राधानगरी : भुदरगड विधानसभेचे विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर यांनी सलग तिसऱ्यांदा निवडून येत हॅटट्रिक केली आहे. या मतदारसंघातून हॅटट्रिक करणारे आबिटकर पहिले आमदार ठरले आहेत. यावेळी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत महायुती शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार प्रकाश आबिटकरांनी प्रारंभापासूनचे मताधिक्य शेवटच्या फेरीपर्यंत टिकवून ठेवले. परिणामी तालुक्यात दोनदा निवडून आलेला आमदार तिसऱ्यांदा निवडून येत नाही या शक्यतेला आबिटकरांनी सुरुंग लावला. गेल्या दोन निवडणुकांप्रमाणे याही वेळी ३८,५७२ मताधिक्याने विजय मिळविला आहे. गेली दहा वर्षे केलेली कामे, तरुण चेहरा, युवावर्गाचा पाठिंबा, कामाची तत्परता, मतदारसंघातील जनसंपर्क व वाड्या-वस्त्यांपर्यंत असलेला वावर या आबिटकरांच्या जमेच्या बाजू होत्या. (Prakash Abitkar)
कोल्हापूर
कोल्हापूर; प्रतिनिधी : लोकसभा निवडणूकीतील पराभव विसरुन महायुतीने विधानसभा निवडणूकीत दोनशेहून अधिक जागांवर आघाडी घेऊन सत्तास्थापनेकडे आश्वासक वाटचाल केली आहे. महाविकास आघाडीला दारुण पराभवास सामोरे जावे लागत असून मतदानाचा कलात त्यांचा आकडा ५० च्या आसपास स्थिर आहे. भाजपने १२५ अधिक जागांवर आघाडी घेतल्याने भाजपचा मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झाले असून केंद्रीय नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करणार की, सरप्राईज चेहरा देणार हे सायंकाळपर्यंत स्पष्ट होईल. (Mahayuti)
आज (दि.२३) सकाळी आठ वाजल्यापासून २८८ विधानसभा मतदारसंघात मतमोजणीस सुरुवात झाली. सुरुवातीपासून महाविकास आघाडीने पहिल्या टप्प्यात आघाडी घेतली होती. पण सकाळी दहा वाजेपर्यंत महायुतीने जबरदस्त मुसंडी मारुन दोनशे पारचा टप्पा गाठला. महायुतीतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. मंत्री अदिती ठाकरे, दीपक केसरकर, भाजपचे अमल महाडिक, यांनी विजय नोंदवला असून महायुतीच्या उमेदवारांनी मोठे मताधिक्य घेत विजयाकडे वाटचाल सुरु केली आहे.
मतमोजणीचा कल स्पष्ट होऊ लागल्यावर भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली. ढोल ताशाच्या गजरात गुलाल उधळून कार्यकर्त्यांनी नृत्य करुन आनंद साजरा केला. लाडू पेढे वाटून विजयाचा जल्लोष साजरा केला.
जयसिंगपूर; प्रतिनिधी : शिरोळ विधानसभा मतदारसंघातून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे ४१ हजार १९६ मताधिक्याने विजयी झाले आहेत. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून राजेंद्र पाटील यड्रावकर प्रत्येक फेरीत आघाडी घेतली. साडेबाराच्या सुमारास शिरोळ मधील ३०७ मतदान केंद्रावरील १२ टेबलवर २२ फेऱ्यांमध्ये मत मोजणी झाली. यात महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली. तर स्वाभिमानीचे उमेदवार उल्हास पाटील यांना जोराचा धक्का बसला असून त्यांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. शिरोळ तालुक्यातील जनतेने विकास कामांना प्राधान्य दिल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे. गत विधानसभेत राजेंद्र पाटील यड्रावकर २७००० च्या फरकांनी निवडून आले होते. (Rajendra Patil Yadravkar)
कोल्हापूर; प्रतिनिधी : जिल्ह्यातील दहाही विधानसभा मतदारसंघांतील मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. शनिवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. दहा मतदारसंघांतील २५ लाख ३२ हजार ६५७ मतांची मोजणी होणार आहे. सकाळी अकरा वाजेपर्यंत मतदानाचा कल स्पष्ट होणार आहे. मतमोजणीची प्रक्रिया दुपारी चार वाजेपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. (Kolhapur)
यंदा महिलांनी उत्फुर्तपणे मतदान केले असून चंदगड विधानसभा मतदारसंघात पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांचे मतदान जास्त झाले आहे. या मतदारसंघात पुरुष आणि महिला मतदानामध्ये महिलांचे २१४४ मतदान जास्त आहे.
