प्रशांत पवार, सातारा
जयकुमार गोरे, तुषार खरात आणि ती महिला या प्रकरणावर लोक सत्य समजून आहेत. सोशल मीडियावर कमेंट वाचल्या की लक्षात येत आहे. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जे निवेदन केले, त्यामुळे लिहिणे भाग आहे. फडणवीस यांनी गोरे यांचा गौरव हिंमतबहाद्दर असा केल्याने हे संकीर्तन अपरिहार्य आहे. (Jaykumar Gore Controversy)
सातारा जिल्ह्याचा राजकीय इतिहास महाराष्ट्र राज्याने अनुकरण करावा असा आहे. मराठेशाहीत दोन गाद्या निर्माण झाल्यानंतर सातारच्या थोरल्या गादीच्या इतिहासापासून, स्वातंत्र्यांची चळवळ आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची पुढची पन्नास वर्षे अशा कालखंडात अनेक व्यक्ती आणि घटना गौरवाने उल्लेख कराव्या अशा आहेत. चांगला मगदूर, चांगले बेणं असेल तर पीकही चांगले उगवते अशी ही भूमी आहे. पण जमीन मालकाचे (समाज) दुर्लक्ष झाले की पीक कमी आणि तणच कसे माजते, याचे वर्तमानकाळ हा नमुना आहे.
तर विषय जयकुमार गोरे यांचा आहे. त्यांच्या नागड्या फोटोंचा, पत्रकार तुषार खरात यांच्या अटकेचा, तुषार खरात यांनी पुनश्च सादर केलेल्या एका महिलेच्या विनयभंगाचा, त्याच महिलेने कथित खंडणी मागितल्याचा, तिला झालेल्या अटकेचा. (Jaykumar Gore Controversy)
जयकुमार गोरे कोण?
तर अगोदर जयकुमार गोरे कोण हे पाहू. माण तालुक्यातील बोराटवाडी गावचे हे व्यक्तिमत्त्व. हे तिघे भाऊ. १९९० नंतर जे आर्थिक आणि विकासविषयक धोरण आले, त्यातून कंत्राटदार नावाची जमात बेसुमार वाढली. हे त्यापैकीच. सांगली ही त्यांची उमेदीच्या काळातील कर्मभूमी होती. जकातीचे ठेके यात त्यांचा सहभाग होता. सांगलीच्या राजकारणातील काँग्रेस नेत्यांकडे यांचा राबता असायचा. १९९० च्या दशकाच्या अखेरीस केंद्र सरकारने चार महानगरे जोडणारी सुवर्णचतुष्कोन या महामार्गाची योजना प्रत्यक्षात सुरु केली. त्यात सातारा शहराच्या जवळून जाणारा महामार्गाचा पट्टा स्कॅन्स्का नावाच्या कंपनीने कंत्राटात घेतला.
