टप्प्यात आघाडी घेतली होती. पण सकाळी दहा वाजेपर्यंत महायुतीने जबरदस्त मुसंडी मारुन दोनशे पारचा टप्पा गाठला. महायुतीतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. मंत्री अदिती ठाकरे, दीपक केसरकर, भाजपचे अमल महाडिक, यांनी विजय नोंदवला असून महायुतीच्या उमेदवारांनी मोठे मताधिक्य घेत विजयाकडे वाटचाल सुरु केली आहे.
मतमोजणीचा कल स्पष्ट होऊ लागल्यावर भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली. ढोल ताशाच्या गजरात गुलाल उधळून कार्यकर्त्यांनी नृत्य करुन आनंद साजरा केला. लाडू पेढे वाटून विजयाचा जल्लोष साजरा केला.
जयसिंगपूर; प्रतिनिधी : शिरोळ विधानसभा मतदारसंघातून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे ४१ हजार १९६ मताधिक्याने विजयी झाले आहेत. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून राजेंद्र पाटील यड्रावकर प्रत्येक फेरीत आघाडी घेतली. साडेबाराच्या सुमारास शिरोळ मधील ३०७ मतदान केंद्रावरील १२ टेबलवर २२ फेऱ्यांमध्ये मत मोजणी झाली. यात महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली. तर स्वाभिमानीचे उमेदवार उल्हास पाटील यांना जोराचा धक्का बसला असून त्यांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. शिरोळ तालुक्यातील जनतेने विकास कामांना प्राधान्य दिल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे. गत विधानसभेत राजेंद्र पाटील यड्रावकर २७००० च्या फरकांनी निवडून आले होते. (Rajendra Patil Yadravkar)
कोल्हापूर; प्रतिनिधी : जिल्ह्यातील दहाही विधानसभा मतदारसंघांतील मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. शनिवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. दहा मतदारसंघांतील २५ लाख ३२ हजार ६५७ मतांची मोजणी होणार आहे. सकाळी अकरा वाजेपर्यंत मतदानाचा कल स्पष्ट होणार आहे. मतमोजणीची प्रक्रिया दुपारी चार वाजेपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. (Kolhapur)
यंदा महिलांनी उत्फुर्तपणे मतदान केले असून चंदगड विधानसभा मतदारसंघात पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांचे मतदान जास्त झाले आहे. या मतदारसंघात पुरुष आणि महिला मतदानामध्ये महिलांचे २१४४ मतदान जास्त आहे.
दहा विधानसभा मतदारसंघांसाठी स्वतंत्र मतमोजणी ठिकाणे निश्चित केली असून कोल्हापूर शहरात कोल्हापूर उत्तर, कोल्हापूऱ् दक्षिण आणि करवीर मतदारसंघाची मोजणी होणार आहे. कोल्हापूर उत्तर आणि करवीर मतदारसंघाची मतमोजणी रमणमळा येथील शासकीय गोदामांच्या इमारतीत होणार आहे. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील मतमोजणी राजारामपुरीतील व्ही.टी. पाटील सभागृह ताराराणी विद्यापीठात होणार आहे. मतमोजणीच्यावेळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. निकालानंतर मिरवणुका काढण्यास बंदी घातली आहे. मतदान केंद्र परिसरात वाहतूकीस बंदी घातली असून पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात येणार आहे.