दहा विधानसभा मतदारसंघांसाठी स्वतंत्र मतमोजणी ठिकाणे निश्चित केली असून कोल्हापूर शहरात कोल्हापूर उत्तर, कोल्हापूऱ् दक्षिण आणि करवीर मतदारसंघाची मोजणी होणार आहे. कोल्हापूर उत्तर आणि करवीर मतदारसंघाची मतमोजणी रमणमळा येथील शासकीय गोदामांच्या इमारतीत होणार आहे. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील मतमोजणी राजारामपुरीतील व्ही.टी. पाटील सभागृह ताराराणी विद्यापीठात होणार आहे. मतमोजणीच्यावेळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. निकालानंतर मिरवणुका काढण्यास बंदी घातली आहे. मतदान केंद्र परिसरात वाहतूकीस बंदी घातली असून पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात येणार आहे.
सकाळी आठ वाजता मतमोजणीस सुरुवात होणार असून सर्वप्रथम टपाली मतदानाची मोजणी होणार आहे. त्यानंतर ईव्हीएम मतमोजणीस सुरुवात होणार आहे. प्रत्येक मतमोजणी केंद्रात १४ टेबलांची व्यवस्था केली असून कोल्हापूर दक्षिण आणि हातकणंगले मतदारसंघात १६ टेबलांची व्यवस्था केली आहे. (Kolhapur)
शिवाजी विद्यापीठ-मिड स्विडन विद्यापीठातील संशोधन प्रकल्प समाजासाठी उपयुक्त
कोल्हापूर; प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठ आणि मिड स्विडन विद्यापीठातील संशोधन प्रकल्प समाजासाठी उपयुक्त ठरेल. त्याचबरोबर, दोन्ही देशातील संशोधकांना संशोधनातील नवीन संधी उपलब्ध होणार आहे, असा विश्वास प्रा.मॅग्नस् हमेलगार्ड यांनी व्यक्त केला. (Shivaji University)
शिवाजी विद्यापीठ आणि मिड स्विडन विद्यापीठ यांच्यामध्ये संयुक्त संशोधन प्रकल्प मंजुर झाला असून त्या अनुषंगाने मिड स्विडन विद्यापीठाचे प्रा.मॅग्नस् हमेलगार्ड, संशोधक डॉ.मनिषा फडतारे व रोहन पाटील यांनी प्रकल्पाअंतर्गत पुढील नियोजनासाठी नुकतीच विद्यापीठाला भेट दिली. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सभागृहामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी, दोन्ही विद्यापीठांमधील या महत्वपूर्ण संशोधन प्रकल्पाच्या वाढीसाठी शिवाजी विद्यापीठ सहकार्य करेल, अशी ग्वाही कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के यांनी दिली. बैठकीस प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ.विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.अजितसिंह जाधव, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ.तानाजी चौगुले, अधिष्ठाता डॉ.श्रीकृष्ण महाजन, डॉ.महादेव देशमुख, डॉ.सरिता ठकार, आयक्यूएसी कक्षाचे संचालक डॉ.सागर डेळेकर, आंतरराष्ट्रीय व्यवहार कक्षाचे डॉ.शिवाजी सादळे, डॉ.कैलास सोनवणे, डॉ.अनिल घुले, डॉ.चंद्रकांत लंगरे, नॅक विभागाचे डॉ.सुभाष माने आदी उपस्थित होते. युसिक अधिविभागप्रमुख डॉ.ज्योतीप्रकाश यादव यांनी प्रकल्पाचा उद्देश आणि स्वरूप याची माहिती दिली. (Shivaji University)
हेही वाचा :
कोल्हापूरः येथील ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक, संशोधक डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी अथक परिश्रमातून तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या समग्र वाड्.मयाचे १८ खंड साकारले आहेत. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेल्या या खंडांचा प्रकाशन समारंभ कोल्हापुरात शुक्रवारी ( दि. २२) होणार आहे.
दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्यावतीने आयोजित केलेला हा समारंभ शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता राम गणेश गडकरी सभागृह, पेटाळा येथे होईल. दिल्ली येथे होणा-या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांच्या हस्ते प्रकाशन समारंभ होईल. यावेळी डॉ. लवटे यांच्यासह ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर आणि किशोर बेडकिहाळ प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. तारा भवाळकर यांचा सत्कार यावेळी करण्यात येणार आहे. कोल्हापूर आणि परिसरातील साहित्य रसिकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन साहित्य सभेचे कार्यवाह डॉ. विनोद कांबळे यांनी केले आहे.
कोल्हापूर; प्रतिनिधी : विधानसभा निवडणूकीतील मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली असून आता शनिवारी (दि.२३) निकालाची उत्सुकता लागली आहे. जिल्हा प्रशासन मतमोजणीसाठी सज्ज झाले असून सर्व इव्हीएम मशिन स्ट्राँगरुममध्ये सीलबंद करण्यात आले आहेत.
बुधवारी मतदान झाल्यानंतर दहा मतदारसंघातील मतमोजणीच्या ठिकाणी असलेल्या स्ट्राँगरुममध्ये मतदानयंत्रे आणली आहेत. त्या ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवण्यात आली असून सीसीटीव्हीची नजर ठेवण्यात आली आहे. शनिवारी सकाळी स्ट्राँगरुम उघडण्यात येणार असून सकाळी आठ वाजता मतमोजणीस सुरुवात होणार आहे. सुरवातीला टपाली मतदान मोजण्यात येईल. त्यासाठी स्वतंत्र टेबल आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघानुसार मतमोजणीसाठी ठिकाणे निश्चित केली असून त्यासाठी १४ टेबलवर मतमोजणी होणार आहे. फक्त कोल्हापूर दक्षिण आणि हातकणंगले मतदारसंघासाठी १६ टेबलची व्यवस्था केली आहे. ईव्हीएमवरील मतमोजणीसाठी ६३३ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
जिल्ह्यातील दहा मतदारसंघातील मतमोजणी खालील ठिकाणी होणार आहे.
- चंदगड : पॅव्हेलियन हॉल गांधीनगर, नगरपरिषद, गडहिंग्लज
- राधानगरी : तालुका क्रीडा संकुल, जवाहर बाल भवन, गारगोटी
- कागल : जवाहर नवोदय विद्यालय, सांगाव रोड, कागल
- कोल्हापूर दक्षिण : व्ही.टी. पाटील सभागृह, ताराराणी विद्यापीठ, राजारामपुरी.
- करवीर : शासकीय धान्य गोदाम क्र. डी, रमणमळा कसबा बावडा.
- कोल्हापूर उत्तर : शासकीय धान्य गोदाम क्र. ए, रमणमळा कसबा बावडा.
- शाहूवाडी : जुने शासकीय धान्य गोदाम, शाहूवाडी
- हातकणंगले : शासकीय धान्य गोदाम- नंबर २, हातकणंगले.
