पिंपरी : ‘बटेंगे तो कटेंगे’ म्हणणाऱ्यांचा अर्धा उत्तर प्रदेश आपल्याकडे येऊन पोट भरतो. समाजात फूट पाडणारी विधाने करून आमच्यावर काही परिणाम होणार नाही. ही सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील माणसे आहेत. येथे ‘बचेंगे तो और लढेंगे’ आणि ‘जुडेंगे और जितेंगे’ हे चालते. त्यामुळे सुसंस्कृत उमेदवार अजित गव्हाणे यांना निवडून द्या, असे आवाहन खासदार डॉ. अमोल कोल्हे सभेत केले.
महाविकास आघाडी राष्ट्रवादीचे भोसरीचे उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत कोल्हे बोलत होते. लोकसभेला मतांची कडकी बसल्यानंतर यांना लाडकी बहीण आठवली. बहिणींना १५०० रुपये देण्यास सुरुवात केली; पण २०१४ ला १५ लाख रुपये देण्याची केलेली भाषा १५०० रुपयांवर कधी आली, हे जनतेला समजले नाही. एका हाताने बहिणींच्या नावाखाली पैसे देतात आणि दुसऱ्या हाताने काढून घेतात, अशी टीकाही कोल्हे यांनी केली.