चेन्नई : भारताचा युवा बुद्धिबळपटू अरविंद चिदंबरमने चेन्नई ग्रँडमास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. या स्पर्धेच्या अखेरच्या फेरीपर्यंत विजेतेपदासाठी चुरस पाहायला मिळाली. अरविंदने अगोदर पऱ्हम मॅगसुदलूला पराभूत करून विजेतेपदासाठी दावेदारी सांगितली. अरविंदसह लिव्हॉन अरॉनियन आणि अर्जुन एरिगैसी हे बुद्धिबळपटूही गुणतक्त्यात संयुक्तरीत्या प्रथम स्थानावर असल्याने विजेतेपदाकरिता टायब्रेकर लढती खेळवण्यात आल्या. या टायब्रेकर लढतींमध्ये अरविंदने अन्य दोन बुद्धिबळपटूंवर मात करून विजेतेपद निश्चित केले. या विजेतेपदासह अरविंदने २७०० एलो रेटिंग प्राप्त करणाऱ्या बुद्धिबळपटूंमध्ये स्थान पटकावले असून, अशी कामगिरी करणारा तो सहावा भारतीय बुद्धिबळपटू ठरला आहे. यापूर्वी अरविंदने २०१८ आणि २०१९ या सलग दोन वर्षी राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद पटकावले होते. (Aravindh Chithambaram)
क्रीडा
शारजा, वृत्तसंस्था : रहमानुल्ला गुरबाझचे शतक आणि अझमतुल्ला ओमरझाईच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर अफगाणिस्तानने बांगलादेशविरुद्धच्या वन-डे क्रिकेट मालिकेतील तिसऱ्या व अखेरच्या सामन्यात ५ विकेटनी विजय मिळवला. या विजयासह अफगाणिस्तानने ही मालिका २-१ अशी जिंकली.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने ५० षटकांत ८ बाद २४४ धावा केल्या. सुरुवातीच्या विकेट झटपट गेल्यामुळे बांगलादेशची अवस्था पंधराव्या षटकात ४ बाद ७२ अशी झाली होती. तथापि, महमदुल्ला आणि कर्णधार मेहदी हसन मिराझ यांनी पाचव्या विकेटसाठी १४५ धावांची भागीदारी रचत बांगलादेशला दोनशेपार मजल मारून दिली. बांगलादेशचा मधल्या फळीतील अनुभवी फलंदाज महमदुल्लाने ९८ चेंडूंमध्ये ७ चौकार व ३ षटकारांसह ९८ धावांची खेळी केली. त्याचे शतक अवघ्या दोन धावांनी हुकले. कर्णधार मेहदी हसन मिराझने ४ चौकारांसह ११९ चेंडूंमध्ये ६६ धावा करून त्याला साथ दिली. अफगाणिस्तानकडून ओमरझाईने ३७ धावांत ४ विकेट घेतल्या.
बांगलादेशचे आव्हान अफगाणिस्तानने ४८.२ षटकांत ५ विकेटच्या मोबदल्यात पार केले. अफगाणिस्तानचा सलामीवीर गुरबाझने ५ चौकार व ७ षटकारांसह १२० चेंडूंमध्ये १०१ धावा फटकावल्या. त्याचे हे आठवे वन-डे शतक ठरले. त्याने ओमरझाईसोबत शतकी भागीदारीही रचली. ओमरझाईने ७७ चेंडूंमध्ये ३ चौकार व ५ षटकारांसह नाबाद ७० धावा केल्या. गुरबाझ बाद झाल्यानंतर ओमरझाईने महंमद नबीच्या साथीने अफगाणिस्तानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
संक्षिप्त धावफलक : बांगलादेश – ५० षटकांत ८ बाद २४४ (महमदुल्ला ९८, मेहदी हसन मिराझ ६६, सौम्य सरकार २४, अझमतुल्ला ओमरझाई ४-३७, महंमद नबी १-३७) पराभूत विरुद्ध अफगाणिस्तान – ४८.२ षटकांत ५ बाद २४६ (रहमानुल्ला गुरबाझ १०१, अझमतुल्ला ओमरझाई नाबाद ७०, महंमद नबी नाबाद ३४, नाहिद राणा २-४०, मुस्तफिझूर रहमान २-५०).