गोरे बंधू त्या कंपनीचे पोटकंत्राटदार, पुरवठादार. सातारच्या पोवई नाक्यावर मरीआई कॉम्प्लेक्समध्ये गोरे बंधूंनी त्यांचे ऑफिस सुरु केले. त्यामुळे त्यांचा पस्तीस वर्षांचा कालखंड डोळ्यासमोरुन तरळत आहे. स्कॅन्स्काचा तो ठेका, त्या ठेक्यातील हे पोटकंत्राटदार आणि त्या सर्वांनी मिळून केलेला इतिहास लिहायचा तर तो थेट स्वर्गात बसलेल्या चित्रगुप्ताच्या वेबसाईटची लिंक मिळाली तर तिथे पोस्ट करावा लागेल असा हा विषय आहे. असो. (Jaykumar Gore Controversy)
काँग्रेसच्या माध्यमातून उत्कर्ष
कंत्राटदार धष्टपुष्ट झाला की त्याच्या चरबी संवर्धनासाठी राजकीय पक्षाचा, राजकारणात सक्रीय व्हायचा परिपाठ बनतो. तसेच इथेही झाले. जयकुमार गोरे यांचे थोरले बंधू माण तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. तेव्हा डोक्याची केसं पांढरी झाली तर नव्हे, ती काळी करुन झडली तरी युवक काँग्रेसच्या पदावर राहता यायचे. तेव्हा नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसची निर्मिती झालेली. त्यामुळे राहिलेल्या लोकांसाठी काँग्रेसचे रान मोकळे होते. तसेच माण तालुक्याचे मोकळे रान गोरे बंधूंसाठी मिळाले. १९९९ ते २०१४ या काळात काँग्रेसचा राज्यातल्या सत्तेत निम्मा वाटा. त्यामुळे गोरे बंधू त्यांना असणार्या जागेत निम्म्यात बरेच व्यापले. (Jaykumar Gore Controversy)
२००९ साली माण विधानसभा मतदारसंघ सर्वसाधारण म्हणजे खुला झाला. तत्पूर्वीच जयकुमार गोरे काँग्रेसच्या पाठिंब्याने जिल्हा परिषद सदस्य झाले. जिल्हा बँकेचे संचालक झाले. २००९ साली ते अपक्ष आमदार झाले. तेव्हापासून अशाच पोलीस केस व्हायच्या. अर्थात गोरे यांच्यावर. मग त्यांना एकतर अटकपूर्व जामीन मिळायचा किंवा अटक होऊन जामीन मिळायचा. मग माणमध्ये मिरवणूक निघायची. आता तुषार खरात, ती पीडित महिला आणि अनिल सुभेदार यांना अटक झाल्यानंतर दिवाळीच साजरी व्हायला हवी होती. पण तसे काही दिसले नाही.
तुषार खरात तेव्हा वाघ होता…
आता जरा वादग्रस्त फोटोच्या प्रकरणाकडे वळू. पण तुषार खरात या यू ट्युबवरच्या अटकेला वळसा घालून. तुषार खरात हा माण तालुक्यातील पांढरवाडी गावच्या खरातवस्ती येथील. तो २००९ साली जयकुमार यांचा मतदार होता. २०१४ च्या निवडणुकीत खरात यांचा जयकुमार गोरे यांचे मधले बंधू शेखर गोरे यांच्याबरोबर वाद झाला. तेव्हा जयकुमार गोरे यांनी खरात यांची बाजू घेतली. ‘तू वाघ आहेस,’ असे प्रमाणपत्र जयकुमार गोरे यांनी तुषारला दिलेले. तुषार मुंबई परिसरात कार्यरत होता. पण त्याची नाळ गावाशी जोडली गेली होती. पाणी फौंडेशन, जलयुक्त शिवारच्या माध्यमातून काही कामे करण्यात त्याचा सहभाग होता. कोणताही पत्रकार स्वतःला प्रसिद्धी देण्यापुरता गोड असतो. त्याने स्थानिक घडामोडींमध्ये सहभाग घेतला की मग अडचण होते. बहुतेक पुढार्यांचा हाच प्रॉब्लेम असतो. (Jaykumar Gore Controversy)
निर्भय, शिकलेला, निर्व्यसनी, आधार असलेल्या समाजातील, चारित्र्यवान माणूस पुढार्यांचा शत्रू असतो. हे पाचही गुण एकत्र असणारा माणूस तर घोर शत्रू. खरात त्यांच्या गावात, परिसरात, विकासकामांत सहभाग घ्यायला लागल्यावर ते गोरे यांना खटकू लागले. त्यातून त्या दोघांचे कधी-मधी तू-तू, मैं-मैं होऊ लागले. दरम्यानच्या काळात तुषार पत्रकारितेच्या मुख्य प्रवाहातून बाहेर पडला. स्वतःचे डिजिटल पोर्टल आणि यू ट्युब चॅनेल त्याने सुरु केले. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्याने माण – खटाव मतदारसंघात तळ ठोकून गोरे यांच्या संदर्भात बातम्या, मुलाखती सादर केल्या. ती संख्या पुढे ८५ झाली म्हणे. झाले विधानसभेच्या निवडणुकाचा निकाल लागला. लाडक्या बहिणी पावल्या आणि त्यानंतर जयकुमार गोरे यांच्या भाषेतील एक ‘माता भगिनी’ उगवली.