- इचलकरंजी : राजीव गांधी सांस्कृतिक भवन, इचलकरंजी
- शिरोळ : मध्यवर्ती प्रशासकीय इमारत
कोल्हापूर; प्रतिनिधी : जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत चुरशीचे मतदान झाले. राज्यात सर्वांत जास्त मतदानाचा बहुमान कोल्हापूर जिल्ह्याला मिळाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ७६.२५ टक्के मतदान झाले. जिल्ह्यात एकूण १० विधानसभा मतदारसंघ आहेत. या दहा मतदारसंघांपैकी करवीर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ८४.७९ टक्के मतदान झाले. प्रचंड राजकीय ईर्ष्या, दिग्गज उमेदवार, कार्यकर्त्यांची फौज, जागरुक मतदार आणि लाडकी बहीण योजना, व्होट जिहाद या प्रचारांच्या मुद्द्यामुळे मतदानाचा टक्का वाढला असल्याची चर्चा आहे. जिल्हा प्रशासनानेही मतदानाचा टक्का वाढावा यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवल्याचा परिणाम म्हणून मतदान टक्केवारी वाढली आहे. (Maharashtra Election)
जिल्ह्यात ८० टक्क्याच्या वर करवीर आणि कागल मतदारसंघात मतदान झाले. करवीर मतदारसंघात करवीर आणि दुर्गम गगनबावडा, पन्हाळा तालुक्यातील भाग येत असून मतदानाची टक्केवारी वाढल्याचे दिसते. या मतदारसंघात काँग्रेसकडून राहुल पाटील आणि शिवसेना शिंदे गटाकडून माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्यात लढत झाली आहे. जास्त मतदानाचा फायदा कोणाला मिळणार हे मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे.
राजकीय विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कागल मतदारसंघात ८१.७२ टक्के मतदान झाले. मतदारसंघात कागल तालुका, गडहिंग्लज पालिका आणि एक जिल्हा परिषद मतदार संघ, आजरा तालुक्यातील एका मतदारसंघाचा समावेश आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे या दोन तुल्यबळ उमेदवार आणि राष्ट्रवादीच्या दोन गटांत निवडणूक झाली. या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
राधानगरी, शाहूवाडीला ७५ टक्क्यांवर
७५ टक्क्याच्यावर राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ आणि हातकणंगले मतदारसंघात मतदान झाले. शाहूवाडी मतदारसंघात शाहूवाडी आणि पन्हाळा तालुक्यातील गावांचा समावेश असून या मतदारसंघात ७९.०४ टक्के म्हणजे जवळजवळ ८० टक्के मतदान झाले आहे. आमदार विनय कोरे आणि माजी आमदार सत्यजित पाटील या पारंपरिक विरोधकांमध्ये येथे सामना आहे. या मतदारसंघात पन्हाळा की शाहूवाडी बाजी मारणार हे निकालात दिसून येणार आहे. राधानगरी मतदारसंघात ७८.२६ टक्के मतदान झाले. या मतदारसंघात राधानगरी आणि भुदरगड तालुक्यासह आजरा तालुक्यातील गावांचा समावेश होते. आमदार प्रकाश आबिटकर आणि माजी आमदार के. पी. पाटील यांच्यात आणि शिवसेनेच्या दोन गटांत लढत होत आहे. (Maharashtra Election)
शिरोळ, हातकणंगले मतदारसंघात मतदानाचा आकडा ७५ टक्क्याच्यावर पोचला आहे. ऊस आणि साखर कारखानदाराचा पट्टा ओळखल्या जाणाऱ्या शिरोळ मतदारसंघात ७८.०६ टक्के मतदान झाले आहे. या मतदारसंघात तिरंगी लढत असून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी आमदार उल्हास पाटील आणि गणपतराव पाटील यांच्यात लढत होणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या या मतदारसंघात माजी खासदार राजूशेट्टी यांची प्रतिष्ठा पणास लागली आहे. हातकणंगले तालुक्यातही तिरंगी लढत होत असून या मतदारसंघात ७५.५० टक्के मतदान झाले आहे. आमदार राजूबाबा आवळे, माजी आमदार सुजीत मिणचेकर आणि अशोकराव माने यांच्यात लढत होत आहे.