कोलकाता, वृत्तसंस्था : मागील वर्षभरापासून दुखापतीमुळे स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर असणारा भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हा रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेद्वारे पुनरागमन करणार आहे. बुधवारपासून सुरू होणाऱ्या मध्य प्रदेशविरुद्धच्या सामन्यात शमी बंगाल संघाकडून खेळेल. (Mohammed Shami)
मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये वन-डे क्रिकेट वर्ल्ड कपच्या अंतिम सामना खेळल्यानंतर ३४ वर्षीय शमीला पायाचा घोटा दुखावल्यामुळे क्रिकेटपासून दूर राहावे लागले होते. या दुखापतीमुळे त्याच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. नुकत्याच झालेल्या भारत-न्यूझीलंड कसोटी मालिकेमध्ये शमी खेळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती. तथापि, पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याने त्याचा समावेश संघात न करण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) घेतला.
याच कारणास्तव ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठीही त्याची भारतीय संघात निवड करण्यात आली नाही. तथापि, आता शमीने रणजी स्पर्धेत फिटनेस सिद्ध केल्यास बॉर्डर-गावसकर मालिकेतील पुढील सामन्यांसाठी त्याची निवड होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. (Mohammed Shami)
दरम्यान, शमीच्या समावेशामुळे बंगाल संघाची ताकद वाढली असल्याची माहिती बंगाल क्रिकेट संघटनेचे (कॅब) सचिव नरेश ओझा यांनी दिली. बंगाल-मध्य प्रदेश सामना बुधवारपासून इंदूरच्या होळकर स्टेडियमवर रंगणार आहे.
वारणानगर; प्रतिनिधी : येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाच्या १९ वर्षाखालील मुलींच्या संघाने शालेय राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. अकलूज जि. सोलापूर येथे या स्पर्धा पार पडल्या. वारणा महाविद्यालयाच्या कु.जानवी संजय खामकर, हर्षदा बाबासो शेळके व तनिष्का प्रदीप जगताप यांची निवड पतियाला (पंजाब) येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. (Warana college)
या स्पर्धेतील अंतिम सामना यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय, (कोल्हापूर विभाग) व के एस कॉलेज (मुंबई विभाग) यांच्यामध्ये झाला. यामध्ये कोल्हापूर विभागांने आठ गुणांनी सामना जिंकून राज्यस्तरावर अव्वल स्थान पटकावले.
वारणा माहवद्यालयाच्या संघाकडून उत्कर्षा सूर्यवंशी, आर्या भोसले, समृद्धी जाधव, ऋतिका गोसावी, वैष्णवी पाटील, प्रतीक्षा सिद, प्रणाली वांईगडे जिज्ञासा घोगे व समृद्धी पाटील यांनी संपुर्ण स्पर्धेत चमकदार कामिगरी केली. विजयी संघास श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. विनयरावजी कोरे (सावकर), मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विलास कार्जीनी, डॉ. कल्पना पाटील, प्राचार्य डॉ. ए. एम शेख, जिमखाना प्रमुख प्रा. क्रांतीकुमार पाटील, प्रशिक्षक उदय जाधव, उदय पाटील, रोहित घेवारी यांचे मार्गदर्शन मिळाले.
हेही वाचा :
पर्थ, वृत्तसंस्था : पर्थमध्ये झालेल्या वन-डे मालिकेतील निर्णायक सामन्यात पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला आठ विकेट राखून पराभूत केले. या सामन्यात विजय मिळवून पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाचा वन-डे मालिकेत २-१ ने पराभव केला. यासह पाकिस्तानने ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
सामन्यात नाणेफेक जिंकून पाकिस्तानने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा डाव ३१.५ षटकांत १४० धावा सर्वबाद झाला. यात ऑस्ट्रेलियाच्या शॉन ॲबॉटने सर्वाधिक ३० धावांचे योगदान दिले, तर गोलंदाजीमध्ये पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदी आणि नसीम शाह यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानने २६.५ षटकांत दोन फलंदाज गमावून हे आव्हान पार केले. फलंदाजीमध्ये सॅम आयुबने सर्वाधिक ४२ धावा केल्या, तर ऑस्ट्रेलियाकडून लान्स मॉरिसने दोन फलंदाज बाद केले.