गोरे आणि संबंधित महिलेचा संपर्क
सदर लेखाचा थोडा विस्तार आवश्यक आहे. संबंधित महिलेने मुलाखतीत दिलेल्या माहितीनुसार ही कहानी २०१४ पासून सुरु होते. गोरे दुसर्यांदा आमदार झाले. त्यावेळी ती महिला एका दैनिकाच्या वर्धापन दिनात त्यांना भेटली. ती महिला कौशल्य विकास कार्यक्रमानुसार युवक – युवतींना प्रशिक्षण देण्याचे काम करत होती. ती गोरेंना म्हणाली, तुमच्या मतदारसंघात मला हे काम करायचे आहे. गोरे म्हणाले, तुम्ही माझ्या बोराटवाडी येथील ऑफिसला या. ती महिला तिकडे गेली. तिने योजना समजावू सांगितली. गोरेंनी त्या महिलेला फारसा प्रतिसाद दिला नाही. पण जाताना त्या महिलेचा फोन नंबर घेतला. मग फोनाफोनी सुरु झाली. तुम्ही व्हाटसऍप का वापरत नाही?, ह्यापासून सुरु झालेला संवाद. त्या महिलेला व्हाटसऍप सुरु करायला लावून तिला वेगवेगळ्या फोन नंबरवरुन किरीट सोमय्या स्टाईल फोटो पाठवण्यापासून गुन्हा दाखल होऊन, अटकपूर्व जामीन फेटाळून अटक होईपर्यंत प्रकरण पुढे गेले. (Jaykumar Gore Controversy)
जामीन मिळाला. मग प्रथेप्रमाणे गोरे यांचे दहिवडीला भाषण. हे विरोधकांचे कटकारस्थान इथपासून त्या तक्रारदार माता – भगिनीच्या जिवाला काही बरेवाईट होऊ नये इथपर्यंतची काळजी ते वदले. केवढे हे सद्वचन. अहाहा काय हे स्त्री दाक्षिण्य. गोरे त्या फिर्यादीला माता-भगिनी म्हणतात. जणू यांचा तिच्याशी काहीच संबंध नाही. त्यांनी तिला फोटो पाठविलेच नाहीत. पुढे या प्रकरणात केस न्यायालयात उभी राहिली. त्या महिलेने पूर्वी फिर्याद देण्यापूर्वी शपथेवर जबाब दिला होता. डिजिटल पुरावेसुद्धा सक्षम होते. मग गोरेंनी काय केले? शिक्षा होण्याची शक्यता जास्त. मग त्या महिलेचा नात्याने भाऊ असणारा कोणीतरी गाठला. त्याच्यामार्फत त्या महिलेला तक्रार, जबानी यांच्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न सुरु होता. उभयपक्षी तडजोड झाली. गोरे यांनी न्यायालयात या प्रकरणात लेखी आणि हात जोडून माफी मागितली प्रकरण मिटले. निर्दोष मुक्तता झाली हे सब झूठ.