सकाळी आठ वाजता मतमोजणीस सुरुवात होणार असून सर्वप्रथम टपाली मतदानाची मोजणी होणार आहे. त्यानंतर ईव्हीएम मतमोजणीस सुरुवात होणार आहे. प्रत्येक मतमोजणी केंद्रात १४ टेबलांची व्यवस्था केली असून कोल्हापूर दक्षिण आणि हातकणंगले मतदारसंघात १६ टेबलांची व्यवस्था केली आहे. (Kolhapur)
शिवाजी विद्यापीठ-मिड स्विडन विद्यापीठातील संशोधन प्रकल्प समाजासाठी उपयुक्त
कोल्हापूर; प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठ आणि मिड स्विडन विद्यापीठातील संशोधन प्रकल्प समाजासाठी उपयुक्त ठरेल. त्याचबरोबर, दोन्ही देशातील संशोधकांना संशोधनातील नवीन संधी उपलब्ध होणार आहे, असा विश्वास प्रा.मॅग्नस् हमेलगार्ड यांनी व्यक्त केला. (Shivaji University)
शिवाजी विद्यापीठ आणि मिड स्विडन विद्यापीठ यांच्यामध्ये संयुक्त संशोधन प्रकल्प मंजुर झाला असून त्या अनुषंगाने मिड स्विडन विद्यापीठाचे प्रा.मॅग्नस् हमेलगार्ड, संशोधक डॉ.मनिषा फडतारे व रोहन पाटील यांनी प्रकल्पाअंतर्गत पुढील नियोजनासाठी नुकतीच विद्यापीठाला भेट दिली. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सभागृहामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी, दोन्ही विद्यापीठांमधील या महत्वपूर्ण संशोधन प्रकल्पाच्या वाढीसाठी शिवाजी विद्यापीठ सहकार्य करेल, अशी ग्वाही कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के यांनी दिली. बैठकीस प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ.विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.अजितसिंह जाधव, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ.तानाजी चौगुले, अधिष्ठाता डॉ.श्रीकृष्ण महाजन, डॉ.महादेव देशमुख, डॉ.सरिता ठकार, आयक्यूएसी कक्षाचे संचालक डॉ.सागर डेळेकर, आंतरराष्ट्रीय व्यवहार कक्षाचे डॉ.शिवाजी सादळे, डॉ.कैलास सोनवणे, डॉ.अनिल घुले, डॉ.चंद्रकांत लंगरे, नॅक विभागाचे डॉ.सुभाष माने आदी उपस्थित होते. युसिक अधिविभागप्रमुख डॉ.ज्योतीप्रकाश यादव यांनी प्रकल्पाचा उद्देश आणि स्वरूप याची माहिती दिली. (Shivaji University)
हेही वाचा :
कोल्हापूरः येथील ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक, संशोधक डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी अथक परिश्रमातून तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या समग्र वाड्.मयाचे १८ खंड साकारले आहेत. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेल्या या खंडांचा प्रकाशन समारंभ कोल्हापुरात शुक्रवारी ( दि. २२) होणार आहे.
दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्यावतीने आयोजित केलेला हा समारंभ शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता राम गणेश गडकरी सभागृह, पेटाळा येथे होईल. दिल्ली येथे होणा-या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांच्या हस्ते प्रकाशन समारंभ होईल. यावेळी डॉ. लवटे यांच्यासह ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर आणि किशोर बेडकिहाळ प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. तारा भवाळकर यांचा सत्कार यावेळी करण्यात येणार आहे. कोल्हापूर आणि परिसरातील साहित्य रसिकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन साहित्य सभेचे कार्यवाह डॉ. विनोद कांबळे यांनी केले आहे.
कोल्हापूर; प्रतिनिधी : विधानसभा निवडणूकीतील मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली असून आता शनिवारी (दि.२३) निकालाची उत्सुकता लागली आहे. जिल्हा प्रशासन मतमोजणीसाठी सज्ज झाले असून सर्व इव्हीएम मशिन स्ट्राँगरुममध्ये सीलबंद करण्यात आले आहेत.