संवेदनशील मतदारसंघ अशी ओळख असलेल्या कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात मतदानाचा टक्का जवळजवळ ७५ टक्क्याच्या आसपास ७४.९५ टक्क्यावर पोचला. आमदार ऋतुराज पाटील आणि माजी आमदार अमल महाडिक या घराण्यात होत आहे. विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील, खासदार धनंजय महाडिक यांची प्रतिष्ठा पणास लागली आहे. चंदगड विधानसभा मतदारसंघात ७४.६१ टक्के मतदान झाले. या मतदारसंघात गडहिंग्लज, चंदगड आणि आजरा तालुक्यातील गावांचा समावेश आहे. आमदार राजेश पाटील यांना नंदाताई बाभुळकर, अप्पी पाटील, शिवाजी पाटील यांनी आव्हान दिल्याने इथे चौरंगी लढत होणार आहे. (Maharashtra Election)
मॅचेंस्टर सिटी म्हणून ओळख असलेल्या इचलकरंजी मतदारसंघात ६८.९५ टक्के मतदान झाले आहे. राहुल आवाडे आणि मदन कारंडे यांच्यात थेट लढत असून नवीन चेहऱ्याचा आमदार इचलकरंजीला मिळणार आहे. जिल्ह्यात सर्वात कमी मतदान ६५.५१ टक्के कोल्हापूर उत्तर मतदारसंघात झाले आहे. माजी आमदार राजेश क्षीरसागर आणि माजी नगरसेवक राजेश लाटकर यांच्यात लढत होणार आहे.
मतदारसंघनिहाय टक्केवारी
- चंदगड ७४.६१
- राधानगरी ७८.२६
- कागल ८१.७२
- कोल्हापूर दक्षिण ७४.९५
- करवीर ८४.७९
- कोल्हापूर उत्तर ६५.५१
- शाहूवाडी ७९.०४
- हातकणगंले ७५.५०
- इचलकरंजी ६८.९५
- शिरोळ ७८.०६
हेही वाचा :
कोल्हापूर; प्रतिनिधी : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील कसबा बावडा परिसरात शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटात वाद झाल्याने तणाव निर्माण झाला. बावड्यात राडा झाला, अशी माहिती मिळाल्यावर महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेसच्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी धाव घेतली. दोन्ही गटांनी सामंजस्यांची भूमिका घेतल्याने तणाव निवळण्यास मदत झाली. आमदार सतेज पाटील यांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे वाद निवळण्यास मदत झाल्याची चर्चा कसबा बावड्यात सुरू होती.
कसबा बावड्यातील सर्व मतदान केंद्रांवर चुरशीने मतदान सुरू होते. दुपारी शिवसेनेचे उमेदवार कसबा बावडा येथील बलभीम विद्यालय मतदान केंद्रावर आले. यावेळी क्षीरसागर यांचे निष्ठावंत कार्यकर्ते सुनील जाधव यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख राहुल माळी यांना ‘तू निष्ठावंत नाहीस’ असे म्हणून शिवीगाळ केली. राहुल माळी यांनी शिवगाळ करून सुनील जाधव यांना प्रत्युत्तर दिल्याने तणाव निर्माण झाला. जाधव यांचे चिरंजीव आदर्श जाधव हे राहुल माळी याच्या अंगावर धावून गेले. ही घटना वाऱ्यासारखी कसबा बावड्यात पसरली. बावड्यातील तरुण दत्त मंदिर कार्यालयाजवळ बलभीम विद्यालयाजवळ जमू लागले. घटनेचे गांभीर्य ओळखून राजेश क्षीरसागर आणि सत्यजित कदम यांनी सुनील जाधव आणि त्यांचा चिरंजीव यांना आपल्या वाहनात घेतले आणि बलभीम गल्लीतून निघून गेले. त्यांच्या पाठोपाठ बावड्यातील काही तरुण मोटारसायकलवरून पाठलाग करत बावड्याच्या मुख्य रस्त्यावर पोचले.