फोटोंचे प्रकरण पुन्हा चव्हाट्यावर
पुढे चार – पाच वर्षे या प्रकरणात काहीच घडल नाही. गेल्या दोन – चार महिन्यात त्या महिलेच्या नावे काही मेसेज आणि पत्रे इकडे तिकडे फिरु लागली. ही पत्रे आपली नाहीत म्हणून त्या महिलेने पोलिसांना तसा जबाबही दिला. अगोदर सांगितले त्याप्रमाणे तुषार खरात यांची गोरे यांच्याबद्दलची आघाडी जोरात होतीच. त्या महिलेचा आणि तुषार खरात यांचा संपर्क झाला. तिने फोनवरुन खरात यांना इंटरव्ह्यू दिला. एकदा हा इंटरव्ह्यू व्हायरल होताच इतर माध्यमांनीही हे प्रकरण उचलून धरले. आतापर्यंत जे गोरे तुषार खरात यांच्याकडे दुर्लक्ष करत होते आणि त्या महिलेने केलेल्या केसमध्ये आपण निर्दोष मुक्त असल्याची समजूत करुन घेत होते, ते गोरे मुळापासून हादरले. कारण हे प्रकरण राज्यात आणि देशात चर्चेचा विषय झाले होते. मग गोरे यांनी विधिमंडळाच्या आवारात स्वतः तोंड उघडले. ते म्हणाले, ‘माझी बदनामी करणार्या संजय राऊत, रोहित पवार आणि तुषार खरात यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार.’
विधीमंडळात तर यांची या तिघांविरुद्ध हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला. त स्वीकारलाही गेला. त्यादिवशी तुषार खरात यांनी जयकुमार गोरे यांना विधिमंडळाच्या आवारात दोन प्रश्न विचारले. १) तुम्ही त्या महिलेची लेखी माफी मागितली होती का नव्हती ? २) तुम्ही त्या महिलेच्या मोबाईलवर नागडे फोटे पाठविले होते की नव्हते? (Jaykumar Gore Controversy)
टीव्हीवर लाईव्ह आण मोबाईलमधल्या यू ट्युबवर करोडो लोकांनी हे दोन प्रश्न ऐकले. शेकडो इंगळ्या एकाच वेळी डसाव्यात, असे हे प्रश्न होते. त्याची उत्तरे तेव्हा मिळाली नाहीत. उत्तर सोडा, त्यावरचा पुढचा उतारा आठवडाभरातच समोर आला.
तुषार खरातला अडकवण्याचे कारस्थान
फोटो आणि माफीनामा यासंबंधीचे प्रश्न ‘मारुती कांबळेचं काय झालं?’ या धाटणीचे होते. विधिमंडळाच्या आवारात काय घेऊन बसला, महाराष्ट्राच्या इतिहासात अनेक मंत्र्यांनी लफडी, कुलंगडी केली असतील. मंत्रीच काय घेऊन बसला, अनेक स्खलनशील लोकांनी पण अनेक डिजिटल भानगडी केल्या असतील, पण कुणी असे काही करणारास तुम्ही नागडे फोटो पाठविले का? असा तोंडावरचा प्रश्न प्रथमच. त्या किंवा तत्सम प्रश्नाची नसबंदी करायची तर हक्कभंग, अब्रुनुकसानीचा दावा हे मर्त्य माणसांनी करायचे उद्योग. मग पोलिसी आणि तीही फौजदारी. त्यातही पोलीस कोठडी मिळाली तरच अद्दल घडेल या मानसिकतेतून सापळे रचले गेले.
तुषार खरात हा काही ऐश्वर्यसंपन्न, श्रीमंत असा पत्रकार नव्हता. एका सामान्य घरातला मुलगा. काडी काडी जमा करुन त्याने मुंबईत आपला प्लॅटफॉर्म उभा केलेला. स्टाफचे पगार भागतील एवढे पण उत्पन्न नसते अशा उद्योगात. त्याच्याच समाजातला एक उपटसुंभ हेरला. आणि बोलक्या तुषारकडून आर्थिक विवंचना मिटेल असे होकार त्याच्या तोंडून वदवून घेतले गेले. ते रेकॉर्डिंग प्रमाण पुरावा मानून त्याच्यावर खंडणीची केस दाखल केली. अगदी असा पुरावा मिळाला नसता तरी कायद्याच्या भाषेत ‘हिअर से’ म्हणजे ‘तो मला असे म्हणाला होता,’ असा कुणाचा तरी जबाब घेऊन संजय राऊत, अरविंद केजरीवाल, संजय सिंह, अनिल देशमुख यांना कोणताही पुरावा नसताना जशी अटक केली, तशीच तुषार खरातला काहीही करुन अटक करण्यात आली असती.
