किंग्जटाउन : जाकेर अलीचे नाबाद अर्धशतक आणि गोलंदाजांच्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर बांगलादेशने वेस्ट इंडिजला तिसऱ्या टी-२० मध्ये ८० धावांनी नमवले. याबरोबरच मालिकेतील तीनही सामने जिंकून बांगलादेशने ३-० असा एकतर्फी मालिकाविजय साकारला. बांगलादेशला प्रथमच वेस्ट इंडिजविरुद्ध एकतर्फी मालिका जिंकण्यात यश आले. (Bangladesh T-20)
टी-२० मालिकेपूर्वी झालेली बांगलादेशविरुद्धची वन-डे मालिका विंडीजने ३-० अशी जिंकली होती. त्याचा वचपाही बांगलादेशने काढला. अखेरच्या टी-२० मध्ये बांगलादेशच्या ७ बाद १८९ धावांच्या प्रत्युत्तरात यजमानांचा डाव १६.४ षटकांमध्ये १०९ धावांत संपुष्टात आला. बांगलादेशतर्फे जाकेर अलीने ४१ चेंडूंमध्ये नाबाद ७२ धावांची खेळी करताना ३ चौकार व ६ षटकार लगावले. त्याला परवेझ हुसैन इमोन (३९ धावा) आणि मेहदी हसन मिराझ (२९ धावा) यांच्याकडून उपयुक्त साथ लाभली.
दुसरीकडे, विंडीजचे फलंदाज बांगलादेशच्या गोलंदाजांचा सामना करण्यात अपयशी ठरले. रोमारिओ शेफर्डचा अपवाद वगळता विंडीजच्या एकाही फलंदाजास वैयक्तिक ३० धावांचा टप्पाही ओलांडता आला नाही. शेफर्डने २७ चेंडूंमध्ये एक चौकार व तीन षटकारांसह ३३ धावा केल्या. बांगलादेशकडून रिशाद हुसैनने ३, तर तस्किन अहमद आणि माहेदी हसन यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या. (Bangladesh T-20)
हेही वाचा :