कवडे गल्लीच्या कोपऱ्यावर बावड्यातील तरुणांनी राहुल माळी यांना धक्काबुक्की का झाली म्हणून क्षीरसागर आणि कदम यांना विचारणा केली. यावेळी परिसरात मोठा जमाव जमला. काही जागरूक नागरिकांनी प्रसंगावधान राखून क्षीरसागर आणि कदम यांना कसबा बावडा मिसळ येथील हॉटेलमध्ये बसण्यास सांगितले. दरम्यान, वादाची घटना कळताच आमदार सतेज पाटील कसबा बावड्यात कवडे गल्लीत आले. यावेळी जमाव आक्रमक होता. कवडे गल्ली ते बावडा मिसळ हॉटेल हे अंतर अवघे १५ ते वीस फुटांचे होते. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून सतेज पाटील यांनी जमावाला भगव्या चौकात नेले. भगवा चौकात त्यांनी तरुणांना शांततेचे आवाहन केले. .” मी राहुलच्या पाठीशी भक्कम आहे. आपण प्रत्येक गोष्टीचा हिशेब करायचा. पण अजून मतदान व्हायचे आहे, प्रत्येकाने आपल्या बूथवर जाऊन जास्तीत जास्त मतदान करून घ्यावे, अशी विनंती त्यांनी तरुणांना केली. भगवा चौकात जमाव असल्याचे लक्षात घेऊन पोलिसांनी राजेश क्षीरसागर आणि सत्यजित कदम यांना दुसऱ्या रस्त्यावरून बाहेर काढून समयसूचकता दाखवली. सतेज पाटील यांनी संयम दाखवून कार्यकर्त्यांना शांत राहण्यास सांगितले. त्यामुळे परिसरातील तणाव निवळला आणि पुन्हा मतदान प्रक्रियेस सुरुवात झाली.
कोल्हापूर; प्रतिनिधी : मतदारांनी दाखवलेल्या मोठ्या प्रतिसादामुळे आज, बुधवारी जिल्ह्यातील दहाही मतदारसंघांत अतिशय चुरशीने मतदान झाले. शहरी आणि ग्रामीण भागात मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. सकाळी संथ गतीने सुरू झालेल्या मतदानाने दुपारनंतर वेग पकडत सायंकाळी पाच वाजेपर्यंत ६७.९७ टक्क्यांचा टप्पा गाठला. सायंकाळी सहा वाजता मतदानाचा आकडा ७२ टक्क्यांच्या पुढे पोचल्याची शक्यता वर्तवली जात आहे. शनिवारी, २३ रोजी मतमोजणी होणार असून त्यानंतर मतदारांचा कौल महायुतीकडे की महाविकास आघाडीकडे हे स्पष्ट होणार आहे.
आजच्या मतदानाने पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी मंत्री आमदार विनय कोरे, माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील- यड्रावकर, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजूबाबा आवळे, आमदार राजेश पाटील, माजी आमदार अमल महाडिक, के. पी. पाटील, सत्यजित पाटील, डॉ. सुजित मिणचेकर, उल्हास पाटील, चंद्रदीप नरके, समरजित घाटगे, राहूल पाटील, राहूल आवाडे, गणपतराव पाटील, नंदिनी बाभूळकर, शिवाजी पाटील, अप्पी पाटील, राजेश लाटकर, अशोकराव माने या प्रमुख उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले.
मतदारांनी सकाळी सात वाजल्यापासूनच मतदान केंद्रांवर रांगा लावल्या होत्या. नवमतदार, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, तृतीयपंथी मतदारांनी उत्साहात मतदान केले. प्रथमच मतदानाचा हक्क बजावणाऱ्या युवा मतदारांचा उत्साह वाखाखण्याजोगा होता. तरुणांनाही लाजवेल अशा ८५ वर्षांहून अधिक वय असलेल्या ज्येष्ठ मतदारांचा उत्साह दांडगा होता. जिल्हा प्रशासनाच्यावतीने मतदान केंद्रावर येऊन मतदान करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांना मतदान केल्याबद्दल सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कसबा बावडा, सदर बाजार, पुलाची शिरोली, कागलमध्ये काही ठिकाणी तणावाचे प्रसंग निर्माण झाले. त्या ठिकाणी पोलिस आणि राजकीय नेत्यांनी वाद शमवण्यासाठी प्रयत्न केले.