तुषारची बाजू घेण्यात अडचण असणार्या तमाम लोकांना एवढे सांगायचे आहे की, त्याने जी कथित खंडणी मागितली ती कुणाकडे जाऊन नाही तर त्याच्याकडे जाऊन त्याला खंडणी मागायला प्रवृत्त केले आहे. किंवा तशी परिस्थिती निर्माण केली. तुषार तिथे चुकलाच म्हणून त्याला अडकविणारे राजा हरिश्चंद्राचे वारस ठरत नाहीत. झाले, तुषार एकदाचा आत गेला, पण अजूनही त्या पीडित महिलेच्या महिलेच्या बुरखाधारी वाणीची टांगती तलवार होतीच. (Jaykumar Gore Controversy)
वकिलाला फोडून महिलेला अडकवले
त्या पीडित महिलेने दि. १७ मार्च रोजी मुंबईत राजभवनासमोर मंत्री जयकुमार गोरे यांच्याविरुद्ध आंदोलन करण्याचा इशारा दिलेला. त्यापूर्वीच या आंदोलनकर्ती महिलेचा बंदोबस्त करणे आवश्यक होते. ज्याप्रमाणे तुषार खरात याला सापळा रचून सापळ्यात अडकेल अशी व्यवस्था करवून अटक केली. तशी सेम मोडस आपरेंडी त्या पीडित महिलेच्या बाबतीत वापरली गेली. त्यासाठी वाईतले एक चवचाल, बाटगे पात्र पुढे आले. त्याने त्या महिलेच्या वकिलाला गाठले. तो वकील महिलेपर्यंत पोहोचला.
हा खंडणीचाच सापळा होता. पण खंडणी झाली कायदेशीर शब्द. त्या महिलेला ‘भाऊ नुकसानभरपाई देऊ करताहेत,’ असा बनाव केला. ही नुकसानभरपाई खंडणीच्या केसमध्ये रुपांतरित होणार आहे, हे त्या पीडित महिलेच्या वकिलाला माहित होते. पण त्याचा वाटा ठरलेला होता. (तो ठरला तेवढा दिला की माहीत नाही.) त्यामुळे त्या वकिलाने दलाल हा शब्द सार्थ ठरवत मोहीम फत्ते केली. त्या महिलेला खंडणीची रक्कम घेताना अटक केली. त्याच वेळी पोलीस खंडणीच्या रकमेचे दहा बंडल मोजत असल्याचा आणि त्या नोटांपलीकडे ती महिला अत्यंत स्तब्ध, निश्चलपणे बसून असल्याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला.
फिर्यादीच झाले आरोपी
अशी अनेक प्रकरणे आहेत की, तिथे फिर्यादीच आरोपी झाले आहेत. साक्षीदार तुरुंगात आहेत. पत्रकारांना अटक होत आहे. उदाहरण घ्यायचे झाले तर गुजरातमध्ये संजीव भट, नागपुरात सतीश उईके. तुषार खरात आणि त्या पीडित महिलेची अटकही त्याच मालिकेत गणली जाऊ शकते. फक्त त्याची श्रेणी वेगळी असेल. भट आणि उईके यांच्या तुलनेत तुषार खरात आणि ती पीडित महिला तशी नशीबवान म्हणायला हवीत. कारण त्यांना आज ना उद्या जामीन मिळेल. आज पडलेल्या अनेक मुद्यांची, शंकांची उकल त्यावेळी होईल. पण जयकुमार गोरे आणि गुन्हे दाखल करण्याचा सापळा रचणार्या बाजारबुणग्या टोळीसाठी काही प्रश्न आजही लोक विचारत आहेत. त्याची उत्तरे त्यांच्याकडे नाहीत. पण हे प्रश्न घेऊन समाजमन जागृत आहे.