बुधवारी मतदान झाल्यानंतर दहा मतदारसंघातील मतमोजणीच्या ठिकाणी असलेल्या स्ट्राँगरुममध्ये मतदानयंत्रे आणली आहेत. त्या ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवण्यात आली असून सीसीटीव्हीची नजर ठेवण्यात आली आहे. शनिवारी सकाळी स्ट्राँगरुम उघडण्यात येणार असून सकाळी आठ वाजता मतमोजणीस सुरुवात होणार आहे. सुरवातीला टपाली मतदान मोजण्यात येईल. त्यासाठी स्वतंत्र टेबल आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघानुसार मतमोजणीसाठी ठिकाणे निश्चित केली असून त्यासाठी १४ टेबलवर मतमोजणी होणार आहे. फक्त कोल्हापूर दक्षिण आणि हातकणंगले मतदारसंघासाठी १६ टेबलची व्यवस्था केली आहे. ईव्हीएमवरील मतमोजणीसाठी ६३३ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
जिल्ह्यातील दहा मतदारसंघातील मतमोजणी खालील ठिकाणी होणार आहे.
- चंदगड : पॅव्हेलियन हॉल गांधीनगर, नगरपरिषद, गडहिंग्लज
- राधानगरी : तालुका क्रीडा संकुल, जवाहर बाल भवन, गारगोटी
- कागल : जवाहर नवोदय विद्यालय, सांगाव रोड, कागल
- कोल्हापूर दक्षिण : व्ही.टी. पाटील सभागृह, ताराराणी विद्यापीठ, राजारामपुरी.
- करवीर : शासकीय धान्य गोदाम क्र. डी, रमणमळा कसबा बावडा.
- कोल्हापूर उत्तर : शासकीय धान्य गोदाम क्र. ए, रमणमळा कसबा बावडा.
- शाहूवाडी : जुने शासकीय धान्य गोदाम, शाहूवाडी
- हातकणंगले : शासकीय धान्य गोदाम- नंबर २, हातकणंगले.
- इचलकरंजी : राजीव गांधी सांस्कृतिक भवन, इचलकरंजी
- शिरोळ : मध्यवर्ती प्रशासकीय इमारत
कोल्हापूर; प्रतिनिधी : जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत चुरशीचे मतदान झाले. राज्यात सर्वांत जास्त मतदानाचा बहुमान कोल्हापूर जिल्ह्याला मिळाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ७६.२५ टक्के मतदान झाले. जिल्ह्यात एकूण १० विधानसभा मतदारसंघ आहेत. या दहा मतदारसंघांपैकी करवीर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ८४.७९ टक्के मतदान झाले. प्रचंड राजकीय ईर्ष्या, दिग्गज उमेदवार, कार्यकर्त्यांची फौज, जागरुक मतदार आणि लाडकी बहीण योजना, व्होट जिहाद या प्रचारांच्या मुद्द्यामुळे मतदानाचा टक्का वाढला असल्याची चर्चा आहे. जिल्हा प्रशासनानेही मतदानाचा टक्का वाढावा यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवल्याचा परिणाम म्हणून मतदान टक्केवारी वाढली आहे. (Maharashtra Election)
जिल्ह्यात ८० टक्क्याच्या वर करवीर आणि कागल मतदारसंघात मतदान झाले. करवीर मतदारसंघात करवीर आणि दुर्गम गगनबावडा, पन्हाळा तालुक्यातील भाग येत असून मतदानाची टक्केवारी वाढल्याचे दिसते. या मतदारसंघात काँग्रेसकडून राहुल पाटील आणि शिवसेना शिंदे गटाकडून माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्यात लढत झाली आहे. जास्त मतदानाचा फायदा कोणाला मिळणार हे मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे.
