कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ फुलेवाडी येथील प्रचारसभेत खासदार धनंजय महाडिक यांनी महिलांबाबत आक्षेपार्ह विधान करून आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी निवडणूक अधिकारी हरिष धार्मिक यांनी नोटीस दिली आहे. खासदार महाडिक यांनी आक्षेपार्ह विधानाचा तत्काळ खुलासा करावा, असे नोटिशीत म्हटले आहे.
भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ फुलेवाडी पाचवा स्टॉप येथील महात्मा फुले युवक मंडळाजवळ जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. सभेमध्ये खासदार महाडिक यांनी भाषणात लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊन काँग्रेसच्या रॅलीत सहभागी होणाऱ्या महिलांचे फोटो काढा, त्यांची नावे घ्या असा आदेश कार्यकत्यांना दिला होता. आपल्या शासनाचा लाभ घ्यायचा आणि त्यांचे गायचे हे चालणार नाही. महाराष्ट्रात अनेक महिला छाती बडवून आम्हाला पैसे नकोत, आम्हाला सुरक्षितता पाहिजे, असे म्हणतात. लाडकी बहीण योजनेवरून राजकारण करतात, अशी टीकाही केली होती. सभेला भाजप प्रदेश सचिव महेश जाधव, राजू मोरे, सागर घाडगे, मानसिंग पाटील, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
खासदार महाडिक यांच्या या वक्तव्याची ताबडतोब तीव्र प्रतिक्रिया उमटली. खासदार प्रणिती शिंदे, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांनी महाडिक यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्यावर टीका केली. सोशल मीडियावरही त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. खासदार सुप्रिया सुळे, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एक्सवर पोस्ट टाकून महाडिक यांच्या वक्तव्याचा निषेध केला. त्यानंतर खासदार महाडिक यांनी शनिवारी उशिरा रात्री महिलांच्याविषयी केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागून दिलगिरी व्यक्त केली. दरम्यान, महाडिकांच्या वक्तव्याची आज दिवसभर कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यभर चर्चा सुरु होती. महडिकांनी या वक्तव्याची माफी मागितली असली तरी त्यांनी केलेल्या महिलांच्या कार्यासंबंधीचा आलेख त्यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर शेअर केला गेला.
महाडिक यांची पार्श्वभूमी गुंडगिरी करण्याची असल्याने त्यांच्याकडून अशी वक्तव्ये होत आहेत. भाजपची ही महिलांवर उपकार केल्याची भावना आहे. यापूर्वी कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत धनंजय महाडिक यांनी जयश्री जाधव यांचा अपमान केला होता. आताही त्यांनी महिलांचा अपमान केला आहे. महाडिक या मातीतील नाहीत. त्यामुळे या मातीचा गुण त्यांना कळलेला नाही. योजना भाजपप्रणित महिलांसाठी आहे का?
-आमदार सतेज पाटील
लाडकी बहीण योजनेसंदर्भात माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला आहे. काँग्रेसच्या नेत्यांकडे बोलण्यासारखे काहीच मुद्दे राहिलेले नाहीत. त्यामुळे ते गैरसमज पसरवत आहेत. काँग्रेस रॅलीत सहभागी होणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला नसेल तर त्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी मी हे वक्तव्य केले आहे. महिलांचा अपमान करण्यासाठी किंवा धमकी देण्यासाठी वक्तव्य केलेले नाही.
-खासदार धनंजय महाडिक