काही मूलभूत प्रश्न (Jaykumar Gore Controversy)
१) पाच महिन्यापूर्वी तुषार खरात याच्याकडून ऍट्रासिटी, मारहाण झाली. तेव्हाच तक्रार दाखल होऊन अटक का नाही झाली ?
२) या प्रकरणात बदनामी एकाची झाली. ती दुसर्याने केली मग तिसरा खंडणी कशी काय देतो आणि चौथा कथित बदनामी करणार्यास कसा अडकवतो, हा काय बरे प्रकार आहे?
३) जो कोणी तिसरा (संबंधित महिलेचा वकील) खंडणीची मागणी पुढे पोहोचवतो, ज्याची बदनामी झाली त्याच्याकडे खंडणी मागतो आणि तो आरोपीच होत नाही, हा काय प्रकार आहे ?
फडणवीस यांचे निवेदन
या विषयावर लिहिलेच पाहिजे असे काही नाही. पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा विधिमंडळाच्या पटलावरून गोरे प्रकरणात निवेदन करतात आणि त्यात जे मुद्दे मांडतात, वाक्यरचना सादर करतात, तेव्हा लिहिलेच पाहिजे असा हा प्रसंग आहे. फडणवीस म्हणतात, १) या प्रकरणात गोरे यांच्या बदनामीचा कट करण्यात आला आहे. २) त्यात शरद पवार गटाचे सुप्रिया सुळे, रोहित पवार, प्रभाकर देशमुख यांचा पण हात आहे. ३) त्या पीडित महिलेने २०१६ मध्ये केस केली, ती २०१९ ला संपली. ४) मी गोरे यांच्या हिंमतीला दाद देतो. (Jaykumar Gore Controversy)
फडणवीस यांनी आपल्या भाषणात मांडलेला पहिला मुद्दा घेऊ. २०१६ मध्ये केस झाली. पुराव्यासह ती कोर्टात उभी राहिली. मग तो आता झालेल्या बदनामीचा कट तोही आता कसा बरे होऊ शकतो?
त्यांचा दुसरा मुद्दा असा की, या बदनामीच्या कटात सुप्रिया सुळे, रोहित पवार, प्रभाकर देशमुख यांचा हात आहे. त्यासाठी ते फोन कॉल झाल्याचे आणि त्याचे रेकॉर्ड उपलब्ध असल्याचे सांगतात. कुणा पत्रकाराशी फोनवर बोलणे किंवा फोनवर चॅटिंग करणे कट असू शकतो का?
फडणवीस म्हणतात, त्या पीडित महिलेने दाखल केलेली केस २०१९ ला संपली. त्याबद्दल प्रश्न असे की, ती केस खरोखर सुनावणी घेऊन संपली का? गोरे म्हणतात तशी निर्दोष मुक्तता झाली का ? की तडजोड करुन संपविण्यात आली?
गोरे यांचा नागरी सत्कार करा, पण…
आता फडणवीस जे अत्यंत महत्त्वाचे उद्गार काढताहेत, त्याबद्दल बोलू. ते म्हणतात,’गोरे यांच्या हिंमतीला दाद देतो.’ द्या, द्या, दाद द्या, न्हाय तर नागरी सत्कार पण करा, पण तो करण्यापूर्वी जरा थोडे एक-दोन नमुने पाहू. मायणी येथील मेडिकल कॉलेजमध्ये कोरोना काळात मृत व्यक्तिंच्या नावे गोरे आणि त्यांच्या सहकार्यांनी अनुदान हडप केल्याची एक केस पेंडिंग आहे. तो पण हिंमतीने केलेला प्रकार आहे. याच कॉलेजच्या संस्थेत धर्मादाय आयुक्त कार्यालयात सादर करायला एक बनावट वर्तमानपत्र किंवा पेपर छापून एक जाहिरात/ प्रकटन सादर केल होते. त्याही प्रकरणात पोलीस केस झाली. प्रकरण अंगलट यायला लागल्यावर ज्याप्रमाणे तुषार खरात, पीडित महिला यांचे संभाषण रेकॉर्ड करण्यात आले, तसेच रेकॉर्डिंग करुन एक संपादक आणि त्या दैनिकाचा व्यवस्थापक याला अटक झाली. बनावट जाहिरात छापून, ती घेऊन कोर्टात सादर करणारे गोरे मोकळे आणि जिथे छापली ते अटकेत, असा झ्याक धंदा आहे. अशी ही हिंमत आहे.