राजकीय विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कागल मतदारसंघात ८१.७२ टक्के मतदान झाले. मतदारसंघात कागल तालुका, गडहिंग्लज पालिका आणि एक जिल्हा परिषद मतदार संघ, आजरा तालुक्यातील एका मतदारसंघाचा समावेश आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे या दोन तुल्यबळ उमेदवार आणि राष्ट्रवादीच्या दोन गटांत निवडणूक झाली. या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
राधानगरी, शाहूवाडीला ७५ टक्क्यांवर
७५ टक्क्याच्यावर राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ आणि हातकणंगले मतदारसंघात मतदान झाले. शाहूवाडी मतदारसंघात शाहूवाडी आणि पन्हाळा तालुक्यातील गावांचा समावेश असून या मतदारसंघात ७९.०४ टक्के म्हणजे जवळजवळ ८० टक्के मतदान झाले आहे. आमदार विनय कोरे आणि माजी आमदार सत्यजित पाटील या पारंपरिक विरोधकांमध्ये येथे सामना आहे. या मतदारसंघात पन्हाळा की शाहूवाडी बाजी मारणार हे निकालात दिसून येणार आहे. राधानगरी मतदारसंघात ७८.२६ टक्के मतदान झाले. या मतदारसंघात राधानगरी आणि भुदरगड तालुक्यासह आजरा तालुक्यातील गावांचा समावेश होते. आमदार प्रकाश आबिटकर आणि माजी आमदार के. पी. पाटील यांच्यात आणि शिवसेनेच्या दोन गटांत लढत होत आहे. (Maharashtra Election)
शिरोळ, हातकणंगले मतदारसंघात मतदानाचा आकडा ७५ टक्क्याच्यावर पोचला आहे. ऊस आणि साखर कारखानदाराचा पट्टा ओळखल्या जाणाऱ्या शिरोळ मतदारसंघात ७८.०६ टक्के मतदान झाले आहे. या मतदारसंघात तिरंगी लढत असून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी आमदार उल्हास पाटील आणि गणपतराव पाटील यांच्यात लढत होणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या या मतदारसंघात माजी खासदार राजूशेट्टी यांची प्रतिष्ठा पणास लागली आहे. हातकणंगले तालुक्यातही तिरंगी लढत होत असून या मतदारसंघात ७५.५० टक्के मतदान झाले आहे. आमदार राजूबाबा आवळे, माजी आमदार सुजीत मिणचेकर आणि अशोकराव माने यांच्यात लढत होत आहे.
संवेदनशील मतदारसंघ अशी ओळख असलेल्या कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात मतदानाचा टक्का जवळजवळ ७५ टक्क्याच्या आसपास ७४.९५ टक्क्यावर पोचला. आमदार ऋतुराज पाटील आणि माजी आमदार अमल महाडिक या घराण्यात होत आहे. विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील, खासदार धनंजय महाडिक यांची प्रतिष्ठा पणास लागली आहे. चंदगड विधानसभा मतदारसंघात ७४.६१ टक्के मतदान झाले. या मतदारसंघात गडहिंग्लज, चंदगड आणि आजरा तालुक्यातील गावांचा समावेश आहे. आमदार राजेश पाटील यांना नंदाताई बाभुळकर, अप्पी पाटील, शिवाजी पाटील यांनी आव्हान दिल्याने इथे चौरंगी लढत होणार आहे. (Maharashtra Election)
मॅचेंस्टर सिटी म्हणून ओळख असलेल्या इचलकरंजी मतदारसंघात ६८.९५ टक्के मतदान झाले आहे. राहुल आवाडे आणि मदन कारंडे यांच्यात थेट लढत असून नवीन चेहऱ्याचा आमदार इचलकरंजीला मिळणार आहे. जिल्ह्यात सर्वात कमी मतदान ६५.५१ टक्के कोल्हापूर उत्तर मतदारसंघात झाले आहे. माजी आमदार राजेश क्षीरसागर आणि माजी नगरसेवक राजेश लाटकर यांच्यात लढत होणार आहे.
मतदारसंघनिहाय टक्केवारी
- चंदगड ७४.६१
- राधानगरी ७८.२६
- कागल ८१.७२
- कोल्हापूर दक्षिण ७४.९५
- करवीर ८४.७९
- कोल्हापूर उत्तर ६५.५१
- शाहूवाडी ७९.०४
- हातकणगंले ७५.५०
- इचलकरंजी ६८.९५
- शिरोळ ७८.०६
हेही वाचा :