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने १४० धावा केल्या. फलंदाजीत ऑस्ट्रेलियाच्या सहा फलंदाजांना मैदानावर फार काळ टिकता आले नाही. यात त्यांच्या सहा फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. यामध्ये जेक फ्रेझर मॅकगर्क (७), कर्णधार जोश इंग्लिस (७), कूपर कॉनोली (७), मार्कस स्टॉइनिस (८), ग्लेन मॅक्सवेल (०) आणि लान्स मॉरिस (०) यांचा समावेश आहे.
ऑस्ट्रेलियाकडून शॉन ॲबॉटने सर्वाधिक ३० धावा केल्या. त्याच्यासह मॅथ्यू शॉर्ट (२२), ॲरॉन हार्डी (१२), ॲडम झाम्पा (१३), बाद झाले, तर स्पेन्सर जॉन्सन १२ धावांवर नाबाद राहिला. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदी आणि नसीम शाह यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले, तर हरिस रौफने दोन गडी बाद केले. मोहम्मद हसनैनला एक विकेट मिळाली.
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानावर आलेल्या पाकिस्तानच्या सलामीवीरांनी संघाला चांगली सुरूवात करून दिली. सॅम अयुब आणि अब्दुल्ला शफीक यांनी ८४ धावांची सलामी दिली. शफीक ५३ चेंडूत ३७ धावा करून बाद झाला, तर सॅम अयुब ५२ चेंडूत चार चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने ४२ धावा करून बाद झाला. यानंतर बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी डावाची धुरा आपल्याकडे घेत संघाला विजय मिळवून दिला. यात रिझवान आणि बाबर यांनी ५८ धावांची भागीदारी केली. ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजीत लान्स मॉरिसने दोन गडी बाद केले.
२२ वर्षांनी ऑस्ट्रेलियात मालिका विजय
पर्थमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव करून पाकिस्तानने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. पाकिस्तानने २२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाचा मायभूमीत द्विपक्षीय वन-डे मालिकेत पराभव केला. याआधी पाकिस्तानने २००२ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध द्विपक्षीय वन-डे मालिका २-१ ने जिंकली होती.
ऑस्ट्रेलियाविरुद्धची वनडे मालिकेत पाकिस्तानची कामगिरी
- पाकिस्तान २-१ ने विजयी (२०२४)
- ऑस्ट्रेलिया ४-१ ने विजयी (२०१७)
- ऑस्ट्रेलिया ५-१ ने विजयी (२०१०)
- पाकिस्तान ३-२ ने विजयी (२००२)
मेलबर्न, वृत्तसंस्था : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २२ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाने पहिल्या कसोटी सामन्यासाठी संघ जाहीर केला आहे. यातून भारतीय संघासाठी ऑस्ट्रेलियाने एक खास सरप्राईज दिले आहे. भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यातील मालिकेत शानदार कामगिरी करणाऱ्या नॅथन मॅकस्विनीचा ऑस्ट्रेलियाने पहिल्या कसोटीसाठी संघात स्थान दिले आहे.
काय आहे भारतासाठी सरप्राईज?
या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने आधीच आपला संघ जाहीर केला आहे. या ट्रॉफीतील पहिला सामना पर्थच्या स्टेडियमवर होणार आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीआधी भारताचा अ संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर होता. यात ऑस्ट्रेलियाने भारतावर मालिकेत २-० असा एकतर्फी विजय मिळवला होता. या मालिकेत शानदार कामगिरी करणाऱ्या नॅथन मॅकस्विनीला ऑस्ट्रेलियाने मालिकेतील पहिल्या सामन्यात संधी दिली आहे.
कोण आहे नॅथन मॅकस्विनी?
भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्याच झालेल्या दोन अनधिकृत कसोटी सामन्यात नॅथनने शानदार कामगिरी केली होती. भारताविरुद्ध खेळताना त्याने दोन सामन्यांच्या चार डावांत ५५.३३ च्या सरासरीने १६६ धावा केल्या. डेव्हिड वॉर्नरने घेतलेल्या निवृत्तीनंतर ऑस्ट्रेलियाला अजून कायमस्वरूपी सलामीवीर सापडलेला नाही. यामुळे बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात डेव्हिड वॉर्नरच्या जागी नॅथन सलमी करण्याची शक्यता आहे.
नॅथनबाबत काय म्हणाले जॉर्ज बेली
याआधीच ऑस्ट्रेलियाचे मुख्य निवडकर्ता जॉर्ज बेली यांनी स्पष्ट केले होते. या मालिकेत स्टीव्ह स्मिथ त्याच्या जुन्या क्रमावरच फलंदाजी करताना दिसेल. नॅथनबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले, की त्याने भारताविरुद्धच्या सामन्यात आपली पात्रता सिद्ध करून दाखवली आहे. यासह त्याने शानदार कामगिरी करत अनेक विक्रम रचले आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये केलेल्या कामगिरीच्या जोरावर त्याला ही संधी दिली आहे.
पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ : पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, मिच मार्श, नॅथन मॅकस्विनी, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), आर. अश्विन, आर. जडेजा, आर. मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.
राखीव खेळाडू : मुकेश कुमार, नवदीप सैनी, खलील अहमद.
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचे वेळापत्रक
पहिली कसोटी : २२ ते २६ नोव्हेंबर, पर्थ
दुसरी कसोटी : ६-१० डिसेंबर, ॲडलेड
तिसरी कसोटी : १४-१८ डिसेंबर, ब्रिस्बेन
वृत्तसंस्था : गेल्या काही काळापासून भारतीय क्रिकेट संघाला ग्रहण लागले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत ३-० ने पराभव स्वीकारावा लागला होता. यामुळे भारतीय संघाला टीकांना सामोरे जावे लागत आहे. यासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेतील अव्वल स्थानही धोक्यात आले. यानंतर भारतीय संघ पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. परंतु, याआधीच ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असलेल्या भारतीय अ संघाला मोठा दणका बसला आहे. या मालिकेत भारतीय अ संघाचा ऑस्ट्रेलियाने मोठा पराभव केला आहे.
न्यूझीलंडने ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला क्लीन स्वीप देत ऐतिहासिक कामगिरी केली होती. या मालिकेत किवी संघाने भारताचा ३-० ने पराभव केला होता. या पराभवामुळे भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठा फटका बसला. टीम इंडियाला गुणतालिकेत अव्वल स्थान गमवावे लागले. भारताला आता २२ नोव्हेंबरपासून पर्थमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावसकर ट्रॉफी खेळायची आहे. या ट्रॉफीमध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे, परंतु सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असणाऱ्या भारतीय अ संघाला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
मेलबर्न येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात यजमान ऑस्ट्रेलिया अ संघाने भारत अ संघाचा ६ गडी राखून पराभव केला. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय अ संघाचा पहिला डाव अवघ्या १६१ धावांवर आटोपला. यात ध्रुव जुरेलने एकाकी झुंज दिली. त्याच्या व्यतिरिक्त एकाही खेळाडूला विशेष कामगिरी करता आली नाही. भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या अ संघाने २२३ धावा केल्या. दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. परंतु भारताचा दुसरा डाव २२९ धावांवर आटोपला. यातही ध्रुव जुरेलने सर्वाधिक ६८ धावांची मोलाची खेळी केली.
सामन्यात विजय मिळवण्यासाठी ऑस्ट्रेलियासमोर १६८ धावांचे आव्हान होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारत अ संघाच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलिया अ संघाला सुरुवातील धक्का दिला. परंतु ऑस्ट्रेलियाच्या सॅम कोन्स्टासने केलेल्या नाबाद ७३ आणि ब्यू वेबस्टरच्या नाबाद ४६ धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने सहा विकेट राखून सामन्यात विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलिया अ संघाने २ अनधिकृत सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताचा २-० ने पराभव केला. या मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ७ विकेट राखून पराभव केला होता.