सकाळी नऊ वाजेपर्यंत जिल्ह्यात ९.५३ टक्के मतदान झाले. त्यानंतर मतदानाचा आकडा झपाट्याने वाढू लागला. शहरी आणि ग्रामीण भागात मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. राजकीय पक्षांचे कार्यकर्ते पक्षाला मतदान करण्याचे आवाहन करत होते. उमेदवार प्रत्येक मतदारसंघ आणि गावांना भेटी देऊन मतदानाचा कानोसा घेत होते. उमेदवारांचे सर्व कुटुंबीय मतदारसंघातून फिरून मतदारांच्या गाठीभेटी घेत होते. मतदान केंद्रावर नवमतदारांकडून सेल्फी काढून तो शेअर करण्याकडे ओढा होता. थिमॅटिक मतदान केंद्रावर सर्व वयोगटातील मतदार मोबाईलवर फोटो घेत होते. मोबाईल घेऊन जाण्यास मतदान केंद्रावर बंदी असल्याने अनेक मतदारांची अडचण झाली होती, पण यावेळी पोलिस यंत्रणेने मोबाईल वापरण्यास मज्जाव केल्याचे दिसून आले.
जिल्ह्यात सकाळी अकरा वाजता २०.५९, तर एक वाजता ३६.५६ टक्के मतदान झाले. त्यानंतर मतदानाचा टक्का वाढू लागला. दुपार असूनही मतदान केंद्रांवर रांगा होत्या. तीन वाजता मतदानाने निम्मा टप्पा गाठत ५४,०६ टक्केपर्यंत मजल मारली. तीन वाजता शाहूवाडी मतदारसंघात सर्वाधिक ६१.७० टक्के मतदान झाले. दुपारी तीननंतर कागल, शाहूवाडी, कोल्हापूर दक्षिण, चंदगड, राधानगरी, करवीर मतदारसंघात चुरशीने मतदान झाले. सायंकाळी पाच वाजता जिल्ह्यात ६७.९७ टक्के मतदान झाले. कागल मतदारसंघात ७४.३३ टक्के मतदानाची नोंद झाली. शेवटच्या तासात शिल्लक मतदान शोधण्यासाठी यंत्रणा लावण्यात आली. सहा वाजता मतदान संपण्यापूर्वी काही मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. त्यांना मतदान करू देण्यात आले.
१४३ थिमॅटिक मतदान केंद्रावर
जिल्ह्यात वैशिष्ट्यपूर्ण संकल्पानांवर आधारित १४३ थिमॅटिक मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. ही मतदान केंद्रे पाहण्यासाठी व येथील मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी नागरिक व मतदारांनी गर्दी केली होती. मतदान केंद्रांवर लावण्यात आलेल्या सेल्फी पॉइंटवर छायाचित्रे घेण्यासाठी तरुणांसह वयोवृद्ध मतदारांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. ऑलिंपिकवीर स्वप्नील कुसाळे याच्या कांबळवाडी गावात स्वप्नीलच्या ऑलिंपक यशाचे पोस्टर लावून केंद्र सजवण्यात आले होते. अनेक मतदान केंद्रांवर रांगोळ्या घालण्यात आल्या होता. लेक वाचवा, प्लास्टिक बंदी, मोबालचे दुष्परिरणाम, प्रदूषण, कोल्हापूरची वैशिष्ट्ये असलेल्या गूळ, कोल्हापूर चप्पल, मधाचे गाव अशी थिमॅटिक केंद्रे उभारण्यात आली होती.
अधिकाऱ्यांनी बजावला मतदानाचा हक्क
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील दत्ताबाळ विद्यामंदिर या मतदान केंद्रावर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला, तर शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू दिगंबर शिर्के यांनी वाठार तर्फ वडगाव येथे मतदान केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी कसबा बावडा येथील भाऊसो महागावकर विद्यामंदिर येथे मतदान केले. तसेच जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्यासह विविध विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावला.
दोन मतदान केंद्रांत बिघाड
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील विक्रमनगर हायस्कूल येथे सकाळी साडेसात वाजता व्हीव्हीपॅट बंद पडले. त्यानंतर ते बदलण्यात आले आणि मतदानास सुरुवात झाली. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील नेहरूनगर येथे सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ईव्हीएम मशिनचे बटण खराब झाल्याने मतदान थांबवण्यात आले. अर्धा तासानंतर मशीन बदलण्यात आले. त्यावेळी मतदान केंद्रांच्या बाहेर रांगा लागल्या होत्या. मतदारांनी घरी न जाता रांगेत थांबून उशीर झाला असतानाही मतदानाचा हक्क बजावला.