-प्रा. प्रशांत नागावकर : निष्पाप कलानिकेतन, इचलकरंजी या संस्थेने विष्णू सूर्या वाघ लिखित ‘बाई मी दगूड फोडते ‘ हे नाटक सादर केले. देविदास शंकर आमोणकर यांनी ते दिग्दर्शित केले होते. (Drama Competition)
भारतातील मँचेस्टर म्हणून प्रसिद्ध असलेले इचलकरंजी हे शहर. विशेष राबणाऱ्या कष्टकरी मजुरांचं शहर म्हणून प्रसिद्ध आहे. अशा ठिकाणच्या एखाद्या नाट्यसंस्थेने राबणाऱ्या कष्टकरी मजुरांच्या, स्त्रियांच्या न्याय हक्का विषयी विषयी नाटक निवडण, हे सहज आहे. कामगारांना आणि स्त्रियांना महत्त्व देणाऱ्या नाटकांची निवड करणे हे कौतुकास्पद आहे.
विष्णू सूर्या वाघ हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व होते. कवी, नाटककार, पत्रकार, चित्रकार,पटकथाकार, दिग्दर्शक अभिनेता, गायक तसेच आमदार, उपसभापती अशी ओळख असलेली हे व्यक्तिमत्व.अनेक जबाबदाऱ्या त्यांनी सहजतेने पार पाडल्या आहेत.
त्यांनी लिहिलेले (मूळ शीर्षक ‘ती बाई मीच आहे’) हे इचलकरंजीच्या निष्पाप कलानिकेतन संस्थेने ‘बाई मी दगूड फोडते’ या नावाने राज्य नाट्य स्पर्धेत सादर करण्यात आले.
‘नाटकातील नाटकाचे सादरीकरण,’ असं या नाटकाबाबत म्हणता येईल. एका मजूर कुटुंबाने दगड फोडण्याचे काम अंगावर घेतलेल्या असते. नवरा-बायको आणि बऱ्यापैकी मोठा असलेला मुलगा हे तिघेजण राब राब राबून रस्ता तयार व्हावा म्हणून आडवे येणारे दगड फोडण्याचे काम करत असतात. एके संध्याकाळी मोठे दगड फोडण्यासाठी सुरुंगाची पेरणी करतात पण त्याच वेळेला काही मुलं त्या दगडावर उभे असलेले त्यांना दिसतात. अशा वेळेला जीवाची परवा न करता आई-बाबांचा विरोध पत्करून लहानग्या दगडावर जातो आणि त्या मुलांना घेऊन येतो. तोच दोन सुरंगांचा स्फोट होतो. मोठ्या मुश्किलीने या मुलांचे प्राण वाचतात. तीन मुलं त्या कुटुंबाचे उपकार मानतात. (Drama Competition)
त्या मुलाला राहून राहून अजून तिसरा सुरुंग कसा फुटला नाही, याची चिंता लागून राहते. त्यावेळी त्या मुलाचा बाप आपण इथेच थांबू आणि सुरुंग फुटण्याची वाट बघू जेणेकरून त्या भागाकडे कोणी फिरकणार नाही, असे सांगतो.
यावेळी शहरातील या तीन मुलांनी आम्ही नाटक करतो, अशी ओळख करून दिल्यानंतर ते कुटुंब कसलं नाटक, असं विचारतात. त्यावर ते आपलं नाटक सादर करतात. यामध्ये वाट चुकलेला चौथाही येऊन मिसळतो. हे चौघेजण प्राचीन काळापासून स्त्रीवर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराचं नाटक सादर करतात. अनुसया, अहिल्या, द्रौपदी यांच्यावर ज्या पद्धतीने पुरुष व्यवस्थेने अन्याय केला, त्याचे चित्र ही मुलं कुटुंबासमोर करतात. या वेळेला कुटुंबातल्या स्त्रीला एक आत्मभान येण्यास सुरुवात होते. प्रत्येक वेळेला ती म्हणते की, यातली बाई मीच आहे. एवढी ती त्या नाटकाशी तन्मय होते. त्या मजूर कुटुंबातली स्त्रीला पूर्ण आत्मभान येते. आणि तीही पुरुषप्रधान व्यवस्थेच्या विरोधात संघर्ष करायला सिद्ध होते.
मूळ नाटकाचं नाव ‘बाई मी दगूड फोडते’ आणि त्या नाटकातील मुलं जे नाटक सादर करतात त्याचं नाव ‘ती बाई मीच आहे.’ दोन शीर्षक असलेली पण एकच आशय घेऊन दोन्ही नाटकांतून एकात्मक परिणाम साधला गेला आहे.