वृत्तसंस्था : इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन सध्या चर्चेत आहे. त्याने सांगितले होते की, त्याला २०२५ मध्ये होणाऱ्या आयपीएल हंगामात खेळायचे आहे. यासाठी अँडरसनने यंदाच्या आयपीएलसाठी होणाऱ्या मेगा लिलावात आपल्या नावाची नोंदणीही केली आहे. दरम्यान, त्याने निवृत्तीबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
‘मी ५० वर्षांचा होईपर्यंत खेळलो असतो’
एका मुलाखतीत बोलताना अँडरसनने सांगितले की, मला संधी मिळाली असती, तर मी वयाच्या पन्नाशीपर्यंत इंग्लंडकडून कसोटीत खेळलो असतो. मी पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि चांगली कामगिरी करत आहे, असे मला वाटते. अँडरसन इंग्लंडच्या सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत ७०० हून अधिक विकेट घेतल्या आहेत.
आयपीएल खेळण्याची अँडरसनची इच्छा
कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर जेम्स अँडरसनला नवी इनिंग सुरू करायची आहे. त्याला आपल्या नव्या इनिंगची सुरुवात आयपीएलच्या मैदानातून करायची आहे. मुलाखतीत तो पुढे म्हणाला की, लिलावात जाण्याचा उद्देश हा आहे की, मला पुन्हा खेळायचे आहे. आयपीएल हंगामात माझी निवड होईल की नाही, हा वेगळा मुद्दा आहे. मी तंदुरुस्त आहे, मी अजूनही गोलंदाजी करत आहे आणि मला वाटते की, मी चांगल्या स्थितीत आहे, त्यामुळे मला कुठेतरी खेळण्याची संधी मिळाली तर छान होईल.
अँडरसनने आपल्या कारकिर्दीतील शेवटचा टी-२० सामना २०१४ साली खेळला होता. याआधी अँडरसन कधीही आयपीएलमध्ये खेळलेला नाही. त्याने २४ आणि २५ नोव्हेंबरला होणाऱ्या लिलावासाठी स्वतःची नोंदणी केली आहे. यात त्याने स्वतःची मूळ किंमत १.२५ कोटी रुपये ठेवली आहे. पुढे अँडरसन म्हणाला की, सर्वात मोठ्या टी-२० लीगमध्ये खेळून, त्याला केवळ गोलंदाज म्हणून आपले ज्ञान वाढवायचे नाही, तर प्रशिक्षक म्हणून अनुभव आणि ज्ञान मिळवायचे आहे.
वृत्तसंस्था : भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघाला बॉर्डर-गावसकर ट्रॉफीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच कसोटी सामने खेळायचे आहेत. या ट्रॉफीबाबत ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू रिकी पाँटिंगने मोठी भविष्यवाणी केली आहे.
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू रिकी पाँटिंगने भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. यात त्याने ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करणारा आणि सर्वाधिक बळी घेणाऱ्या खेळाडूंबद्दल त्याने सांगितले आहे. ट्रॉफीमधील विजेत्या संघाबाबतही त्याने आपले मत मांडले आहे. आगामी बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियन संघ भारताचा ३-१ अशा फरकाने पराभव करेल, असे त्याने भाकित केले आहे. यासह मोहम्मद शमीच्या दुखापतीमुळे संघात नसल्यामुळे संघाचे नुकसान झाल्याचे त्याला वाटते.
कोणता फलंदाज करणार सर्वाधिक धावा
आपले भाकित करताना पाँटिंगने सांगितले, की ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर कसोटी सामन्यात विजय मिळवण्यासाठी भारताला २० फलंदाजांना बाद करावे लागेल. ही कामगिरी करणे भारतीय संघासाठी कठीण असेल. परंतु अशी कामगिरी केली तरच भारतीय संघाला सामन्यात विजय मिळवता येईल. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूबद्दल बोलताना पाँटिंग म्हणाला की, मला असे वाटते या मालिकेत ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ किंवा भारताचा रिषभ पंत सर्वाधिक धावा करू शकतो.