…तर फडणवीस साहेब, तुम्ही ज्या हिंमतीला दाद देताय ना, ती रामशास्त्री प्रभुणे यांच्या न्यायालयात राघोबादादांनी गारद्यांना भले बहाद्दर म्हणावे, या सदरीची आहे.
त्या दोन प्रश्नांचे काय?
ज्याप्रमाणे फडणवीस यांच्या सदरेवर संजय राठोड ते अशोक चव्हाण अशा लोकांना क्लीन चीट मिळाल्या आहेत, तसेच हेही प्रकरण आहे. कुणी कितीही प्रयत्न केले तरी गोरे यांना राज्याचा नेता बनवायचा निर्धार केला आहे. गोरे यांनी मायणी प्रकरणाप्रमाणेच याही प्रकरणात फिर्यादीला आरोपी बनविले आहे. कुणाचीच सत्ता कधीच ताम्रपट घेऊन येत नाही. पेरलेले उगवतेच उगवते. कारण ते कसले तरी बीज असते. रावणाचे चौदा चौघड्यांचे राज्य कुच्च्या खाईत गेले. तो वाईट होता, पण अशोकवनात जाऊन भोंगळा झाला नव्हता. तो संदर्भ लक्षात घेतला तर गोरे किस खेत की मूली. काळासारखे उत्तम औषध नसते आणि तो काळ जे उत्तर देतो, ते सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट असते. याही प्रकरणाचा आणि एकूण गोरेंचा निवाडा यथावकाश होईल. तोपर्यंत मोबाईल स्क्रोल करणार्या लाखो लोकांच्या डोक्यात तुषार खरात यांनी विधिमंडळाच्या आवारात विचारलेले दोन प्रश्न आहेत. १) जयाभाऊ तुम्ही त्या महिलेच्या मोबाईलवर नागडे फोटे पाठविले होते की नव्हते आणि २) तुम्ही त्या महिलेची माफी मागितली होती का नव्हती ? (Jaykumar Gore Controversy)
आधुनिक युगाची सुरुवात होण्यापूर्वी जगभरात एक तर धर्माची सत्ता होती किंवा धर्माधिष्ठित राज्यसत्ता होती. लंडन धर्मप्रांताचे तेव्हाचे बिशप होते मैंडल क्रेयटन. त्यांना उद्देशून लॉर्ड एक्ट यांनी पत्र लिहिले. त्यातील पुढील ओळी जगभरात उध्दृत केल्या जातात. त्या ओळी अशा आहेत. ‘पॉवर टेन्डस् टू करप्ट अँड अपसुलेट पॉवर करप्टस् अपसुलेटली.’ अर्थात जी व्यक्ती सत्तेत असते तिला सत्ता भ्रष्ट बनविते आणि ज्याच्या हाती निरंकुश, पाशवी सत्ता असते ती त्या व्यक्तीला आकंठ भ्रष्ट करते. विषय त्याही पार पुढे गेलाय. सत्तेच्या शिलाजीत, व्हायग्रामुळे काही अवयव जरा मापाच्या बाहेर वळवळू लागतात, त्याचे हे उदाहरण आहे.
हेही वाचा :
असंवेदनशील, अमानवी
उच्च न्यायालयातील ७७ टक्के न्यायाधीश उच्च जातीचे