सर्वच कलाकारांनी नाटकाचे सादरीकरण अतिशय ताकदीने केले. विष्णू सूर्या वाघ या लेखकाने मांडलेल्या विषयाला, व्यक्त केलेल्या आशयाला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचा प्रयत्न केला. अक्षरश: जीव ओतून त्यांनी काम केले.
शंकर आणि त्याच्या बायकोची भूमिका करणारे अनुक्रमे अभिजीत फाटक आणि साक्षी पाटील यांनी मजूर कामगारांची ग्रामीण बोलीभाषा पुरेपूर आत्मसात करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर मजूर कामगारांची जीवनशैलीही त्यानी तितक्याच सहजपणे सादर करण्याचा प्रयत्न केला आहे.
आचला झालेल्या अनुजा कुलकर्णी हिने वेगवेगळी स्त्रीरूपे अत्यंत समर्थपणे प्रकट केली आहेत. ती ज्या सहजतेने अनुसया होते त्याच सहजतेने अहिल्या होते, त्याच सहजतेने द्रौपदीची भूमिका पार पाडते.
या तिन्ही भूमिका वेगवेगळ्या पण या सर्व स्त्रिया अन्यायाला बळी पडलेल्या. त्यांची व्यथा ताकतीने अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांपुढे सादर करण्यात ती पुरेपूर यशस्वी झालेली आहे. स्त्रियांची होणारी घुसमट तळमळ आणि विद्रोह तिने अत्यंत ताकतीने अभिनयीत केला आहे. तिला जयंत, अजय, अनिकेत यांची अनुक्रमे प्रतीक हुंद्रे, ओंकार चौगुले आणि रोहित कुरणे यांनी तितक्याच ताकतीने साथ दिली. सगळ्याच कलाकारांमध्ये थोडी ‘ओव्हर ॲक्टिंग’ ही दिसत होती.
लहानग्या अवधूत कुलकर्णीने आपली भूमिका समजून सादर करण्याचा प्रयत्न केला.
नेपथ्याची मांडणी करत असताना आडव्या रंगमंचाचे दोन भाग केलेले दिसतात. मागच्या भागात दगडांच्या काही रचना केल्या आहेत. मध्यभागी मोठा दगड त्या दगडाशेजारी वाळलेले झाडाचा केवळ कमी आकाराचा बुंधा. पण त्या झाडाच्या बुंध्यातून स्त्री प्रतिमेचा आकार स्पष्ट होतो. त्याला त्यावर पांढऱ्या रंगाचं विटलेलं, फाटलेलं वस्त्र आहे. काही ठिकाणी जमिनीतून काही उगवून आलेले आहे, हेही स्त्रीत्वाच्या सर्जनशीलतेचे प्रतीक म्हणून येतं. नेपथ्यातून प्रतिकात्मकता मांडण्यात नेपथ्यकार यशस्वी झाले आहेत. (Drama Competition)
प्रसंगाला साजेशी प्रकाश योजना आणि पार्श्वसंगीत यांनी नाटकातील अनेक प्रसंग हे उठावदार झाले आहेत.
नाटकातील नाटक सादर करत असताना दिग्दर्शक म्हणून देविदास शंकर आमोणकर यांना दुहेरी पद्धतीने काम करावं लागले. अनावश्यक हालचालींना फाटा देऊन प्रसंगातील आशय पोचवण्यात ते यशस्वी झाले आहेत.
नाटक : बाई मी दगूड फोडते
दिग्दर्शक : विष्णू सूर्या वाघ
सादरकर्ते : निष्पाप कलानिकेतन, इचलकरंजी
दिग्दर्शक : देविदास शंकर आमोणकर
नेपथ्य : प्रताप डांगरे, हर्षवर्धन कारंडे-देशमुख
संगीत : जॉय रॉड्रिक्स
प्रकाश योजना : अनिल सोनटक्के
रंगभूषा : सुनीता वर्मा
वेशभूषा : मृदूला झान्टे
भूमिका आणि कलावंत
शंकर : अभिजीत फाटक
पार्वती : साक्षी पाटील
लहानग्या : अवधूत कुलकर्णी
जयंत : प्रतिक हुंद्रे
अचला : अनुजा कुलकर्णी
अजय : ओंकार चौगुले
अनिकेत : रोहीत कुरणे
मुकादम : पंडित ढवळे
हेही वाचा :