स्मिथ चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करेल : पाँटिंग
पुढे बोलताना पॉटिंग म्हणाला, की भारताविरुद्घ खेळताना स्टीव्ह स्मिथ चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरू शकतो. यामुळे सामन्यात चांगली कामगिरी करण्याची शक्यता आहे. ज्या-ज्यावेळी स्टीव्हने संघासाठी सलामी दिली आहे. त्यावेळी त्याला चांगली धावा करण्यात अपयश आले आहे. त्यामुळे त्याने खालच्या क्रमांकावर फलंदाजी केलेले चांगले राहील.
ऑस्ट्रेलियापुढे रिषभचे आव्हान
भारतीय संघात रिषभ पंतचे संघात असणे संघाला आव्हानात्मक ठरू शकते. मधल्या फळीत खेळताना रिषभचा फॉर्म संघासाठी फायद्याचा ठरतो. चेंडूची चमक आणि कडकपणा कमी झाल्यानंतर तो अधिक आक्रमक फलंदाजी करतो. यामुळे पंतला मालिकेत सर्वाधिक धावा करण्याची संधी आहे. यामुळे तो मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंपैकी एक असू शकतो.
कोणता गोलंदाज घेणार सर्वाधिक विकेट?
ऑस्ट्रेलियाच्या वेगवान खेळपट्यांवर वेगवान गोलंदाजांना विकेट घेण्याची संधी आहे. यात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड सर्वाधिक विकेट घेऊ शकतो, असे भाकित केले आहे.
पाँटिंग म्हणाला, ‘हेझलवूड सध्या शानदार कामगिरी करत आहे. त्यामुळे मी त्याला या मालिकेतील अव्वल विकेट घेणारा गोलंदाज मानतो.’ भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली कसोटी २२ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या महत्त्वाच्या मालिकेमुळे आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीचे चित्र स्पष्ट होऊ शकते. ऑस्ट्रेलिया आणि भारत सध्या टेबलमध्ये अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत.
वृत्तसंस्था : न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील पराभवानंतर भारतीय संघाला पाठोपाठ धक्के बसत आहेत. आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या कसोटी क्रमवारीत भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीची घसरगुंडी झाली आहे, तर निराशाजनक कामगिरीमुळे कर्णधार रोहितचेही नुकसान झाले आहे. ऋषभ पंतची थोडी सुधारणा झाली आहे. नव्या क्रमवारीत विराट कोहली टॉप २० फलंदाजांच्या यादीतून १० वर्षांच्या कालावधीनंतर बाहेर गेला आहे.
आयसीसीने जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत ९०३ रेटिंगसह इंग्लंडचा जो रूट अजूनही पहिल्या स्थानावर आहे, तर न्यूझीलंडचा केन विल्यमसन ८०४ रेटिंगसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. नव्या क्रमवारीत इंग्लंडच्या हॅरी ब्रूकला एका स्थानाचा फायदा झाला आहे. तो आता ७७९ रेटिंगसह तिसऱ्या क्रमांकावर आला आहे.
विराटची घसरगुंडी
विराट कोहलीची आयसीसीच्या ताज्या कसोटी क्रमवारीत ८ स्थानांनी घसरण झाली आहे, तर रोहित शर्मा क्रमवारीत ६२९ रेटिंगसह २६ व्या क्रमांकावर आहे. विराटने यावर्षी एकूण ६ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने २२.७२ च्या सरासरीने केवळ २५० धावा केल्या आहेत. यात त्याने केवळ १ अर्धशतक झळकवले आहे.
पंतची क्रमवारीत सुधारणा
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत यशस्वी जैस्वाल मुंबई कसोटीत विशेष कामगिरी करू शकला नाही. त्यामुळे त्याची ताज्या क्रमवारीत एका स्थानाने घसरण झाली आहे. त्यामुळे क्रमवारीत ७७७ रेटिंगसह चौथ्या स्थानावर घसरला आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ ७५७ रेटिंगसह पाचव्या स्थानावर आहे. मालिकेतील अखेरच्या सामन्यात रिषभ पंतने इतर फलंदाजांच्या तुलनेत चांगली कामगिरी केली. यामुळे त्याला क्रमवारीत फायदा झाला आहे. क्रमवारीत ७५० रेटिंगसह तो सहाव्या स्थानावर पोहोचला आहे.